रस्सीखेच

रात्र चढत होती. सगळी चाळ झोपेत बरी-वाईट स्वप्ने पाहत होती. दिनेशचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. नुसती तळमळ, तडफड, गुदमर! सकाळी उठायची घाई नसती तर उठून काहीतरी वाचत तरी बसला असता. कुणाच्या तरी घरातून घड्याळाचे दोनचे ठोके ऐकू आले. बापरे ! दोन वाजले पाच वाजता उठावेच लागणार होते. थोडी तरी झोप झालीच पाहिजे. त्याने मेंढ्या मोजायला सुरूवात केली.



रात्र चढत होती. सगळी चाळ झोपेत बरी-वाईट स्वप्ने पाहत होती. दिनेशचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. नुसती तळमळ, तडफड, गुदमर! सकाळी उठायची घाई नसती तर उठून काहीतरी वाचत तरी बसला असता. कुणाच्या तरी घरातून घड्याळाचे दोनचे ठोके ऐकू आले. बापरे ! दोन वाजले पाच वाजता उठावेच लागणार होते. थोडी तरी झोप झालीच पाहिजे. त्याने मेंढ्या मोजायला सुरूवात केली. हजार मोजून झाल्या तरी झोपेची एक जांभईही आली नाही. उलट सुलट अंक मोजून झाले. तरी काही उपयोग झाला नाही. मेंदू इतका उत्तेजित झाला होता की झोप अनेक कोस दूर पळाली होती. त्याला कारणही तसेच होते. उद्या तालुक्याच्या गावी एका शाळेत त्याची मुलाखत होती. त्यासाठी पहाटेची पहिली एस.टी. गाठायची होती. मुलाखतीची तयारी म्हणून सगळा पेपर वाचून काढायचा होता. आजकाल जनरल नॉलेज म्हणून काहीही प्रश्न विचारतात हे त्याने ऐकले होते. विषयाशी संबंध नसलेली माहिती सांगता आली नाही तर काय बिघडेल या त्याच्या प्रश्नाला उत्तर कुणाजवळच नव्हते. त्या नोकरीची त्याला नितांत गरज होती. घराची डबघाईला आलेली परिस्थिती सावरण्यासाठी तो जबाबदारीच्या भावनेसह उत्सुक होता. त्याला वाचनाचा छंद होता. कॉलेजमध्ये त्याचे खूप विषयावर वाचन झाले होते. मोठया व्यक्तींच्या चरित्रांचे वाचन त्याला प्रेरणा द्यायचे. गरीब परिस्थितीतून वर आलेल्या व महान ठरलेल्या व्यक्ती त्याच्यासाठी आदर्श होत्या. त्याच्या कॉलेजच्या जोशी मॅडमनी त्याची आवड ओळखली होती. जोपासायला पाठिंबाही दिला होता. कॉलेज सोडताना त्यांनी त्याला ‘अग्नीपंख’ हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. पोथीसारखे तो त्याचे पारायण करीत असे. त्यातील अनेक उतारे त्याने पाठ करून टाकले होते. खानावळ चालवणाऱ्या आईकडे बघून त्याला नेहमी ते वाक्य आठवत असे, “खरे, शौर्याने, प्रामाणिक प्रयत्नाने श्रम करतात ते हात सर्वांगसुंदर असतात. ‘ त्याला वाटायचे आईच्यासारखेच माझेही हात सुंदर होतील. धाकटी बहीण सुमा, दिनेश, गहाण पडलेले घर हे सगळं सांभाळायला त्याची एकमेव आईच तर कष्ट करीत होती. तो तिचे ओझे हलके करायला फार आतुर झाला होता आणि आता लवकरच ती संधी त्याला मिळणार होती. अगदी उद्याच.

