आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा
आज काल काय झालंय.
दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी,
जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून !
आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती.
रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती !
वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती !
पैशांची किंमत झाली कमी आणि पैसे झाले जास्ती !
मनमोकळ्या गप्पा झाल्यात कमी आणि चॅटींगसाठी वेळ झालाय जास्ती !
टीव्ही वरील सर्व चॅनेल्सवरचे एकुणएक पिक्चर्स जणु काही आपल्यासाठीच बनवले आहेत. फुकट बघता येतात, म्हणून आयपीएल पण झाल्या. याच्या जोडीला "मनोरंजन" म्हणून काहीतरी हवेच ना, म्हणून दिमतीला हाय फाय सिरीयल्स आहेतच !
सिरीयल्सच्या मधल्या जाहिरातींच काय करणार ? विचारांना एका ठिकाणी स्थिर बसू न देणाऱ्या रिमोटने दुसरी चॅनेल्स बदलली तरी तिथेही जाहिरातीच ! एकुणच काय, तुमच्या खिशातले पैसे आमच्या खिशात, आमच्यातचे तुमच्यात ! म्हणून भारतात एकवेळ थंडीची लाट येईल, पण मंदीची लाट कधीच येणार नाही.
95 % जनतेला सिरीयल्स मधला झामझौल मोहक वाटतो. मोह निर्माण झाल्यावर त्यातून इर्षा जन्माला येते. माझ्याकडे पण हा सगळा ताकझाक हवा, असे वाटू लागते, त्यासाठी खिशात असलेले पैसे पुरणारे नसतात. म्हणून अधिकाधिक प्रयत्न सुरू होतात. ज्या झोपेसाठी रात्र आहे, त्या झोपेच्या वेळी अशा सिरीयल्स पाहून आपल्या झोपेचं खोबरं तर करतोच, पण नको ते मानस रोग पाठी लागतात. आणि दिवस पण खराब करून टाकतो.
म्हणजे रात्रही गेली आणि दिवसही गेला.
एवढंही पुरत नाही, म्हणून हायफाय वायफाय सुरू करून घेतलं. नको ते चॅटींग, रात्री अपरात्री सुरू झालं. डोक्यावरून पांघरुण पांघरून गप्पा रंगू लागल्या. या मॅच्युअर गप्पा अजाण पालकांना समजू नये, याचा ताण सुरू झाला. नेहमीच्या गप्पागोष्टी नकोश्या वाटू लागल्या. वेळ कसा जातोय, ते लक्षात येईनासं झालं. अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडून पडू लागलं. हुशार मुलांची आणि बुद्धिमान मुलींची बुद्धी गहाण पडू लागली. जागरणं घडू लागली आणि नको ती स्वप्न पडू लागली.
रात्रीचर्या बिघडू लागली.
तरूण तरूणींच्या चेहेऱ्यावरील चर्या बिघडू लागली.
दिवस आणि रात्रीची कामं पुरती बदलून गेली आणि समाजाची घडी सगळी विस्कटून गेली.
यम नियम न पाळता, अनावश्यक आरोग्य नियम, यम बनू लागला आणि "यम" आपला पाश आवळू लागला.
जगण्याची भीती वाटू लागली आणि मरण येऊ नये म्हणून औषधे ही गरज बनली.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.05.2017
May 21, 2017
जवस हे तेल बीज चवीला गोड,कडू,उष्ण असते.हे स्निग्ध,पचायला जड असते.हे शरीरातील कफ व पित्त दोषाचा नाश करतात व वातदोष वाढवितात. जवसाचे बी हे डोळ्यांच्या आरोग्यास अहितकर असते.तसेच ते शुक्रधातूचा नाश करते.
ह्या जवसामधील ओमेगा ३ फॅटी अॅसीड्स हे हृदयाचे आरोग्य उत्तम राखायला मदत करतात.तसेच शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर ती देखील जवस वाढायला मदत करतात.
जवसाची चटणी करतात किंवा त्याचे तेल ही काढले जाते.आता आपण ह्या दोन व्यंजनांचा शरीरावर होणारा परिणाम पाहूया:
१) जवस चटणी:
तिखट,गोड,कडू,स्निग्ध,भुकवाढविते,उष्ण,
वात,कफनाशक,पित्तकर,शुक्रधातू नाशक,हृदयविकार नाशक आहे.
२) जवस तेल:
गोड,उष्ण,पचायला जड,स्निग्ध,कफ पित्तकर,वातनाशक,बल्य,संडासला साफ करविणारे,त्वचारोग नाशक,चरबी कमी करणारे,आहे.
