कंपनी कायद्याच्या क्षेत्रात चंद्रशेखर ऊर्फ बाबूराव रेळे यांचे नाव मोठे असले तरीही संगीताच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान तेवढेच मोलाचे असल्याची माहिती कायद्याच्या क्षेत्रातील फार थोडय़ा लोकांना असेल. आज मुंबईत राहणाऱ्या सव्वा कोटी लोकांपैकी कितीजण अस्सल मुंबईकर असतील, हे शोधावेच लागेल.
पण बाबूराव रेळे यांच्या पूर्वजांचा जो काही ज्ञात इतिहास उपलब्ध आहे, तो पाहता, मूळचे मुंबईचे असे जे काही थोडे लोक आज असतील, त्यात त्यांच्या कुटुंबाचा समावेश करावा लागेल. मुंबईतील खंबाला हिल भागातील जायफळाची बाग बाबूरावांच्या पणजोबांच्या मालकीची होती. त्यामुळे घरून काही मिळवण्यासाठी काही करण्याचा आग्रह असण्याची शक्यता नव्हती. पण रेळेंनी आपले सारे आयुष्य संपन्नपणे जगण्यासाठी अगदी लहान वयातच प्रयत्नांना सुरुवात केली होती. जे मनापासून आवडते, ते करण्यासाठी कष्ट पडत नाहीत, हे त्यांना लवकर उमगले असावे. त्यामुळेच त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू करण्याच्या कितीतरी अगोदर, तेव्हा मुंबईत नव्याने सुरू झालेल्या प्रो. बी. आर. देवधर स्कूल ऑफ म्युझिकमध्ये १९३५ मध्ये, म्हणजे वयाच्या आठव्या वर्षीच आपले नाव दाखल करून टाकले होते. आपल्याला संगीताची विशेष आवड आहे आणि ती जोपासण्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे आवश्यक आहे, याची जाण त्यांच्या दोन्हीकडच्या आजोबांना होती. १९३६ मध्ये याच संगीत शाळेत दाखल होण्यापूर्वी कुमार गंधर्व नावाच्या मुलाने साऱ्या देशात आपल्या अपूर्व गायनाने ख्याती मिळवली होती. बाबूराव आणि कुमारजी यांच्यातील मैत्रीचे धागे इतके घट्ट झाले की, हे दोघेही एकमेकांशिवाय राहणे अशक्य झाले. संगीतातील आनंद निर्माण करण्याच्या प्रज्ञेचा कुमारांनी केलेला अपूर्व प्रयोग घडत असताना त्यांच्या अगदी जवळ असे जे काही थोडेचजण होते, त्यात बाबूरावही होते. संगीताकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वैज्ञानिकाची होती. ही दृष्टी प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडूनच मिळाली असणार हे नक्की! कारण देवधर मास्तर हे केवळ संगीत शिक्षक नव्हते, ते संगीताबद्दल मूलगामी चिंतन करणारे होते. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे ज्येष्ठ कलावंत विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे संगीत शिकल्यानंतरही त्यांनी आपली दृष्टी सतत विस्फारित ठेवली. इतर घराण्यांचे गाणे ऐकायलाही दुरापास्त असताना देवधर मास्तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नामवंत कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करत असत. कुमारजी आणि बाबूराव यांच्याकडे संगीताकडे पाहण्याची जी वेगळी नजर होती, त्याचे मूळ इथे आहे. बाबूरावांनी आयुष्यभर कायद्याच्या क्षेत्रात काम केले, पण त्यांचे सुखनिधान संगीत हेच राहिले. मैफली गवई व्हायचे नाही, असे काही त्यांनी ठरवले नव्हते. पण त्यांनी मैफली करण्यापेक्षा संगीतावर चिंतन करणे अधिक पसंत केले आणि संगीतावर ग्रंथ लिहिले. ‘स्वरप्रवाह’ हे संगीतातील थाट पद्धतीचे विश्लेषण करणारे त्यांचे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे. कायद्याच्या क्षेत्रात काम करीत असतानाही त्यांनी संशोधन करून पीएच.डी. संपादन केली. ‘स्वरप्रवाह’ हा या संशोधनाचाच ग्रंथ. बाबूरावांनी स्वत: काही बंदिशींच्या रचनाही केल्या होत्या. अशा सुमारे सव्वाशे बंदिशींचा ‘गुंजन’ हा संग्रहही त्यांनी प्रकाशित केला होता. कुमार गंधर्व यांच्या अपूर्व मैत्रीचा ठेवा उलगडून दाखवणारे ‘कुमार माझा सखा!’ हे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी गाता गाता मृत्यू यावा असे संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताचे एक स्वप्न असते. बाबूरावांच्या बाबतीत ते सत्यात उतरले. संगीतावर व्याख्यान देत असतानाच त्यांना मृत्यूने निमंत्रण दिले. त्यांच्या निधनाने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील संगीताच्या इतिहासाचा साक्षीदार आपल्यातून निघून गेला आहे.