(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

  • p-1166-chakli

    चकली कुठे बिघडते?

    चकली उत्तम होण्यासाठी प्रथम भाजणी उत्तम व्हावी लागते. तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ या सर्व गोष्टी धुवून मग भाजायच्या असतात. चकलीची भाजणी जास्त भाजायची नसते. सर्व धान्यं भाजून झाली की त्यात धने व जिरे भाजून घालून सर्व मिश्रण बारीक दळून घ्यायचं असतं. या पिठात तिखट, मीठ, तीळ, ओवा आणि गरम तेलाचं मोहन घालून आणि पुरेसं पाणी घेऊन पीठ भिजवायचं असतं. मग त्या पिठाचा छोटा गोळा थोडा मळून घेऊन चकली पात्रात घालून चकल्या पाडायच्या असतात.

    चकली कशी तळावी?
    चकली तळणं हे कौशल्याचं काम असतं. चकली कमी तापलेल्या तेलात म्हणजे दीडशे डीग्री सेल्सियसपेक्षा) (या तपमानाला मायलार रिअँक्शन सुरू होते) कमी तपमानाच्या तेलात टाकली तर चकलीच्या बाहेरच्या भागाचा संपर्क गरम तेलाशी आल्यानं तेथील पाण्याची वाफ होऊन ती बाहेर येऊ लागते. त्या छिद्रांमधून तेल आत शिरू लागतं, पण मायलार रिअँक्शन न झाल्यानं बाहेरील भाग सोनेरी व घट्ट होत नाही. आतील भागातील पाण्याची वाफ झाली तरी तिचा दाब पुरेसा नसल्यानं ती बाहेर येत रहाते. आत शिरणार्या् तेलाला ती अटकाव करू शकत नाही. आणि म्हणूनच तेल भरपूर आत शिरल्यानं व बाहेरील भाग घट्ट न झाल्यानं चकली विरघळते. या उलट खूप तापलेल्या तेलात जर चकली टाकली तर बाहेरील भाग लगेच सोनेरी व थोड्याच वेळात लाल बनतो. बाहेरील भाग घट्ट असल्यानं अतिरिक्त वाफ बाहेर येऊ शकत नाही. अशी चकली तळून काढली की बाहेरून लाल व कडक, पण आतून मऊ असते. तपमान कमी झाल्यावर चकलीमधील वाफ आतल्या आत शोषली जाते व चकली मऊ पडते. चिवट होते. या कारणांसाठी चकली तळतांना तेलाचं तपमान मध्यम ठेवावं लागतं. म्हणजे ती सोनेरी आणि खुसखुशीत होते. चकली तळत असताना बाहेर येत असलेल्या वाफेमुळे सतत बुडबुडे येत असतात. हे बुडबुडे येणं खूप कमी झालं की चकली तळून झालेली असते.

    भाजणी कशी भिजवावी?
    चकलीची भाजणी सैल भिजली तर अशा पिठाची चकली कागदावर पाडून तळणीत टाकतेवेळी तिचा आकार बदलण्याची शक्यता असते. शिवाय पाण्याचा अंश जास्त असल्यानं अशी चकली गरम तेलात टाकली की खूप मोठय़ा प्रमाणात वाफ बाहेर येते. त्या छिद्रांमधून तेल आतपर्यंत जाऊन चकली विरघळू शकते. जर वाफेच्या दाबानं तेलाला रोखून धरलं तर चकली गार झाल्यावर मऊ पडू शकते. अशा वेळी आणखी थोडी कोरडी भाजणी घेऊन त्यात तिखट, मीठ, गरम तेल वगैरे घालून ती सैल भाजणीत घालून मिश्रण योग्य तेवढं मऊ ठेवावं. भाजणी घट्ट भिजली तर पाण्याचा अंश कमी असल्यानं कमी वाफ बाहेर येते. छिद्रं कमी पडतात. त्यामुळे तेल त्यात कमी शिरतं व चकली खुसखुशीत होत नाही. अशा वेळी भाजणीत थोडं पाणी घालून ती जरा सैल करावी. उकडीच्या पाण्यात भाजणी भिजवली तर उच्च तपमानामुळे भाजणीतील स्टार्चमधील अमायलोज व अमायलोपेक्टिन विरघळू लागतात. रेणूंचा आकार मोठा होतो. अशा पिठाची चकली गरम तेलात टाकल्यावर पाण्याची वाफ होऊन छिद्र खोलवर पडतात (कारण पाणी कणाच्या आतपर्यंत शिरलेलं असतं) ती खूपही असतात. त्यामुळे खूप तेल आतवर शिरू शकतं. अशी चकली तोंडात विरघळेल इतकी खुसखुशीत होऊ शकते, पण तळायला वेळ लागतो, जरा तेलकट असते आणि विस्तव फार मंद नाही, फार तीव्र नाही, असा ठेवून तपमान व्यवस्थित ठेवावं लागतं.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

  • गाजराचे पराठे

    गाजराचे पराठे

    साहित्य: ३-४ मध्यम गाजरे - साधारण २ कप खिस होईल इतपत, २-२.५ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त), ३-४ हिरव्या मिरच्या, १/२ लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून साखर, मुठभर चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, पाणी लागेल तसे.

