नाटक ही केवळ करमणूक आणि मनोरंजन करणारी कला नसून ती प्रत्येकाला आत्मभान देणारी, विचारप्रवृत्त करणारी एक गंभीर कला आहे, हे लक्षात येत असतानाच अतुल पेठे रंगभूमीवर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य याच कलेसाठी वेचायचे ठरवले. कोलकात्याच्या ‘ब्रात्तोजान’ नाटय़संस्थेचा ‘विष्णु बासू स्मृती पुरस्कार’ अतुल पेठे यांना मिळणे, म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर कौतुकाची मोहोरच. वेगळ्या वाटेने जाणारी नाटके सादर करणे, हे पेठे यांचे वैशिष्टय़. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यशाचा पहिला जरीपटका मिळवल्यानंतर पेठे यांनी विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचे ठरवले. ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘गोळायुग’, ‘दलपतसिंग येती गावा’ यांसारख्या नाटकांनंतर त्यांनी नुकतेच सादर केलेले ‘सत्यशोधक’ हे गो. पु. देशपांडे यांचे महात्मा फुले यांच्यावरील नाटक रंगमचीय क्षेत्रात चर्चेत राहिले आहे. ते अभिनय करतात, तरी दिग्दर्शन हे त्यांचे खरे क्षेत्र. नव्या पिढीशी सतत संपर्कात राहून त्यांच्यात रंगभूमीची जाण निर्माण करण्यासाठी पेठे राज्यभर नाटय़कार्यशाळा घेत असतात. वैचारिक रंगभूमीवर सतत काही घडत राहिले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. एकांकिका लेखन हा त्यांचा जसा प्रांत आहे, तसेच नाटय़रूपांतराच्या मार्गानेही त्यांनी नाटय़लेखनात रस घेतला आहे. विजय तेंडुलकर यांच्यावर त्यांनी तयार केलेला ‘तेंडुलकर आणि हिंसा - काल आणि आज’ हा माहितीपट विशेष गाजला. ‘नाटककार सतीश आळेकर’, ‘बहिणाई’, ‘अशोक केळकर’ यांसारख्या माहितीपटांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. मात्र ‘कचरा कोंडी’ या कचऱ्याच्या समस्येवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्यांच्या जगण्याबद्दल समाजाचे डोळे उघडणाऱ्या माहितीपटाने पेठे यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आकाशवाणीवर ‘कोसला’ कादंबरीचे वाचन असो, की अरुण कोलटकरांच्या कवितांचे वाचन; पेठे ‘तयार’ असतात. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि विविध नाटकांसाठी अनेक पुरस्कार मिळालेल्या पेठे यांना प्रयोगशील रंगभूमीवरील कामाबद्दल कोलकात्यात मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कलाजीवनातील एक महत्त्वाचा पुरस्कार म्हटला पाहिजे.
ब्रजेश मिश्रा यांच्याविषयीच्या ‘’मध्ये (१ ऑक्टो.) पोखरण-२ अणुचाचणी १९९९ मध्ये झाल्याचा चुकीचा उल्लेख आहे. तो १९९८ असा हवा होता.
पेठे, अतुल
नाटक ही केवळ करमणूक आणि मनोरंजन करणारी कला नसून ती प्रत्येकाला आत्मभान देणारी, विचारप्रवृत्त करणारी एक गंभीर कला आहे, हे लक्षात येत असतानाच अतुल पेठे रंगभूमीवर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य याच कलेसाठी वेचायचे ठरवले. कोलकात्याच्या ‘ब्रात्तोजान’ नाटय़संस्थेचा ‘विष्णु बासू स्मृती पुरस्कार’ अतुल पेठे यांना मिळणे, म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर कौतुकाची मोहोरच. वेगळ्या वाटेने जाणारी नाटके सादर करणे, हे पेठे यांचे वैशिष्टय़. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यशाचा पहिला जरीपटका मिळवल्यानंतर पेठे यांनी विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचे ठरवले. ‘शीतयुद्ध सदानंद’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘गोळायुग’, ‘दलपतसिंग येती गावा’ यांसारख्या नाटकांनंतर त्यांनी नुकतेच सादर केलेले ‘सत्यशोधक’ हे गो. पु. देशपांडे यांचे महात्मा फुले यांच्यावरील नाटक रंगमचीय क्षेत्रात चर्चेत राहिले आहे. ते अभिनय करतात, तरी दिग्दर्शन हे त्यांचे खरे क्षेत्र. नव्या पिढीशी सतत संपर्कात राहून त्यांच्यात रंगभूमीची जाण निर्माण करण्यासाठी पेठे राज्यभर नाटय़कार्यशाळा घेत असतात. वैचारिक रंगभूमीवर सतत काही घडत राहिले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले. एकांकिका लेखन हा त्यांचा जसा प्रांत आहे, तसेच नाटय़रूपांतराच्या मार्गानेही त्यांनी नाटय़लेखनात रस घेतला आहे. विजय तेंडुलकर यांच्यावर त्यांनी तयार केलेला ‘तेंडुलकर आणि हिंसा – काल आणि आज’ हा माहितीपट विशेष गाजला. ‘नाटककार सतीश आळेकर’, ‘बहिणाई’, ‘अशोक केळकर’ यांसारख्या माहितीपटांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. मात्र ‘कचरा कोंडी’ या कचऱ्याच्या समस्येवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्यांच्या जगण्याबद्दल समाजाचे डोळे उघडणाऱ्या माहितीपटाने पेठे यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. आकाशवाणीवर ‘कोसला’ कादंबरीचे वाचन असो, की अरुण कोलटकरांच्या कवितांचे वाचन; पेठे ‘तयार’ असतात. महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आणि विविध नाटकांसाठी अनेक पुरस्कार मिळालेल्या पेठे यांना प्रयोगशील रंगभूमीवरील कामाबद्दल कोलकात्यात मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कलाजीवनातील एक महत्त्वाचा पुरस्कार म्हटला पाहिजे.
ब्रजेश मिश्रा यांच्याविषयीच्या ‘’मध्ये (१ ऑक्टो.) पोखरण-२ अणुचाचणी १९९९ मध्ये झाल्याचा चुकीचा उल्लेख आहे. तो १९९८ असा हवा होता.