वास्तव

आजकाल कुठल्याही समारंभाला जा, कुठल्याही पार्टीला जा, अगदी आम्हा बायकांच्या किटी पार्टीला जा कुठेही जा, सगळीकडे एका कॉमन विषयावर लोक बोलत असतात. “बदललेले हे जग आणि आजच्या मुलांचे रहाणीमान.” सगळ्यांची मुले खूप शिकलेली असतात



आजकाल कुठल्याही समारंभाला जा, कुठल्याही पार्टीला जा, अगदी आम्हा बायकांच्या किटी पार्टीला जा कुठेही जा, सगळीकडे एका कॉमन विषयावर लोक बोलत असतात. “बदललेले हे जग आणि आजच्या मुलांचे रहाणीमान.” सगळ्यांची मुले खूप शिकलेली असतात. त्यांना खूप छान जॉब मिळालेले असतात. कोणाची मुले अमेरिकेत तर कोणाची लंडनला तर कोणी इथेच खूप मोठ्या हुद्यांवर. ही शिकलेली मुले पोटापाण्यासाठी बाहेर गेली. आणि त्यांच्या रहाणीमानात इतका बदल झाला आहे की हळूहळू तो एक काळजीचा विषय होऊन बसला आहे.
पंख फुटलेल्या पाखराच्या पिल्लांना जशी सैरावैरा उडण्याची मजा येते ना, तशीच काही गत या आमच्याही पिल्लांची झाली आहे. आजच्या या बदलत्या युगात उत्कर्षाचे अनेक दरवाजे ह्या मुलांसाठी संपूर्ण जगभर खुले आहेत. जगातील कोणत्याही दिशेला ती व्यवसायासाठी जात आहेत. कधी एकटीच, तर कधी कोणाच्या सोबतीने.
आणि आम्हा पाखरांची घरटी “ओस” पडली आहेत. ही घरटी आम्ही त्यांच्यासाठी बांधत होतो. त्यांच्या खोल्या, त्यांची अभ्यासाची जागा, पुढे वाढणारे कुटुंब याचा विचार करत ती बनवलेली आहेत.
गेल्या काही वर्षात, अतिशय अल्प कालावधीत, या जगात इतका भयंकर बदल झाला की आम्हाला काही कळण्यापूर्वीच ही सगळे स्वप्ने माळेतील मणी ओघळावेत तशी ओघळून गेली.
अशी आमची स्वप्न होती तर काय? काय इच्छा होत्या? खरे तर अगदी साधी इच्छा आहे. मुलाबाळांच्या जवळ रहावे, सगळ्यांनी बसून आनंदाने दोन वेळचे जेवण करावे, सणासुदीला घरात एकत्र जमावे, परस्परांचा सहवास, साधी रहाणी, उच्च विचार कुटुंबाती ऐक्य आणि प्रेम, आणि मुलांचा सुखी संसार.. हा छोटासा आनंद.
हा छोटासा आनंद आमच्या जीवनाचा पाया होता. कुटुंबातील भावनात्मक एकता ही तर प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. ती त्याची ताकद असते. पण हा आमच्या जीवनाच्या आनंदाचा पाया कोसळून पडतोय, काही वेळा तर असे जाणवते की आपण आपले “मूळ” घालवत चाललोय.
व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या आमच्या मुलांचे या कशाशी ही नाते राहिले नाही. केवळ जगणे आणि स्वप्नांच्या पाठीमागे धावणे हेच राहिले असावे. किंवा कदाचित या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे “वेळ” ही नाही. सकाळी आठ ते रात्री आठच्या कामांच्या वेळांमुळे हे सगळे छोटे छोटे आनंद आणि कुटुंबाबरोबर दोन वेळा जेवणाच्या आनंदही हिरावून बसली आहेत. कुठल्याही मुल्यांशी त्यांची बांधिलकी राहिलेली नाही. ही मुले फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत जगत आहेत.
याचे जबाबदार कुठेतरी आपण तर नाही ना? असो एक प्रश्न उभा रहातो. “आयुष्य” हे एक फार मोठे कोडे आहे. फार मोठी मोठी कोडी सोडवणारी माणसं ही कधी कधी या कोड्यात अशी अडकतात की तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतच रहातात. आयुष्य जगतांना आपण कोणता मार्ग निवडतो यावर आपले भवितव्य अवलंबून असते. प्रत्येकाच्या आयुष्याचे मार्ग वेगळे-वेगळे असतात. काहींचा मार्ग अगदी ‘सरळसोट ‘ असतो. या जीवनातल्या अडीअडचणींची त्यांना जाणीवही नसते आणि ही ‘सरळसोट’ आयुष्य जगणारी माणसे समाधानी असतात. जिथे असतात तिथेच रहातात आणि आनंदाने मान्य करतात त्यांची आयुष्यात फार उंच उडण्याची इच्छाही नसते. ते आपले चाकोरीतील आयुष्य जगत रहातात.