    कृती - गाजरे धुवुन साले काढुन खिसुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटुन गाजराच्या खिसात घालावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून १०-१५ मिनीटे ठेवावे. १५ मिनिटानंतर थोडे पाणी लावून कणीक मळावी. भिजवलेली कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहेमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबीरीसोबत फस्त करावेत.

  • p-2860-upvaas-paanipuri

    उपवासाची पाणीपुरी

    साहित्य: ३/४ कप वरीचा तांदूळ, २ टेस्पून शाबुदाना पीठ, चवीपुरते मिठ, क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा), तळण्यासाठी तेल.

    कृती:
    १) वरीचे तांदूळ, शाबुदाना पीठ आणि मिठ एकत्र करावे. त्यात सोड वॉटर घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे.
    २) नंतर भिजवलेल्या पिठाचे करवंदाएवढे छोटे गोळे करावे आणि ते गोळे कोरडे पडू नयेत म्हणून ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे.
    ३) तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात. तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. मध्यम आचेवर तेल तापवावे.
    ४) पुर्‍या तळल्यावर जाळीच्या रॅकवर तेल निथळण्यास ठेवाव्यात. या रॅकच्या खाली एकादे ताट ठेवावे म्हणजे निथळलेले तेल ताटात जमा होईल.
    ५) पुर्‍या शक्यतो कुरकूरीत राहातील. पण जर राहिल्या नाहीत तर बेकिंग ट्रे मध्ये पुर्‍या पसरवाव्यात. ओव्हन २०० F (९३ C) वर प्रिहीट करावा, बेकिंग ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा आणि साधारण १० मिनीटे पुर्‍या बेक कराव्यात. बेक केल्यावर पुर्‍या नक्की कुरकूरीत राहतील.

    स्टफिंग साठी: उकडलेला बटाटा त्यात मीठ हिरवी मिरची जिरे पेस्ट घालून कालवून घालावे. खारे शेंगादाणे. उपासाची शेव.

    पाणी पुराचे पाणी

    साहित्य: अर्धा कप चिंच, ४-५ टेस्पून किसलेला गूळ, १०-१२ खजुर, ६-७ हिरव्या मिरच्या, २ टिस्पून जिरेपूड, मीठ.

    कृती:
    १) चिंच पाण्यात भिजत घालून चिंचेचा कोळ करावा. खजूर ४-५ तास कोमट पाण्यात भिजवावे. बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे.
    २) हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक कराव्या.
    ३) ४-५ भांडी पाण्यात चिंचेचा कोळ, गूळ, खजूराची पेस्ट, मिठ, मिरचीची चटणी, जिरेपूड सर्व मिक्स करावे.

  • p-33418-Coriander-300

    आजचा विषय कोथिंबीर

    जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो.

  • p-3715-tomato-carrot-soup

    टोमॅटो-गाजर सूप

    साहित्य: २ टोमॅटो, दोन गाजरं, पाव टीस्पून बटर, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार.

    कृती: टोमॅटो आणि गाजराच्या फोडी करून मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. त्यात दूध, बटर आणि मीठ-मिरपूड घालून उकळा.

  • गाजराचे पराठे

    ढाबा स्टाईल पनिर मसाला

    सर्व प्रथम 200 ग्रँ. पनिर घ्या. त्याचे तुकडे करून त्याला मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद लावून बाजूला ठेवून द्या.

    1/2 तासाने एका पँन मध्ये 3 चमचे तेल आणि एक चमचा तुप घाला. ढाबा स्टाईल मध्ये तेला तुपाचा वापर सढळ हस्ते असतो आपल्याला आवडत नसेल तर प्रमाण कमी करा. त्यात मँरिनेट केलेलं पनिर टाँस करून घ्या. थोडं साँफ्ट होईपर्यंत. मग पनिर वेगळं काढून ठेवून त्याच पँन मध्ये अनुक्रमे जिरं,मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र घाला. प्रमाण आपल्या तिखट आवडेल त्याप्रमाणे मग 2 मोठे कांदे बारीक चिरलेले घाला. रंग हलका ब्राऊन होईपर्यंत परता. मग त्यात 3 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 2 चमचे धना जिरं पूड, आणि 2 चमचे बेसन घालून चांगलं परतून घ्या. खरपूस.... मसाला चिकटतोय असं वाटलं तर पाण्याचा हबका मारा. मग त्यात 3 मध्यम टोमँटो प्युरी टाका आणि पुन्हा तेल सुटे पर्यंत परतून घ्या. मीठ आणि बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. शेवटी बाजूला ठेवलेलं पनिर आणि ग्रेव्ही नुसार पाणी घालून झाकण लावून 2 मिनिटं ठेवा....... झालं आपलं ढाबा स्टाईल पनिर मसाला.....

