अभिजात संगीत नाटकांकडे

मला नेहमी वाटायचं की, आपल्याला दोन/ तीन नवीन नाटकं मिळाली. पण आपण अजून आपल्या अभिजात संगीत नाटकांत ( ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’ इत्यादी ) भूमिका केल्या नाहीत. त्या आपण करायला हव्यात, पण कशा? त्यावेळी रंगभूमीवर या नाटकांचे प्रयोग विविध कलाकारांच्या संचात होत होते. सर्वांची कामे बसलेलीच होती. छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, मा. अनंत दामले, भार्गवराम आचरेकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशी सर्व मंडळी या अभिजात नाटकांतून भूमिका करत होते. त्या नाटकांचे प्रयोग संयुक्त नटसंच किंवा अशाच काहीतरी नावाने केले जात. आम्हाला तालमीशिवाय नाटकाला उभं रहाणं शक्य नव्हतं. तालीम हवी म्हटलं की काम मिळत नसे. त्यांना तयार नट हवे असत.



मला नेहमी वाटायचं की, आपल्याला दोन/ तीन नवीन नाटकं मिळाली. पण आपण अजून आपल्या अभिजात संगीत नाटकांत ( ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’ इत्यादी ) भूमिका केल्या नाहीत. त्या आपण करायला हव्यात, पण कशा? त्यावेळी रंगभूमीवर या नाटकांचे प्रयोग विविध कलाकारांच्या संचात होत होते. सर्वांची कामे बसलेलीच होती. छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, मा. अनंत दामले, भार्गवराम आचरेकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशी सर्व मंडळी या अभिजात नाटकांतून भूमिका करत होते. त्या नाटकांचे प्रयोग संयुक्त नटसंच किंवा अशाच काहीतरी नावाने केले जात. आम्हाला तालमीशिवाय नाटकाला उभं रहाणं शक्य नव्हतं. तालीम हवी म्हटलं की काम मिळत नसे. त्यांना तयार नट हवे असत.

शेवटी विचार केला की, हे काही खरं नाही. आपल्याला अशा प्रकारच्या नाटकातून भूमिका करायच्या असतील, तर आपण आपली भूमिका बसवून रंगमंचावर उभं रहायचं. अर्थात पदांसाठी वेगळी तालीम करावीच लागणार होती. ‘घनःश्याम’ मुळे प्रसाद सावकारांशी चांगली ओळख झाली होती. त्यांनी प्रभाकर भालेकर ( ‘मदनाची मंजिरी’ नाटकाचे संगीत दिग्दर्शक) यांचं नाव सुचवलं. आता प्रश्न आला त्यांना गाठायचं कसं?

‘नयन’च्या वेळी नरेन चव्हाण मित्र झाला होताच. तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट ऑफिसमध्ये होता. तिथेच काम करणारा त्याचा एक मित्र दिनेश कामत अधूनमधून प्रयोगाला यायचा. नंतर समजलं की तो भालेकरांचा जावई आहे. त्याला विचारलं. त्याने लगेच मला भालेकर यांच्याकडे नेलं. त्यावेळी ते दामोदर हॉलच्या शेजारी असलेल्या दादा पांग्यांच्या क्लासवर रहात होते. प्रकृतीच्या कारणावरून त्यांनी थोडे आढेवेढे घेतले, पण नंतर ते शिकवायला तयार झाले. पहिली भूमिका कुठली बसवावी असा विचार करत असतानाच भालेकर म्हणाले, ‘तुम्ही ‘सौभद्र’ तला अर्जुन करा. सध्या रंगभूमीवर अर्जुन कुणी नाही. रामदास कामत हे नोकरीमुळे दौऱ्यावर जाऊ शकत नाहीत. शिवाय तुम्हाला उंची चांगली आहे. अर्जुन म्हणून तुम्ही शोभाल.” अशा तऱ्हेने अर्जुनाची पदे मला शिकवायला त्यांनी सुरुवात केली.
‘सौभद्र’ नाटकातील गद्याचा भाग समजून घेणंही गरजेचं होतं. त्यासाठी दाजी भाटवडेकरांकडे जावं असा विचार केला. कॉलेजची संस्कृत संगीतिका त्यांनीच दिग्दर्शित केली होती. शिवाय संघात (यशवंतराव, संशयकल्लोळ, इंद्रजित वध ) छोट्या भूमिका केल्यामुळे परिचय वाढला होता. एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो. त्यावेळी ते A.C.C. कंपनीत मोठ्या पदावर होते. म्हटलं, “मला अर्जुनाची भूमिका बसवून द्या.” त्यांनी लगेच मान्यता दिली. नंतर अर्जुन आणि अश्विन शेट या दोन्ही भूमिकांचे मर्म आणि त्यांचे नाटकातील स्थान याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.

