उद्योगाचे 4 थे आवर्तन – नवीन लाडका शब्द की एक संधी

उद्योग क्षेत्रात ५० वर्षे वावरल्यानंतर, वारंवार वापरले जाणाऱ्या नवनवीन लाडक्या शब्दांबद्दल मी जरा सावधच असतो. काही वेळा तर असे नवीन शब्द वा घोषणा म्हणजे ‘बाटली नवीन पण दारू तीच’ अशी परिस्थिती असते. अशा शब्दांचा संध्याकाळच्या सोशल पार्टीमध्ये वापरण्यापलीकडे फारसा उपयोग नसतो. असे शब्द फारसे टिकत पण नाहीत. मात्र काही नवीन शब्द त्यांच्यामधील बळकट संकल्पनेमुळे काळाच्या प्रवाहात टिकून रहातात. उदा. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट [TQM], रिव्हर्स इंजिनियरिंग इ.



उद्योग क्षेत्रात ५० वर्षे वावरल्यानंतर, वारंवार वापरले जाणाऱ्या नवनवीन लाडक्या शब्दांबद्दल मी जरा सावधच असतो. काही वेळा तर असे नवीन शब्द वा घोषणा म्हणजे ‘बाटली नवीन पण दारू तीच’ अशी परिस्थिती असते. अशा शब्दांचा संध्याकाळच्या सोशल पार्टीमध्ये वापरण्यापलीकडे फारसा उपयोग नसतो. असे शब्द फारसे टिकत पण नाहीत. मात्र काही नवीन शब्द त्यांच्यामधील बळकट संकल्पनेमुळे काळाच्या प्रवाहात टिकून रहातात. उदा. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट [TQM], रिव्हर्स इंजिनियरिंग इ.

सर्वसामान्य माणसाला समजेल अशा स्वरूपात मी इंडस्ट्री ४.० ही संकल्पना येथे मांडत आहे. इंडस्ट्री ४.० [चौथी औद्योगीक क्रांती] ही कल्पना २०११ च्या सुमारास जर्मनी मध्ये उदयास आली. या संकल्पनेच्यामागील उद्दिष्ट असे, ‘औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धाक्षमतेत लक्षणीय सुधारणा’.

नजीकच्या काळात यापूर्वी तीन औद्योगिक क्रांती घडून आल्या ज्यांनी मानवाच्या दैनंदिन जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले. या बदलांमुळे जीवनपद्धती आधुनिक झाली, जीवन जास्त सुसह्य झाले पण जास्त धावपळीचे आणि अनिश्चितही झाले.

[१] औद्योगिक क्रांती १. – वाफेच्या इंजिनाचा शोध [१७६० ते १९०० हा कालखंड], सर्व क्षेत्रात, मानवी जीवन सुलभ करणारे, खूप नवनवीन शोध लागले. शेतीप्रधान सामाजव्यवस्थेचे शहरीकरण सुरु झाले.

[२] औद्योगिक क्रांती २. – कालखंड १९०० ते १९७०. हा काळ शास्त्र आणि यंत्रांच्या मदतीने फार मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा समजला जातो. या काळात विविध क्षेत्रात अनेक महत्त्वाचे नवीन शोध चालूच होते. जगाला आधुनिकतेकडे नेणारा कालखंड असे याचे स्वरूप ओळखले जाते.

[३] औद्योगिक क्रांती ३. – १९५० ते २०१० च्या पुढचा काळ डिजिटल टेक्नॉलॉजीचा काळ म्हणून ओळखला जातो. सेमीकंडक्टरचा शोध, मोठ्या प्रमाणात संगणकीकरण, इंटरनेटचा प्रसार, कित्येक जुनी उपकरणे व तंत्रज्ञाने वापरातून कायमची गेली आणि संपूर्णपणे नवीन प्रकारची उपकरणे वापरात आली. आपण एकमेकांशी संवाद कोणत्या माध्यमातून साधतो या सर्वांचा संबंध या औद्योगिक कालखंडाशी येतो.
या तीन प्रकारच्या औद्योगिक क्रांतीमुळे आपण गतिमान आरामदायी आधुनिक जीवन जगत आहोत. साध्या साध्या कामासाठी सुद्धा विविध इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे आपल्या हाताशी आली.

