प्रदीप साठे

प्रदीप साठे हे व्यक्तिमत्त्वच तसे वेगळे होते. छोटीशी मूर्ती, लहान शरीरयष्टी, जाड तपकिरी रंगाचा चष्मा, हलक्या आवाजातले बोलणे आणि हातात सिगारेट. ‘आवाज’ दिवाळी अंकातली ‘खिडकी चित्रे’ हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्या अनोख्या चित्रांसाठीच अनेक लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्या या ‘खिडकी चित्रांचा’ एक मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. अशा प्रकारची विनोदी चित्रे काढणारा हा माणूस बोलताना विनोदी असेल अशी जर तुमची समजूत असेल तर ती खोटी म्हणावी लागेल.

साठे यांचे बोलणे हलक्या आवाजातले असले तरी ते ठाम असायचे आणि बहुतेक वेळा ते गंभीर विषयावरच बोलत. लोकांच्या समजुतीत ‘विनोदी’ असलेल्या या माणसाने आपला अंत मोठा दुर्दैवी करावा ही बाब मनाला चटका लावणारी होती. प्रदीप साठे यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली आणि या बातमीवर कुणाचा विश्वासच बसेना. कदाचित आयुष्यात आलेल्या अनेक कठोर प्रसंगांवर मात करणे त्यांना कठीण गेले असावे. यातूनच त्यांच्यासारख्या एका कलाकार माणसाला हे जीवन संपविण्याचा विचार आला असावा. साठेंचे बालपण अतिशय चांगल्या स्थितीत गेले. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच होती.

मुंबईत मोठी जागा, वडिलांच्या मालकीची कंपनी. त्यामुळे घरात लक्ष्मी पाणी भरत होती. त्यांच्या वडिलांना प्राण्यांची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी घरात मासे, पोपट, कुत्रे, कासव, मांजर इतकेच नव्हे तर माकड, अजगर आणि अगदी बिबळ्याचा बछडासुध्दा त्यांनी पाळला होता. अशा या प्राणी-पक्ष्यांच्या सहवासात प्रदीप वाढले. त्यांच्याशी हसत खेळत प्रदीप रेखाटने काढू लागले. या वातावरणात ते चांगलेच रमले होते. पुढे त्यांच्या कलाकृतींमध्ये विविध प्राण्यांची अ‍ॅनाटॉमीयुक्त चित्रे दिसत. याला त्यांच्या बालपणातील प्राण्यांच्या सहवासाची पाश्र्वभूमी होती. अर्थातच त्यांनी आपल्या आवडीनुसार आर्टस्कूलला प्रवेश घेतला. परंतु वडिलांना त्यांचा हा निर्णय काही मान्य नव्हता. यातूनच त्यांच्याशी मतभेद झाले. शेवटी स्वत: पार्टटाइम नोकरी करून फीचे पैसे भरून या कलाकाराने शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक मासिकांत त्यांची चित्रे प्रसिध्द होऊ लागली. देशातील विविध भाषांतल्या कॉमिक्ससाठी त्यांनी चित्रे काढली. याद्वारे त्यांनी कॉमिकमधील चित्रकलेला एक दर्जा प्राप्त करून दिला. अशी चित्रे काढीत असताना त्यांची प्रामाणिक भूमिका होती की, आपण ‘इलस्ट्रेटर’ आहोत, पण आपण व्यंगचित्रकार नाही. ‘निवडक मराठी व्यंगचित्रे’ या पुस्तकाचे संपादन करीत असताना त्यांनी हे वास्तव आपल्या मित्रपरिवारात मान्यही केले होते. त्यांचे हे प्रामाणिक मत असले तरी त्यांना विनोदाची चांगली जाण असल्याने तसेच चित्रकलेतील त्यांचे नैपुण्य यामुळे त्यांनी बरीच व्यंगचित्रे काढली. प्रामुख्याने ‘आवाज’ या दिवाळी अंकातली त्यांची ‘खिडकी चित्रे’ लोकप्रिय झाली आणि हा तेथून कलाकार खरे तर जनतेपुढे आला. या व्यंगचित्रांच्या जोडीला त्यांनी विनोदी कथांना पूरक अशी रिअलिस्टिक शैलीतील असंख्य चित्रे काढली. त्यांच्या चित्रातील बारकावे अस्सल होते. चित्रातील रंगसंगती व पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके प्रभावी असत की एखादा जिवंत प्रसंग साकारल्याचा भास होई. त्यांनी देशभरात काढलेल्या कॉमिक्समधील चित्रांनी त्यांना देश पातळीवर प्रसिद्धी लाभली.

कॉमिक्ससाठी चित्रे काढताना त्यांनी स्वत: काही पात्रे तयार केली. त्यांच्या गोष्टी रंगविल्या आणि केवळ मुलांमध्येच नव्हे तर सर्वच वयोगटातील वाचकांना त्या भावल्या. मुलांसाठी कॉमिक्स करताना प्राणी विज्ञान हा विषय त्यांनी मोठय़ा खुबीने, सचित्र सांगून मोठा चाहता वर्ग मिळविला. चेहऱ्यावरच्या हावभावांबरोबर प्रसन्न रंगसंगती हे त्यांचे वैशिष्टय़ होते. मध्यंतरी त्यांनी एका अर्कचित्र प्रदर्शनासाठी अभिनेत्री नंदा हिचे काढलेले अर्कचित्र विलक्षण होते. प्रत्यक्ष भेटीत विनोदी किस्से सांगताना त्यांच्या विनोदबुध्दीची झलक दिसे. चित्रकलेसारख्या एका क्रिएटिव्ह विश्वात रंगलेल्या या कलाकाराने व विनोदाची चांगली जाण असलेल्या या व्यक्तीने आयुष्याचा शेवट अशा रीतीने करावा हे दुर्दैवी, धक्कादायक आणि अनाकलनीयही!

Author