‘घनःश्याम’ नाटकाच्या दौऱ्याच्या वेळी इंदूरला ‘सौभद्र’, ‘घनःश्याम’ आणि ‘मानापमान’ असे प्रयोग होते. राजाराम शिंदेंनी विचारलं, “अर्जुन करणार का? ” तोपर्यंत माझी भूमिका आणि पदे व्यवस्थित तयार झाली होती. प्रसाद सावकार कृष्ण, निर्मला गोगटे – सुभद्रा, भारती मालवणकर – रुक्मिणी, शंकर घाणेकर – वक्रतुंड आणि नारद – मा. दामले अशा संचात मी प्रथमच अर्जुन म्हणून उभा रहाणार होतो. थोडसं दडपण होतं. पण दोन्ही गुरूंच्या उत्तम मार्गदर्शनामुळे गद्य आणि पद्य दोन्ही आघाड्यांवर माझी भूमिका चांगली झाली. पहिल्यांदाच भूमिका करताना पाहून सर्वांनी कौतुक केलं. भारती म्हणाली, ‘चांगलाच छुपा रुस्तुम दिसतोस ! काम बसवलंस तरी केव्हा?” सावकारांनी किती योग्य माणसाकडे मला पाठवलं याची प्रचीती आली.

भालेकरांच्याकडे मी जवळजवळ वर्षभर जात होतो. त्या काळात त्यांनी माझी ‘अर्जुन’, ‘अश्विन शेट’ आणि ‘कोदंड’ अशा तीन भूमिकांची पदे बसवून दिली. त्यातील खाचाखोचा, कोणी कोणी कसं गायलंय याचंही उत्तम मार्गदर्शन केलं. त्यांची तब्येत नरमगरम असायची. अस्थिपंजर झाले होते आणि ते वर्ष संपता संपता त्यांचं निधन झालं.

याच दरम्यान अश्विन शेटची भूमिकाही चालून आली. आंबेकरनगर (शाहीर साबळे राहात होते ती कॉलनी) येथे एक प्रयोग जयंत सावरकर आणि मेकअपमन शांताराम विचारे यांनी ठरवला होता. मी प्रथमच अश्विन शेट करणार होतो. इतर भूमिका पुढीलप्रमाणे, फाल्गुनराव – सुकुमार, सुकुमार, रेवती

जयश्री शेजवाडकर, भादव्या – जयंत सावरकर, कृत्तिका बहुधा सुनिता धोंड असाव्या. इतर सर्व कलाकार सहकारी मनोरंजन मंडळाचे होते. प्रयोगाला खूप गर्दी होती. शाहीर साबळे यांचा मुलगा देवदत्त साबळे त्यावेळी लहान होता. तो आत येऊन म्हणाला, “काका, तुमचं ते ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं म्हणा” (हे गाणं त्यावेळी बरंच गाजलं होतं). हे गाणं या नाटकात नाही हे त्याला नीट समजवावं लागलं.

