कुंपणापलीकडचे आकाश

तो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता.



चल, ऊठ लवकर नेहा. तीन वाजत आहेत. चार वाजता टॅक्सी येईल. आवर पटकन. ‘

‘काय हे पंकज ! आराम करू दे ना जरा, तू पण जरा पडून राहा. सकाळपासून सारखं भटकत आहोत. पाय खूप दुखतायत माझे.’ कधीचा पकंज नेहाच्या मागे लागला होता अन् ती त्याचे काही ऐकत नव्हती.

तो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता. नेहा मात्र प्रथमच येत होती. त्यामुळे तिला ते सुवर्णमंदिर कधी एकदा बघते असे झाले होते. मंदिराजवळच्याच एका हॉटेलमध्ये खोली घेऊन थोडे फ्रेश होऊन लगेच ते मंदिरात गेले होते. रात्र झाली होती. त्यामुळे दर्शन होऊ शकले | नव्हते. गर्दीही अगदी तुरळक होती. दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने ते सुवर्णमंदिर अधिकच झळाळत होते. त्याचे सोनेरी प्रतिबिंब सभोवतालच्या पाण्यात उजळले होते. ती भव्यता, शांतता, सौंदर्य पाहून नेहा भारावली. प्रवासाचा शीण विसरून दोघेही तेथे बराच वेळ बसून होती.

आज सकाळी लवकर उठून मंदिरात दोघे पोहोचली तेव्हा ‘ भाविकांची गर्दी खूप होती. मोठी रांग लागली होती. सकाळच्या उन्हात मंदिराचे सौंदर्य रात्रीपेक्षा वेगळेच होते. किरणांमुळे अधिक झळाळी लाभली होती. बराच वेळ उभे राहिल्यानंतर त्यांना दर्शन मिळाले होते. त्यानंतर तिथले वस्तुसंग्रहालय पाहायला पंकजने नेहाला नेले. एक मोठा संपूर्ण शौर्य व बलिदानांचा इतिहास तिच्यासमोर उलगडला गेला. त्या सगळ्या वातावरणामुळे ती फार प्रभावित झाली. पंकजही तिला मनापासून सारी माहिती देत होता. लंगरमधे जेवण करून त्यांनी शहरात एक फेरफटका मारला. होळीचा उत्साह लोकांमधे खूप संचारला होता. मंदिरातून मिरवणूक निघाली होती. रंगांची उधळण होत होती.

हॉटेलमध्ये परतल्यावर नेहाला थकव्याची जाणीव झाली. तिने स्वत:ला पलंगावर झोकून घेतले. पण हे विश्रांतीसुख काही फार वेळ पंकजने तिला मिळू दिले नाही. थोड्याच वेळात उठून आवरण्यासाठी तो तिच्या मागे लागला होता.

पंकजला आता ओढ लागली होती ती अटारी बॉर्डरवर जाण्याची व तिथला कार्यक्रम पाहण्याची. तो परत तिला घाई करू लागला.

“चल, ऊठ, ऊठ. आधीच तुला तयार व्हायला वेळ लागतो. तिथे कोणत्याही परिस्थितीत पाच वाजायच्या आत पोहोचायचे आहे आपल्याला.”

“अरे हो हो ! उठतेच आहे मी आता, वाघा बॉर्डरवर जायची इतकी कसली घाई झालीय तुला?

” वाघा नाही, मॅडम, अटारी म्हणा. अटारी बॉर्डरवर जात आहोत आपण.” अटारी शब्दावर पंकज जोर देत म्हणाला.

“अरे, वाघा काय अन् अटारी काय, दोन्ही एकाच ठिकाणी आहेत ना

“असं कसं? वाघा ही पाकिस्तानची आणि अटारी ही आपली म्हणजे भारताची बॉर्डर आहे. ती सीमेवरची छोटी गावंच आहेत. आपण आहोत कुठले?

