कार्यकाळ: २७ मे १९६४ ते ९ जून १९६४
जन्म: ४ जुलै १८९८ मृत्यू: १५ जानेवारी १९९८
गुलजारीलाल नंदा मुंबई विधानसभा मतदारसंघाचे सन १९३७ ते १९३९ व १९४७ ते १९५० या काळात आमदार राहिले. त्यांनी श्रम आणि आवास मंत्रालयाचा कार्यभारदेखील सांभाळला. नॅशनल ट्रेड युनियनची स्थापनाही त्यांनी केली.
भारताचे हंगामी दुसरे पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ४ जुलै १८९८ रोजी पाकिस्तानांतील सियालकोट येथे झाला. भारतीय राजकारणाचा त्यांचा सखोल असा अभ्यास होता. म्हणूनच त्यांचा राजकीय क्षेत्रात विशेष सन्मान करण्यात येत असे. काँग्रेस पक्षासाठी गुलजारीलाल नंदा यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर त्यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लाल बहादूर शास्त्री यांचे सन १९६६ साली निधन झाले तेव्हादेखील दुसऱ्यांदा त्यांना अशीच संधी मिळाली. त्यांच्या वडिलांचे नाव बुलाकी राम नंदा, तर आईचे नाव श्रीमती ईश्वर देवी नंदा असे होते. गुलजारीलाल नंदा यांचे प्राथमिक शिक्षण सियालकोट येथेच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी लाहोर येथील फोरमॅन महाविद्यालय तसेच अलाहाबाद विश्वविद्यालयात अध्यापनाचे कार्यदेखील केले. त्यांनी कायद्याची पदवीही प्राप्त केली होती. त्यांचा विवाह १९१६ साली लक्ष्मीदेवी यांच्या सोबत झाला. स्वातंत्र्यसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. अहमदाबाद टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीच्या मजदूर असोसिएशन सचिव पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्रमिकांच्या प्रश्नाबाबत ते जागृत असायचे. सत्याग्रह आंदोलन, भारत छोडो आंदोलना अंतर्गत त्यांना कारावासही झाला. २६ डिसेंबरच्या अंकात ‘ओळख राष्ट्रपतींची’ या सदरात प्रतिभाताई पाटील यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २००४ ते २३ जुलै २००७ अंसा अनवधानाने प्रसिद्ध झाला आहे. त्यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ २५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२ असा होता.