ऋणानुबंध

अण्णा एकदम प्रसन्न दिसत होते. बाहेर जाण्याची तयारी सुरू होती. घोटून घोटून दाढी केली होती. केसांना हलक्या हाताने तेल लावून भांग पाडला होता. पांढरे शुभ्र मुलायम केस त्यांच्या वृध्दत्वाला सौंदर्य बहाल करीत होते. काळी पँट व पांढरा शुभ्र सदरा घातला. खिळ्याला अडकवलेली त्यांची अतिशय आवडती शबनम खांद्यावर अडकवत विनयाला म्हणाले, “जरा जाऊन येतो, आधी देवीला जातो. मग चितकडे, मग मंडईत, एक तास लागेल. तू काळजी करू नकोस, मी नीट जातो.



अण्णा एकदम प्रसन्न दिसत होते. बाहेर जाण्याची तयारी सुरू होती. घोटून घोटून दाढी केली होती. केसांना हलक्या हाताने तेल लावून भांग पाडला होता. पांढरे शुभ्र मुलायम केस त्यांच्या वृध्दत्वाला सौंदर्य बहाल करीत होते. काळी पँट व पांढरा शुभ्र सदरा घातला. खिळ्याला अडकवलेली त्यांची अतिशय आवडती शबनम खांद्यावर अडकवत विनयाला म्हणाले, “जरा जाऊन येतो, आधी देवीला जातो. मग चितकडे, मग मंडईत, एक तास लागेल. तू काळजी करू नकोस, मी नीट जातो.

विनया आपल्या वडिलांच्या सावळ्या रूपाकडे पाहतच राहीली. वयाची सत्तरी उलटून गेलेले तिचे अण्णा किती छान होते. खूप सोशीक, प्रसन्न, सतत दुसऱ्यांच्या विचार करणारे, चौथ्या मजल्यावरच्या त्यांच्या घरात ते एकटे राहत होते. रोज बावन्न पायऱ्या दोनदा तरी चढणे उतरणे व्हायचे. कसे रहात असतील एकटे ! विनयाला एकदम भरून आले. “घरी थांबा, मी आणते बाहेर जाऊन काय आणायचे ते.” या तिच्या म्हणण्यावरती हसतमुखाने त्यांचे उत्तर ठरलेले असायचे, ” डोंट वरी, मी एकदम ठीक आहे. थोडं चालायला वेळ लागतो इतकंच आणि सगळे ओळखतात मला. नेहमीचाच रस्ता आहे. कुणीही मदत करील मला. तू नसतेस तेव्हा मीच जातो ना एकटा? एवढा व्यायाम हवाच माझ्या शरीराला.

“ठीक आहे, अण्णा सांभाळून जा. रस्ता नेहमीचा असला तरी वेळ गर्दीची आहे आणि वेळेत या. काळजी वाटते. ‘ ” अण्णा बाहेर गेले. विनया त्यांच्या विचारात हरवून बसली. तिच्या कॉलेजच्या कामाने चार दिवसांसाठी ती पुण्याला आली होती. आईला जाऊन दहा वर्षे झाली होती. ती एकुलती एक मुलगी. खूप आग्रह केला तरी अण्णा जिद्दीने एकटे राहत होते. “मी एकटा आहे, एकाकी नाही. माझी काळजी करू नकोस. जेव्हा मला एकटे राहणे अशक्य होईल तेव्हा मी स्वतः तुझ्याकडे येईन. “त्यांच्या या अशा वागण्याचा तिला खूप त्रास व्हायचा. सतत काळजी वाटायची. कधी कधी परिचित म्हणायचे, “असं कसं म्हाताऱ्या वडिलांना एकटं राहु देता? ” या प्रश्नाला ती काय उत्तर देणार? तिलाच ओशाळवाणे वाटायचे. त्यांचा स्वभाव हट्टी आहे. वयानुसार येणारी दुर्बलता ते त्यांच्या इच्छाशक्तीने थोपवून धरू शकतात. उगीच नाही अनेक वर्षाचा अल्सरचा त्रास सहन करीन ते एकमुक्त राहत आहेत.