नेहा निरूत्तर झाली. काहीशी गंभीरही झाली. उठली, तयार झाली. उत्साह काहीसा मावळल्यासारखा झाला होता. पंकजच्या लक्षात तिने काही येऊ दिले नाही.

दोघेही तयार होऊन हॉटेलच्या लॉबीत टॅक्सीची वाट पाहत बसले. अमृतसरला पंकज आधीही आला असला तरी बॉर्डरवर जायचे राहून गेले होते. होळी निमित्ताने आज तिथे विशेष कार्यक्रम असल्याचे त्याला समजले होते. काल आल्या आल्याच त्याने मॅनेजरला टॅक्सीसंबंधी बोलून ठेवले होते. बॉर्डरवर जाण्याच्या कल्पनेने तो फार उत्तेजित झालेला दिसत होता. नेहाने त्याला विचारले, ” पंकज, एवढा विशेष उत्साहात का आहेस?

“अगं, आपल्या देशाच्या सीमेवर आपण जात आहोत, हेच फार विशेष नाही का? रोज संध्याकाळी तिरंगा झेंडा खाली उतरवला जातो तो कार्यक्रम फार बघण्यासारखा असतो. आपल्या घरचे सगळे जाऊन आले. मी मात्र राहिलो मागे अगदी चाचाजी आणि चाची मॉ पण थकलेल्या वयात जाऊन आले तिथं. हजारो लोक मुद्दाम जातात. तुला नाही का वाटत तिथं जावंसं? ”

‘तसं नाही रे काही. मला पण वाटतंच आहे की.

नेहा उत्तरली पण आवाजात उत्साह नव्हता. मग ती एकदम शांतच झाली. थोड्याच वेळात टॅक्सी आली. दोघे अटारीच्या दिशेने प्रवास करू लागले.

अमृतसर मागे पडले. दोन्ही बाजूंनी विस्तीर्ण शेते दिसत होती. आकाशाच्या निरभ्र निळाईखाली हिरवाईल्यालेली धरती नजरेत भरत होती. सृष्टीने भाळावरती सूर्याचा तेजस्वी टिळा लावला होता. दोघे मूकपणे बसून होते. पंकज रसिकतेने सगळीकडे पाहून घेत होता. नेहा स्वत: तच हरवली होती. प्रयत्न करूनही ती पंकजच्या आनंदाला प्रतिसाद देऊ शकत नव्हती. “आपण आहोत कुठले?” मघाशी पंकजने अभिमानाने उच्चारलेला प्रश्न ती स्वतःला विचारत होती. उत्तराचा शोध घेत होती.

नेहा – पंकजच्या लग्नाला वर्ष होऊन गेले होते. अंबाला सारख्या टुमदार व लष्करी छावण्यांचा शहरात ती पंकजच्या घरी आली आणि त्या घरचीच झाली. लग्नानंतर अजून एकदाही तिला तिच्या माँ, पिताजींना भेटायला माहेरी जाता आले नव्हते. तिला त्यांची खूप आठवण यायची. तिची भावंडे, मैत्रिणी, प्रेमळ काकाकाकू यांच्या सुखद आठवणींनी ती बेचैन व्हायची. त्या एकाच गावात तिचे बालपण तरूण झाले होते, शिकले सवरले होते. त्या गावावरही तिचा फार जीव होता. निसर्गाच्या कुशीतले तिचे हे छोटेसे गाव. हिरवीगार कुरणे, उंच उंच वृक्षांनी आच्छादलेले डोंगर, खळखळणारे ओढे, किती थंड आणि आल्हादायक हवा होती तिच्या गावाची. जणू आताही ती शीतल झुळूक तिच्या मनाला स्पशून जात होती. तिच्या सासरचे सगळेच खूप चांगले होते. पंकजही तिला समजूतदारपणे वागवायचा. त्या कुणाबद्दल तिची काहीच तक्रार नव्हती. तरी पण माहेरच्या आठवणींचा काटा काळजात सलत राहायचा.

