ओढ

ऐन पावसाळ्याचे दिवस होते. अगदी आषाढातला जोरदार पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होता. जागोजागी पाणी साचलेले होते. आमच्या गल्लीत तर पाणी खूपच साचून रहाते. त्या साठलेल्या पाण्यातून चालत गल्लीच्या बाहेर पडायचे म्हणजे एक दिव्यच. त्यातून चालताना घाणही वाटते आणि काही चावेल याची भीती सुध्दा वाटत होती.



ऐन पावसाळ्याचे दिवस होते. अगदी आषाढातला जोरदार पाऊस गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु होता. जागोजागी पाणी साचलेले होते. आमच्या गल्लीत तर पाणी खूपच साचून रहाते. त्या साठलेल्या पाण्यातून चालत गल्लीच्या बाहेर पडायचे म्हणजे एक दिव्यच. त्यातून चालताना घाणही वाटते आणि काही चावेल याची भीती सुध्दा वाटत होती. तरीही काही सुटका नसल्यामुळे लोकांचे आपले दैनंदिन व्यवहार चालूच होते. ही मागच्या वर्षाची घडलेली गोष्ट आहे. आज ही तसाच पाऊस, तसेच साठलेले पाणी बघून एकदम आठवण झाली.
रात्रीचे दोन तरी वाजले असतील. रस्त्यावर लाईट नव्हते. सगळीकडे भयानक शांतता होती. घड्याळाची ‘टिक-टिक’ आणि रात्री पडणाऱ्या पावसाचा ‘टप-टप’ आवाज ‘शांतता भंग’ करत होता. झोप न आल्यामुळे मी जागीच होते. मला आठवतं निदान एक सव्वा वाजेपर्यंत तर नक्कीच जागी होते. त्यानंतर बहुतेक डोळा लागला असावा. एकदम कोणीतरी कंपाऊंडचे गेट उघडण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटले आणि पटकन उठून बसले. आवाजाचा कानोसा घेत होते. परत तसाच आवाज झाला. आता मात्र खात्री झाली. नक्की कोणीतरी गेटला धक्के मारतय. आम्ही दोघेही पटकन उठलो. हाताशी बॅटरी होतीच. ती चालू केली. गेट वर ‘झोत’ मारला. तेवढ्या उजेडात मला कोणीतरी असल्याची चाहूल लागली. तशी जोरात ओरडले, ‘कोणीतरी आहे. बॅटरी तशीच धरून ठेव.’ नीट बघितले. अंधारात पांढऱ्या केसांची व्यक्ती दारात पडली आहे हे अगदी आम्हाला स्पष्ट दिसत होते. खाली आलो. बाहेरचा लाईट चालू केला. बाप रे! बघून थक्कच झालो.
दोन तीन घर सोडून पलिकडच्या घरात एक राजस्थानी कुटुंब रहाते. त्या गृहस्थांचे वडिल आमच्या दारात पडलेले होते. काय करावे हे पाच मिनिटे सुचलेच नाही. आम्ही ठरविले ‘प्रथम आजुबाजूच्या लोकांना फोन करुन उठवू या कोणी आले की मग आपले दार उघडू.’ पहिला फोन समोरच्यांना केला आणि सांगितले त्यांनी त्यांच्या बाल्कनीतून बघितले आणि म्हणाले ‘हो, हो, कर्नल साहेबच आहेत.’ मग आमची पळापळ सुरु. शेजारी उठले. त्यांच्या मुलाला उठवून आणले. ह्या कर्नलची मुलगी नुकतीच सोसायटीत रहायला आली होती. ती बरोबर आमच्या समोरच्या लाईनीतच रहात होती. तिला पण उठवले. कर्नल साहेबांना बघून तर आम्ही सगळे आवाकच झालो होतो. तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न बहुतेक सगळ्यांच्या मनात काहूर माजवत होते. आमची रिटायर्ड आर्मी ऑफिसर्सची सोसायटी आहे. त्यात ‘कर्नल’ सगळ्यात सिनीयर. त्यांचे वय जवळ जवळ नव्वद तर असेलच.