[४] आता आपण सर्वजण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दारावर आहोत. ही क्रांती इंडस्ट्री 4.0 म्हणून ओळखली जाते. यावेळी औद्योगिक क्रांतीला अधिक ताकद प्राप्त झाली आहे ती क्लाऊड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि कोग्निटीव कॉम्प्युटिंग या चार संकल्पनांमुळे. त्याला मदत होत आहे ती अतिप्रचंड माहितीचे [data] अती द्रुतगतीने संगणन [ Computing] करण्याच्या क्षमतेची आणि ती माहिती झटकन कुठेही पोहोचविण्याची.

चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया यांमध्ये अकल्पित प्रमाणात ऑटोमेशन आणि माहितीचे अतिजलद संगणन यांच्या मदतीने आमूलाग्र बदल घडून येणार आहेत. आता माणसाला अथवा मशीनला अशक्य वाटणारी कामे नवीन पद्धतीत अगदी सहजी शक्य होणार आहेत.

प्रत्येक क्षेत्रात खूप सेन्सर्सचा [sensors] वापर करून एखाद्या प्रक्रियेतील अनेक मापदंड [parameters] सतत तपासले जातील. AI [ यांत्रिक मेंदू ] या प्रचंड माहितीचे झटकन संगणन करून निष्कर्ष काढेल आणि उपाय ही सुचवेल. यंत्रमानव [रोबोट] सर्रास वापरात येतील. ते माणसास अशक्य अथवा असुरक्षित असणारी कामे लीलया करतील.

अशा प्रकारचे एक उदाहरण विचारात घेऊया. साधारणपणे मशीन अथवा वाहनाचे बेअरिंग खराब झाले की मगच समजते आणि मग ते मशीन अथवा उत्पादन बंद पडते. त्यानंतर ते खराब बेअरिंग बदलण्याचे काम कर्मचारी करतो. भविष्यकाळात सेन्सर सातत्याने बेअरिंगचे तापमान, आवाज आणि कंपन याची माहिती सतत संकलित करतील. AI जमा केलेल्या माहितीनुसार ते बेअरिंग खराब होण्याच्या जरा आधी बदलून टाकण्याचा संदेश देईल. यंत्रमानव अथवा कामगार ते बेअरिंग उत्पादन बंद न होईल अशातऱ्हेने बदलून टाकतील. याचा मुख्य फायदा म्हणजे सर्व सुट्या भागांचा आवारात साठा करण्याची गरज पडणार नाही. सध्या असे पुष्कळसे स्पेअर पार्ट खूप मोठी किंमत देऊन आणि स्टोअर्स मधील मोठी जागा व्यापून साठवावे लागतात. एकीकडे ते कधी उपलब्ध नसल्यास उत्पादनाचे काम बंद पडते, तर त्यांचा योग्य काळात उपयोग न करावा लागल्यास फेकूनही द्यावे लागतात. त्यामुळे सुटे भाग खरेच गरजेचे असतात तेव्हाच आणले जातील व खर्चात बचत होईल. हे खरेदी विक्रीचे काम सुद्धा घेणारा आणि विकणारा यांचेकडील कॉम्प्यूटर [संगणक] परस्पर करतील. या नव्या औद्योगिक क्रांतीमध्ये मशीन सर्व ३६५ दिवस २४ तास विनातक्रार काम करत असल्याने उत्पादकता खूपच वाढते. सुट्ट्या, आजारपणाच्या रजा, संप, आळस, कंटाळा, मानवी चुका याची पण भीती रहात नाही. यामुळे संस्थेची बाजारातील स्पर्धा करण्याची कुवत वाढते.

