माझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील जीवनापैकी पुष्कळशी वर्षे विविध देशात कार्यरत असलेल्या एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करण्यात गेली. २००० साली माझी बदली, प्रमुख म्हणून त्या कंपनीतील एका व्यवसायात झाली की जिथे सतत पाच वर्ष वाढत्या प्रमाणात तो व्यवसाय नुकसानीत जात होता. त्या व्यवसायावर सगळीकडून टीकेचा भडीमार होत होता, साहजिकच त्यामुळे व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत होते.
माझे प्राधान्य मुख्यत्वे एकाच गोष्टीला होते ते म्हणजे व्यवसाय पूर्वपदावर, नफा मिळविण्याच्या स्थितीत आणणे आणि तेसुद्धा कमीत कमी वेळेत शक्य करणे. मला मनातून खात्री होती की हा व्यवसाय नक्कीच नफा मिळविण्याच्या स्थितीत आणता येईल. पण त्यासाठी माझ्या हातात वेळ मात्र थोडाच होता. त्यामुळे मी एक मात्र पक्के ठरवलं होतं की काहीही झालं तरी कंपनीला नफ्यात आणण्याच्या गोष्टींवरच फक्त लक्ष केंद्रित ठेवायचं. नाहीतर तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी अनंत कारणे पुढे येऊ शकतात.
साधारणपणे आपण नवीन पदावर जेव्हा रुजू होतो त्यावेळी सुरुवातीचे काही दिवस आपली परीक्षा पहाणारे असतात. [testing days] मी electronic engineer असल्याने ह्या नवीन कंपनीच्या उत्पादन प्रक्रिया आणि तंत्रज्ञान ह्याविषयी अनभिज्ञ होतो. ह्या व्यवसायात ऑटोमोबाईल इंडस्ट्री करता लागणारे घटक भाग [mechanical components] उत्पादित केले जात होते. त्यामुळे प्रारंभीच मी येथील व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती की “मित्रांनो तुम्ही सर्वजण ह्या तंत्रज्ञानामध्ये [technology] ज्ञानी आहात, तसेच उत्पादन प्रक्रिया, प्रत्यक्ष उत्पादन आणि त्याचा ग्राहकवर्ग याचे तुम्हाला परिपूर्ण ज्ञान आहे. मला मात्र हे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल. पण दुसऱ्या बाजूला नुकसानीत जाणारा व्यवसाय पुन्हा नफा मिळविण्यास सक्षम कसा करता येईल याची मला पूर्ण माहिती आहे. त्यामुळे आपण एकमेकांवर विश्वास ठेऊयात आणि आपणास जे माहित आहे त्यावर आपापले लक्ष केंद्रित करू यात.” सर्वजण माझ्या ह्या विचारांशी सहमत झाले.
अशा सुरुवातीनंतर काही दिवसांनी एके दिवशी सकाळी मी माझ्या नेहमीच्या कामात व्यग्र असताना माझ्या केबिनचा [office] दरवाजा कोणीतरी जोरजोरात ठोठावला आणि मी “या” म्हणण्याची वाट न पहाताच युनियनचे काही पुढारी आत घुसले. काहीशा आक्रमक भाषेत त्यांनी मला सांगितले की आज सकाळी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जो नाश्ता दिला तो खारट होता, खाण्यासारखा नव्हता. त्यांनी मागणी केली की मी त्वरित कॅन्टिनला भेट द्यावी आणि ही समस्या सोडवावी.
त्यांना मी थोडं हसून सांगितलं की सध्या मी माझ्या महत्वाच्या कामात व्यग्र आहे आणि त्यांनी आमच्या कॅन्टीन सुपरवायझरला भेटावे, जो अशा स्वरूपाच्या तक्रारी हाताळतो. माझे हे सांगणे त्यांनी त्वरित फेटाळून लावले आणि जास्तच मोठ्या आवाजात सांगितले की मी स्वतः कॅन्टिनला त्वरित भेट द्यावी.
माझी सहनशीलता आणि सभ्यता सांभाळत मी त्यांना समजावून सांगितले की प्रत्येकाने आपापले काम करावे, ज्यासाठी कंपनीने त्यांची नेमणूक केली आहे. कॅन्टीनमध्ये दिले जाणारे पदार्थ आरोग्यपूर्ण आणि नीट आहेत किंवा नाहीत हे तपासण्याचे काम कॅन्टीन सुपरवायझरचे आहे. माझी प्राथमिक जबाबदारी अशी आहे की कंपनीच्या कामाचे नियोजन करून ती कामे वेळेवर आणि बिनचूक कशी पार पडतील असे पहावे, आणि शिवाय कंपनीच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी आवश्यक ती कृती करावी. ज्यामुळे कंपनी नफ्यात येऊन सर्वांच्या नोकऱ्या सुरक्षित रहातील. मात्र मी दुसऱ्यांच्या कामात स्वतःला गुंतवले तर माझे माझ्या कामावरचे लक्ष उडेल. अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जर आत्ता कॅन्टीनला गेलो तर कॅन्टीन सुपरवायझरला असे वाटेल की मी त्याच्या अधिकारात हस्तक्षेप करत आहे, ज्यामुळे तो दुखावला जाईल.
एव्हढं सांगूनही त्या कामगार संघटनेचे नेते, त्यांचे समाधान न झाल्यामुळे त्यांचीच मागणी रेटत राहीले. मी अस्वस्थ झालो नाही, कारण मला माहित होते की मी नवीन असल्याने ते माझी परीक्षा पहात होते. मी स्वस्थ बसून होतो. थोड्यात वेळात बातमी आली की फ्रेश नाश्ता [snacks] तयार झाला असून तो कर्मचाऱ्यांना उपलब्ध केला जात आहे. ते कामगार नेते माझ्या केबिन मधून काहीशी कुरकुर करत त्वरित बाहेत पडले.
मी त्यावेळी जर त्यांच्या मागणीपुढे मान तुकवली असती तर पुढे सुद्धा त्यांनी मला छोट्याछोट्या प्रसंगात गुंतविले असते. माझ्याशी संबंधित नाहीत त्या विषयात लक्ष घालायला लावून माझा वेळ खर्च केला असता. माझी वृत्ती, विचारसरणी लक्षात घेऊन आमच्यात एक प्रकारचा नवीन समेट, तडजोड झाली, आणि मग पुढे त्या नेत्यांनी माझ्यावर कधीच अनावश्यक दडपण आणलं नाही. जो विषय माझा नाही त्यात लक्ष घालण्याचा आग्रह धरला नाही. परिणामी माझ्या कामावरच मी माझे संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकलो. आमच्या कंपनीचा व्यवसाय वाढला, कंपनी लवकरच नफ्यात आली.
कंपनीत आपला रोल काय, आपले काम काय ह्याबद्दल स्पष्टता असणे, आणि संवादात पारदर्शकता असणे किती महत्वाचे आहे ह्याबद्दलचा माझा विश्वास द्रुढ झाला.
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.