संध्याकाळ झाली होती. दिनेश बसस्टॅण्डवर बसला होता. गावाकडच्या कितीतरी गाड्या त्याने सोडून दिल्या होत्या. आई वाट पाहत असेल. व्याकूळ झाली असेल पण घरी जाऊन कोणत्या तोंडाने तिच्या समोर उभा राहू? आजच्या मुलाखतीने त्याच्या आशा-आकांक्षेचा चक्काचूर केला होता. मुलाखत घेण्यासाठी चांगले दहा-बारा लोकांचे मंडळ बसले होते; पण मुलाखत दिल्याचे समाधानच त्याला मिळाले नाही. वरवरची, अगदी सोपी सोपी उत्तरे असणारे काही दोन-चार प्रश्न विचारले. त्याला सगळीच उत्तरे देता आली. देता देता त्याचा आत्मविश्वास वाढत होता; पण अचानक पाच मिनिटांतच त्याला बाहेर पाठवण्यात आले. त्याला काही समजेना की नोकरी मिळणार की नाही? निवड झालेल्यांची नावे दुपारी तीन वाजता बोर्डावर लावणार असल्याचे सांगण्यात आले. जीव मुठीत धरून तो तिथेच बसून राहिला. यादी लागली. त्यात त्याचे नाव नव्हते. त्याच्यासारखेच निराश झालेले अनेक जण तेथे होते. मर्जीतल्या व वशिल्यातल्या लोकांचीच निवड झाली अशी त्यांची चर्चा त्याच्या कानावर आली. कारणे कोणतीही का असेनात; पण परिणाम एकच होता अन् तो म्हणजे तो आजही बेकारच राहिला होता. हताशेने तो बसस्टॅण्डवर आला व तेथेच बसून राहिला. पुढे काय? पुढे सगळा काळोखच तर दिसतो आहे. त्याला आई आठवली. वयात येणारी बहीण सुमा आठवली गहाण टाकलेले घर आठवले. त्यांचे सावकार अप्पा देशमुख आठवले. त्यांच्या अर्धवट असणाऱ्या मुलासाठी सुमावर त्यांचा डोळा आहे हेही त्याला आठवले. त्यासाठी ते कर्जाचा पाश घट्ट घट्ट आवळत नेणार याची त्याला कल्पना होती. कसं वाचवणार तो सुमाला? कसे फिटणार कर्ज? कधी मिळणार आईला विश्रांती? अन् कधी माझा संसार उभारणार …? स्वतःच्या भावी जीवनाचे एक गोड स्वप्न त्याने मनात फुलवत ठेवले होते. डी.एड. कॉलेज मधली त्याच्या वर्गातली शुभांगी त्याला विलक्षण आवडत होती. अभ्यासाच्या नोटस्, पुस्तकांची देवाणघेवाण त्यांच्यात व्हायची. पाठही एकाच शाळेत लागायचे. अभ्यासाव्यतिरिक्तही काही गप्पा व्हायच्या. नकळत प्रेमाच्या कोवळा अंकुर मनात रूजला होता; पण घरच्या परिस्थितीचा रेटाच एवढा जबरदस्त होता की त्याची जाणीवही त्याने तिला होऊ दिली नव्हती. डी.एड. पूर्ण झाल्यावर, नोकरी लागल्यावर मग तो तिला हळूच ‘सांगणार होता. मागणी घालणार होता. दोघे एकाच क्षेत्रात काम करणारे झाले असते. दोघांचा जीवन प्रवास हातात हात घालून झाला असता; पण… आता त्याचे काय? तो अंकुर आता खुडूनच टाकावा लागणार असे दिसतंय. कारण तिला तर लगेच नोकरी मिळाली. शहरातल्या एका चांगल्या नावाजलेल्या मोठ्या शिक्षण संस्थेत. तो मात्र मागे राहिला आपले स्वप्न फार दूर दूर वाहून जात आहे असे त्याला वाटले.