नांदी झाली. पडदा उघडला. समोर मासळी बाजार भरल्यासारखा गोंगाट चालला होता. सगळी बारकी बारकी पोरं दाटीवाटीनं बसली होती. साथीदारांच्या सभोवती त्यांचा गराडा पडला होता आणि आपापसात त्यांची ओढाताण, मारामाऱ्या चालल्या होत्या. सबंध पहिला अंक संपेपर्यंत आम्ही काय बोलतोय आम्हालाच कळत नव्हतं. पहिला अंक कसातरी पार पडला. देवदत्त साबळे परत आत आला. त्याला सागितलं की, “मुलं फार गोंगाट करताहेत. त्यांची काहीतरी व्यवस्था कर.” तो बाहेर गेला.

दुसरा अंक शांततेत सुरू झाला. नंतरचा बागेचा प्रवेश आला. तिथे रेवतीचं एक वाक्य होतं ‘अजून काही यांच्यावरचा संशय विषाचा अंमल उतरलेला दिसत नाही. काय करावं बरं?’ पाठीमागून आवाज आला, ‘गाणं म्हणा गाणं!’ सर्व प्रेक्षक हसायला लागले. रेवतीही हसू लागली. इतर सगळे विंगमध्ये उभं राहून हसत होते, पण मला हसता येईना. तो चिडलेला असतो आणि हे सगळं पाहून माझी आणखीच चिडचिड झाली. कसाबसा प्रवेश पार पडला. देवदत्ताने समोर बसलेल्या सर्व पोरांना प्रेक्षकांच्या मागच्या बाजूला नेऊन बसवलं होतं. त्याचा राग त्यांनी बरोबर टायमिंग साधून काढला.

नाटकात कधी काय घडेल याचा नेम नसतो. त्यामुळे नटाच्या अंगी प्रसंगावधान हा मोठा गुण असावा लागतो आणि समयसूचकताही ! हा धडा मला त्या दिवशी मिळाला.

त्यावेळी मिल्समध्ये नाट्य चळवळ सुरू झाली नव्हती. सत्यनारायणाच्या पूजेला सहकारी मनोरंजनाचे प्रयोग असत. त्यावेळी ‘संशयकल्लोळ’चा प्रयोग असला की हमखास माझी वर्णी लागत असे. एकदा मजासवाडी, गोरेगाव इथे पोलीस स्टेशनमध्ये पूजा होती. संशयकल्लोळ’चा प्रयोग ठरला होता. फाल्गुनराव मिळत नव्हता. सहकारीचे लोक चिंतेत होते. एकाने सुचवलं दामुअण्णा मालवणकरांना बोलवा.

त्यांनी मला विचारल, “चालेल का?” “ अहो चालेल का काय विचारता? इतक्या बुजुर्ग कलाकाराबरोबर काम करायला मिळण्यासारखं भाग्य नाही !” हेच आमचं उत्तर असणार ! प्रयोग ठरला. ओपन एअरमध्ये बांधलेल्या रंगमंचावर पाच-सहा हजार प्रेक्षकांसमोर प्रयोग करायला मिळाला. नंतर दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे दामुअण्णांचा सत्कार होता. त्या समारंभातही मला दामुअण्णांबरोबर भूमिका करायला मिळाली.

नंतर केव्हातरी भारतीला मी अभिमानाने म्हटलं, “अगं मी अण्णांच्या बरोबर ‘संशयकल्लोळ’मध्ये काम केलं बरं का ! ‘ ”

अर्जुन झाला. अश्विन शेटही झाला. आता कोदंडाची पाळी. तोही योग लवकरच आला. एके दिवशी सकाळी भोलाराम आठवले माझ्या घरी आले. त्यांच्या भाचीची संस्था ( कमलाबाई साळगावकर, प्रतिभा नाटक मंडळी) गोवा, कोकण आणि आजूबाजूच्या गावातून संगीत नाटकांचे प्रयोग करीत असे. त्यांना ‘संगीत शारदा’ मधल्या कोदंडाची भूमिका करण्यासाठी गायक नट हवा होता. तसा दौऱ्याला बऱ्यापैकी वेळ होता. त्यामुळे मी भूमिका बसवायला घेतली. पाठांतर झालं. पदं भालेकरांकडून बसवून घेतली. गद्यात काही अडचण आली तर शंकानिरसन करायला दाजी होतेच. भूमिका तयार होत होती.