जवस व मोहरीचे तेल हे जरी स्निग्ध असले तरी अन्य तेलांपेक्षा हि दोन्ही तेलं थोडी रूक्षच असतात.
जवसाचे अतिसेवन केल्यास अशक्तपणा येऊ शकतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
January 8, 2017
छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.
August 16, 2016
सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव.
तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते.
हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत.
सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत.
हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. )
स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे काम ही चव करते. या एका अति महत्वाच्या गुणामुळे ती वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रिय झाली आहे.
रक्तवाहिनींचा संकोच करीत असल्यामुळे रक्तस्राव थांबवणारी,त्यामुळे शस्त्रकर्मींना हुकुमी शस्त्रच जणु !
आतड्यांचे, गुदमार्गाचे आकुंचित करत असल्यामुळे अतिसार कमी करणारी, सहन होत नाही, सांगताही येत नाही वाले सगळे खुश !
तसेच पित्त वाहिनीचा संकोच झाला तर पित्ताचे स्रवण पण कमी करण्यासाठी वापरली जाणारी, म्हणजेच पित्तशामक गुणाची त्यामुळे गॅस्ट्रोएन्टराॅलीस्टना भक्कम आधार देणारी.
रोमकुपांचा संकोच झाल्यामुळे घाम कमी करणारी, त्यामुळे त्वचारोग तज्ञांना सावरून घेणारी.
शुक्रवाहिनीचा संकोच झाल्यामुळे शुक्राच्या बाहेर पडण्यावर बंधन आणणारी, म्हणून शीघ्रस्खलनामधे उपयोगी ठरणारी, म्हणजेच सेक्स स्पेशालिस्टच्या भात्यातील मदनाचा बाणच जणु !
केस जिथून उगवतात, त्या पेशींना आकुंचित करत असल्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे स्त्रीयांची जीवश्च कंठश्च सखी !
मूत्रमार्गाचा अवरोध करत असल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी करवणारी, म्हणून मधुमेह तज्ञांना मदत करणारी
स्थूलता कमी करण्यासाठी, भूकेवर संयम आणण्यासाठी पण ही तुरट चव वापरता येते. म्हणजे ढेरपोटे, तुंदीलतनु कमी करण्यासाठी धडपडणारे स्लीम सेंटर वाले भी खुश !
हिरड्यांना बलदायक आहे. म्हणून प्रत्येक दंतमंजनामधे वापरली जातेच जाते. दातांची हलणारी मुळे या संकोच गुणामुळे मजबूत होतात. म्हणजे सर्व दात पाडणारे तज्ञ पण खुश !
गुणांचा अभ्यास केला की द्रव्य कोणतेही असो, ते कसे काम करेल, याचा अंदाज बांधता येतो आणि इच्छित ठिकाणी जावून औषध काम करते.
यासाठी युक्ती वापरावी लागते. ही ज्याच्याकडे आहे तो बुद्धिमान यशस्वी होतो.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
26.11.2016
November 26, 2016
अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ?
उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं.
सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा तेवढा आतून वहाणारे द्रव पदार्थ जास्ती प्रमाणात जाणार. आणि जेवढा पाईप लहान तेवढा द्रव पदार्थ देखील पुढे ढकलायला जास्ती कष्ट पडणार. हे व्यावहारिक सत्य आपण बघतोच. बरं ही स्रोतसे आतून गुळगुळीत असतील तर आतील पदार्थ पटकन पुढे ढकलला असता. पण स्रोतसे आतुन वरखाली असतात. नुसत्या डोंगर आणि दऱ्या. याकरीता या स्रोतसांमधे लाळेसारखा एक बुळबुळीत पदार्थ सतत स्रवत असतो. यामुळेच तर अन्नाचा गोळा हळुहळू पुढे ढकलला जातो. पण स्रोतसांना चिकटणारे पदार्थ आत गेले तर या स्रोतसांच्या हालचाली थोड्या मंदावतात. आतमधे या आम सदृश पदार्थाचे लेपन झाल्यामुळे यांचा आकारदेखील थोडा लहान होतो. त्यामुळे आतील द्रव ज्या वेगाने पुढे सरकला पाहिजे, त्या वेगाने पुढे सरकत नाही.
दिवसाची मिळालेली सूर्याची उष्णता, या स्रोतसांमधील आतून चिकटलेला कफसदृश द्रवपदार्थ विलयीत करते आणि स्रोतसांचा आकारही वाढवला जातो, आणि अन्न पदार्थ सहजपणे पुढे ढकलायला मदत होते.
हे सर्व काम दिवसा उजेडी झाले तर बरे ना. म्हणून दिवसा जेवावे.
