स्टार माझा या वृत्तवाहिनीने टेलिव्हीजन प्रादेशिक प्रांतामधील अर्ध्याहुन अधिक जागा आपल्या गुणवत्तेच्या व इतकी वर्षे जपलेल्या विश्वासार्हतेच्या बळावर व्यापून टाकली असून प्रसिध्दीच्या, तंत्रज्ञानिक सरसतेच्या व निखळ मनोरंजनाच्या बाबतीत ही वाहीनी इतर वाहिन्यांपेक्षा चार हात पुढेच असते. या वाहिनीचा भक्कम पाया उभारण्यापासून ते विवीध रोचक व माहितीपर कार्यक्रम, उपक्रम, तसेच चर्चासत्रे आयोजित करून त्यावर सुवर्णकळस चढविणारे महाराष्ट्रामधील धडाडीचे व असामान्य आभ्यासुवृत्ती जपणारे पत्रकार म्हणजे राजीव खांडेकर. त्यांच्यातील प्रकर्षाने जाणवणारे स्वभाववैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पत्रकारिता व्यवसाय म्हणून नव्हे तर या देशामधील उरलेल्या लोकशाहीच्या अवशेषांचे रक्षण करण्यासाठी स्वीकारली आहे, व स्वःताच्या हृद्यामधील स्पंदनांप्रमाणे ते त्यांच्यातील प्रखर विचारांच्या व कणखर पत्रकाराची जोपासना करीत असतात. म्हणून जेव्हा सामान्य व्यक्तींच्या भोवती जेव्हा राजकीय स्वार्थामुळे संकटांचे वादळ निर्माण होते, तेव्हा ते शमविण्यासाठी ते आपल्या वाहिनीसोबत नेहमीच त्याच्या मागे उभे राहतात. स्टार माझा या वाहिनीवर चालु घडामोडी व ताजे विषय यांच्या व्यतिरीक्त विवीध राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, मनोरंजनात्मक, कलात्मक अशा अनेक प्रातांवर आधारित अशा माहितीपर व उद्बोधक कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते. कधी त्या त्या विषयामधील तज्ञ व्यक्तींना पाचारण करून चर्चासत्रे, संवाद, परिसंवाद, वादविवाद अशा सत्रांच्या फैरी झाडुन प्रेक्षकांचे विचारमंथन केले जाते.
स्टार माझाच्या गौरवास्पद यशाचे हे गमक असले तरी या यशाला साकारणारे चित्रकार म्हणजे राजीव हेच आहेत, हे विसरुन चालणार नाही. स्टार माझाचे संपादक व जबाबदार पत्रकार म्हणून ते यातील प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात व या कार्यक्रमांची सांगता ही त्यांच्या विशेष टिपणीनेच केली जाते. चेहर्याने जरी ते अगदी साधे व मृदु दिसत असले तरी त्यांच्यामधील पत्रकारितेचा बाणा जागा झाला तर भल्याभल्या पटाईतांना शब्दांनी लोळविण्याची ताकद त्यांच्यामध्ये संचारते. आजवर अनेक राजकीय नेत्यांना शब्दद्वंद्वांमध्ये चारही मुंड्या चित केले असताना आपण खांडेकरांना पाहिले आहेच. अन्यायाची त्यांना प्रचंड चिड आहे.
राजीव खांडेकर यांचा पत्रकारिता या क्षेत्रातील अनुभाव फारच दांडगा आहे. स्टार माझाच्या संचालकपदी नियुक्त होण्यापुर्वी लोकसत्ता चे निवासी संपादक म्हणून कार्यरत होते. मार्मिक राजकीय विश्लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. हार्ट टु हार्ट हा त्यांनी सुरु केलेला स्तंभलेखनाचा प्रयोग चांगलाच गाजला. त्यांच शैलीदार व आशावादाकडे झुकणार लेखन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यामधून वाखाणलं गेल्यामुळे, राज्य शासनाचा उत्कृष्ठ वाड्:निर्मीतीचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. खांडेकरांनी 1981 मध्ये पुण्याच्या च्या सकाळमधुन आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
नाशिक सकाळ आणि पुण्याच्या लोकसत्तामध्ये काही काळ काम केल्यानंतर १९९५ पासून पुढे पाच वर्षे त्यांनी लोकसत्ताचे नवी दिल्ली प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. या काळातील राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रासंबंधीच्या त्यांच्या अनेक बातम्या महाराष्ट्रभर गाजल्या. २००० मध्ये ईटीव्ही मराठी सुरू झाल्यावर या वाहिनीच्या मुंबई ब्युरोचे प्रमुख म्हणूनही त्यांनी अडीच वर्षे काम पाहिले. ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दल आस्था असलेल्या खांडेकर यांचे शालेय शिक्षण आटपाडी (जि. सांगली) येथे, महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत आणि पदव्यूत्तर शिक्षण पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये झाले.
प्रतिष्ठेचा मानला जाणार्या लातूरच्या एकमत पुरस्काराने खांडेकर यांना गौरवण्यात आले आहे. मराठी न्यूज चॅनेलच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र संपादक परिषदेच्या आचार्य अत्रे पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
####
स्टार माझा या वृत्तवाहिनीने टेलिव्हीजन प्रादेशिक प्रांतामधील अर्ध्याहुन अधिक जागा आपल्या गुणवत्तेच्या व इतकी वर्षे जपलेल्या विश्वासार्हतेच्या बळावर व्यापून टाकली असून प्रसिध्दीच्या, तंत्रज्ञानिक सरसतेच्या व निखळ मनोरंजनाच्या बाबतीत ही वाहीनी इतर वाहिन्यांपेक्षा चार हात पुढेच असते. या वाहिनीचा भक्कम पाया उभारण्यापासून ते विवीध रोचक व माहितीपर कार्यक्रम, उपक्रम, तसेच चर्चासत्रे आयोजित करून त्यावर सुवर्णकळस चढविणारे महाराष्ट्रामधील धडाडीचे व असामान्य आभ्यासुवृत्ती जपणारे पत्रकार म्हणजे राजीव खांडेकर.