घरी अठराविश्वे दारिद्य असलेल्या दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकाने अवघ्या दीड एकर शेतीत तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित केली आहेत. त्यांच्या या संशोधनाकडे राज्य सरकारने पाठ फिरवली असली तरी जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने या कृषी संशोधकाची दखल घेतली आहे. फोर्ब्सने जगभरातील ग्रामीण उद्योजकांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात चंदपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणार्या दादाजी खोब्रागडे यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.
७२ वर्षांचे दादाजी अल्पभूधारक शेतकरी आहेत. १९८३मध्ये त्यांनी तांदळाचे एक नवीन वाण विकसित केले. हे वाण वापरून भरपूर पीक घेता येईल असे त्यांनी गावातील अनेक शेतकर्यांना समजावून सांगितले; पण कुणीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. याच गावातील भीमराव शिंदे यांनी मात्र विश्वास टाकला व हे वाण चार एकरात वापरले. पहिल्याच वर्षी शिंदेंना ९० क्विंटल तांदूळ आला व दादाजींच्या संशोधनाची कीर्ती अख्या पंचक्रोशीत पसरली. त्यावेळी एच.एम.टी. ची घड्याळे खूप प्रसिद्ध होती. त्यामुळे दादाजींना त्या वाणाला एच.एम.टी. असे नाव दिले. या तांदळाची कीर्ती नांदेडपासून दहा किमी अंतरावर असलेल्या तळोधी बाळापूरच्या बाजारात पसरली व तो तांदुळ मोठया प्रमाणावर आसपासच्या गावांमध्ये निर्यात होऊ लागला. त्यामुळे तेथील व्यापार्यांनी दादाजींना प्रोत्साहन दिले. नंतर संपूर्ण विदर्भात हा वाण पसरला.
पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी हे वाण तपासण्यासाठी घेतले खरे, पण त्याचे श्रेय दादाजींना देण्याऐवजी विद्यापीठाने हे वाण पीकेव्ही एच.एम.टी. या नावाने बाजारात आणले. तेव्हापासून ते आजगायत, दादाजींचा विद्यापीठाशी प्रखर संघर्ष चालू आहे. नंतर दादाजींनी विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चिन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी, व डीआरके सुगंधी अशी तब्बल नऊ वाणे विकसित केली. या सर्व वाणांना केवळ विदर्भातीलच नाही तर अखिल महाराष्ट्रातील शेतकर्यांनी उचलून धरले. पण देशातल्या कोणत्याही कृषी विद्यापीठाने या संशोधनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. आता फोर्ब्स मासिकाने दखल घेतल्यानंतर सगळ्यांना जाग आली आहे.
दादाजी यांना या संशोधनाबद्दल चार पुरस्कार मिळाले आहेत. राज्य सरकारने त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून यथोचित गौरव केला आहे. मधल्या काळात मुलाच्या आजारपणात त्यांना त्यांची चार एकर शेती विकावी लागली. त्यामुळे ते आता मुलीच्या दीड एकर शेतीत वाण विकसित करण्याचे प्रयोग करीत असतात. रोज मजुरी करून चार पैसे कमावायचे आणि हंगामाच्या काळात संशोधन करायचे असा त्यांचा दिनक्रम अहोरात्र चालू असतो. वय झाले तरी त्यांची जिद्द काम आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर दादाजींची कीर्ती आली तेव्हा त्यांनी मुद्दाम त्यांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपये रोख दिले व पाच एकर जमीन विकत घेऊन देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे दादाजींनी संशोधनाला जोमाने सुरुवात केली आहे.
संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स