ब्रेक लागल्याबरोबर नेहा भानावर आली. टॅक्सी स्टॅण्डवर टॅक्सी लावून ड्रायव्हरने त्यांना कुठल्या दिशेने जायचे ते सांगितले. त्यापुढे टॅक्सी जाऊ शकत नव्हती. दोघे रस्त्यावर आले. सर्वत्र एकच गर्दी उसळली होती. सायकलरिक्षावाले पुकारा देत होते. काही जण रिक्षात बसून कार्यक्रमाच्या दिशेने निघाले होते. काही जण पायी चालत निघाले होते. पंकजने पण पायीच जाण्याचे ठरवले. पाच मिनिटांच्या अंतरावर त्यांना एक भव्य प्रवेशद्वार त्या सडकेवर दिसले. त्यावर इंडिया व भारत असे मोठ्या अक्षरांत लिहिलेले होते. तसेच तिरंगाही त्यावर फडकत होता.

“नेहा, किती मोठं गेट आहे बघ. दिल्लीच्या इंडिया गेटसारखंच आहे अगदी.” पंकज म्हणाला.

“हो का ! मी ते तरी कुठं बघितलंय.’ ”

त्या गेटच्या डाव्या बाजूने वळसा घेऊन स्टेडियमच्या पायऱ्या चढून जायचे होते. जागोजागी लष्करी जवान तैनात होते. दोघे स्टेडियमवर जाऊन पोहोचले. स्टेडियम खूप मोठे व रस्त्याच्या एका बाजूने होते. खूप पायऱ्या होत्या. खूप लोक आधीच तेथे जाऊन ध्वजसंचलन व ध्वजावतरणाचा कार्यक्रम चांगला दिसेल अशा जागा पकडून बसले होते. पंकज-नेहालाही बऱ्यापैकी जागा मिळाली. त्यांच्या उजव्या हातात ते इंडिया गेट व डावीकडे एक मोठे लोखंडी फाटक होते. त्यावरही इंडिया व भारत हे शब्द होते. ते बंद होते. त्यामागे लागूनच तिरंगा वाऱ्यावर फडकत होता. तीन-चार बंदूकधारी व कडक गणवेशातील जवान तिथे होते. त्या दोन्ही गेटच्या दरम्यानची सडक स्वच्छ, गुळगुळीत व डांबरी होती. त्यावरच सर्व कार्यक्रम होत असत. सडकेच्या दुसऱ्या बाजूने बैठ्या इमारती होत्या. ती लष्करी कार्यालये होती.

होळी निमित्ताने विशेष ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. थोड्याच वेळात त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. देशभक्तीपर एकापेक्षा एक सुरस गाणी ते जोशपूर्ण आवाजात सादर करू लागले. वातावरणात एक प्रकारचा भारलेपणा व जल्लोष भरू लागला. प्रेक्षकांतून टाळ्यांनी ताल धरला. अनेक जण उत्स्फूर्तपणे उठले व स्टेडियमच्या पायऱ्या उतरून त्या सडकेवर जाऊन बेभानपणे नृत्य करू लागले. त्यात स्त्री-पुरुष, लहान, मोठे, वृद्ध सर्वांचाच समावेश होता. स्टेडियम गर्दीने अक्षरश: फुलले होते. बसण्यास जागा नसल्यामुळे अनेक जण उभे होते. नेहमीच्या झेंडावंदनापेक्षा ते काही वेगळेच होते. आपण देशाच्या सीमेवर आहोत. ही सुरक्षित आहे. म्हणून आपण सुरक्षित आहोत. स्वत:च्या घरात उबदार
वाटते तशी भावना मनात निर्माण होत होती. घराबद्दल वाटणाऱ्या आत्मीयता व उत्कटतेची जागा आता देशसंकल्पनेने घेतली होती. त्यामुळे अनेकांचे डोळे पाझरायला लागले. अश्रू अनावर झाले. पंकजचीही स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. आपल्या जीवनाचे स्थैर्य या जवानांवर अवलंबून आहे. त्यांच्यामुळे ते स्वतंत्र आहे. ते सीमेवर जागता पहारा करतात. म्हणून आपण आपल्या घरात सुखाने झोपू शकतो. आजची ही एक संध्याकाळ पुरेशी नाही. या विचाराने तो एकदम उद्गारला, “नेहा आपण उद्या पण येणार आहोत इथे.” त्याने अपेक्षेने नेहाकडे पाहिले. पण नेहाचे लक्ष होते कुठे? … आणि … त्याच क्षणी पंकजच्या लक्षात सारे काही आले. तिच्या मनस्थितीची त्याला कल्पना आली. तोही मनातून हळवा झाला. हलकेच तिचा हात हातात घेतला. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, “पंकज …मी आता कसं…? ” पकंजने तिला हळुवारपणे थोपटले.

