आज मंदिरातील संगमरवर फोडला तसा,
आतील दगडांनी हलकेच श्वास घेतला,
शतकांच्या शांततेत अडकलेला हुंदका
पहिल्यांदाच ओठांवर येऊन थबकला.
त्या शुभ्र, गार थराखाली
कितीतरी वेदना गाडून ठेवल्या होत्या,
आरतीच्या प्रकाशामागे
अंधाराने स्वतःच्या जखमा झाकल्या होत्या.
भक्त येत होते, हात जोडत होते,
देवापाशी सुखांची याचना करत होते,
पण त्या भिंतींमध्ये कुठेतरी
दुःखही रोज नतमस्तक होत होतं.
घंटांच्या आवाजात हरवून गेले होते
काही न बोलेले प्रश्न,
धूपाच्या धुरासोबत विरघळत होते
मनातले कितीतरी आक्रोश.
आज जेव्हा हातोड्याचा पहिला घाव बसला,
तेव्हा मंदिर थोडंसं हादरलं,
आणि आत खोलवर दडलेला
एक कैद श्वास मोकळा झाला.
संगमरवर तुटत गेला तसा
दगडही जिवंत भासू लागले,
आणि ते निःशब्द देऊळ अचानक,
श्वास घेणारं मंदिर होऊन गेलं.
त्यांच्या छातीतही कुठेतरी
वेदनांचे पक्षी फडफडू लागले.
कळलं मग,
प्रत्येक सुंदर वस्तूच्या आत
एक तडा लपलेला असतो.
लोकांना दिसतात फक्त शिखरं,
कोरलेली नक्षी, दिव्यांची झळाळी,
पण पाया मात्र शांतपणे
साऱ्या वेदनांचं ओझं वाहत असतो.
आज मंदिरातील संगमरवर फोडला तसा,
आतील दगडांनी रडून घेतलं,
आणि वर्षानुवर्षे गोठलेलं दुःख
पहिल्यांदाच पावसासारखं बरसलं.
कारण काही वेळा तुटणं म्हणजे अंत नसतो,
तो तर नव्या श्वासाचा आरंभ असतो,
जिथे वेदनांनाही आवाज मिळतो,
आणि दगडांनाही श्वास मिळतो.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212