भालेकरांच्या निधनानंतर त्या क्लासवर भार्गवराम आचरेकर रहात असत. ‘कट्यार’चे प्रयोग असले की मामा मुंबईत यायचे आणि त्यांचा मुक्काम पांग्यांच्या क्लासवरच असायचा. त्यांच्याकडून कोदंडाच्या पदांची उजळणी करून घेतली. इतरही काही पदे, वझे बुवांच्या चिजा असा ठेवा मला त्या वर्षभरात त्यांच्याकडून मिळाला. गोव्याच्या दौऱ्यासाठी भूमिका बसवली आणि ती प्रथम करण्याचा योग आला. पण ललितकलादर्श या अण्णा पेंढारकरांच्या संस्थेत (याची हकीकत पुढे येईलच ) गणपतीमध्ये उगार साखर कारखान्यात ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग होता. कोदंडाची भूमिका करायला त्यांना नट मिळत नव्हता. रामदास कामत उपलब्ध नव्हते. त्यांनी नारायण बोडस यांना विचारलं. तेव्हा नाना बोडसने पुस्तक चाळलं आणि म्हणाला, “अरे बापरे ! एवढं मोठं पाठांतर? मला बापजन्मी शक्य नाही. शेवटी अण्णांना काय करावं हे सुचेना. तेव्हा दादा पांगे त्यांना म्हणाले, “अरे चंदू (अण्णा) अरविंदाचं काम गोव्याच्या दौऱ्या निमित्ताने बसलं आहे. त्याची पदंही तयार आहेत. मामांच्याकडून त्याला तालीम मिळाली आहे. मी क्लासवर ऐकलं आहे. त्याला का काम देत नाहीस? ”

अण्णा ‘शारदा’ नाटकात कामही करत होते. ते स्वतः भुजंगनाथ, मालती पेंढारकर – इंदिराकाकू, चंदू डेगवेकर – कांचन भट आणि शारदा गिरिजा पेंढारकर यांच्याबरोबर मला कोदंड करायचा होता. अर्थात पाठांतर आणि गाणी चोख असल्यामुळे अडचण आली नाही. अण्णांनी माझ्या एकदोन तालमी घेतल्या. माझ्याबरोबर हिरण्यगर्भाचं काम करायला लक्ष्मीकांत ऊर्फ लक्ष्या बेर्डे होता. यथावकाश प्रयोग झाला. गोव्याचा दौराही झाला. त्यात श्रीमंत मा. दामले, शारदा जयश्री शेजवाडकर, कांचन भट –चंदू डेगवेकर आणि कोदंड मी अशा भूमिकांमध्ये होतो. अशाप्रकारे अण्णांच्या बरोबर या नाटकाचे खूप प्रयोग केले.

अनेक प्रयोगांनंतर शेवटी दोन प्रयोग लक्षात राहिले ते विशिष्ट कारणामुळे.

१९८० साली संगीत रंगभूमीच्या शताब्दी वर्षात नाट्य संमेलन मुंबईत झालं. त्यावेळी सुहासिनी मुळगावकरांनी लिहिलेला ‘शतरंग’ हा कार्यक्रम झाला. १८८० ते १९८० या शंभर वर्षातील संगीत नाटकातील स्थित्यंतरे या निमित्ताने रंगभूमीवर पहायला मिळाली. या पहिल्या कार्यक्रमात रंगभूमीवरील झाडून सगळ्या गायक नटांनी हजेरी लावली.

