पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा मुकुट किती काटेरी असतो, याची कल्पना डॉ. रघुनाथ शेवगावकर यांना एव्हाना येऊ लागली असेल! अर्थात, कुलगुरुपदी नियुक्ती होतानाच त्यांनी इतिहास घडवला आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविणारे ‘आयआयटी’मधील पहिलेच संशोधक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. इतकेच नव्हे, तर अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून उच्चशिक्षण व संशोधन केलेल्या व्यक्तीकडेही हे पद प्रथमच जात आहे.
‘आयआयटी’ आणि पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्था राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिकपात्र असल्या, तरी त्यांच्या कारभाराच्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र तफावत आहे. हा ‘धक्का’ डॉ. शेवगावकर यांना पचवावा लागणार आहे. तात्कालिक आंदोलनबाजीचा मुकाबला त्यांना करावा लागेलच, शिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या कार्यकालात संभवतात. महत्त्वाचे म्हणजे सुमारे हजारभर महाविद्यालये-संस्थांमधून शिकणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांचा डोलारा विद्यापीठाला आता डोईजड होऊ लागला आहे. त्यामुळेच विद्यापीठाचे पुणे, अहमदनगर व नाशिक असे त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव जोर धरत आहे.
मुख्य कॅम्पसमधील पदव्युत्तर विभागातून ‘आयआयटी’प्रमाणे संशोधन करायचे आणि तीन जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक कॅम्पसच्या माध्यमातून विस्ताराचे उद्दिष्ट साध्य करायचे, असे पथदर्शी मॉडेल विकसित करण्यास वाव आहे. डॉ. शेवगावकर मूळचे ग्वाल्हेरचे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई ‘आयआयटी’मधून पीएच.डी. संपादन केली. बंगलोरची रामन संशोधन संस्था व अमेरिकेतील मेरीलॅण्ड विद्यापीठातून खगोलभौतिकी विषयामध्ये त्यांनी अद्ययावत संशोधन केले.
संगीतशास्त्रामध्येही ते पदवीधर असून सतारवादनाचा छंद त्यांनी जोपासला आहे. १९८७ पासून ते ‘आयआयटी’मध्ये संशोधन-अध्यापन करीत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्याच्या केंद्रीय प्रकल्पाचे ते समन्वयक आहेत. त्याद्वारे विद्येच्या माहेरघरातील ज्ञानगंगा अगदी जुन्नरसारख्या आदिवासी क्षेत्रातील महाविद्यालयांपर्यंत पोचविण्याची लक्ष्यपूर्ती केली जाऊ शकते. ‘आयआयटी’चे उपसंचालकपद सांभाळणाऱ्या डॉ. शेवगावकर यांच्याकडे प्रशासन-व्यवस्थापकीय अनुभवाची कमतरता नाही. त्याची कसोटी मात्र ‘पूर्वेकडील ऑक्स्फर्ड’मध्ये नक्कीच पाहिली जाईल!