बाळ पळसुले यांच्या ठसकेबाज चाली ऐकल्या की अचंबित व्हावे लागायचे. मराठी चित्रपट संगीतात त्यांनी केलेल्या कामगिरीचा त्यांच्या हयातीत तसा सन्मान झाला नसला, तरीही रुपेरी पडद्याच्या इतिहासात त्यांच्या नावे एक पान राखीव राहील, यात शंका नाही. अनेकदा कानावरून गेलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा कौतुकमिश्रित आदर वाटू लागतो. कोल्हापूर, सांगली परिसरातील वातावरणात रमलेल्या पळसुले यांच्या रोमारोमात तमाशातला ठसका याच परिसरात भिनला. १९६५ पासून सुमारे तीन दशके मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या संगीतकाराला चिमुरडय़ा पोरीने बसस्थानकाबाहेर त्यांचेच गाणे ऐकवले, तेव्हा खिशातली दहा रुपयांची नोट तिच्या पदरात टाकणाऱ्या पळसुले यांना तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय वाटत होता. सहज गुणगुणता येणारी आणि कानात राहणारी चाल बांधणे हे पळसुले यांचे वैशिष्टय़. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ सारखं उडत्या चालीचे गाणे असो, की ‘विठ्ठलनामाची शाळा भरली’ हे सर्वतोपरी झालेले भक्तिगीत असो; पळसुले यांचे वेगळेपण त्या रचनेमध्ये सहजपणे लक्षात यायचे. लावणीतला ठसकादेखील सुंदरपणे व्यक्त करण्याचे त्यांचे कसब होते. चित्रपटासारख्या दुनियेत त्यांच्या बालपणीचा कलापथकातील अनुभव त्यांना उपयोगी पडला, कारण सर्वाच्या ओठात सहज राहतील, अशा रचना करण्याचे शिक्षण त्यांना त्या संस्कारातून मिळाले होते. ‘फटाकडी’, ‘भन्नाट भानू’, ‘भिंगरी’, ‘तेवढं सोडून बोला’,‘रणरागिणी’,‘पंढरीची वारी’ , ‘राजा पंढरीचा’ यासारख्या चित्रपटातील गीते तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी रसिकांची अतिशय आवडती झाली होती. त्यांच्या संगीतामुळे चित्रपटांनाही एक वेगळा नखरेल रंग प्राप्त झाला. यशाने हुरळून जाण्याची पळसुले यांची वृत्ती नव्हती. अंगठय़ांनी भरलेली त्यांची बोटे पेटीवर फिरायला लागली की समोर बसलेले सारे जण एका वेगळ्या विश्वात पोहोचत असत. साधेपणाने संगीताला भिडण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या स्वभावातून आली होती. चित्रपट मिळावेत, यासाठी कधी कुणाच्या दारापुढे तोंड वेंगाडण्याची त्यांच्यावर वेळच आली नाही, कारण त्यांचे नाणे बावनकशी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील एक उत्तम संगीतकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
पळसुले, बाळ