आणि रात्री सूर्य नसल्यामुळे स्रोतसांचे आकुंचन सुरू होते. स्रोतसे संकुचित होतात. आतून वाहाणारा द्रवाहार सावकाश जातो. काही वेळा तर अडकूनच रहातो. त्याला मागाहून येणारा रस चिकटत जातो. थरावर थर लागत जातात आणि स्रोतसांचा आकार आणखीनच कमी होतो. स्रोतसांमधे आतून साठण्याची वृत्ती वाढली की गोळा बनत जातो.
लहान रस्त्यावर ट्रॅफिक स्लो होते, रस्ता मोठा असला तर ट्रॅफिकजामची भीती नसते. म्हणून दिवसाचे अन्न लवकर पुढे सरकते, आणि पचते आणि रात्रीचे उशीरा !
ही संकोचनाची क्रिया होऊ नये या करीता, गती आणि उष्णता दोन्ही गोष्टी हव्यात. हे चक्क भौतिकशास्त्र सांगितलेले आहे.
ग्रंथकार एक सूचना अवश्य करीत आहेत. जर सायंकाळी घेतलेले अन्न चांगले पचले नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागेपर्यंत जेऊ नये. पण दिवसाचे अन्न पचले नसेल तर परत सायंकाळी जेवले तरी ते दिवसभराच्या उष्णतेमुळे पचून जाते.
याचा दुसरा अर्थ सायंकाळी जेवताना नीट विचार केल्याशिवाय जेऊ नये. एवढे लक्ष सायंकाळच्या जेवणाच्या वेळेवर ठेवावे.
कारण,
जंतुंची वाढ देखील रात्रीच्याच वेळी होते.
कारण त्यांचाही रात्रीस खेळ चाले....
हे आयुर्वेदातील जीवशास्त्र..
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.03.2017
March 12, 2017
भारतीय परंपरेतील बिछाना हा असाच होता. जमिनीवर अथवा एका लाकडी बाकावर पथारी पसरायची की झाले ! त्यावर एखादी चटई, धाबळी, घोंगडी, सतरंजी, गोधडी, रजई, किंवा शाल. झोपल्यानंतर इंग्रजी एस आकाराचा पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीला समांतर टेकला जावा. ज्यामुळे मेरूदंडातील सर्व मणके देखील एका सरळ रेषेत येतात. आणि मज्जारज्जूवरील ताढ कमी होतो. म्हणजे मणक्यातील अंतर वाढणे, कमी होणे, मणक्यातील गादी सरकणे, गादीला सूज येणे, त्यामुळे होणारी पाठदुखी, कंबरदुखी, मुंग्या येणे आदि प्रकार कमी होतात.
February 6, 2018
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
ग्रंथकार म्हणतात, निरोगी राहायचे असेल तर नेहेमीच क्षमावान असावे. काही वेळा प्रश्न पडतो, क्षमावान असण्याचा आरोग्याशी संबंध कसा काय बुवा ?
क्षमाशीलता हे वीराचे भूषण आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे, तोच म्हणू शकतो, " जा, तुला क्षमा केली ! "
क्षमा याचना कधी केली जाते ? जेव्हा आपली चुक आपल्याला उमजते तेव्हाच. माझी चुकच नाही तर मी क्षमा कशाला मागू ? आणि क्षमा मीच का मागू ? हा प्रचंड अहंकार पाठी लागतो. एकदा का अहंकाराची कीड आत गेली तर तिला बाहेर काढणे खूप कठीण होते. म्हणून वेळीच सावध होऊन मनाला आवरावे.
I am sorry.
हे तीन शब्द मोठमोठ्या चुका माफ करून जातात. व्यवहारात अशी परिस्थिती अनेक वेळा येत असते. एक शब्दाचा कमीपणा स्विकारायला आपण तयार नसतो आणि काट्याचा नायटा होतो. ठिणगीचे रूपांतर आगीत, आणि आगीचे रुपांतर फुफाट्यात होते. जेव्हा समजते तेव्हा खूप काही गमावलेले असते. परस्परांवरील विश्वास ! मन दुखावते, माणसे दुरावतात. यासाठी हे तीन शब्द उपयोगी पडतात, आय अॅम साॅरी.
जर मनात असूनही हे शब्द जर वेळीच ओठात आले नाहीत, तर वेळ निघून जाते. गैरसमज वाढत जातात. ताण निर्माण होतो. आणि अनेकानेक व्याधी जन्माला येतात.