अती छोट्या चिप्स शरीरात बसवून त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या विषयीचे मापन करणे शक्य आहे. इतकेच नव्हे तर अशा चिप्स आणि संलग्न यंत्रणेमुळे प्रतिबंधात्मक सिग्नल पण दर्शवले जातात, तब्बेतीमध्ये [health हेल्थ] काही अनपेक्षित नकळत बदल झाले तर समस्या निर्माण होण्यापूर्वी सूचना मिळतात.

शेती क्षेत्रात सुद्धा काही मापदंडांचे सतत मोजमाप करून त्या आधारे शेती उत्पादनावर लक्ष ठेवले जाते. त्याचप्रमाणे शेतीतील उत्पादन वाढावे याचे उत्तम व्यवस्थापन केले जाते. वरील छोटी उदाहरणे औद्योगिक क्रांति 4.0 चे काही परिणाम औद्योगिक क्षेत्रात कसे झाले आणि होत आहेत, याची आहेत.

क्लाऊड कॉम्प्युटिंग मध्ये अतिप्रचंड कॉम्प्युटर्सचा आणि इंटरनेटचा वापर करून नवीन शक्यता निर्माण केल्या गेल्या आहेत. येत्या काळात क्लाऊड कॉम्प्युटिंगचा वापर अतिप्रचंड प्रमाणात वाढणार आहे. उदा. Gmail, IBM क्लौड [cloud], ड्रोपबॉक्स.

इंटरनेट ऑफ थिंग्ज [Internet of Things (IoT)] – एकमेकांना जोडलेल्या कॉम्पुटर आणि मशीन मुळे माणसाला दुसऱ्या माणसावर अथवा कॉमप्यूटरवर कमी अवलंबून रहावे लागेल.

प्रत्येक व्यक्तीला इंटरनेटवरील सर्व व्यवहारांसाठी एक खास आयडेनटीटी नंबर [UID] असेल. इंटरनेट ऑफ थिंग्ज यामुळे चालका विना मोटर चालवणे अशा गोष्टी शक्य झाल्या आहेत. कुठल्याही प्रकारची माहिती तत्क्षणी मिळू शकत आहे. एकमेकाशी परस्पर संबंध साधून योग्य काम करणारी घरगुती उपकरणे आणि सुरक्षा यंत्रणा आता शक्य झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता [Artificial Intelligence] ही संगणन शास्त्राची एक मोठी विस्तारित शाखा आहे. मानवी बुद्धिमत्ता मशीन मध्ये सामावून घेतलेल्या प्रोग्राम स्वरूपात असते. मानवी मेंदू प्रमाणेच मशीन विचार आणि काम करतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते ते म्हणजे स्वतःच मार्ग शोधून योग्य काम करत असल्याने विशिष्ट ध्येय गाठणे सहज शक्य होते. या तंत्राचा वापर मोबाईलच्या काही मॉडेलमध्ये केला जातो. तसेच गूगल सर्च, इंटरनेटवरील विक्रीसाठी आणि विमानात ऑटो-पायलट मध्येही याचा उपयोग केला जातो.

उदा. chatGPT, गुगल बार्ड इत्यादी.

cognitive computing – मानवासारखे विचार करण्याची क्षमता असलेले संगणन. सखोल विचार करण्याची क्षमता, भावनांचे विश्लेषण यामध्ये मोडतात. उदा. आरोग्य निदान, आर्थिक व्यवहार आणि खेळातील कौशल्य सुधारण्यात याचा खूप उपयोग केला जातो.

वरील सर्व संकल्पनांचे अगणित उपयोग सर्व क्षेत्रात आहेत जे आज विचारांच्या पलीकडे आहेत. विकसित पाश्चात्त्य देशांमध्ये याचे फायदे जास्त झालेले दिसतात. तसेच भारतात पण हे फायदे दिसू लागले आहेत.

