ध्येय, भूमिका आणि संपर्क

मी आता सेवानिवृत्त झालो आहे. पुष्कळदा माझे एकेकाळचे सहकारी माझ्या घरी गप्पा मारायला येतात. अश्याच एका प्रसंगी माझा सहकारी निलय (तो बंगाली असल्यामुळे, ह्या शब्दाचा उच्चार आम्ही निलोय असा करतो) माझ्या घरी आला आणि काही इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मला विचारले, “सर रोल,गोल आणि कम्युनिकेशन या गोष्टींची आमच्यासारख्या जुनिअर सहकाऱ्याना समजण्याची उपयुक्तता किती आहे ह्याबाबतीत तुमचे काही अनुभव सांगाल का?”



मी आता सेवानिवृत्त झालो आहे. पुष्कळदा माझे एकेकाळचे सहकारी माझ्या घरी गप्पा मारायला येतात. अश्याच एका प्रसंगी माझा सहकारी निलय (तो बंगाली असल्यामुळे, ह्या शब्दाचा उच्चार आम्ही निलोय असा करतो) माझ्या घरी आला आणि काही इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मला विचारले, “सर रोल,गोल आणि कम्युनिकेशन या गोष्टींची आमच्यासारख्या जुनिअर सहकाऱ्याना समजण्याची उपयुक्तता किती आहे ह्याबाबतीत तुमचे काही अनुभव सांगाल का?”

असे प्रश्न चांगले असतात कारण ते आपली स्मृती जागृत करतात. मी म्हणालो, “निलय, आता तू विचारतोस म्हणून एक घटना जी माझ्या स्मृतीत अजूनही ताजी आहे, ती तुझ्याशी शेअर करतो.”

काही वर्षांपूर्वी पर्यत कंपनीत अशी पद्धत होती, ती म्हणजे सर्व सिनिअर मॅनेजर्सना मदतीसाठी सेक्रेटरी दिली जात असे. कारण त्या काळात laptop, इंटरनेट, मोबाईल अश्या गोष्टी कल्पनेपलीकडच्या होत्या. त्या काळात संपर्कासाठी टेबलवर ठेवायचे काळे टेलीफोन आणि टाईपरायटर वर टाईप केलेली लखोट्यात घालून पाठवायची पत्रे हेच संपर्काचे मुख्य माध्यम होते. drawing ची प्रत काढण्यासाठी अमोनिया प्रिंटरचा उपयोग केला जात असे. सर्व प्रकारच्या प्रवासाची तिकिटे थोड्याश्या जाड कागदाचीच असत. कामगार संघटना आणि “लाल निशाणे” याच्याशी व्यवस्थापकांचा रोजचाच संबंध यायचा, तो दैनंदीन जीवनाचा एक अविभाज्य असाच भाग होता. मोबाईल आले, लॅपटॉप आले, आणि गेल्या काही दशकात घडून आलेले अनेक बदल विश्वास बसणार नाही असे आहेत. पण तरीही महत्वाची सातत्याने टिकून राहिलेली एक गोष्ट म्हणजे व्यवस्थापन तत्वे.

१९९२ साली मला दिलेल्या एका नवीन पदावर मी काम करत असताना एक लक्षात राहील अशी घटना घडली. त्या घटनेतून, त्या परिस्थितीतून जे मी अनुभवले ते आजही आठवते. मी जे अनुभवले त्याचा उपयोग भविष्यात पुष्कळ प्रसंगी मला झाला. कंपनीत एक अधिकारी म्हणून उत्पादनाशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या मी हाताळल्या होत्या. जसे की क्वालिटी, प्रोडक्शन, इंजिनीअरिंग इत्यादी. त्यानंतर मला कॉर्पोरेट क्षेत्रात एक मोठी नवीनच जबाबदारी देण्यात आली. ती राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी होती. हे काम त्यामानाने नवीन होते, त्यामुळे काम करण्यासाठी ऑफिस किंवा सेक्रेटरी असं काहीच नव्हतं. नन्तर मी एक ऑफिस उपलब्ध करून घेतलं. माझ्या कामाचा एक भाग म्हणून मला खूप प्रवास करावा लागे. त्यामुळे पुष्कळसा वेळ मी ऑफिसच्या बाहेरच असे. देशातील अनेक भागातील वितरकांनी दिलेली माहिती मी गोळा करत असे. माझ्या प्रवासाचे नियोजन, संकलित केलेली माहिती एकत्रित करणे यासाठी मला सेक्रेटरीची गरज होती.