आताही ते बाहेर पडले, ते बरोबर एक तासाने येतील. पेपरवाला त्यांच्यासाठी नक्की जागेवरच थांबलेला असणार प्रकृत्तीच्या कारणास्तव कधी ते जाऊ शकले नाहीत तर वाट पाहून घरी सगळे पेपर्स आणून देणार. भाजीवालाही ठरलेलाच. औषधाचे दुकान ठरलेले. सगळ्यांशी घरगुती दोन शब्द बोलणार. अशी खूप माणसे त्यांनी जोडून ठेवली होती. बाकी काही काम नसले तरी पेपरवाल्यासाठी जाणारच. कारण तो वाट पाहतो. त्यांच्यासाठी पेपर्स बाजूला काढून ठेवतो. ते घेतले नाहीत तर त्याच्या अंगावर तो खर्च पडेल. या काळजीपोटी ते पेपर्स आणणारच. तो व त्याची बायको दोघेही चौकात रस्त्याच्या बाजूला पेपर्स मांडून सकाळच्या वेळी बसतात. अण्णा एकटे रहातात. हे त्यांना माहीत होते. सणासुदीला ते त्यांच्या घरचे गोडधोड अण्णांसाठी आणत असत. तोंडात एकही दात नव्हता. कवळी वापरली नव्हती. तरी अण्णा ते पदार्थ दुधात बुडवून खात असत.

एक विलक्षण गोष्ट होती. सकाळी आठच्या सुमारास दोन कावळे गॅलरीत न चुकता यायचे. रेलिंगवर बसून त्यांचे जोरजोरात काव काव सुरू व्हायचे. पेपरं वाचता वाचता अण्णा “अरे हो हो आलोच. थांब जरा. किती काव सुरू व्हायचे. पेपर वाचता वाचता अण्णा “अरे हो हो आलोच. थांब जरा. किती घाई करतोस? ” असे म्हणत उठून एक मारी बिस्किटाचे तुकडे गॅलरीत टाकायचे. लगेच शांत होऊन एक एक तुकडा उचलून कावळे निघून जायचे. विनयाला आधी हे खोटेच वाटले. पण प्रत्यक्ष पाहिल्यावर तिलाही आश्चर्यच वाटले होते. ती म्हणायची, “अण्णा, तुरूंगात टिळकांभोवती चिमण्या यायच्या असं वाचलं आहे. आता तुमच्याकडे कावळेही येतात. ‘

आई गेल्यानंतर अण्णा एकटे राहतात. अल्सरने त्यांना आतून पोखरले आहे. पण स्वावलंबनाची जिद्द मोठी आहे. इच्छाशक्तीही तीव्र आहे. त्यामुळेच त्यांच्यापुढे कुणाचेच काही चालत नव्हते.

दारावरची बेल वाजली. बरोबर एक तास झाला होता. अण्णा परतले होते. हातातली शबनम जड झाली होती. चार मजले चढल्यामुळे धाप लागली होती. अगदी सावकाश पावले टाकत ते आतल्या खोलीत त्यांच्या नेहमीच्या जागी बसले. बोलू शकत नव्हते. चेहरा उतरला होता. अंगठा मुडपून चार बोटांचा तळहात त्यांनी विनयापुढे नाचवला. ती समजली. त्यांना चहाची गरज होती. तिने पटकन त्यांना चहा करून दिला. मग ते थोडे सावरले. आपण नसताना यांचे परत आल्यावर रोज असेच होत असणार या विचाराने ती व्याकूळ झाली. थोड्याच वेळात त्यांनी उत्साहाने शबनममधील सामान डायनिंग टेबलावर ओतून दिले. त्यात बाकरवड्या, दुधाचं पाकीट, शेवग्याच्या शेंगा, बर्फी, एक दोन पुस्तके, औषधी असे सगळे काही होते. विनयाने सामान जागच्या जागी ठेवत विचारले, ”