त्यांना रिटायर्ड होऊन सुध्दा तीस वर्ष तर नक्कीच झाली होती. कदाचित जास्तीच. त्यांच्या आयुष्याचा प्रवास ‘ब्रिटीश आर्मी’ पासून सुरु झाला होता आणि ‘इंडियन आर्मी’त पूर्ण झाला होता. ब्रिटीश आर्मी जरी सुटली होती तरी तिच्या राहणीमानाचे सगळे पुरावे त्यांच्या जीवनात तसेच होते. चालणे, बोलणे, कपडे वागणीमान यांच्यात ब्रिटीशांची छटा दिसून यायचीच. चोवीस वर्षापूर्वी आम्ही इथे रहायला आलो. कुठल्याही पार्टीत गप्पा निघाल्या की ह्यांच्या ‘ब्रिटीश आर्मी’ च्या गप्पा कायम रंग घेत असत. कुठल्याही विषयाला वळवून तो ब्रिटीशांपर्यंत पोहचवण्यात त्यांचा हातखंडा होता.
कर्नल असल्यामुळे ‘ रुबाबदार ‘ पणा तर होताच. राजस्थानी असल्यामुळे व्यक्तिमत्वही तजेलदार, राजबिंडे होते आणि सैन्याची शिस्त. आमच्या सोसायटीत ‘वयस्कर’ आणि ‘कर्नल’ म्हणून त्यांना खूप रिस्पेक्ट होता. त्यांची पत्नी ही तशीच. ते बायकोला नेहमी ‘मॅडम’ म्हणायचे. आर्मीत असल्यामुळे नोकरचाकरां सोबत वागण्याची त्यांची आपली एक वेगळीच स्टाईल होती. मॅडम ही अतिशय रुपवान होत्या. उंच्या पुऱ्या गोरा रंग, खांद्यापर्यंतचा बॉब कट, अंगावर कायम टिपीकल ‘जयपुरी सीफॉन’ ची साडी, दोन्ही खांद्यावर, अर्ध डोकं झाकत घेतलेला पदर, खानदानी असल्यीच जाणीव करुन द्यायचा. या वयात पण उंच टाचेच्या चपला घालून अगदी ताठपणे चालणे होते. कुठेही बाहेर निघाले की कायम दोघे बरोबर असायचे. अगदी बाहेर झोपाळ्यावर बसले तरी दोघे बसणार ही त्यांची खासियत.
गेल्या कित्येक वर्षांपासून मात्र दोघे जणही थकले होते. हळूहळू बाहेर फिरणे कमी झाले होते. पाय अटेन्ड करणे तर बंदच झाले होते. आपण कधी त्यांच्याकडे गेलो तर बोलणे पण बंद झाले होते. गेल्या दोन वर्षापासून तर ‘कर्नल’ बिछान्यावर खिळूनच होते. बिछान्यातून उठणे ही शक्य नव्हते. कोणी तोंडात घास घातला तर खात होते. त्यांना सांभाळणारा माणूस येऊन त्यांना आंघोळ वगैरे घालत असे. जीवन परावलंबी झाले होते. सगळा ‘रूबाब’ तर इतिहास जमा झाला होता. मॅडमही थकून गेल्या होत्या. हात, पाय व्यवस्थित होते. पण अंगात त्राण नव्हता. नातवंडे हाताला धरुन चालवित होती. त्यांना सुध्दा दिनचर्येसाठी सुनेच्या मदतीची जरूरी लागत होतीच. हळूहळू त्यांच्याही स्मृतीवर परिणाम झालाच होता. तरी कर्नल साहेबांपेक्षा बरी आवृत्ती होती. असे हे कर्नल साहेब जे स्वतःहून उठू शकत नव्हते, स्मृती ही नाहीतच जमा होती ते रात्री दोन वाजता बिछान्यातून उठून त्यांच्या घराचे दार उघडून, इतक्या अंधारात साठलेल्या पाण्यातून आमच्या घरापर्यंत कसे आले असावेत? आणि का?
ह्या विचारातच सगळे जण त्यांना उठवून उभे करण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री दोन वाजता सगळ्या सोसायटीत दिवे लागून सगळ्यांची एकच पळापळ चालली होती.