प्रत्येकाला एकेक पद होतं. अण्णा पेंढारकर सूत्रधार आणि ललिता केंकरे नटी या जोडीनं सर्व कार्यक्रम सादर केला. थोडे मानापमानाचे प्रसंग सोडले तर कार्यक्रम उत्तम झाला. प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली.

त्याच वर्षी नाट्य परिषदेसाठी निधी गोळा करण्यासाठी एक भव्य नाट्य महोत्सव करायचे ठरले. छोटा गंधर्व हे संमेलनाध्यक्ष होते. ‘मृच्छकटिक’ आणि ‘सौभद्र’ अशा दोन प्रयोगात त्यांनी भूमिका करायची असं ठरलं. इतरही दहा-बारा नाटकं होती. त्यात दादांच्या ‘सौभद्र’ मध्ये अर्जुनाची भूमिका माझ्या वाट्याला होती. त्यावेळी शशिकांत नार्वेकर ( माझा पत्रकार मित्र) परिषदेचा सेक्रेटरी होता.

त्याला मी म्हटलं, “शशिकांत, दादांच्या एकसष्टीला पुण्याला जो ‘सौभद्र’चा प्रयोग झाला होता त्यात मी अर्जुन केला होता, तर आता रामदास कामत यांना अर्जुन करू दे. मी ‘शारदे’तला कोदंड करतो.

‘त्यावर तो म्हणाला, “ते सगळं अण्णांकडे सोपवलेलं आहे. तू अण्णांना विचार.” आता सगळ्या महोत्सवाची जबाबदारी अण्णांवरच होती. त्यामुळे त्यांना त्रास देणं मला सयुक्तिक वाटलं नाही.

मी स्वस्थ बसलो. महोत्सव सुरू झाला ‘मृच्छकटिक’ नाटकाने. छोटा गंधर्व त्यात ते स्वतः चारूदत्त. वसंतसेना – मधुवंती दांडेकर आणि अशोक सराफ याला शकाराची भूमिका मिळाली होती. माझ्या घरचे पाच – सहा जण येणार असल्यामुळे मी अण्णांना तिकिटे सांगून ठेवली होती. ती आणायला त्यांच्या घरी गेलो. माझ्या घरासमोरच त्यांची नवयुग नगर सोसायटी होती. अण्णा आंघोळ करून आले आणि फेऱ्या घालू लागले.

थोड्या वेळाने मी विचारलं, ” अण्णा काय झालं तिकिटांचं? ” ते म्हणाले, “तिकिटं देतो. पण एक वेगळीच अडचण आहे. चंदू कोळी हा चेटाचं काम करणार होता. तो घरी नाही. त्याची बहीण वारल्यामुळे तो अंत्ययात्रेला गेला आहे. आता चेटाचं काम कोणाला द्यायचं या विवंचनेत मी आहे. ”

मी म्हणालो, “त्याला फोन करून विचारा. नसला तर मी करेन ते काम. ”
अण्णा म्हणाले, “फोन करून त्याला विचारू काय? त्याची मनःस्थिती कशी असेल कोण जाणे? जाऊदे. खरंच करशील का काम? ” ”

मी म्हटलं, “अहो संघाच्या ‘मृच्छकटिक’चा प्रयोग दिल्लीला झाला होता त्यावेळी गंमत म्हणून मी ते काम केलं होतं ! दाजी स्वतः शकार होते. ‘ अण्णा म्हणाले, “खरंच करशील का? माझं टेन्शन जाईल. ”

म्हटलं, “अण्णा काळजी करू नका. मी संध्याकाळी काम करेन.’ ”

अण्णांनी सुटकेचा श्वास सोडला आणि लगेच तिकिटं माझ्या स्वाधीन केली. संध्याकाळी मी चेटाचा मेकअप करून दादांना नमस्कार करायला गेलो.

म्हणाले, “अरेच्या ! आज तू कोण आहेस? ”

मी म्हटलं, “चेट ! तुमचं नाटक आहे आणि मी नाही हे कसं शक्य आहे.