या शेवग्याच्या शेंगा कशाला आणल्या? कोण खाणार आहे? ‘
‘या अकोल्याला न्यायच्या आहेत. मस्त आहेत की नाही?
“अहो पण, इथून शेंगा तिथं न्यायच्या? तिथं मिळत नाहीत का?” विनयाने आर्श्वयाने विचारले.
“तिथं मिळतातच गं. पण बघ ना या किती ताज्या आहेत. तिथं सगळ्यांना आवडतात आणि ही पुस्तकं छोट्या कोंबडीसाठी आणली आहेत. ” “अहो अण्णा! अकोला हे मोठं शहर आहे. तिथं सगळं मिळतं. कशाला तुमचं सामान वाढवता उगीच? ” “एवढ्यानं काय वाढणार आहे सामान?
‘नेहमीप्रमाणे त्यांनी विनयाला निरुत्तर केले. उद्या रात्रीच्या बसने ते अकोल्याला जाणार होते. तिथे जाणे म्हणजे जणू काही तीर्थाची वारी करण्यासारखेच होते. दर दीड-दोन महिन्यांनी त्यांची चक्कर ठरलेली असे. वाटेत औरंगाबादला येता जाता एक मुक्काम विनयाकडे असायचा. तोही प्रवास फार लांबचा होता म्हणुन.

अण्णांची अकोल्याची ओढ जुनीच होती. त्यांची एक मानलेली बहीण तिथे राहायची. बालपणापासून ते एकत्रच वाढले होते. तिची आई यांची दूधआई होती. विनयाला हे मानलेले नातं माहीत असले तरी कृत्रिम कधीच वाटले नव्हते. सख्ख्या आत्याप्रमाणेच तिला ती वाटायची. आत्याला एकुलता एक मुलगा होता. आत्याचे यजमान लवकर वारले. तिने मुलाला नीट वाढवले, शिकवले, त्याचे लग्न झाले. अंजली तिची सून म्हणून आली. प्राजक्ता व ऋतुजा या दोन मुली झाल्या. त्या दोघींना अण्णा लाडाने मोठी कोंबडी, छोटी कोंबडी म्हणत. त्या लहान असतानाच दुर्दैवाने आत्याचा मुलगा अनंता वारला. आत्यावर दुःखाची कुन्हाड कोसळली. ती धक्क्यातून सावरलीच नाही. अण्णा तिच्याकडे जात असत. तिला धीर देत असत. पण ती अंथरुणातून उठलीच नाही. अण्णांनी तिची शेवटच्या दुखण्यात सतत सोबत केली. प्राण जातानाही ते तिच्या जवळच होते. तिला तिच्या तरुण सुनेची व कोवळ्या नातींची काळजी होती. तिने अण्णांना सांगितले, “अण्णा, माझ्यानंतर या तिघींकडे लक्ष दे बरं! कसं होणार या तिघींचं? अण्णांशी ती बोललेले ते शेवटचे वाक्य. नंतर थोड्याच वेळात ती गेली. तिचे सगळे सासर-माहेरचे नातलग आले. सुनेकडचेही आले. सर्वांना अण्णाच वडीलधारे. सारेच त्यांना मानत होते. त्यांच्या देखरेखीखाली पुढचे सर्व सोपस्कार झाले. सर्व परत गेले. अण्णाही पुण्याला आले; पण त्यांच्या मनात बहिणीचे शब्द घर करून होते. “या तिघींकडे लक्ष दे.” त्यांनी मनोमन बहिणीला शब्द दिला व तो शब्द अखेरपर्यंत पाळला.

ते पुण्याहून परतले तरी लक्ष अकोल्याकडेच असे. तिथे बऱ्याच गुंतागुंतीचे प्रश्न होते. अनंताचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असा संशय होता. बँकेचे, विम्याचे व्यवहार सगळे आत्या व अनंताच्या नावावर होते.
नॉमिनेशन अनंताचे होते. अंजलीची नोकरी खाजगी शाळेत अपुऱ्या पगाराची होती. दोन लहान मुली तिच्या पदरात होत्या. तसे तिला ही माहेरचे गणगोत होते व माहेरही अकोल्याजवळ नागपूरचेच होते. पुणे खूपच लांब होते. पण या कोणत्याच गोष्टींचा बहाणा न करता अण्णा त्या तिघींसाठी झिजले. अक्षरश: तन, मन, धनाने झिजले.