गावाकडे जाणारी शेवटची बस पकडून तो गावी आला. घरी पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. आईची खानावळ बंद झाली होती. त्याचा चेहरा पाहूनच आईच्या सारे लक्षात आले. तिने काही विचारले नाही. त्याच्या जवळ आली. चेहऱ्यावरून, केसांवरून मायेने हात फिरवला. त्याला भरून आले. तिच्या कुशीत शिरून त्याने मन मोकळे केले. सुमा झोपली होती. ती पण आवाजाने जागी झाली. उदास वातावरण तिलाही उदास करून गेले. आईने त्याला चार घास जेवायला लावले. त्याचे आवडते पुस्तक ‘अग्नीपंख’ त्याच्या हातात दिले. दिनेश तिचे मन समजाला. न बोलता धीर देणाऱ्या आईबद्दलचा त्याचा आदर अधिकच वाढला.
पहाट झाली. काहीही न घडल्यासारखे आई वावरू लागली. सुमालाही तिने काही सांगितले असावे. कारण तिनेही दिनेशला नोकरीबद्दल काही विचारले नाही. नोकरीच्या जाहिराती वाचण्यासाठी रोजच्या प्रमाणे त्याने पेपर विकत आणला. शाळेची जाहिरात तर नव्हती; पण तालुक्याच्या गावी एका मेडिकल स्टोअरमध्ये मदतनीस हवा होता. ती जाहिरात त्याच्या वाचण्यात आली. बाकीच्या जाहिराती होत्या, त्यातली पात्रता त्याच्या जवळ नव्हती. डी. एड. झाल्या झाल्या नोकरी लागतेच अशी परिस्थिती असल्याने व लवकर पायावर उभे राहायचे असल्याने त्याने डी.एड. केले होते. खाजगी कॉलेजला त्याचा नंबर लागल्याने डोनेशन देण्यासाठी घर गहाण टाकावे लागले होते. गरिबांची स्वप्ने ही लहानच असतात. त्यालाही फक्त प्राथमिक शिक्षक व्हायचे होते. ती त्याची महत्त्वाची निकड होती. नंतरचे नंतर हिता येणार होते. पुढे शिक्षणही घेता आले असते. पण त्या पुढच्या गोष्टी होत्या. अप्पा सावकाराची मुदत संपत आली होती. आज त्याला कोणत्या ना कोणत्या नोकरीची निकड होती. त्याने मेडिकल स्टोअरच्या नोकरीसाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्याच्या खानावळीत जेवायला येणाऱ्या एकाची ओळख त्या मेडिकल स्टोअरच्या मालकाशी होती. दिनेशसाठी त्यांनी शब्द टाकला व त्याला ती नोकरी मिळाली.

दिनेशचे नवे आयुष्य सुरू झाले. त्याचे क्षेत्रच बदलले. सुरूवातीला त्याला बरेच जड गेले; पण कर्तव्यभावनेने त्याने सगळे शिकून घेतले.

त्याच्या मालकांचे फक्त एक मेडिकल स्टोअर नव्हते; तर ते औषधी कंपन्यांचे डीलरही होते. त्यांचा व्यवसायाचा व्याप मोठा होता. दिनेश बारावी सायन्स होता. त्याला त्यांनी हाताशी धरले. त्याची त्यांना चांगली मदत होऊ लागली पण त्याचे मन त्या नोकरीत रमत नव्हते. त्याच्या दुकानाजवळच काही अंतरावर एक शाळा होती. शाळा भरण्याच्या व सुटायच्या वेळेला मुला-मुलींची गर्दी त्याच्या समोरून जायची. त्यांचे हसणे खिदळणे, कलकल करणे त्याला खूप आवडायचे. शाळेतला स्टाफही त्याला बघून बघून आता माहीत झाला होता. त्यांचा त्याला हेवा वाटायचा. अशी संधी मला कधी मिळणारच नाही का? जिवाचा आकांत व्हायचा. अप्पा सावकार आता हातघाईवर आला होता. सारखा तगादे लावू लागला. घरावर पाणी सोडा किंवा सर्व रक्कम चुकवा, अशी धमकी तो नुकताच आईला देऊन गेला होता. आईच्या जेमतेम चालणाऱ्या खानावळीतून व त्याच्या तुटपुंज्या पगारातून सर्व खर्च भागवून कर्ज फेडणे अशक्य होते हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. तो स्वतः अप्पाकडे जाऊन विनंती करून आला. मुदतवाढ द्या, आमचे सर्व प्रयत्न चालूच आहेत वगैरे वगैरे सगळा पाढा त्यांच्यापुढे वाचला; पण पालथ्या घडयावर पाणी. शेवटी तर त्यांनी निर्लज्जपणे दिनेशपुढे सुमा व त्यांच्या अर्धवट मुलाच्या लग्नाच्या प्रस्ताव मांडला. घर वाचवण्याचा व कर्जातून सुटका होण्याचा तो शेवटचा एकच पर्याय उरला असल्याचे त्यांनी सांगितले. नाही तरी तो भाऊ म्हणून सुमाला ना धड शिक्षण देऊ शकत होता, ना चांगल्या स्थळी तिचे लग्न लाऊन देऊ शकत होता. या प्रखर वास्तवाची जाणीव त्यांनी त्याला दिली होती. दिनेश हतबल होवून परत आला. सुमाला त्या घरी देणे म्हणजे विहिरीत ढकलण्यासारखेच होते. तो किंवा आई त्यासाठी कसे काय तयार होणार होते ! मग त्याने करायचे तरी काय?