ऑर्केस्ट्रा संपला. हातात माईक घेऊन एक अधिकारी घोषणा देत प्रेक्षकांना प्रतिसादासाठी प्रोत्साहन देऊ लागला. त्याच्या ‘भारत माता की ‘ ला प्रेक्षक ‘जय’ असा प्रतिसाद द्यायचे. ‘जय जवान…’ प्रेक्षक ओराडायचे ‘जय किसान’ पंकजही त्यात सामील झाला.

भारतीय फाटकाच्या पलीकडे काही फुटांच्या अंतरावर तसेच आणखी एक फाटक होते. तेही बंद होते. तिथेही लष्करी जवान तैनात होते. तिथेही एक राष्ट्रध्वज लहरत होता. तिथेही असेच स्टेडियम अशीच लोकांची गर्दी, अशाच जयघोषणा होत्या. पण ते म्हणत होते. ‘जियो जियो ‘ पाकिस्तान !’ हो. ती वाघाबॉर्डर होती. पाकिस्तानची सीमा.

नेहा तिकडेच बघत होती. तिच्या मनात आर्तता होती. भावनांचे काहूर उठले होते. ती शाळेत शिकत असताना एकदा तिथे आली होती. आपल्या देशाची सीमा पाहण्याची उत्सुकता तिला पण होती. तेव्हा तिने पण हर्षभराने जयघोष केला होता. ‘जियो जियो… पाकीस्तान.’ पुढे कधी काळी ती पलीकडच्या बॉर्डरवर येऊन बसेल असा विचार तिच्या मनात कधी आला नव्हता. पण आत जी परिस्थिती आली होती.

नेहाचे माहेर पाकिस्तानात होते. फाळणीनंतर तिचे आजोबा भारतात न येता तिकडेच राहिले होते. नेहाचा जन्म तिथेच झाला. हळूहळू येईल असे वाटणारे स्थैर्य त्यांच्या कुटुंबाला इतक्या वर्षांनीही लाभले नव्हते. गेल्या काही वर्षांत तर तिथलं सामाजिक आणि राजकीय जीवन अतिशय अस्थिर झाले होते. त्यामुळे निदान आपल्या पुढच्या पिढीने तरी इथेच नको राहायला. या विचाराने नेहाच्या वडिलांनी मित्राकडून आलेल्या पंकजच्या स्थळाला होकार देऊन नेहाला भारतात सासरी पाठवलं होते. भारतात तिचे लग्न झाल्यावर तिथं आई-वडील परत गेले. त्यानंतर अजून ‘त्यांची भेट झाली नव्हती. तिथे अशांत व धोकादायक वातावरण असल्यामुळे तिने इतक्यात तिकडे यऊ नये असेच दोन्ही कुटुंबांना वाटत होते. लग्नानंतर माहेर दुरावतं. नेहाचं माहेर अधिकच दुरावले गेले होते. आज बॉर्डरवर आल्यानंतर तिला पाकिस्तानचे जे काही थोडेसे का होईना पण दर्शन झाले होते. त्यामुळे आठवणींनी ती अगदी व्याकूळ झाली. त्या जल्लोषपूर्ण कार्यक्रमात तिचे मन रमत नव्हते. तिचे विचार वेगळे चालले होते. आता आपण कुठले आहोत. या प्रश्नाचे उत्तर निश्चित देता येईना. लग्नामुळे मी भारतीय झाले म्हणजे माझ्या देशाची मी आता शत्रू झाले की काय? भारत माता की जय म्हणणाऱ्या पंकजकडे पाहाताना तिच्या मनात हा विचार होता. मी काय म्हणू? ‘भारत माता की जय’ की ‘जियो जियो पाकिस्तान? ‘ दोन्ही म्हणायला काय हरकत आहे? मी दोन्ही देशांची आहे आता; पण असं मी केलं तर काय होईल? लोकांना माझा भलताच संशय येईल? पंकजला काय वाटेल?

