अमिरोंकी भूख है जो
कभी कम नही होती,
और गरीब आधी रोटी
भी बाँटकर खा लेता है
दुपारचे भगभगीत उन… वैशाख महिना… जणू सारा आसमंतच पेटला आहे अस जाणवणारी धग, सर्वांगाला होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या झळा, अंगातून झिरपणाऱ्या घामाच्या धारा, त्यातून ज्या कामासाठी निघाले होते ते काम तर झालेच नव्हते. त्यामुळे उद्या परत ह्या रखरखीत उन्हात तडफडत यावे लागणार ह्या विचाराने रस्त्यावर भराभर चालत रिक्षा पकडण्याची माझी धडपड चालू होती. घरात साठून पडलेले काम समोर दिसत होते. सकाळी सकाळीच कामवाल्या बाईने फोन करुन दोन दिवसाची सुट्टी डिक्लेअर केली होती. त्यामुळे ह्या एवढ्या रणरणत्या उन्हातून घरी जाऊन काम आटोपायचे होते आणि ते अगदी जीवावर आले होते. डोक्यात एकामागून एक विचारांचे चक्र फिरत होते. समोर काय दिसत आहे, कुठले वाहन येत आहे इकडे फारसे लक्ष देखील नव्हते. डोळे फक्त रिक्षा शोधत होते.
तेवढ्यात पाठीमागे कोणीतरी जोरात ओरडले, चल निकल, दूर हट, त्या भसाड्या मोठ्या आवाजाने डोक्यातील विचारचक्र एकमद ठप्प झाले. पाय जागच्या जागीच खिळले. माझेच कशाला, माझ्यासारखी रस्त्यावरुन चालणारी बरीच मंडळी जागच्या जागीच थांबली. मी पाठीमागे वळून पाहिले. एका मोठ्या गाडीतून गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती बाहेर उतरत होती आणि उतरत असताना एका म्हाताऱ्या बाईवर ओरडत होते. तरीही भूकेपोटी म्हणा किंवा गरजेपोटी म्हणा ती हात जोडून काहीतरी खायला मागत होती. आणि दुर्दैवाने त्या बिचारीच्या मळक्या काळ्याकुट्ट हातांचा, त्या व्यक्तीच्या पांढऱ्या शुभ्र महागड्या, ब्रँडेड शर्टाला स्पर्श झाला असावा. त्यामुळे तर त्यांचा राग अगदी अनावरच झाला. ते जवळजवळ धावतच तिच्या अंगावर गेले व पुन्हा ओरडले, समझता नहि क्या, नही बोला ना, निकल इदारसे, असे म्हणत त्या बाईला त्यांनी एक जोरात थप्पड मारली आणि तितक्याच जोरात धक्का देखील दिला.
तिने कसाबसा पडता पडता स्वतःचा तोल सांभाळला. आणि हे सदग्रहस्थ हातात ब्रिफकेस घेऊन तडतड चालत समोरच्या बँकेत निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही खेदाचे भाव नव्हते. उलट एका एका अबला स्त्रीवर हात उचलून काय मोठा पराक्रम केला असेच त्यांना वाटत असावे अशी त्यांची चाल होती.
साधारणपणे रस्त्यावरुन चालताना भिकाऱ्यांच्या अंगावर ओरडणाऱ्या अनेक व्यक्ती बरेच वेळा दृष्टीस पडतात. परंतु त्यांना मारणारी माणसे दिसत नाहित. निदान मी तरी ह्या आधी बघितली नव्हती.