या चारही संकल्पनांची, विशेष करून आयटी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रात सध्या प्रचंड मागणी वाढली आहे आणि फार जोरात वाढत आहे. आज औद्योगिक क्रांती ४.० च्या संकल्पना महाग वाटत असल्या तरी जशी मागणी वाढेल तसतशी यंत्रमानवाची आणि सेन्सर्सची किंमत कमी होत जाईल. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना तेवढेच आकर्षक पगार सुद्धा दिले जातात त्यामुळे या क्षेत्रात काम करणार्‍यांचे राहणीमान खूप सुधारले आहे. एकूण भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारत एक आर्थिक महासत्ता होण्यास ही औद्योगिक क्रांती खूप मदत करणार आहे.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचा विचार करता त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम पण विचारात घेतले पाहिजेत. कोणत्याही प्रोसेस किंवा प्रगतीच्या बाबतीत मनुष्य महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सर्व गोष्टींचा प्रारंभ करणारा तोच असतो. हाताने निर्माण करणारा माणूसच असतो. प्रत्यक्ष वापर करणारा माणूसच असतो. याचा अर्थ औद्योगिक क्रांती चौथीचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडणार आहे मग ती व्यक्ती समाजात कुठेही असो.

आत्तासुद्धा, ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे शिक्षणासाठी आणि रोजगार शोधण्यासाठी जाणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. शेती व्यवसाय दुर्लक्षित होत आहे. तर शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या खुप वाढल्या आहेत. उपलब्ध सार्वजनिक सेवांवर मागणी भरपूर वाढत आहे. वाहतूक, रस्ते, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, निवास व्यवस्था यावर शहरी लोकसंख्येचा ताण वाढला आहे. शहरात प्रदूषण प्रमाण वाढले आहे. यावर कमी खर्चिक उपाय शोधावेच लागतील.

अजून काही परिणाम म्हणजे श्रमशक्तीवर अवलंबून असणाऱ्या नोकऱ्या कमी कमी होत जाणार आहेत. मानवी बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले असून आकडेमोड करणे अथवा समस्यांचे विश्लेषण यासाठी बुद्धिमत्ता वापरावी लागत होती ती कामे संगणक करू लागले आहेत. यामुळे बेकारी वाढू शकते. लोकांना नवीन कौशल्ये शिकावी लागतील. तसेच सरकारला कामगार विषयक कायद्यांचा पुनर्विचार करावा लागेल.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचा झालेला अजून एक परिणाम म्हणजे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होणे. मोठ्या कंपन्या अजून जास्त मोठ्या होतील. छोट्या कंपन्यांना एकमेकाशी सहकार्य करून टिकून राहावे लागेल. मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेला विकसनशील देशात तोंड द्यावे लागेल. संस्कार नीतिमुल्ये यांचा धावपळीच्या जीवनात विसर पडत चालला आहे.
मात्र या सर्व यांत्रिक धावपळीच्या जगात काही गोष्टी आशेचा किरण आहेत. आधीच्या औद्योगिक क्रांती होतांनासुध्दा अशाच काही समस्या होत्या आणि त्या काळात लोक यशस्वीपणे या समस्यांना सामोरे गेले. त्याच प्रमाणे आजची तरुण पिढीसुद्धा या चौथ्या औद्योगिक क्रांतीने निर्माण झालेल्या समस्यांना सामोरे जाण्यास समर्थ आहे. माणसाची क्षमता अचाट असून आपल्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर जगाची फेररचना करण्यास तो समर्थ आहे.

थोडक्यात काय तर औद्योगिक क्रांतीचे चौथे पर्व हा फक्त अजून एक लाडका शब्द नसून आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात प्रचंड बदल घडवून आणणाऱ्या काळाची नांदी आहे.

शक्यतो सोप्या शब्दात ह्या नवीन लाटेची माहिती देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

समजूतदार माणसांच्या हातून कधीच काही मोठे बदल घडून आलेले नाहीत !

Author