ह्या दृष्टीने शोध घ्यावयास सुरुवात केली. कंपनीतलाच एखादा कर्मचारी माझ्या सेक्रेटरीचे काम करू शकेल असा मिळाला तर तसा घ्यावा नाहीच मिळाला तरच मग बाहेरून नवीन माणूस घ्यावा असा विचार मी करत होतो. ज्यांनी ज्यांनी मोठ्या कंपनीत काम केलेले असेल त्यांना कल्पना असेल की कोणीही मॅनेजर सहसा आपल्या विभागातला कर्मचारी दुसऱ्या विभागाला देण्यास तयार नसतो. एखादा कर्मचारी अतिरिक्त असेल तरीही त्याला हलविण्याची त्याची तयारी नसते. मात्र एखादा कर्मचारी डोईजड झाला असेल तर मात्र त्याला दुसऱ्या विभागात हलवायला तो मॅनेजर एकदम उत्सुक असतो.

अशीच गोष्ट नन्तर घडली. मिस मेरी नावाच्या सेक्रेटरीला मी घ्यायला तयार आहे का अशी मला विचारणा करण्यात आली. संपूर्ण कंपनीत मेरीची ओळख शिष्ठ, अजिबात सहकार्य न करणारी कर्मचारी अशी होती. एकतर ती काम टाळत असे किंवा कामात दिरंगाई करीत असे. मात्र तिला कर्मचारी संघटनेचे पाठबळ होते ज्यामुळे मॅनेजर लोकं तिच्याकडे दुर्लक्षच करीत असत. तिला जास्त कामच दिले जात नसे. त्याचेही तिला काही वाटत नसे. थोडक्यात काय तर ती चांगलीच निर्ढावलेली होती.

माझी तातडीची गरज आणि निवड करण्यास पर्यायच नसल्याने मी सेक्रेटरी म्हणून तिला घ्यायला तयार झालो. मला हे पूर्णपणे माहित होते की माझे काही सहकारी या निर्णयासाठी मला मनातून हसले असतील. मी मात्र या निर्णयाकडे वेगळ्या दृष्टीने पाहत होतो. एखाद्या कर्मचाऱ्याला सुधारण्यासाठी माझे व्यवस्थापन कौशल्य वापरण्याची ही एक चांगली संधी आहे असं मला वाटलं. मेरीने माझ्या खात्यात केलेली ट्रान्स्फर अश्या करता स्वीकारली असावी की आपला बॉस प्रवासामुळे पुष्कळसा कंपनीपासून दूरच असतो त्यामुळे आपल्याला फार काम करावे लागणारच नाही.

प्रारंभीचे काही दिवस मी मेरीच्या कामाचे फक्त निरीक्षण करत होतो, तिच्या कामाची पद्धत समजावून घेत होतो. ती स्वतः पुढाकार घेऊन किती काम करते ते पहात होतो. तिची लंचची वेळ, चहाची वेळ ह्याकडे माझे फार लक्ष नव्हते. हळूहळू माझ्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे तिच्या कामाच्या टेबलावर कधी धूळ नसते, टेबलावरच्या फाईल्स नीट ठेवलेल्या असत, तिचे पेहेराव आणि केस नीट असत, इंग्लिश भाषेवर तिचे चांगले प्रभुत्व होते इत्यादी.

थोड्याच दिवसात तिच्याबद्दल माझ्याकडे तक्रारी यायला सुरुवात झाली. टेलिफोन वर बोलताना तिची भाषा असभ्य आणि परखड आहे, ती दिलेली आश्वासने पाळताना दिरंगाई करते, काहीवेळा तर कबूल केलेली आश्वासने पूर्ण करतच नाही, इत्यादी. आता मात्र मी ह्यात लक्ष घालावे अशी योग्य वेळ येऊन ठेपली होती.

तिच्याबद्दल मी केलेली चांगली निरीक्षणे मी तिला सांगितली. तसच माझ्या नवीन कामाची आणि माझ्यावर असलेल्या जबाबदारीची तिला कल्पना दिली. माझ्या कामाची व्याप्ती आणि कंपनीत त्याचे काय महत्व आहे हेही तिला सांगितले. त्यामुळे आपल्या दोन माणसांच्या टीममध्ये तिच्याकडून मला वेळेवर मदत मिळणे किती गरजेचे आहे हेही समजावून सांगितलं. सारे सांगून झाल्यावर आमची मिटिंग तेथे संपली. तिचा चेहरा जरी निर्विकार असला तरी डोळ्यात चमक आणि जरा उत्सुकता वाटली. तिच्यासमोर मी जे आमच्या दोघांच्या एकत्रित जबाबदारीचे चित्र उभे केले होते त्याचा तो परिणाम असावा.

