सुंदरबाई बांगर गावच्या आधारवड

संपूर्ण गावात सुंदरबाई या नावाला एक विशिष्ट वलय आहे—आदराचं, सोज्वळतेचं आणि धार्मिकतेचं. सुंदरबाई या संपूर्ण गावच्या आधारस्तंभ आहेत.



संपूर्ण गावात सुंदरबाई या नावाला एक विशिष्ट वलय आहे—आदराचं, सोज्वळतेचं आणि धार्मिकतेचं. सुंदरबाई या संपूर्ण गावच्या आधारस्तंभ आहेत.

का? काय माहित, पण सुंदरबाई दिसताच प्रत्येक माणसाला त्या गावाचा एक आधारस्तंभ असल्याचा भास होतो.

प्रत्येक घरात एखादा तरी वृद्ध माणूस असावा आणि त्याचा प्रचंड आधार आपल्याला असावा, त्याप्रमाणेच संपूर्ण गावाला सुंदरबाई या एक आधारवड म्हणून लाभल्या आहेत. त्यांचे कुणाशीही शत्रुत्व नाही—हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य. मराठा समाजातील असूनही सर्व समाजाशी त्यांचे तितकेच जवळचे संबंध आहेत. काहींना त्या मावशी, आत्या, मामी, आजी लागतात, तरी सर्वजण त्यांना स्नेहाने सुंदरबाई म्हणूनच हाक मारतात.

मंदोशी गावचे मुलकी पाटील कै. शिवराम मानाजी मोहन यांच्या सुंदरबाई या कन्या आहेत.

त्यांचा जन्म साधारण 1952 च्या सुमारास झाला. लहानपणी अभ्यासात त्या अतिशय हुशार—सातवीपर्यंत नेहमी प्रथम क्रमांक.

परंतु त्या काळी ग्रामीण भागात मुलींना जास्त शिकवण्याचा प्रघात नव्हता. त्यामुळे हुशार असूनही सुंदरबाईंना पुढील शिक्षण घेता आले नाही.

नंतर त्यांचे लग्न देवराम बांगर यांच्याशी झाले. देवराम बांगर सुरुवातीला मुंबईला कामावर होते, परंतु त्यांच्या कंपनीला लागलेल्या आगीत सर्व नुकसान झाल्याने ते गावी परत आले आणि सासरवाडीत म्हणजेच सुंदरबाईंच्या माहेरी राहू लागले.

सन 1983 मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘एकात्मिक बालविकास योजना’ अंतर्गत अंगणवाडीची स्थापना केली तेव्हा प्रथमच सुंदरबाईंना अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

जरी त्या सेविका म्हणून कार्यरत असल्या तरी गावातील सुशिक्षित स्त्री, समाजसेविका आणि मार्गदर्शक म्हणून लोक त्यांचा मान राखतात.

गावात कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा लग्नकार्य—सुंदरबाई नेहमी पुढे असतात. सढळ हाताने देणगी देणे, कार्यक्रमात सहभाग ठेवणे हे त्यांच्या स्वभावातच आहे.

गावात एखादी दुःखद घटना घडली की सुंदरबाई सर्वात आधी सांत्वनासाठी धावून जातात. त्यांच्या चार शब्दांनी लोकांचे मन हलके होते—हे सांगायला नकोच.

त्या काळात पश्चिम भागात हातभट्टी दारूचे धंदे वाढू लागले होते. गामा शेठ यांनी अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने दारूचा व्यवसाय सुरू केला होता. जमिनीखाली दारू साठवण्याची रचना केल्याने पोलिसांना काहीच हाती लागत नसे. तिथून छोट्या धंदेवाल्यांना होलसेल दरात दारू मिळत असे आणि ती भोसरीपर्यंत पोहोचे.

सन 1991–92 मध्ये सुंदरबाईंच्या नेतृत्वाखाली डेहणेपासून भोरगिरीपर्यंतच्या महिलांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारले. दोनशे–तीनशे महिला मिळून प्रत्येक दारूधंद्यावर धाड टाकत दारूविक्री बंद केली. अगदी गामा शेठ यांचाही धंदा बंद करण्यात आला. महिलांच्या रुद्ररूपाने सर्व दारूधंदेवाल्यांची दहशत झाली.

या आंदोलनात सुंदरबाईंचा मोठा वाटा होता.

सुंदरबाईंनी गावात महिला मंडळाची स्थापना केली. छोटासा फंड गोळा करून स्थानिक महिलांच्या विविध गरजा भागवल्या जात होत्या.

देव कोंडण्याची परंपरा आणि सुंदरबाईंचे नेतृत्व

पूर्वी पाऊस वेळेवर न पडल्यास गावांत देव कोंडण्याची पद्धत होती. सर्व महिलांनी घागरभर पाणी शंकराच्या मंदिराला वाहून पिंडीला जलाभिषेक करायचा आणि झरोका बंद करायचा—हे एक प्रकारे सामूहिक वर्षाव-प्रार्थनाच होती.

माझ्या लहानपणीचा एक प्रसंग स्पष्ट आठवतो—भातरोपांनंतर पाऊस थांबला होता. शेतकरी पोराबाळांसह रोपे जगवत होता—त्यात मीही होतो. पण तो केवळ केविलवाणा प्रयत्न होता.

तेव्हा सुंदरबाई यांनी धुओली, वांजाळे, शिरगाव आणि मंदोशी या चार गावातील महिलांना एकत्र केले. सर्वांनी घागरी भरून सुळ्याच्या महादेव कोंडायचा निर्णय झाला.

सकाळी सर्व महिला घागरीत पाणी घेऊन उंच डोंगरावरील महादेवाच्या मंदिराकडे निघाल्या. आम्ही मुलेही सोबत होतो. जंगलातील वाट, पक्ष्यांचे आवाज, एखादा ससा, उभा डोंगर—सगळं एखाद्या चित्रपटासारखं होतं.

वर पोहोचताच थंड वाऱ्याने मन प्रसन्न झाले.

चारही गावच्या महिलांनी एकत्र येऊन पिंडीचा जलाभिषेक केला. पिंड पाण्याने पूर्ण बुडाली.

नंतर महिलांनी मंदिराबाहेर फेर धरून पावसासाठी गाणी म्हणत आळवणी केली. हे दृश्य माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे.

ही सर्व महिलांना एका ठिकाणी गोळा करण्याचे काम—आदरणीय, मातृतुल्य सौ. सुंदरबाई देवराम बांगर यांनी केले होते.

आणि मग चमत्कारच—थोड्याच वेळात टपटप थेंब सुरू झाले आणि लगेच मुसळधार पाऊस.

सगळे चिंब भिजत घरी निघालो. ओढ्यांना पुर आला. जंगलातील ओंडके वाहत जात होते. सर्वत्र खळखळणारे झरे आणि पावसाने नटलेले हिरवेगार दृश्य दिसत होते.

सुंदरबाई आज…

आज सुंदरबाई वयोवृद्ध झाल्या आहेत. मोहनवाडीत रस्त्यालगत त्यांचे घर आहे. दारातच त्या बसलेल्या असतात. आम्ही जातो तेव्हा चार शब्द बोलतो—मन हलके होते.

लेखक : रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

Author