द. पां जोशी

जोशी, द. पां.

स्वातंत्र्योत्तर काळात हैदराबादसारख्या उर्दू व तेलुगू या भाषांचा प्रभाव असलेल्या शहरात मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समृद्ध करण्यात ज्यांनी तोलामोलाचे योगदान दिले, अशांमध्ये प्रा. द. पं. जोशी हे ठळक नाव. आपल्या सुमारे ५० वर्षांच्या वाङ्मयीन व संघटनात्मक कारकीर्दीत स्वत:ची विपुल ग्रंथसंपदा निर्माण करण्यावर भर देण्यापेक्षा संशोधन व संपादनाचा पिंड जोपासणाऱ्या या भाषाप्रभूने संपादित केलेल्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एका ग्रंथाचे शीर्षक ‘काळाच्या पडद्याआड’ असे होते.

ते द. पं. नुकतेच काळाच्या पडद्याआड गेल्याने हैदराबादची मसाप, मराठी महाविद्यालय यांसह तेथील समस्त मराठी भाषकांचा आधारवड कोसळला आहे. हैदराबादेत मराठी वातावरण तयार होत असतानाच्या काळात तेथे आधी विद्यार्थी म्हणून गेलेल्या आणि मग प्राध्यापकी पेशाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या द.पं.नी पुढच्या पाच दशकांत मराठी बहुअंगाने समृद्ध करण्याचे कार्य व्रतस्थपणे पार पडले. डॉ. नांदापूरकर, भालचंद्र कहाळेकर हे त्यांचे गुरू. त्यांच्या पश्चात ‘मसाप’चा लौकिक सर्वदूर पसरवताना द.पं.नी हैदराबादेतील वाङ्मयीन चळवळीत मोठी मांदियाळी सहभागी करून घेतली. अनेक संस्था व उपक्रमांचे ते अध्वर्यू. वाचन, अभ्यास, लेखन-संपादन यामध्ये त्यांनी कधी उसंत घेतलीच नाही. त्यांच्या संपादित ग्रंथसंपदेवर नजर टाकली तरी त्यांच्यातला संशोधक दिसतो. महाराष्ट्र शासनाने नांदेडच्या कुरुंदकर स्मारकाला निधी देण्याच्या बाबतीत करंटेपणा केला आहे, पण द.पं.नी हैदराबादेत बसून याच शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून कुरुंदकर स्मृतिग्रंथासह समग्र नांदापूरकर, समग्र सेतू माधवराव पगडी इत्यादी अभ्यासकांचे ग्रंथ अभ्यासकांसमोर आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. पंचधारा नियतकालिकाला प्रतिष्ठा व सन्मान लाभला तो त्यांच्या कुशल संपादनामुळेच! या सबंध कार्यात सहचारिणी डॉ. उषा यांचीही त्यांना साथ होती. मागील एक-दोन वर्षांपासून द. पं. काहीसे थकले होते, पण सार्वजनिक कार्यातील त्यांचा उत्साह कायम होता. ‘इतिहास-हैदराबादचा’, ‘व्यक्तिविशेष’ आदी काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच या साहित्यसेवकाची ‘साहित्य-सहवास यात्रा’ थांबली.

Author