देवाचा खरा पत्ता

मंदिरात दिवे पेटवले,
पण मनात अंधारच दाटला असेल,
ओठांवर प्रार्थनेचे शब्द असतील
आणि हृदय मात्र रिकामंच असेल,
तर सांग, असा देव कशाला?

हात जोडून उभं राहिलो,
पण तेच हात कुणासाठी पुढे आले नाहीत,
डोळे मिटून नमस्कार केला,
पण डोळ्यांत करुणेचे थेंब दाटले नाहीत,
तर अशी भक्ती कशाला?

भुकेल्या माणसाला भाकरी न देता
देवाला फुलांचा हार अर्पण केला,
रडणाऱ्याच्या खांद्यावर हात न ठेवता
मंदिरात घंटांचा गजर केला,
तर असा देव कशाला?

देव जर खरोखर कुठे असेल,
तर तो माणसांतच सापडतो
एखाद्या हसण्यात,
एखाद्या मदतीच्या हातात,
एखाद्या निरागस प्रेमात
तो शांतपणे फुलत असतो.

म्हणून मंदिर दूर कुठे नाही,
ते आपल्या वागण्यातच उभं असतं.
एखाद्याच्या अश्रूंना हात लावला,
एखाद्याच्या वेदनेला आधार दिला,
एखाद्याच्या भुकेला भाकरी दिली,
तिथेच देव शांतपणे उभा असतो.

आपण जर माणुसकी जपली,
तर देव शोधायला कुठेच जावं लागत नाही,
कारण माणसाच्या हृदयातच
देवाचा खरा पत्ता लिहिलेला असतो.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author