ती स्त्री बरीच वृद्ध होती. इतक्या तळपत्या उन्हात तिच्या पायात चप्पलही नसल्यामुळे ती रस्त्यावर नीटशी उभीही राहू शकत नव्हती. त्यामुळे तिला तोल सांभाळणे शक्य होत नव्हते. आजूबाजूच्या लोकांनी तिला पटकन आधार दिला आणि झाडाच्या सावलीत नेऊन बसवले. मी बाजूलाच उबी होते. रस्त्यावर तिच्यासभोवती बरीच मंडळी जमा झाली होती. आपल्याकडे गर्दी जमायला तर काही कारणा लागतच नाही. ती काकुळतीने लोकांकडे खायला मागत होती. “दोन दिवसांपासून काही खाल्लेले नाही. खुप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला द्या”. असे सांगत होती.
एक १३-१४ वर्षाची भाजी विकणारी मुलगी आपली गाडी बाजुला उभी करुन काय झाले आहे हे बघण्यासाठी त्या गर्दीत उभी होती. कोणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच त्या मुलीने पटकन आपल्या गाडीवरुन दोन टोमॅटो आणून त्या वृद्ध स्त्रीच्या हातात दिले. त्या अबलेने तर त्याच्यावर जवळ जवळ झडपच घातली आणि ते टोमॅटो गपागप गिळले. तिच्या चेहऱ्यावरुन तिला जरा बरे वाटले असावे असे वाटले. तितक्यात एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलाने स्वतःच्या डब्यातल्या दोन इडल्यातिला खायला दिल्या. त्या इडल्यांवर तर ती तुटूनच पडली आणि त्या इडल्या देखील तिने अधाश्यासारख्या भराभर गिळून टाकल्या.
खाताखाता ती त्या भाजीवाल्या मुलीकडे आणि त्या मुलाकडे कृतज्ञतेने एकटक बघत होती. उन्हामध्ये करपून काळ्या पडलेल्या, सुरकुतलेल्या चेहऱ्यावर, खोल गेलेल डोळे तिच्या आयुष्याची कहाणी सांगत होते. आणि त्या खोल गेलेल्या डोळ्यातून वाहणारी आसवांची धार तर आपल्या हृदयाला खोलवर इजा करुन जात होती. तिच्या डोळ्यातून आसवांची धार लागली होती. जीर्ण झालेल्या तिच्या शरीरावर त्या माणसाने मारलेला हात जोरात लागला असावा बिचारीला.
ह्या वयात तिच्यावर कोणी हात उगारला ह्याचे तिला वाईट तर वाटले असेलच आणि अपमानास्पद देखील झाले असेल. परंतु गरीबाच्या किंवा गरजवंताच्या हृदयात दुःखाला किंवा अपमानाला जागाच कुठे असते?
नियतीने एकदा गरिबी वाट्याला दिल्यावर ह्या अशा भावना बाळगण्याचा अधिकारही काढून घेतलेला असतो की काय? ह्या प्रशांची उत्तरे शोधूनही सापटणे कठीणच असते परंतु लाचारिचे जिणे जगण्याची गरीब स्वतःला सवय करुन घेतो.
आजुबाजुची सर्व ‘बघे मंडळी’ अगदी चिडू त्या प्रतिष्ठित व्यक्तिला शिव्या देत होती. माणुसकी शिल्लक असलेल्या काही माणसांना ते बघवले नाही.
“तिला काही द्यायचे नव्हते तर द्यायचे नाही ना, पण म्हाताऱ्या माणसावर हात कशाला उगारावा? ती पडली नाही ते बरे, नाहितर काय झाले असते?” कोणीतरी संतप्त होऊन बोलत होते.
“हो ना, तिने काही चोरी केली नव्हती, ती फक्त खायला मागत होती” दुसरे कोणी बोलले. “गरिंबावर हात उचलणे सोपे असते हो, म्हणून हे सगळे” अशा एकामागोमाग एक, अनेक प्रतिक्रिया येत होत्या. परंतु आम्हा इतक्या लोकांपैकी एकाही माणसाची त्या प्रतिष्ठीत माणसाला जाब विचारण्याची हिम्मत झाली नाही. किंवा आपल्याला काय करायचे, ह्या जगात अशा अनेक गोष्टी घडतच असतात ह्या भावनेने आम्ही ते टाळले. असेही म्हणता येईल की आज आपल्याकडे इतकाही वेळ नाही. दुसऱ्याचे दुःख पाहुनही, आपल्या जीवाची घालमेल होत असुनही आपण काही करु शकत नाही इतकी विचित्र परिस्थिती आहे.