    टिप : ढाबा स्टाईल रेसिपित काही जणं फक्त तुपाचा वापर करतात, काही तेलाचा तर काही दोन्हीचा आणि जरा जास्तच..... तसच जेवढे आपण मसाले परतू तेवढी टेस्ट वाढते....

  • baby-corn-in-cheese-dip-300

    बेबी कॉर्न इन चिजी डिप

    बेबी कॉर्न व मशरूम 2-3 मिनिटे गरम पाण्यात ठेवून निथळून घ्या. कढईत तेल गरम करून तमालपत्र, जिरे, लाल मिरची, लवंग, कांदा, आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पेस्ट, कोथिंबीर, किचन किंग मसाला, साखर व मीठ घालून परता. टोमॅटो प्युरी घालून 2-3 मिनिटे शिजवा.

  • p-3713-cream-of-tomato

    क्रीम ऑफ टोमॅटो

    साहित्य: ४ टोमॅटो, २ टेबलस्पून घरची साय, लहान अर्धा कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार.

    कृती: टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून कुकरच्या भांड्यात घालून मऊ शिजवून घ्या. गार झालं की त्यात साय आणि दूध घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाळून त्यात मीठ-मिरपूड घाला आणि मंद आचेवर उकळा.

  • p-1276-khatkhata

    खतखतं

    साहित्य: १/२ कप तुरीची डाळ, १/२ कप खवलेलं ओलं खोबरं, १ मुठ शेंगदाणे, १ हिरवी मिरची, ४-५ आमसुलं, २ मक्याची कणसं (अमेरिकन स्वीटकॉर्न), १ छोटा बटाटा, मध्यम चौकोनी फोडी करून, रताळ्याच्या ७-८ मध्यम चौकोनी फोडी, भोपळी मिरचीचे ७-८ चौकोनी तुकडे
    काकडीच्या ७-८ मध्यम चौकोनी फोडी, मुळ्याच्या ५-६ चौकोनी मध्यम फोडी, ६-७ फरसबीचे , १" लाबीचे तुकडे, लाल भोपळ्याच्या ५-६ मध्यम आकाराच्या फोडी, दोडक्याच्या ५-६ मध्यम आकाराच्या फोडी, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, मीठ आणि साखर चवीप्रमाणे.
    फोडणीसाठी- २ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग, ५-६ कढीपत्ता पाने.

    कृती: कणसाचे २ १/२" ते ३" चे तुकडे करून घ्या. तुरीची डाळ, शेंगदाणे, कणसाचे तुकडे आणि १ हिरवी मिरची कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्या.

    पातेल्यात थोडे पाणी घाला. त्यात बाकीच्या सगळ्या भाज्या घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.

    डाळ शिजली कि चांगली घोटून घ्या. त्यात वेगळ्या शिजवून घेतलेल्या भाज्या,कणसाचे तुकडे,शिजलेले शेंगदाणे घाला. पाणी घालून थोडं पात्तळ करून घ्या.

    ओलं खोबरं गरम पाणी घालून बरीन वाटून घ्या. डाळ आणि भाज्यांमध्ये वाटलेलं खोबरं मिक्स करा. आमसुलं घालून ढवळा.
    हळद,तिखट,मीठ साखर घालून ढवळून घ्या. रस्सा भाजी ५-१० मिनिटे चांगली उकळत ठेवा.

    फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने आणि हिंग घाला आणि रस्याला फोडणी द्या. खतखतं पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • गाजराचे पराठे

    अळीवाचे पॅनकेक

    साहित्य:- प्रत्येकी १ वाटी सोयाबीन, नाचणीचे पीठ, एक वाटी बेसन, रवा, कणीक, तांदूळाचे पीठ, दीड वाटी गूळ दुधात किंवा पाण्यात विरघळवलेला, मीठ, काजूचे बारीक तुकडे, वेलची पावडर, भिजवलेले अळीव, तेल, साजूक तूप.

    कृती:- प्रथम १ वाटी नाचणीचे पीठ, १ वाटी सोयाबीन पीठ व वरीलपैकी कोणतीही दोन पिठे एकेक वाटी अथवा अर्धा वाटी सगळी पिठे एकत्र करावीत. त्यात चिमूटभर मीठ, वेलची पावडर, काजू तुकडा व ४ चमचे दुधात किंवा पाण्यात भिजवलेले अळीव घालावे. गुळाचे पाणी घालून पीठ घिरडय़ाच्या पिठाइतके पातळ भिजवावे. आवडेल इतपत गोड करावे. नॉनस्टीक पॅनमध्ये साजूक तूप घालून ते पसरवावे व त्यावर झाकण ठेवावे. आकार हवा तेवढा लहान-मोठा करावा. खालची बाजू लालसर झाली की झाकण काढून उलटावे व गुलाबी रंगावर झाले की प्लेटमध्ये काढून घ्यावे. नारळाची चटणी किंवा लोणचे किंवा लिंबू गोड लोणचे किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३