वारंवार ते पुण्याहून अकोल्यास जात. तिथे आठ, दहा, पंधरा, जशी आवश्यकता असेल तितके दिवस राहत. अंजलीला नॉमिनेशन मिळवून सर्व खाती व विम्याचे पैसे मिळण्यातील अडथळे दूर करणे, अनंताच्या संशयास्पद मृत्यूबाबत बदनामी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न, अंजलीला बी.एड.ला अॅडएमिशन मिळण्यासाठी प्रयत्न, नंतर तिला अभ्यासात मार्गदर्शन, मुलींचे लाड, त्यांना अभ्यासात मार्गदर्शन, वडिलोपार्जीत मोडकळीस आलेल्या घरात मन रमत नाही म्हणून, ते पाडून नव्याने त्याचे बांधकाम या सर्व जबाबदाऱ्या अण्णांनी स्वत:वर घेतल्या. अंजलीला त्यांनी बहिणीची सून नव्हे, स्वत:ची मुलगीच केले. हे सर्व करताना स्वतःचे वाढते वय, अल्सरचा त्रास, स्वत:च्या घराकडे होणारे दुर्लक्ष, त्याच्या काळजीपोटी होणारी विनयाची, तिच्या आईची तडफड या कशाचीच त्यांनी पर्वा केली नाही. अंजलीच्या नातेवाईकांना कसलीही तोशीस पडली नाही.

स्वतःहून एक ऋषितुल्य वृध्द एवढी जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतो आहे, तहसील, बँका, वकील, कोर्ट, बिल्डर यांच्याकडे हेलपाटे घालतो आहे या गोष्टीचे सर्वांनी दुरून भरपूर कौतुक केले. अंजलीच्या मुलींना अण्णाआजोबांचा लळा लागला. त्यांच्या अभ्यासातील अडचणी त्या त्यांना फोनवरूनही विचारीत असत. विनयाच्या हातात एकदा अचानक फोनचे बिल पडले. ते चार हजार रुपयांचे बिल पाहून विनयाला धक्काच बसला. शेजारणीने सांगितले, “फोनचे बील असे नेहमीच जास्त येते.
कारण सोसायटीच्या लेटर बॉक्समधून मीच आणून देते दर महिन्याला.” न राहवून विनयाने अण्णांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले ” मुलींना इंग्रजी, भूगोलातले जे समजत नाही ते फोनवर समजाऊन दयावे लागते. परीक्षा जवळ आल्या आहेत. महत्त्वाची वर्ष आहेत.” विनया अर्थातच निरुत्तर झाली. बी.एड. झाल्यामुळे अंजलीला पूर्ण पगार सुरू झाला. पण तेवढे अण्णांना पुरेसे नव्हते. त्यांनी तिला एम.एड. करायला लावले. अशा रीतीने त्या घरात आई व दोन मुली या तिघींचे शिक्षण सुरू होते. अण्णा स्वतः सुपरक्लासवन अधिकारी होते, शिक्षण क्षेत्रातील खूप मोठे विद्वान होते. अंजलीच्या प्रोजेक्टसाठी ते विनयाला ही गृहीत धरायचे.

अंजलीचे शिक्षण पूर्ण झाले. आर्थिक बाजू चांगली स्थिर झाली. मुली मोठ्या होऊ लागल्या. कॉलेजला जाऊ लागल्या. आता तरी अण्णांची दगदग थांबेल अशी आशा सर्वांना होती. कारण त्यांची पंच्चाहत्तरी उलटली होती. काही प्रमाणात तसे झालेही. अकोल्याच्या फेऱ्या पूर्ण थांबल्या नाहीत तरी काहीशा कमी झाल्या.

हळू-हळू अण्णा थकले. फोनवरूनच संपर्क ठेवू लागले. पेन्शनचे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी पाठवू लागले. महत्त्वाचा कोर्स आहे, ट्यूशन क्लास आहे, वाढदिवस आहे या ना त्या कारणाने अण्णांनी त्यांना आर्थिक मदत कायम ठेवली. वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण झाली. अण्णांसाठी घराबाहेर पडणेही अवघड झाले. शेवटी विनयाच्या विनंत्यांना होकार द्यायचे ठरवून अण्णा विनयाकडे औरंगाबादला आले. पुणे सोडताना त्यांना खूप जड गेले.