त्यांच्या मुलाला आणि सुनेला आम्ही सगळे जण धडे देत होतो. “अग, पुढच्या दाराला आतुन कुलूप का नाही लावलेस? नशीब इथे गाडी, घोडा येत नाही. नाहीतर काय झाले असते? ”
आणि ती बिचारी केविलवाणी होऊन सांगत होती, “अहो यांना उठून बसता पण येत नाही. हे असे काही करतील हे कधी ध्यानीमनी पण नाही आले.”
एवढ्या गोंधळात त्यांना सगळ्यांनी मिळून कसेबसे उभे केले. थोडे पाणी पाजले आणि त्यांना त्यांच्या घरी नेण्याचा प्रयत्न सुरु झाला. तरी पण हे गृहस्थ एवढ्या लोकांना धक्के देऊन आमच्याच घरात शिरायला बघत होते. आम्हाला कोणाला काही समजत नव्हते हा ‘काय प्रकार आहे? ‘ शेवटी त्यांनी स्वतःची सगळी शक्ती एकत्र करुन जोराने आपल्या बायकोला हाका मारायला सुरुवात केली म्हणाले, ‘ती इथेच आहे, तिला बोलवा. तिला इकडे घेऊन आलेत.’
हे ऐकून त्यांचा मुलगा आणि मुलगी तर थक्कच झाले. ती मुलगी रडत रडत म्हणाली, “अहो मम्मी इथे नाही माझ्या घरात, समोर आहे.” आम्ही सगळे ऐकतच राहिलो. सून सांगायला लागली ” या दोघांचीही सेवा करणे मला एकटीला शक्य नाही. म्हणून सकाळीच समोरच्या घरी मुलीकडे आईला आणून सोडले आहे. यांना तर मुलगी समोर रहायला आली आहे हे पण आम्ही कोणी सांगितले नाही. ह्यांना कळले कसे?”
खरे, तर अंगात अजिबात त्राण नव्हता, नीटसे काही कळतही नव्हेत, दिवसातील बावीस तास तर झोपतच होते. स्मृतीही जवळजवळ नाही, दोन खोल्यात दोघांचे पलंग होते. मागील कित्येक महिन्यात नवरा-बायकोत काही संभाषणही नाही. पण त्या दिवशी बायकोला मुलीकडे रहायला पाठविले हे मात्र त्यांना कसे कळले असेल? कोण जाणे. बायकोला आपल्याजवळ परत आणण्याच्या इच्छेने त्यांच्या पायात इतके बळ आले असेल? देव जाणे. काही प्रश्नांची उत्तरे शोधणेच कठीण.
वयोमानाने आणि स्मृतिभ्रंशाने थोडी चूक केली. चूकून आमच्या दारात आले. ते बहुतेक बायको स्वतःपासून दूर गेली हे सहन करून शकले नसावेत.
त्यांची मुले सांगत होती पहिल्यापासून दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. कायम मॅडमला साहिबीणीच्या थाटातच रहायला लावायचे. कसेबसे त्यांना समजावत घरी नेले. शेवटी बिचाऱ्या ‘मॅडम’ ना पण रात्री दोन वाजता उठवून पुन्हा मुलाकडे सगळी मंडळी सोडून आली. त्यांना घरात आलेले बघितल्यावर हे कर्नल साहेब झोपले. त्यांच्या घराचा दरवाजा सुनेने बंद केला. पण आम्ही शेजारी मात्र आश्चर्य चकित होऊन पहाटे पर्यंत चर्चा करीत होतो.
म्हणतात ना, नवरा-बायकोत कधी ताटातूट करु नये हेच खरे. नवरा बायकोचे नात कधी आपोआप घडत नाही. ते सहवासाने घडत असत. सहवासाने प्रेम वाढते. एखाद्या काव्यात जसा एक एक शब्द गुंफलेला असतो तसेच या नात्यात सहवास आणि प्रेम गुंफलेले असते. हे नातं पण एक काव्यच आहे. हा आयुष्यातला अतिशय सुंदर, नाजुक आणि मोहक अनुभव आहे. हे काव्य घडण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागत असावे
‘कर्नल’ आणि ‘मॅडम’ त्यांच्या आयुष्यातले हे काव्यच असावे. पण ते लिहिले गेले हे समजण्याची त्यांची मानसिक स्थिती नव्हती. हे काव्य ऐकण्याऐवजी बघण्याचा योग आम्हाला असावा.

Author