बघता बघता काय होत आहे हे कळण्यापूर्वीच हातून निसटली ही मैत्रीची माला. विखरून पडला एक एक मोती. निसटलेल्या मोत्यांना पकडण्याचा जिवापाड प्रयत्न केला पण हे सगळे हाती नाहिच आले. काही हाती आलेले हे विखुरलेले मोती आठवणींच्या कुपीत अलगद उचलून दडवून ठेवले आहेत. काही छोटे आहेत काही मोठे आहे. रिकाम्या वेळात कित्येकदा त्या एक एक मोत्याला मी हरवलेल्या मैत्रीच्या माळेत गुंफायचा प्रयत्न करत असते.
निसटून गेलेली मैत्री काय असते हे उमजले की तिला आठवणीत ठेवण्याच्या पलीकडे दुसरा काहीच मार्ग नाही हे मनाला पटवायला लागतं, भोळ्या मनाची समजूत घालावी लागते आणि त्या महाभयंकर सत्याचा स्वीकार करावा लागतो.
लिहिता लिहिता सहजच समोरच्या झाडाकडे लक्ष गेले. झाड फुलांनी भरुन गेलेले आहे. एक झाड एकीने मला दिलेले होते तर दुसरे झाड मी दुसरीला दिले होते. अशी एकही गोष्ट नाही की ज्यामध्ये त्या दोघींची आठवण नाही.
त्या दोघीही जिवलग मैत्रिणी होत्या. अगदी दिसायला देखील दोन बहिणी असाव्यात इतक्या सारख्या होत्या. गोरा रंगही सारखाच होता. केसांची style ही जवळ जवळ सारखीच होती. उंचीही सारखीच, दोघींच्या आवडीनिवडीही जवळपास सारख्याच होत्या. शॉपिंग करण्याची तर दोघींनाही प्रचंड हौस होती. कुठलीही सुट्टी आली की कुठे ना कुठे प्रवास हा तर त्या दोघींचा छंदच होता. एकीला कोकणचा स्वाभिमान होता तर दुसरीला ब्राझीलचा अभिमान होता.
किती किती आठवणी आठवायच्या? आमच्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या मैत्रीच्या आठवणीत काय नाही? आठवणींचा खजिना आहे नुसता. त्या दोघींबरोबर कधीही एकटेपणाची जाणीवच झाली नाही. आमच्या एक घरात आवाज झाला की त्याचा नाद दुसऱ्या दोन घरात घुमायचा. अशी एकही गोष्ट नव्हती की जी आम्ही तिघींनी एकमेकीत share केली नाही. वाढत्या वयाबरोबर आमची मैत्रीही खुप वाढत गेली होती. मैत्री शब्दाच्या कितीतरी पलीकडे आम्ही पोहोचलो होतो. रोज फोन तर चालुच होता. नंतर नंतर तर बाहेर गेलो की कपडेदेखील एकसारखे विकत घेत होतो. बँडवाल्यांसारखे घालत होतो. खरे तर असा बालिशपणा करायला आम्ही लहान नव्हतो, पण ती आमची आवड हाती. भविष्याची खुप स्वप्न रंगवली होती आम्ही. म्हातारपणी हे करु, ते करु; खुप पुढचा विचार करत होतो.
आमच्या या आनंदाच्या, प्रेमाच्या दिवसांना कधी ग्रहण लागेल असा विचारही नव्हता शिवला कधी मनाला. पण काळाने डाव साधला. एका मागोमाग एक त्या दोघीही गेल्या. मी बघतच राहिले. स्वतःला समजावत राहिले. कुठे कुठे ह्या मोत्याच्या माळेतील मोती शोधत आहे? ते कधीच गवसणार नाहित ह्याची पूर्ण कल्पना असूनही वेडे मन त्यांना शोधतच राहते.
हातून निसटू नये म्हणून जीवापाड जपते ही मैत्रीची माला;
आयुष्य थोडेच जगल्या त्या, पण मनाला ओढ लाऊन गेल्या;
आयुष्य थोडेच जगल्या पण जन्मोजन्मीचं प्रेम देऊन गेल्या;
ह्या जगात मला एकाकी करुन गेल्या;
शुभा आणि माधुरी मी तुम्हाला कधी विसरुच शकत नाही.
त्या दोघी
बघता बघता काय होत आहे हे कळण्यापूर्वीच हातून निसटली ही मैत्रीची माला. विखरून पडला एक एक मोती. निसटलेल्या मोत्यांना पकडण्याचा जिवापाड प्रयत्न केला पण हे सगळे हाती नाहिच आले. काही हाती आलेले हे विखुरलेले मोती आठवणींच्या कुपीत अलगद उचलून दडवून ठेवले आहेत. काही छोटे आहेत काही मोठे आहे. रिकाम्या वेळात कित्येकदा त्या एक एक मोत्याला मी हरवलेल्या मैत्रीच्या माळेत गुंफायचा प्रयत्न करत असते.