“प्रयोग व्यवस्थित पार पडला.

दोन-तीन दिवसांनी ‘होनाजी बाळा’ नाटकाचा प्रयोग होता. पण त्या दिवशी इतका मुसळधार पाऊस पडला की, नाटक रद्द करावं लागलं. मंडपात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. रामदास ऑफिसच्या कामासाठी परदेशात जाणार होते. आणि महोत्सव संपता संपता परतणार होते. अण्णांनी त्यांना कोदंड करणार का म्हणून विचारलं तेव्हा ते म्हणाले, ” मी त्यावेळी मुंबईत नाही.” त्यामुळे त्यांनी भूमिका करणं शक्य नव्हतं. ‘होनाजी बाळा’ रद्द झालं आणि महोत्सवाच्या शेवटी त्याचा प्रयोग ठेवला होता. ‘सौभद्र’च्या प्रयोगापर्यंत रामदासबुवा परत येणार होते. त्यामुळे त्यांनी ‘सौभद्रा’त अर्जुन करावा असं ठरलं. आणि कोदंडाची भूमिका अलगद माझ्या पदरात पडली. मी शशिकांतला म्हटलं, ” पाहिलंस? माझी इच्छाशक्ती किती जबरदस्त आहे? काहीही न करता आपोआप काम झालं.” त्यावेळी शारदा मीरा संझगिरी (मंगला संझगिरी यांची कन्या) होती. तिचं वय १७/१८ होतं.हे सर्व प्रयोग रात्रभर चालायचे. त्यामुळे एरवी जे करायला मिळत नाही. ते प्रवेश करण्याची, भरपूर गाण्याची मुभा होती. त्यामुळे मी पुढे एक प्रवेश आहे तो केला होता. कोदंड कारागृहातून सुटून येतो त्यावेळचा. त्यात एक ‘जो लोककल्याण साधावया जाण’ हे सुंदर पद आहे. (हे पद मला भार्गवराम मामांनी बसवलं होतं.) आ. दे. पाटील नावाचे नट होते हिरण्यगर्भ.
त्यांना तो प्रवेश पाठ होता. त्यामुळे हा कधीही न होणारा प्रवेश करता आला याचा त्यांनाही आनंद झाला.

या प्रयोगानंतर यापेक्षा कमी वयाची शारदा मिळणं शक्य नाही असं वाटत होतं, पण नाही. तेही शक्य झालं. संघात संगीत नाटकांचा महोत्सव झाला. म्हणजे महिन्याला एक अशा बारा नाटकांचा महोत्सव व्हायचा.

अण्णा म्हणाले, “आपला ‘शारदे’चा प्रयोग आहे. ‘ मी म्हटलं, “शारदा कोण आहे?”

अरे शारदा १४ वर्षांची आहे दीप्ती वाघ.”

अहो अण्णा शारदा चौदा वर्षांची आहे. पण मी ५५ वर्षांचा आहे. मला भद्रेश्वर दीक्षितांच्या ‘वय किती’ या प्रश्नाला उत्तर २४ वर्षे असं द्यायला काहीतरीच वाटतं.’

” अरे ते दोघे एकत्र येतात कुठे? नाटकाच्या शेवटी कोदंड शारदेला वाचवतो त्यावेळीच. ”

“अहो अण्णा, असं काय करता? पहिल्या अंकात देवळाच्या प्रवेशात, सगळ्या मुली पाया पडतात तेव्हा तो शारदेला आशीर्वाद देतो. ‘जागृत ठेवा लग्नाची’ हे पदही म्हणतो. ”

अण्णा म्हणाले, “ते मला काही माहिती नाही. कोदंड तूच करायचा हे नक्की. ‘ ”

अशातऱ्हेने शेवटच्या प्रयोगात शारदा चौदा वर्षांची होती. यामुळेच हे दोन्ही प्रयोग विशेष लक्षात राहिले.

Author