बातमी कोणतीही असो ती सर्वप्रथम आपल्याच माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी ईर्षां मनात बाळगणे हा आजचा प्रकार नाही. ज्यावेळी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र मर्यादित होते व फक्त सरकारी माध्यमे, मोजकी वृत्तपत्रे व वृत्तसंस्था होत्या तेव्हापासून ही ईर्षां कायम आहे. मात्र आपण देत असलेली बातमी नुसती सर्वप्रथम देऊन उपयोग नाही ती बिनचूक असली पाहिजे, असा खाडे यांचा आग्रह असे. याच आग्रहामुळेच त्यांचा पत्रकारितेत दबदबा होता. त्यांचे पूर्ण नाव कदाचित कोणाला आठवणार नाही पण ‘दि. बा.’ म्हटले की पत्रकार व राजकीय नेत्यांच्या मनात लगेच खाडे हे नाव आलेच पाहिजे, अशी त्यांची ख्याती होती.
दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. यांचे मंगळवारी वयाच्या ८२ व्या वर्षी मधुमेहाने निधन झाले. शेवटपर्यंत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या पिढीतला आणखी एक दुवा आता निखळला आहे. मितभाषी, मनमिळावू आणि नेहमीच सर्वाना माहिती देण्यात अग्रेसर असलेल्या पत्रकारांपैकी ते एक होते. २००५ च्या अतिवृष्टीत घर पूर्णपणे पाण्याने भरल्यामुळे जमवून ठेवलेला माहितीचा खजिना नष्ट झाल्यावर खाडे हताश झाले होते. खाडय़ांच्या त्या साहित्याचे मोल फक्त अभ्यासकांनाच कळू शकते. त्यावेळी सरकारने फक्त पाच हजार रुपये मदत देऊ केली.
वर्षांनुवर्षे मेहनतीने जमा केलेली माहिती पाच हजार रुपयांत परत मिळणार नव्हती. १९५२-५३मध्ये पत्रकारितेत आलेल्या खाडे यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रसिद्धी सहाय्यक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची पदोन्नती होत होत ते वृत्त विभागात आले आणि नंतर ते वृत्तसंपादक या पदापर्यंत पोहोचले. कोयनेचा भूकंप झाला तेव्हा खाडे त्यांच्या अंधेरी येथील घरी होते. मुंबईत त्या भूकंपाचे धक्के बसताच सगळी पळापळ झाली. मध्यरात्रीची वेळ व वीज बंद झालेली.
खाडे यांनी आपल्या कुटुंबाला बाहेर काढले, पण स्वत: मात्र पुन्हा घरात शिरून मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांनी सर्वप्रथम कुलाबा वेधशाळा तसेच संबंधित यंत्रणांकडून भूकंपाबाबत माहिती घेतली. नंतर लाइटनिंग कॉल लावून (त्या काळात मुंबईबाहेर फोन करण्यासाठी ट्रंककॉल किंवा लाइटनिंग कॉल लावावा लागत असे) दिल्ली रेडिओवर भूकंपाची बातमी दिली. पुढल्याच बातमीपत्रात रेडिओवरून महाराष्ट्रात झालेल्या भूकंपाची माहिती देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खाडे यांच्या नावासहित समजली. त्या काळी रेडिओवरून बातमी देणाऱ्या बातमीदाराचे नाव सांगण्यात येत नसे. तरीही त्यांच्या नावासहित ही बातमी देण्यात आली होती, याचे कारण त्यांनी घेतलेली मेहनत!
त्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या चमूसहित कोयना येथे जाऊन तेथील भूकंपग्रस्तांच्या मुलाखती घेत तो अनुभव श्रोत्यांसाठी जिवंत केला होता. त्यांची बदली शिलाँग येथे काही काळासाठी झाली होती. मुंबई दूरदर्शन सुरू झाले तेव्हा त्यांची बदली दूरदर्शनच्या वृत्त विभागात झाली. मुंबई दूरदर्शनचे ते पहिले वृत्तसंपादक होते. पण तेथे त्यांचे मन काही रमेना. ते पुन्हा आवर्जून ऑल इंडिया रेडिओत आले. जनता पक्ष सत्तेवर असताना जयप्रकाश नारायण मुंबईत जसलोक इस्पितळात उपचार घेत होते. अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेमध्ये जाहीर केले.
सभागृहात श्रद्धांजलीही वाहण्यात आली. प्रत्यक्षात मात्र जयप्रकाश नारायण यांची प्रकृती फक्त चिंताजनक झाली होती. पण त्यांच्या निधनाचे वृत्त खरे की खोटे याची खातरजमा न करताच संसदेमध्ये त्याना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि संसदेचे कामकाज थांबविण्यात आले. बातमीची पक्की खातरजमा करून घेण्याची सवय खाडेंना स्वस्थ बसू देईना. त्यांनी इस्पितळात धाव घेतली तेव्हा खरी परिस्थिती उघड झाली. खाडे यांनी तातडीने दिल्लीला खरे वृत्त कळविले. यामुळे सरकारचे हसे झाले. मात्र त्यानंतर प्रत्येक वृत्तसंस्था व वृत्तपत्राचा पत्रकार जसलोकमध्ये तळ ठोकून बसू लागला व इस्पितळातूनही रोज अधिकृतपणे माहिती देण्यात येऊ लागली. आता अशी माहिती देणे हे नेहमीचे झाले आहे. मात्र या पायंडा खाडे यांच्यामुळे पडला हे विसरता येत नाही. बिनचूकपणा हाच खरा बातमीचा आधार, असा आग्रह धरणारे खाडे यांच्यासारखे पत्रकार आजच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जमान्यात सापडणे कठीण!
मंत्रालयात तेव्हा पीटीआय व युएनआय या दोन वृत्तसंस्थांचे पी.के. व व्ही.के. नाईक आणि रेडिओचे खाडे या त्रिमूर्तीचा दबदबा होता व त्यांच्यामुळे पत्रकार परिषदाही रंगत असत. तिघेही अत्यंत गप्पिष्ट असत आणि मैफल रंगविण्यात तिघांचाही हातखंडा असे. त्यातही खाडे नेहमीच आघाडीवर असत. कमी पण योग्य शब्दांत समोरच्याचे वर्णन करण्याची खाडे यांची हातोटीही वाखाणण्यासारखीच होती.खाडे यांच्या जाण्याने आता ती रंगत निघून गेली आहे.