अजुनही त्या बिचारीच्या सुरकुत्या पडलेल्या काळ्या काळ्या गालावर डोळ्यातुन मोठे मोठे अश्रु ओघळतच होते. कित्येक वर्षात तेल न लावलेल्या तिच्या पांढऱ्या केसातील गाठी डोक्यावरुन ओघळणाऱ्या पदारतून स्पष्ट दिसत होत्या. डोक्याला तेल काय कंगवा सुद्धा त्या केसांना लागलेला नाही. त्याचा तो पुरावा होता. कोणीतरी दिलेले जुने लुगडे तिने आपल्या शरीराभोवती केव्हा गुंडाळले होते, हे तिला आठवत देखील नसेल. पायाला चटके बसून बसून भेगांनी भरलेली, करपलेली काळी काळी पावले भयंकर दिसत होती. तिचे डोळे पाण्यांनी भरलेले होते, काठोकाठ भरलेल्या समुद्रासारखे…
त्या गर्दीचा एक भाग होऊन मी तिथे तिच्याकडे एकटक बघत उभी होते. आणि रिक्षा मिळता क्षणी घरी परत आले. घरची कामे तशीच पडली होती ना.
घरात काम करत असताना देखील रस्त्यात पाहिलेल्या ह्या प्रसंगाचा विचार डोक्यात चालूच होता. गरीब असहाय्य वृद्ध अबलेला मारणारा त्या माणसाचा तो हात आणि तिच्या आशाळभूत आणि लाचार डोळ्यातून वाहणारे ते अश्रू सतत नजरेसमोर तरळत होते. त्यावर जितका विचार करत होते, तितका क्रोध आणि दुःख तीव्र रुप धारण करत होते. आणि स्वतःचीच स्वतःला लाज वाटत होती. आपल्याला कुठे थांबायला वेळ आहे ह्या विचारानी मी सगळ्या भावनाच विसरले की काय असे वाटायला लागले.
संध्याकाळी स्वयंकपाक करणासाठी टोमॅटो हातात घेतला आणि तो सुरीने कापत असताना त्या वृद्ध स्त्रीचा अधासारखा टोमॅटो खाणारा चेहराच समोर आला. क्षणभर हातातली सुरी आणि टोमॅटो बाजुला ठेऊन दिला आणि बसूनच राहिले. विचार करुन डोके थकुन गेले होते. झाला गेला प्रसंग डोक्यातून जातच नव्हता. तो श्रीमंत माणूस, ती भाजी विकणारी सर्वसामान्य मुलगी आणि कॉलेजात जाणारा मुलगा यांची मी मनातल्या मनात तुलना करत होते. कुठेतरी असे वाचण्यात आले होते,
“अमिरोंकी भूख हे जो कभी कम नही होती,
और
गरीब आधी रोटी भी बाँटकर खा लेता है”
ह्या प्रसंगाने त्याची आठवण करुन दिली होती. त्या बिचाऱ्या भाजी विकणाऱ्या मुलीला दिवसभर वणवण फिरुन काय मिळत असेल? पण कसलाही विचार न करता तिने दोन टोमॅटो त्या भुकेल्या बाईला खायला दिले होते. त्या मुलानेही दुपारी मी काय खाईन ह्याचा विचार न करता तिला खायला दिले होते. कदाचित ‘भूक’ कशी असते हे त्या दोघांनाही माहित असावे.
