उल्का महाजन

उल्का महाजन ह्या आदिवास्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व्यापक लढा उभारणार्‍या एक जेष्ठ समाजसेविका आहेत. मुंबईमधील निर्मला निकेतन कॉलेजमध्ये बी. एस. डब्ल्यू व एम. एस. डब्ल्यू ही पदवी मिळवल्यानंतर रायगड मधील कातकरी या अतिशय हालाखीच्या परिस्थितींमध्ये दिवस काढणार्‍या आदिवास्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सर्व जन हारा आंदोलन चा मंच उभारला आहे.



उल्का महाजन ह्या आदिवास्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व्यापक लढा उभारणार्‍या एक जेष्ठ समाजसेविका आहेत. मुंबईमधील निर्मला निकेतन कॉलेजमध्ये बी. एस. डब्ल्यू व एम. एस. डब्ल्यू ही पदवी मिळवल्यानंतर रायगड मधील कातकरी या अतिशय हालाखीच्या परिस्थितींमध्ये दिवस काढणार्‍या आदिवास्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सर्व जन हारा आंदोलन चा मंच उभारला आहे. आदिवास्यांना स्वतःची संस्कृती जपायला शिकवून त्यांना सन्मानित व स्वयंपुर्ण जीवन जगण्यास या आंदोलनाने उद्युक्त केले आहे. आदिवास्यांच्या जीवनांमधील दीपस्तंभाचे काम करत असताना उल्का महाजनांनी त्यांच्यामधील आत्मविश्वासाचा व स्वाभिमानाचा कंदिल विझू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

हे आंदोलन म्हणजे केवळ भ्रष्ट सरकारी कर्मचारी, जुलमी सावकार, व गावांमधील मोक्याच्या जमिनींकडे डोळे लावून बसलेले बडे उद्योगपती यांच्याविरोधात उभारलेली चळवळ नाही तर या मंचाद्वारे आदिवास्यांच्या शिक्षणाचे, वैयक्तिक स्वच्छतेचे अनेक उपक्रम चालवण्यात येतात. त्यांना निवडणुकांचे महत्व पटवून देवून तळागाळातील प्रशासकीय कामांमध्ये सक्रीय सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते. मुलांसाठी संस्कारवर्ग चालविले जातात. उल्का महाजनांचा या सर्व कामांमध्ये प्रभावी सहभाग असतो. सरकारविरोधी लढत असतानासुध्दा त्यांचा (आदिवास्यांचा) पुर्ण व्यवस्थेवरील विश्वास उडु नये याची दक्षता घेतली जाते.

उल्का महाजनांनी सुरू केलेल्या या लढ्याला आता ४०,००० सदस्यांनी आपलं सर्वस्व वाहिल्यामुळे त्यांनी पेटवलेल रान आता संपुर्ण तेजाने जळतय असच म्हणावयास हव. रायगड जिल्ह्यामधील जवळपास ७ तालुक्यांमध्ये व एकुण ७५० खेड्यांमध्ये या आंदोलनाच्या नुसत्या सहवासाने ह्जारो आदिवासी कुटुंबियांची जीवने नव्या स्वप्नांच्या आभाळात लखलखत आह त, त्यांची मुले शिकत आहेत त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत स्थलांतरित शेती सोडून पुरूष कायमस्वरूपी शेती करीत आहेत. महिला त्यांच्या विवीध कलाकौशल्यांचा योग्य फायदा उठवून व्यवसाय करित आहेत. काही कर्ते पुरूष तर निवडणुकांमध्ये उभे राहात आहेत.

उल्का महाजन व त्यांच्या सहकार्‍यांनी कित्येक आदिवास्यांच्या जमिनींचे प्रश्न कायदेशीर मार्गांनी सोडविले आहेत. जमिनींवर बेकायदेशीर हक्क दाखवू पाहणार्‍या कंपन्यांना चांगला हिसका दाखविला आहे. कित्येक वर्षे दुसर्‍यांच्या जमीनी कसणार्‍या आदिवास्यांना त्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी कायदेशीर आधार मिळवून दिला आहे. या आदिवास्यांच्या व स्वयंसेवकांच्या वारंवार बैठकी आयोजित केल्या जातात. त्यांना आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व मानवी हक्कांविषयी डोळ्यांत अंजन घालून जागं करण्यात येतं. तसेच अशा सभांमध्ये वेगवेगळ्या गावप्रश्णांचा व समस्यांचा सखोल आभ्यास करण्यात येतो व त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतात.

Author