त्यांच्या जवळच्या माणसांचा निरोप घेऊन त्यांनी पुणे सोडले ते मात्र कायमचे. एकदा पुणे सोडले की पुन्हा परतणार नाही हा त्यांचा निश्चय त्यांनी बोलून दाखवलाच होता. पुण्याच्या बँकेतली सर्व शिल्लक त्यांनी काढली. त्यातली अर्धी रक्कम त्यांनी अकोल्यास पाठवली व अर्धी विनयाच्या हाती सुपूर्द केली.
विनयाकडे ते एक वर्षभर राहिले. गलितगात्र झालेले अण्णा बुध्दी व मनाने मात्र तसेच कणखर व जिद्दी राहिले. अगदी शेवटपर्यंत. प्रकृतीने त्यांना कधीच साथ दिली नव्हती; पण मन:शक्तीच्या जोरावर अतिशय सफलतेने ते स्वतःचे आयुष्य जगले होते. हा मन:शक्तीचा स्रोत कुठून येत होता त्यांच्याकडे, याचे सर्वांना आश्चर्य वाटायचे पण विनयाला ठाऊक होते की याचा उगम त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या व्यासंगात होता. ते रोज ज्ञानेश्वरी वाचायचे, चिंतन करायचे. एक एक ओवी घेऊन तिच्या संदर्भात त्यांचे विचार लिहून काढायचे. त्यांनी इतके लिहिले होते की ज्ञानेश्वरीवर एक भलामोठा संदर्भग्रंथ तयार झाला असता. पण त्यांचं सर्व लिखाण ‘स्वान्तसुखाय’ होते. त्यांना बळ देणारी आणखी एक व्यक्ती होती. ती म्हणजे त्यांचे गुरू. त्यांचे गुरू पूर्वाश्रमीचे डॉक्टर होते. अण्णा आधी त्यांचे पेशंट होते. नंतर त्यांनी संन्यास घेतल्यावर शिष्य बनले. केवळ त्यांचेच ते ऐकत. गुरूंच्या योगशक्तीवर अण्णांना व अण्णांच्या ‘विलपॉवर’ वर गुरूंना खूप विश्वास होता..

शेवटच्या आजारात त्यांना भूतकाळ सतत आठवायचा. अंजली व तिच्या मुलींचीही सतत आठवण यायची. विनयाला वाटले त्यांची भेट झाली तर त्यांना समाधान वाटेल म्हणून तिने अंजलीला तसा फोन करू का म्हणून विचारले. त्यावर आलेला त्यांचा नकार अनपेक्षित व धक्कादायक होता. त्याचे कारण विनयाला समजले नाही. अण्णांनीही सांगितले नाही. माझ्या दुखण्यात कुणालाही बोलवायचे नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले होते.

दिवा मंदावला होता, विझणारच होता, तसा तो विझला. एका सार्थक जीवनाचा शेवट झाला.
मात्र, विनयाला काही कोडी पडलीत ती अद्याप उलगडली नाहीत. पहिले म्हणजे अंजली अण्णांना भेटायला स्वतःहून का आली नाही? ते गेल्यानंतर तिने विनयाला एक फोनही केला नाही. अण्णांनी निभावलेला ऋणानुबंध तिला पेलवला नसेल का? अण्णांची मनोभूमिका आदर्शवादावर रचली गेली होती. अंजली व तिच्या मुलींची मानसिकता कशी बरी असेल? त्यांच्यासाठी फक्त अण्णा होते. विनया जणू काही अस्तित्वातच नव्हती. अण्णा त्यांच्यासाठी कोण होते? अण्णांबरोबर त्यांचा जुळलेला ऋणानुबंधही संपला. इतका की जणू कधी तो नव्हताच. सख्ख्या नात्यांना न जुमानणाऱ्या आजच्या पिढीला या मानलेल्या नात्यांचा अर्थ गवसणारच नाही का?

Author