संत राममारुती महाराज

पूज्य महाराजांचे मूळ नाव शंकर राजारामभाऊ कर्णिक-देशपांडे. त्यांना शिक्षणासाठी भिवंडीस त्यांचे मामा माधवराव खारकर यांच्याकडे ठेवले होते.



जन्म : पेण : १८-९-१८५६. मृत्यू : २९-९-१९१८
पूज्य महाराजांचे मूळ नाव शंकर राजारामभाऊ कर्णिक-देशपांडे. त्यांना शिक्षणासाठी भिवंडीस त्यांचे मामा माधवराव खारकर यांच्याकडे ठेवले होते. परंतु लहानपणापासून विद्याभासापेक्षा भजन व नामसंकीर्तनाकडे अधिक कल होता. त्यांना शंकर म्हणत. त्यांचे मामा संत बालमुकुंद स्वामींचे शिष्य होते. त्यांनी शंकराला त्यांच्याकडे नेले. बालमुकुंद स्वामींना शंकरमध्ये दिव्यत्वाची हिमरेषा सापडली. आणि स्वामीनी त्यांना गायत्री मंत्र व गुरुमंत्र दिला. स्वामींनी त्यांना राममारोती अशा नावाने तू वावरशील असा संकेत दिला. गुरुप्रसादामुळे “राममारोती” ह्यांना आध्यात्मिक संस्कार घडले.
पूज्य महाराज नेहमी धोतर, डोक्यास फेटा, अंगावर उपरणे, हातात काठी, डाव्या मनगटात तांब्याचे कडे, बोटांत सल्ले, कानांत भिकबाळी, पायांत वहाणा अशा रूपात असत. त्यामुळे ते अलौकिक पुरुष असावेत अशी कल्पनाही त्याकाळच्या सामान्य माणसांना शिवली नाही. परंतु कुलाबा जिल्ह्यात जेंव्हा त्यांनी “श्रीराम जयराम” या महान मंत्राने अखंड प्रचार करून लोकांत भगवतभक्तीची जागृती केली, तेव्हा सामान्यजनांचे लक्ष या महापुरुषांकडे गेले.
राममारोतींजवळ “राम” या शब्दाविना दुसरा शब्द नव्हता. कोणताही पदार्थ हवा की नको, हे ते अंगुलीनिर्देश करून “राम” या शब्दाने व्यक्त करीत. इतकी त्यांची रामावरची आसक्ती !
भिवंडीस प्रभू रामचंद्रांची मिरवणूक निघत असे. ही मिरवणूक पूज्य महाराजांना मोक्षपर्वणी वाटायची. ते ह्या मिरवणुकीत देहभान विसरुन सामील होत.
पूज्य अक्कलकोट स्वामी महाराजांचे ते भक्त होते. मुंबईस अक्कलकोट स्वामी आले म्हणजे महाराज त्यांच्यापाशीच असत.
१९१४ साली दादर येथे पूज्य नानामहाराज श्रीगोंदेकर यांची पूज्य राममारोती महाराजांशी भेट झाली. आपण दोघेही एकाच समाजातील व एकाच प्रणालीतील आहोत हे समजताच दोघेही आनंदित झाले. पुढे दोघांनीही ठाणे, कुलाबा जिल्ह्यांत दौरा काढून समाजाची भावी पिढी

सुधारण्याचे कार्य हाती घेतले.

पूज्य महाराज नेहमी “श्रीराम” हा मंत्र म्हणत. महाराज भजनकीर्तनात रंगले असता, भु:भु:कार करुन “राम” म्हणत आणि बसत्या मांडीवरुन उंच उड्डाण करीत असत ! भजन संपल्यावर महाराज स्वत:च “गोविंदा रामा गोपाळ रामा” हे भजन सांगत असत. पूज्य महाराजांना मुलांची फार आवड होती.
१९१८ चा श्रावण महिना उजाडला. त्यांना उतार वयात ज्वराचा त्रास होई. महाराज ज्यांच्या ज्यांच्या घरी जेवून निघाले त्यांच्याकडून त्यांनी दहीसाखरेचा निरोप घेतला. २७-९-१९१८ ला शुक्रवारी “सोऽऽहं” हा मंत्र जपत, शनिवार, ता. २८-९-१९१८ ला ते ब्रह्मस्वरुपात विलीन झाले.
ज्या ठिकाणी महाराजांच्या देहावर अग्निसंस्कार केला तिथे “अस्थिकलश” ठेवून, समाधी बांधण्यात आली. सप्टेंबर १९६८ मध्ये पूज्य महाराजांच्या पुण्यतिथी (सुवर्णमहोत्सव) निमित्त समारंभप्रसंगी ना. वर्तक ह्यांच्या उपस्थितीत, श्रीगजानन महाराज पट्टेकरांनी त्यांचे चरित्र प्रसिद्ध केले व फिल्म्स् डिव्हिजनने त्यांच्यावर डॉक्युमेंटरी तयार केली आहे.

Author