संध्याकाळी एक-दोन शिकवण्या त्याला मिळाल्या होत्या.

त्याशिवाय हॉटेलमध्ये रात्रपाळीची नोकरी मिळण्यासारखी होती; पण त्याच्या मालकाने त्याला ती परवानगी दिली नाही. कुठेतरी एकच नोकरी कर असे त्यांनी त्याला बजावले. शाळेतील नोकरीसाठी त्याचे प्रयत्न चालू होते. पण कुठे ना कुठे माशी शिंकत गेली. त्यात त्याने पेपरमध्ये बातमी वाचली की आता शिक्षक भरतीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. सरकारने तसा आदेशच काढला आहे. दिनेशला थोडी अंधूक आशा वाटू लागली. तो त्याच्या डी. एड. कॉलेजमध्ये गेला. त्याच्या आवडत्या जोशी मॅडमना भेटला. अजून नोकरी नाही व सध्या तात्पुरता तो मेडिकल स्टोअरमध्ये नोकरीला आहे हे सांगताना त्याला ओशाळवाणे वाटले; पण मॅडमनी त्याला धीर दिला. मोकळया घरगुती गप्पा मारल्या. वाचन काय चालू आहे विचारले. तो एकदम हळवा झाला. मॅडमशी मनमोकळ बोलू लागला. सगळया अडचणी सांगितल्या. असे जगणेच नको असे ही तो बोलून गेला. मग चपापला एकदम, पण मॅडम त्याची समजूत घालू लागल्या ‘एवढया वाचनातून तू एवढीच प्रगल्भता मिळवलीस का? अग्नीपंख तू वाचलंस की नाही?

“सगळं वाचलय मॅडम, त्या मुळे तर मी अजून उभा आहे. कष्टाला माझी कसलीच हरकत नाहीच आहे. मी कितीही झिजायला तयार आहे. पण परिस्थिती मला तेवढा वेळही द्यायला तयार नाही. कारण माझं आयुष्य माझं एकटयांच नाही. माझी आई, माझी बहीण, माझ घर सगळंच माझ्यावर अवलंबून आहे.

“शिक्षकभरतीच्या परीक्षेबद्दल त्याला त्यांनी सांगितले की “आता जी.आर. निघणार आहे अशी बातमी आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊन प्रत्यक्ष शिक्षक भरती व्हायला किमान दीडदोन वर्षे लागतील; पण तोपर्यंत धीर धरायला हवा. परीक्षेची तयारी करायला हवी. कारण परीक्षेनंतर मिळालेल्या टक्केवारीनुसार यादी लागून शिक्षक भरती होईल. ”

हे ऐकून दिनेश अजूनच खचून गेला. मॅडमचा निरोप घेऊन परतला. मोठमोठ्या तात्विक गोष्टी बोलायला सोपे असते असे त्याला वाटू लागले. नशिबाच्या ऐरणीवर घाव घालणारी नियती त्याला घाव देणारा हातोडा बनवू द्यायला तयारच नव्हती.