एकदम पसरलेल्या शांततेमुळे ती भानावर आली. झेंडे खाली उतरवण्याची वेळ झाली होती. जवानांना संचलन, ध्वजाला सॅल्यूट झाले. बिगुल वाजत होता. त्या तालावर एकमेकांशी तिरप्या दिशेने छेद केल्यासारखे दोन्ही राष्ट्रध्वज मंदगतीने खाली येऊ लागले. प्रत्येक जण ते दृश्य भारावून जाऊन डोळ्यात साठवून घेत होता. दोन्ही झेंडे उतरले. कार्यक्रम संपला. ताबडतोब दोन्ही फाटके बंद झाली. ती बंद करताना दोन्हीकडचे जवान आपसात काहीतरी बोलताना दिसले. प्रेक्षकांची गर्दी एकदम उसळली. अनेक जण परवानगी नसताना फाटकाच्या अगदी जवळ जाण्यासाठी त्या दिशेने घुसू लागले. अडवणाऱ्या एक-दोन जवानांना चुकवून काही जण तिथपर्यंत जाण्यात यशस्वी झाले.

त्यातच पंकजही होता. नेहाची मन:स्थिती ओळखून त्याने तिला हाताला धरून तिथे नेले. पलीकडचे फाटकही बंद झाले होते. ते प्रेक्षकही परत निघाले होते. नेहाच्या मनाचा आतापर्यंत घातलेला बांध फुटला व ती कोसळल्यागत रडू लागली. जवानांचे तिच्याकडे लक्ष गेले. ते तिच्याजवळ आले. पलीकडच्या जवानांचेही लक्ष गेले होते व ते उत्सुकतेने काय होत आहे हे पाहू लागले.

एक भारतीय जवान तिला विचारू लागला, “काय झालं? तुम्ही एकट्या आहात का? गर्दीत कुणी हरवलं आहे का? ”

“नाही, माझे मिस्टर आहेत माझ्याबरोबर. ”

“मग रडता कशाला? काय झालं? ”

“मला… माझ्या घरची खूप आठवण येतेय. ते तिकडे ….”

नेहा हुंदके देत बोलण्याचा प्रयत्न करू लागली. “कुठे आहेत तुमचे घरचे? ”
पंकजने समोर येत सर्व खुलासा केला. ते ऐकून दोन्हीकडचे जवान व आपसात जमलेले प्रेक्षक एकदम स्तब्ध झाले.
“ते … तुमचे आईवडील पण या कार्यक्रमाला आले आहेत का? ” जवानाने विचारले.

“नाही, आम्ही इथं येणार हे त्यांना माहिती नाही.” नेहा.