त्यानंतर मी लेखी स्वरुपात माझ्या कामाचे स्वरूप तिला दिले आणि तिच्याकडून मला काय अपेक्षित आहे हेही लेखी स्वरुपात तिला दिले. तिने काय करावे आणि काय करू नये हेही तिला स्पष्ट केले. मी प्रवासामुळे विभागात नसताना तिने कोणती कामे पार पाडावीत हेही परत एकदा सांगितले. हे करताना तिला दोषी किंवा अपराधी वाटेल असे मी काहीही बोललो नाही. अर्थात तिच्याकडून मी काय काम अपेक्षित करतो हे साध्या सोप्या सरळ भाषेत पण ठामपणे सांगितले. मी जे बोललो त्यावर तिने दोन दिवस विचार करावा आणि माझ्याकडून तिला काय अपेक्षित आहे हेही सांगण्यास तिला सुचवले.

मी पुढचा प्रवास करून कंपनीत परत आलो तेव्हा मला माझ्या सहकाऱ्यांकडून समजले की आता मेरीचे वागणे, तिचे बोलणे खूपच बदलले आहे. हा बदल खूपच चांगला वाटला त्या सर्वाना. तिच्या चेहऱ्यावर हास्य असते, इतरांना काही मदत हवी आहे का असे आपणहून विचारते, आणि आपल्या फावल्या वेळात इतरांना मदतही करते.

माझ्या मेरीशी पुढच्या मिटिंग मध्ये हे सर्व मी मेरीला सांगितले. “मेरी, आजकाल तुझा चेहरा प्रसन्न हसरा असतो. इतर सहकाऱ्यांना मदत करायला तू तयार असतेस, तुझे काम संपले की तू रिकामी रहात नाहीस, इतरांच्या कामात मदत करून तू कामातून आनंद मिळवतेस, ह्या सगळ्या बद्दल तुला माझ्या मनापासून शुभेच्छा!” त्यावर मेरी म्हणाली “ सर, खरं सांगायचे तर तुम्ही माझ्याशी जसे बोललात तसं माझ्याशी आजपर्यंत कोणीच बोललं नव्हतं. माझ्या उपस्थितीची दखल तुम्ही घेत होतात, माझ्या कामाची, जबाबदारीची खरी जाणीव तुम्ही मला करून दिलीत, जी माझ्या मनाला कधीच नव्हती. तुम्ही मला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या मला स्पष्ट करून सांगितल्यात. तुमच्या बोलण्यात मला कधीही हेटाळणी अथवा घृणा जाणवली नाही.

मला तुम्ही विचार करण्यास प्रतिसाद देण्यास पुरेसा वेळ दिलात. मलाच आतून असं जाणवलं की तुमच्या माझ्याकडून कामाच्या ज्या अपेक्षा आहेत त्यात अवास्तव असं काहीच नाही. तुम्ही माझ्यात स्वाभिमानाची ज्योत परत पेटवलीत. आजपर्यंत मी माझ्या आक्रमक अश्या प्रतिमेत उगीच गुरफटले होते. मला कर्मचारी संघटनेचे संरक्षण होते म्हणून माझे चालून गेले, पण गेल्या काही दिवसांपासून मी जो कामाचा आनंद घेत होते तो तेव्हा नव्हता.”

मेरी पुढे बोलली, आजकाल मी प्रत्येक दिवसाच्या कामाचा आनंद घेते, रोज वेळेत येते. शेवटी प्रत्येकाची काय इच्छा असते की आपल्याला मान मिळावा, आपल्यावर विश्वास ठेवला जावा, सर्वांनी आपल्याला आपल्यात सामील करून घ्यावे, आपल्या गुणांची दखल घ्यावी. मलाही तुमच्याकडून यापेक्षा वेगळ्या अपेक्षा नाहीत. खरं तर तुमची दैनंदिन स्वरुपाची जी कामे आहेत त्यापैकी काही कामे मला करता येतील का, ज्यामुळे तुम्हाला अधिक जबाबदारीच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करता येईल?”

निलय, असा हा मनुष्य स्वभावाचा एक अनुभव. निलय, तुमचा कर्मचारी सहाय्यक जर नीट काम करत नसेल तर आधी त्याला दिलेले काम तपासून पहा. त्यानंतर त्याच्या कामाला आवश्यक ते वातावरण आणि आयुधे आसपास आहेत का ह्याचा विचार करा, आणि सर्वात अखेरीस त्या कर्मचाऱ्याचे गुण अवगुण, काम करण्याची पद्धती इत्यादी विचारात घ्या.
त्यानंतर काही वेळाने निलय माझे आभार मानून परत गेला. मला नक्की अशी आशा वाटतेय की ह्यातून तो अधिक चांगला व्यवस्थापक बनण्यासाठी काही उपयुक्त मुद्धे, विचार नक्कीच घेऊन गेला असेल.

जीवनामध्ये निश्चित ध्येय असेल तर, वेळ घालविण्यासाठी साधने शोधण्याची गरज लागत नाही.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →