मराठी साहित्यातील एक समृद्ध प्रांत म्हणून विनोदाला नेहमीच महत्व मिळाले आहे. विनोदी साहित्याची मराठीतील परंपराही फार मोठी आणि संपन्न. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत, आणि पु. ल. देशपांडय़ांपासून ते श्रीकांत बोजेवारांपर्यंत विनोदाच्या नाना तऱ्हा मराठी साहित्यात उमटल्या. ‘टवाळा आवडे विनोद’ अशी संभावना करणाऱ्या मराठी भाषेतच विनोदी वाङ्मयाला एवढा बहर आला आहे की, कुणाही परभाषेला (त्याबाबतीत तरी!) मराठीचा अक्षरश: हेवा वाटावा.
अशा एका परंपरेत योगदान देणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या निधनाने मराठी विनोदाला काही क्षण तरी गंभीर व्हावे लागले आहे. अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय, आवड अध्यापनाची आणि वेड लेखनाचे अशा वेगळ्याच मुशीत तयार झालेल्या बाळ गाडगीळांनी मराठी साहित्यात आपल्या साहित्याने वेगळेपण जपले. गाडगीळ लिहायला लागले, तेव्हाही मराठी साहित्यात विनोदाचे झाड बहरलेले होते. पण पूर्वसूरींच्या खांद्यावर बसूनही समकालीन लेखकांचा कोणताही प्रभाव पडू न देता आपले वेगळेपण जपणारे गाडगीळ हे आगळे साहित्यिक होते. गॉगलच्या काचांचा चष्मा, नीटनेटके राहणीमान- चेहऱ्यावरून हा माणूस विनोदी लेखक असू शकेल, असे जराही वाटणार नाही. अशी जरब प्राचार्य किंवा उपकुलगुरू म्हणून काम करताना या अशा बाह्य़ व्यक्तिमत्त्वाचा आधार घेणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या स्वभावात मात्र एक प्रकारचा खटय़ाळपणा होता. फग्र्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून सात वर्षे आणि प्राचार्य म्हणून अकरा वर्षे काम करताना अध्यापनाच्या बरोबरीने व्यवस्थापनाचे कामही त्यांनी चोखपणे बजावले. सभोवतालच्या परिस्थितीचे बारीक निरीक्षण करण्याच्या क्षमतेचा वापर लेखनात करण्याची सिद्धहस्तता फार थोडय़ा लेखकांकडे असते. मध्यमवर्गीय जीवनशैलीतील अनेक वैचित्र्यपूर्ण विसंगती तीच जीवनशैली जगत असताना पाहण्याचे कसब गाडगीळांकडे होते. असे कसब आत्मसात केलेल्या आणि समाजाचे असे चित्रण करणाऱ्या लेखकांचीही मराठीमध्ये एक मोठी परंपरा आहे. मराठी विनोद मुख्यत: प्रासंगिक आणि माणसांची स्वभाववैशिष्टय़े टिपणारा असल्याचे सांगितले जाते. मनुष्य स्वभावाच्या अनेक पदरी कथा त्यामुळे विनोदी पद्धतीने साकारलेल्या आपल्याला दिसतात. गुदगुल्या करून हसवणारा विनोद मराठीत फारच कमी. मिश्किल शैली हे तर मराठीचे खास वैशिष्टय़. गाडगीळांचा विनोद पोट धरून हसायला लावणारा नाही, पण वाचताना मन प्रसन्न करणारा आणि गालातल्या गालात हसायला लावणारा असा हा विनोद गाडगीळांनी मनोभावे जपला, त्याची निगराणी केली आणि त्याला स्वाभाविकपणे फुलू दिले. ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्याच विनोदी लेखसंग्रहाला १९६१ मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची मजा अशी की तो पु. ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर विभागून देण्यात आला होता. पहिल्याच फटक्यात बाळ गाडगीळांनी अशी सिक्सर मारल्यामुळे त्यांचा त्यानंतरचा खेळ दिमाखदार होणे क्रमप्राप्त होते. ‘सिगरेट आणि वसंतऋतू’ या प्रवासवर्णनाबरोबरच ‘शिरसलामत’, ‘खिल्ली’, ‘कुणालाही थोडक्यात पाडून घेऊ’, ‘हसो हसो’, ‘दुसरा चिमणराव’ यासारख्या सुमारे तीस पुस्तकांचे धनी होण्याचे भाग्य बाळ गाडगीळांच्या वाटय़ाला आले. व्यक्तिचित्रे, नवनीती कथा, विनोदी कादंबरी, प्रवास वर्णने, बालवाङ्मय यासारख्या साहित्य प्रकारांबरोबरच गाडगीळांनी अन्य विषयांवरही विपुल लेखन केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात आंबेडकर’ हा संपादित ग्रंथ, ‘विनोद तत्त्वज्ञान’ हा टीकाग्रंथ, ‘मिसिसिपीवरील मुशाफिरी’ हा मार्क ट्वेनच्या आत्मवृत्ताचा अनुवाद, ‘अर्थशास्त्राचे शिल्पकार’ हा अनुवादित ग्रंथ हे त्यातील काही निवडक. बाळ गाडगीळांचे मराठी भाषेबरोबरच इंग्रजीवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी गंगाधर गाडगीळांच्या बरोबर आधुनिक मराठी कथांचे भाषांतरही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. राजेंद्र बनहट्टी यांच्या ‘अखेरचे आत्मचरित्र’ या लघुकादंबरीचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. अध्यापन आणि लेखन हाच शेवटपर्यंत ध्यास असलेल्या बाळ गाडगीळ यांनी सिम्बायोसिससारख्या संस्थेत राहून आपल्या शैक्षणिक अनुभवाचा उपयोगही केला. बाळ गाडगीळांच्या निधनाने एक चांगला साहित्यिक, अध्यापक आणि प्रशासक निवर्तला आहे.
गाडगीळ, बाळ