(डॉ.) वा. द दिवेकर

इतिहासाबद्दल प्रेम असणाऱ्या आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना पुस्तकी किडे म्हणण्याची एक पद्धत आहे. प्रत्यक्षात इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला ज्या दिव्यातून जावे लागते, ते दिव्य करायला आपल्यापैकी कुणीही सहसा तयार होणार नाही. उपलब्ध कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याची संगती लावणे, हे काम अतिशय अवघड आणि कौशल्याचे असते. एखाद्या कागदाचा खरेपणा तपासणे आणि अन्य उपलब्ध सामग्रीतून या कागदातील आशयाचे तथ्य जाणणे हे ज्ञान संपादन करण्याएवढेच कठीण असते.

पुण्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. द. दिवेकर यांच्या निधनामुळे अशा ज्ञानमार्गातील एका यात्रिकाचा शेवट झाला आहे. अर्थशास्त्र आणि इतिहास हे दिवेकरांचे लाडके विषय. दोन्हीमध्ये त्यांना गती! इतिहासाबद्दलचा जिव्हाळा सांभाळतानाच अर्थशास्त्रासारख्या विषयाचाही लळा लागावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

१८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ाचा मागोवा घेण्यासाठी ते वर्षभर इंग्लंडमध्ये राहिले. याच काळात तेथील ग्रंथालयांमध्ये मिळालेल्या लोकमान्य टिळकांवरील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, कारण या लढय़ाबाबतचा बराच तपशील मिळणे बाकी होते. दिवेकर यांनी त्याबाबत संशोधन करून ‘साऊथ इंडिया इन १८५७, द वॉर ऑफ इंडिपेन्डन्स’ या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी इंग्रजीतून सिद्ध केला. १८५७ च्या लढय़ात भाग घेणाऱ्या मुशाईसिंग यांची त्यांनी मिळवलेली माहिती थक्क करून सोडणारी होती. हाच ग्रंथ हिंदी आणि मराठीतूनही प्रसिद्ध झाला.

इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ‘टिळक इन लंडन’ हाही ग्रंथ समग्र टिळक या ग्रंथमालेतील नववा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला. इतिहासाची अर्थशास्त्राशी सांगड घालताना दिवेकर यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक घडामोडींच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. जगात आर्थिक विषयावरील संशोधनासाठी नावाजलेल्या पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत ग्रंथालयात काम करत असताना त्यांना या विषयाची गोडी लागणे स्वाभाविक होते. संस्थेत सुरू असलेल्या या विषयावरील संशोधनात त्यांचा वाटा होता.

गोखले अर्थशास्त्र संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी संशोधनकार्यासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढय़ात अंदमान येथे कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करण्याचे कामही दिवेकर यांनी आत्मीयतेने केले. हे काम करीत असताना जे सैनिक हयात असल्याचे लक्षात आले, अशांचा शोध घेऊन त्यांचा मेळावाही त्यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. आयुष्यभर संशोधनात मग्न असणाऱ्या दिवेकर यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील विक्रमगड येथे आदिवासींसाठीच्या शैक्षणिक कार्यात रस घेतला.

दिवेकर पती-पत्नींनी आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या अंगी अध्यापन कौशल्ये बाणवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांचे हे प्रयत्न खूप मोलाचे होते. आयुष्यात लौकिक अर्थाने काय मिळवायचे, अशा विवंचनेत असणाऱ्या अनेकांना दिवेकर यांचे आयुष्य म्हणजे एक आदर्श वाटावा असे होते. इतिहासातून जे काही शिकायचे, ते भविष्यासाठी उपयोगात आणायचे, याचे भान अनेकांना राहात नाही. हे भान येण्यासाठी नुसता अभ्यास किंवा संशोधन उपयोगाचे नसते. त्यासाठी आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याचीही गरज असते.

वा. द. दिवेकर यांनी आयुष्यभर नेमके हेच केले. त्यामुळेच गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ग्रंथालयात काम करत असताना, त्यांना ग्रंथांचा जो सहभाग मिळाला, तो त्यांचे आयुष्य घडवणारा ठरला. त्यांचे अलीकडेच पुण्यामध्ये ८३ व्या वर्षी निधन झाले.

Author