तो दुकानात आला. शून्य मनाने बसून राहिला. अचानक त्याचे लक्ष झोपेच्या गोळ्या असणाऱ्या बाटल्यांकडे गेले. त्याला वाटले आपल्यासारखा तरूण मुलगा आईच्या हाताशी असून अगदीच कुचकामी आहे. माझ्या शिक्षणासाठी काढलेल्या कर्जामुळे आज आई, बहीण, घर सारेच संकटात सापडले आहेत; अन् मी मात्र काहीच करू शकत नाही. असल्या लाजिरवाण्या जगण्यापेक्षा मेलेले काय वाईट? माझ्या मरण्याने सहानुभूतीपोटी अप्पा त्यांची अट तरी बदलेल कदाचित. हळूहळू हा विचार दिनेशच्या मनात पक्का रुजू लागला. दुपारच्या वेळी इतर लोक जेवणासाठी बाहेर गेले असताना तो एकटाच होता. त्याने एक बाटली काढली. त्यातल्या गोळ्या सकाळच्याच पेपरचा एक कागद अर्धवट फाडून त्यात बांधल्या. बाटली बाहेर फेकून दिली. गोळ्यांची पुडी खिशात टाकली. रात्रीची वाट पाहू लागला. रोज तो गावी न जाता दोन-तीन रात्री दुकानातच झोपायचा. मरणाच्या इच्छेने त्याला जरा बरे वाटू लागले. “ मी जाण्यानं आईला, सुमाला अर्थात दुःख होईलच; पण आई धिराची आहे. ती काढेलच त्यातून काहीतरी मार्ग. नाहीतरी बाबा गेल्यावर काय थांबलं होतं. तसंच मी गेल्यावरही काय अडणार आहे? त्या अप्पाला मात्र राग येईल माझा. लाखोली वाहील मला; पण कदाचित मग त्याला आईची दया येईल. अन् शुभांगीला कधी कळेल का मी गेलो ते? तिला काय वाटेल? तिच्या मी लक्षात तरी असेन की नाही? ” दिनेशचे डोळे भरून आले. आज शेवटचे रडून घेऊ म्हणून त्याने स्वत:ला अजिबात आवरले नाही.

रात्रीचे दहा वाजले होते. त्याने मनाची पूर्ण तयारी केली. खिशातून पुढी काढली. पाणी जवळ घेऊन तो बसला. पुडी सोडली. गोळ्या हातात घेतल्या. ग्लास दुसऱ्या हातात धरला. सहज अगदी सहजच त्याचे लक्ष त्या पुडी बांधलेल्या कागदाकडे गेले. ‘वाँटेड!’ हो, ती वाँटेडची जाहिरात होती. तो वाचू लागला उत्सुकतेने. त्याच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. ती जाहिरात त्याच्या दुकानाच्या जवळच्या शाळेचीच होती. प्राथमिक शिक्षकाची एक जागा भरायची तीही खुल्या वर्गातली. चार दिवसांची मुदत होती अर्ज करण्याची. त्याचे हात थांबले. जीवनेच्छा रसरसून जागी झाली. उचंबळून आली. त्याला आता समजेना काय करू ! जाहिरातीच्या जाळ्यात अडकू पुन्हा? कशावरून इथे नोकरी लागेलच मला? हळूच दुसरे मन म्हणाले कशावरून नाही लागणार? आयुष्यच जर एक जुगार असेल तर हा नोकरीचा एक छोटासा जुगार खेळून बघायला काय हरकत आहे? पण आतापर्यंतचा अनुभव काय आहे ! जातीचे कवच असतं तर केव्हाच नोकरीला लागला असता. ही जागा तरी खुल्या वर्गासाठी आहे ना ! अरे, पण खुल्या वर्गात सगळेच उमेदवार बसतात हे माहीत नाही का तुला? म्हणजे काय होईल; सांगता येत नाही. त्याच्या दोन मनांचे द्वंद्व सुरू झाले. कदाचित निवड होईल, पण त्यासाठी कदाचित पैशांचीही मागणी होईल. मग काय करणार? त्यापेक्षा नकोच त्या फसव्या मृगजळामागे धावणे.

दिनेशच्या मनाची रस्सीखेच सुरू झाली. झोपेच्या गोळ्या व जाहिरात दोन्हीकडे मन सारखेच झेपाऊ लागले जीवन-मरणाला जोडणाऱ्या क्षीण धाग्याला तो लोंबकळू लागला.

Author