“कळवलं असतं तर तेही आज इथं आले असते. त्या गेटपाशी उभे राहिले असते. तुम्ही एकमेकांना बघितलं असतं. चार शब्द खुशालीचे बोलता आले असते.” कठोर दिसणाऱ्या त्या जवानांचा आवाज जरा मृदू झाला होता. पलीकडचे जवानही शांतपणे हे सगळं ऐकत होते.

असतं. ‘ ”

“मला त्यांना भेटायला तिकडे जाऊ दिलं असतं का तुम्ही? ”

‘तसं आम्ही करू शकत नाही; पण असं इथूनच पाहता तर आलं “प्लीज तुम्ही मला एकदा, गेटमधून तिकडे जाऊ द्या.”

फक्त एकदा दोन मिनिटांसाठी त्या “नाही… नाही… तसं काही होऊ शकत नाही.”

“अहो, तुमच्या समोर तिकडे जाऊन लगेच येते. प्लीज माझ्यासाठी एकदा हे गेट उघडा.” नेहा आर्त स्वरात विनवणी करू लागली.

हे बोलताना तिची याचना करणारी नजर पलीकडच्या जवानांवरही लागली होती.

“तुम्ही प्लीज यांना इथून घेऊन जा. हे गेट आता उद्या सकाळी झेंडा चढवण्याच्या वेळीच उघडेल व इथून असं त्या बाजूला कुणालाही जाता येणार नाही.” त्या जवानाने पंकजला सांगितले.

नेहाला वाटले, या देशाच्या सुरक्षेसाठी घातलेले हे कुंपण तिला तिकडे जाऊन तिच्या भूमीला स्पर्श करु देण्यास का घाबरते आहे? जालियनवाला बागेत निरपराधांना घातलेल्या इंग्रजांच्या गोळ्यांच्या खुणा अजून जतन करुन ठेवल्या आहेत. माझ्या मनाच्या जखमांचे यांना काहीच कसे वाटत नाही? मी काय कुणी अतिरेकी आहे? माझ्या हातात शस्त्र आहे? मला फक्त तिकडे जाऊन यायचे आहे. तिथल्या भूमीला स्पर्श करून यायचे आहे. तेवढच माझ्या देशात गेल्याचे समाधान मला लाभेल.

खरं तर मावळणारा सूर्य त्या गेटच्या पलीकडच्या आकाशात आहे; पण किरणे इकडे इथपर्यंत येतच आहेत ना. तिकडची हवा इकडे वाहतेच. इकडचे पक्षी तिकडच्या झाडांवर तिथल्या पक्ष्यांबरोबर कलरव करीत आहेत. हे जवानही एकमेकांशी चांगले बोलत आहेत. मग मलाच का मनाई? तर तो देश वेगळा आहे म्हणून ! तिकडे जायला व्हिसा, पासपोर्ट हजार भानगडी केल्याशिवाय जाता येत नाही म्हणून. पण माझ्यापासून या सीमेला कसला आलाय धोका? एक लेक आपल्या घराचं नुकसान व्हावे अशी कल्पना तरी करू शकेल का कधी?

नेहा मूक झाली. सगळेच मूक झाले. तिची वेदना साऱ्यांच्या मनात पाझरत गेली. ती इकडे येण्यास का उत्साही नव्हती, हे आता पूर्णतया पंकजच्या लक्षात आले. आपल्या देशाच्या सीमेवर जाण्याचा आनंद त्याला होता; पण आपल्या देशाच्या सीमेजवळ जाऊन तिथे पाऊलही टाकता न येण्याची तिची व्यथा त्याला हेलावून गेली. त्याने हळुवारपणे तिचा हात धरला व तिच्यासह तो माघारी फिरला..

एकच अनंत आकाशतत्त्व त्या सीमांच्या सुरक्षेसाठी कुंपणावरील दोन फाटकांमुळे इकडे व तिकडे असे विभागून टाकले होते. आता सूर्य मावळला होता. अंधार दोन्हीकडे पसरला होता. इकडे आणि तिकडेही.

Author