या उलट काहींच्या आयुष्यात खूप अडचणी येतात, तर काहींची आयुष्याबद्दल फार मोठी स्वप्न असतात आणि अशा प्रकारची माणसं अडचणीतून ‘ध्येया’ चा रस्ता शोधत असतात आणि हा रस्ता शोधता शोधता त्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. ह्या व्यक्ती आयुष्यात कधी कधी खूप पुढे निघून जातात खूप ” यशस्वी ” होतात. मी पाहिले आहे अशा व्यक्तींना ‘यश’ मिळविण्याचे ‘व्यसन’ लागते आणि मला असे वाटते आपण मध्यमवर्गीय ह्या यशाच्या व्यसनाने पछाडलेले आहोत आणि या व्यसनापोटी आमच्या पुढच्या पिढीचे हे आनंदाचे क्षण विखरून जात आहेत. ऐन उमेदीच्या वयात ती घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी कष्ट करत आहेत.
आमच्या मुलांनी जगाबरोबर पुढे चालावे अशी इच्छा ठेवताना त्यांना आणि आपल्याला सुध्दा किती गोष्टींचा आनंद विसरावा लागेल, छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्याची मदत घ्यायला लागेल ह्याचा आपण विचारही केला नाही किंवा झपाट्याने पुढे जाणाऱ्या या जगाबरोबर त्यांना जगावे लागणार आहे अशी एक वास्तविकता आमच्या पुढे नकळत असावी त्यामुळे आमच्यासमोरही दुसरा काही पर्यायच नव्हता.
आमच्या मागच्या पिढीबरोबर जगताना ‘जनरेशन गॅप’ हा शब्द प्रचलित होता. नेहमी प्रत्येक पिढी ही मागच्या पिढीपेक्षा चार पावले पुढेच जात असते असे म्हणतात. त्यामुळे विचारांमध्ये एकमत होणे हे जरा कठीणच असते तरी सुध्दा आपण आपल्या मोठ्या माणसांबरोबर काही तरी विचारांची देवाण घेवाण करु शकत होतो. जनरेशन गॅप मुळे एकमत जरी होत नसले तरी संवाद जरूर साधू शकत होतो. त्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या पुंजीचा थोडा फायदा आम्हाला नक्कीच मिळत होता आणि ते ही ‘शिस्त आणि संस्कार’ या नावाखाली. घरातले आनंद आपल्याला देत होते. हे आज आपल्याला कळत आहे.
कारण या नवीन पिढीशी आपण फारसे बोलू शकत नाही. काळ इतका बदलला आहे की टेक्नॉलॉजीमुळे आयुष्यात फॉर्मलिटी खूप आली. त्यामुळे काळाप्रमाणे आम्ही स्वतःला कितीही अद्ययावत करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्याशी फारसा संवाद साधू शकत नाही. अलिकडे ‘जनरेशन गॅप’ या शब्दाची जागा ‘स्पेस’ या शब्दाने घेतली आहे आणि या ‘स्पेसनी माणसाच्या आयुष्यात इतकी स्पेस’ घेतली की नवीन पिढी शिस्त, संस्कार अशा या जीवनमुल्यांपासून हळूहळू दूर होत चालली आहे. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला त्यांच्याकडे वेळीही नाही. त्यांच्यासाठी हे ‘आयुष्य’ ही एक फॉर्मलिटी होऊन बसले आहे.
काळाप्रमाणे एन्जॉयमेंटची व्याख्या बदलत चालली आहे. आपण त्यांच्याजवळ असलो की ते त्याप्रमाणे आपल्याला बरोबर घेऊन एन्जॉय करुन आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. ही मुले त्यांच्या धावपळीच्या जीवनात देखील त्यांच्या सुट्या आपल्याबरोबर घालवून आपल्याला जो आनंद देण्याचा प्रयत्न करतात त्यालाच जीवनातला सगळ्यात ‘मोठा आनंद’ आपण मानला पाहिजे.
त्यांच्याकडे स्वतःसाठीच वेळ नाही त्यामुळे आम्हालाच त्यांना आमचा वेळ देणे जरुरी आहे. काळाप्रमाणे बदललेल्या ‘जीवन मूल्यांचा आम्ही हसत स्वीकार करणे ही वेळेची गरज आहे. धावणाऱ्या या युगात त्यांना त्यांच्या जीवनाचा वेग कमी करुन तर चालणारच नाही.’ ‘थांबला तो संपला’ ही वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता स्वीकारावीच लागेल. त्यांनी पण आपली कौटुंबिक पध्दती सांभाळण्याचा प्रयत्न करावा त्यावर पाश्चात्य छबीची छाया येऊ न देता आपला संसार आनंदाने करावा एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा.
गेल्या दहा-पंधरा वर्षाच्या कालावधीत परिस्थीतीत जो काही बदलाव झाला त्या सगळ्यात आमचा आणि आमच्या मुलांचा कोणाचाच दोष नाही. त्यांच्यावर संस्कार एक झाले आणि बाहेर परिस्थीती अगदीच वेगळी.
तरीही बिचारी आनंदाने या सगळ्यांला सामोरी जात आहेत. त्यांना आमच्या वेळेची आणि समजुतदारपणाची अतिशय जरूरी आहे. त्यामुळे बदलत्या काळाप्रमाणे स्वतःला बदलणे हाच पर्याय आहे.
परस्परांना समजून घेऊनच जगण्यात खरा आनंद आहे. याचेच नाव जीवन आहे……

Author