त्या वृद्ध स्त्रीला खरोखरीच इतकी भूक असेल ह्याचा विचार देखील त्याक्षणी घरातल्या कामासमोर माझ्या डोक्यात आला नव्हता. त्याचे मला अतीव दुःख वाटत होते. शेवटी स्वतःच्या मनाला थोडासा दिलासा मिळवण्याच्या उद्देशाने रात्री तिच्यासाठी दोन पोळ्या आणि भाजी बांधून घेतली व ते तिला देण्यासाठी आम्ही घरुन निघालो. खरे तर ‘हे’ ऑफीसमधून थोडे उशीराच आले होते आणि थकलेले होते. परंतु माझ्यासाठी गाडी काढून माझ्याबरोबर निघाले होते. मी तिला ताजी पोळी भाजी खायला देणार आहे ह्या विचाराने मनाला थोडासा दिलासा मिळाला होता.
ह्यांनी गाडी थांबविली आणि मी गाडीतून घाईघाईने पोळी भाजी घेऊन उतरले. समोर थोडी गर्दी दिसली. मनात विचार आला कि परत ह्या आजीला कोणी काही केले की काय? तशीच गर्दीत शिरले आणि समोरचे दृश्य पाहून जागच्या जागीच उभी राहिले. सरकारी शववाहिनी एका बाजुला उभी होती.
एक पोलीस समोरच्या दगडावर बसून काहितरी लिहित होता. रस्त्यावर बाजुला उभा असलेला एक मुलगा कोणाला तरी सांगत होता, “ह्या बाजुच्या फुटपाथवर ती म्हातारी आजी रहात होती ना, ती उन्हाने चक्कर येऊन इथेच पडली होती. तो गाडीवाला उठवायला गेला तर ती उठलीच नाहि. आम्ही तिच्या अंगावर खुप पाणी टाकले तरी ती उठली नाही. ती मरुन पडली होती.”
ऐकुन क्षणभर मन सुन्नच झाले. कशीबशी ह्यांचा आधार घेत उभी राहिले. माझ्या हातातून पोळीभाजी चे पाकीट गळुन पडले. बाजुला उभ्या असलेल्या दोन-तीन उघड्या नागड्यामुलांनी ते पटकन उचलून घेतले आणि परस्परांमध्ये भांडण करत पळून गेली. ती देखील उपाशीच होती की काय देव जाणे.
“आई गं ! बिचारी, सकाळी ती ह्या काळभुकेनेच व्याकूळ झाली होती की काय? ” असे एक ना अनेक विचार मनाला चाटून गेले. नकळत माझ्या डोळ्यातून दोन अश्रुही टपकले. ह्यांनी माझा हात घट्ट धरून ठेवला होता.
निर्विकार चेहऱ्याने समोर घडत असलेला प्रकार आम्ही पहात उभे होतो. त्या शववाहिनीतील माणसांनी एखादे बोचके बांधावे तसं तिचं ते निष्प्राण शरीर पांढऱ्या कापडात बांधले आणि एखादे कचऱ्याचे मोठे बोचके उचलून फेकावे तसा तिचा मृतदेह उचलून गाडीमध्ये टाकला. गाडीचा दरवाजा बंद केला आणि ती गाडी निघून गेली. खिन्न मनाने त्या भरधाव निघून जाणाऱ्या गाडीला बघत मी भी राहिले व नंतर आम्ही घरी परत आलो.
घरी आल्यावर झोप तर येतच नव्हती. मनात एक प्रश्न उभा होता; ही वृद्ध स्त्री शेवटाला बरोबर काय आठवण घेऊन गेली असेल? त्या श्रीमंत माणसाने मारलेली थप्पड आणि जोरात दिलेला धक्का की तिच्या शेवटच्या क्षणी व्याकूळ, भुकेल्या जीवासाठी त्या सामान्य मुलांनी दाखवलेली दया आणि सहानुभूती? …
खरे तर उत्तर सापडणे कठीणच आहे परंतु मी मात्र मनाशी एक निश्चय केला की कोणी खायला मागितले तर त्या क्षणी जे शक्य असेल ते द्यायचेच.