राम ताकवले

ताकवले, राम

भारतीय शिक्षण क्षेत्रात तीन दशकांच्या काळात ज्यांनी मूलभूत स्वरूपाची कामगिरी केली, अशा महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांच्या या कामगिरीमुळेच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गोदावरी पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड सर्वथा योग्य आहे. देशातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून त्यांनी केलेली कामगिरी जेवढी मोलाची आहे, तेवढेच शिक्षणाच्या भावी विकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेले चिंतनही महत्त्वाचे आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या ताकवले यांनी कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन मॉस्को विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी मिळविली. पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रात उच्च पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले आणि त्यातच ते रममाण झाले. विद्यापीठातील उच्चशिक्षणाच्या क्षेत्राशी त्यांचा संबंधही अगदी लवकर आला आणि त्यामुळे ते पुणे विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय असलेल्या ताकवले सरांनी विद्यादानाचे कार्य करत असतानाच संशोधनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची निवड झाली, तेव्हा भारतीय विद्यापीठांमधील विज्ञान शिक्षणासंबंधी केलेले वक्तव्य शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाच्या लक्षात राहणारे होते. विद्यापीठांमधून नुसते शिक्षण मिळता कामा नये, तर ती संशोधनाची देशातील महत्त्वाची केंद्रे बनली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी त्या वेळी बोलून दाखवला होता. हा आग्रह त्यांनी त्यांच्याच कारकीर्दीत प्रत्यक्षात आणला. पुणे विद्यापीठातील विज्ञान विषयांशी संबंधित अशा सगळय़ाच विभागांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जाण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. पुणे विद्यापीठाचा या क्षेत्रातील नावलौकिक वाढण्यास त्यांची कारकीर्द कारणीभूत ठरली, तशीच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी मुक्त शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य अधोरेखित करण्यासारखे झाले. या त्यांच्या कामगिरीमुळेच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर त्या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या भावी विकासाच्या दिशेने त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे. अतिशय सौम्य प्रकृतीच्या ताकवले सरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांचा बारकाईने अभ्यास केला. त्या बदलांना सामोरे जाताना भारतीय शिक्षण व्यवस्थेची होणारी तारांबळ ते स्वत: अनुभवत होते. माहिती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात घडत असलेल्या क्रांतीचे डॉ. ताकवले हे एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यामुळेच या बदलांना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी अनेक नव्या योजना आखल्या, त्या केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच काही वर्षांत शिक्षणाच्या बाबतीत अनेक नवे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांलाही शिक्षणाच्या सगळय़ा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्याला जगात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा लाभ घेता यायला हवा, असा आग्रह त्यांनी सातत्याने धरला. विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत संशोधनाचे महत्त्व तीन दशकांच्या काळातच वाढत गेले आणि त्यासाठी पुढाकार घेतलेल्यांमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव ओघानेच घेतले जाते. शिक्षणाचा जगण्याशी आणि मानवी जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट करताना डॉ. ताकवले यांनी व्यवहार आणि ज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. अर्थार्जनासाठी आवश्यक असलेले ज्ञान विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत देता येण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा आणि शिक्षणक्रम यांचा अन्योन्यसंबंध निर्माण करणे आवश्यक होते. उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात ज्या कौशल्यांची गरज आहे, ती कौशल्ये शिक्षणातून कशी देता येतील, हा व्यावहारिक विचार करत असतानाच संशोधनातून मानवी ज्ञानाची लालसा अधिकाधिक जागृत कशी करता येईल, यासंबंधीही त्यांनी मूलभूत स्वरूपाचा विचार केला. त्यांना मिळणाऱ्या गोदावरी पुरस्कारामुळे त्यांच्या या क्रांतदर्शी कारकीर्दीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Author