तीन दशकांपेक्षा ही अधिक काळ मराठी रंगभूमी तसंच चित्रपटांवर आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणार्या अभिनेत्री इंदिरा चिटणीस यांचा जन्म १९३० साली झाला होता. तब्बल ११२ चित्रपटांमधून तसंच १५ नाट्यप्रयोगातून इंदिरा चिटणीस यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या कजाग, खाष्ट सासुच्या भुमिकांची दखल ही नोंद घेण्यासारखी आहे.
“साखरपुडा”, “कन्यादान”, “जरा जपून”, “केतकीच्या बनात”, “पडछाया”, “गंगेत घोडे न्हाले”, “कोण कुणाचा”, “धाकटी जाऊ”, “माझा होशील का ?”, “झाकली मुठ सव्वा लाखाची”, “ पैशाचा पाऊस”, “ आंधळा मागतो एक डोळा”, “सुवासिनी”, “मोलकरीण”, “लाखाची गोष्ट”, “वहिनीच्या बांगड्या”, “देवबाप्पा”, “जावई माझा भला”, “माणसाला पंख असतात”, “वावटळ”, “प्रिती संगम”, “बाळा जो जो रे”, “अश्या रंगल्या रात्री”, “ओवाळणी”, “सवाल माझा ऐका” या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खुपच लोकप्रिय ठरल्या. तर “संगीत संशयकल्लोळ”, “सौभद्र”, “एकच प्याला”, “ प्रेम संन्यास” या नाटकातल्या भुमिकांना इंदिरा चिटणीस यांनी आपल्या अभिनयाचे “चारचॉंद लावले”. “जुनं ते सोनं” हा इंदिरा चिटणीस यांच्या कारर्कीदीतील शेवटचा चित्रपट ठरला. “परिचय”, “नन्हे मुन्हे” अश्या हिंदी चित्रपटांमधुन देखील इंदिरा चिटणीस यांनी व्यक्तीरेखा साकारल्या
भालजीं पेंढारकरांच्या “थोरातांची कमळा” या चित्रपटातील भूमिकेसाठी इंदिरा चिटणीस यांना राज्य शासनाच्या “सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री” तर गरिबाघरची लेक या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री”च्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
वयाच्या ५२व्या वर्षी म्हणजेच १७ सप्टेंबर १९८२ या दिवशी इंदिरा चिटणीस यांचे निधन झाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)