ज्याची क्षमा त्याच्याकडेच मागावी. तर ती माफ होते. आणि विनाअट मागावी. अट ठेवून माफी मागणे याला क्षमा म्हणत नाहीत, "जर माझ्या शब्दाने, कृतीने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माफी मागत आहे" ही अशी सशर्त क्षमा मागणे फक्त राजकारण्यांना जमू शकते. तो आपला प्रान्त नाही.
आज व्यवहारात त्याचे परिणाम देखील दिसतात. साध्या पोटदुखीपासून जाडी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, पॅरालेसीस, कॅन्सर, हे शारिरीक. नैराश्य, चंचलता, निद्रानाश, चिडचिड इ. मानसिक तर खोटे बोलणे, चोरी करणे, पापकर्म करणे, व्यसन जडणे, असे आध्यात्मिक व्याधी जन्माला येतात.
क्षमा करणारा मोठा असतोच, पण क्षमा मागायला सुद्धा दिलदारपणा असावा लागतो. मन तेवढं मोठ्ठं असावं लागतं. पण आपल्या मनात नसताना, पटलेलं नसताना, कधीही दुसऱ्याची क्षमा मागू नका, कारण जर मनाला पटलेले नाही आणि पटल्याचे नाटक जर करीत राहिलात तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, पण स्वतःला नाही.
यातून तणाव जन्माला येतो. म्हणजेच ताण आणि तणाव वाढण्याचे कारण सत्पात्री क्षमा न मागणे आणि कुपात्री क्षमा मागणे हे आहे.
षड्रिपू पैकी सर्वात मोठा जो अहंकार, याचा शत्रू क्षमा आहे. म्हणजेच अहंकाराचा नाश क्षमेने होतो. तेथे सुद्धा भेदभाव नको. समानता हवी.
तुकोबाराया एका ठिकाणी म्हणतात,
क्षमा करणे जे पुत्रांसी,
तेची दासा आणि दासी ।
याचा अर्थ सरळ आणि सोपा आहे.
"तुला म्हणून साॅरी म्हणतो, नायतर...." ही वृत्ती नको, जी क्षमा असमानता दाखवते.
अहो, साधं वाॅटसप गटात जे नियम अॅडमिननी केलेले असतात, ते चुकुन मोडले तर शिक्षा भोगावीच लागते ना ! आणि "साॅरी... चुकुन... " या दोनच शब्दात माफी देखील मिळते, हे तर आपण दररोज पाहातोच. तरीदेखील क्षमा मागायला आपल्याला कमीपणा वाटतो.
वाढत्या रोगांची संख्या लक्षात घेतली तर फक्त तीन शब्दात ती निश्चितपणे कमी करता येईल.
बस्स म्हणायचे.
"आय अॅम साॅरी."
"गलती मेरी है, मुझे माफ करो."
"हं, जरा चुकलंच तेव्हा ! "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०२.०८.२०१७
August 2, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा
पोटात खड्डा पडावा - भाग दोन
खड्ड्यात पाणी आपोआप ओढले जाते.
पण केव्हा ?
जर तो खड्डा रिकामा असेल तरच ! जर तो पाण्याने भरलेला असेल तर ? पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्यात आणखी पाणी कसे ओढून घेतले जाईल ?
अगदी तसेच पोटाचेही होते. सकाळी उठल्यापासून जी काही खायला सुरवात होते, ती रात्री झोपेपर्यंत ! अगदी ओव्हरफ्लो. अगदी पुलंचा अतिशोयोक्ती अलंकार वापरायचा झाला तर.....
......एवढे श्रीखंड हाणले की, "नको आता. पुरेऽऽ" एवढे शब्दही त्याच्या तोंडून उच्चारवेनात. त्याच्या घशात बोट घातले असते तर, बोटाला पोटातले श्रीखंड लागले असते.......इथे पोटात खड्डा कुठचा ? मिठी नदीचा जणुकाही महापूरच लोटतो.
अतिशोयोक्ती सोडून देऊया, पण अगदी आकंठ जेवल्यावर जी सुस्ती येते, ते सुख पुढे जाऊन, दुःखाचे कारण बनणारे असते.
बरं त्यानंतर काही किरकोळ काम करावे, त्याने पोट थोडे फार हलेल, तर तेही नाही. एवढे टम्म जेवल्यावर पोट हलायची बातच नाही. अंथरूण पसरून, पांघरुण घेऊन, पाय ताणून दिले, की पोटात पचनासाठी आलेल्या भगवान विष्णुंनी करायचे तरी काय ?
( संदर्भ - अहं वैश्वानरोभूत्वाम्.....पचाम्यति चतुर्विधम )
ते बिचारे ताटकळत वाट बघताहेत, "आता याची कुस बदलेल, मग तिथल्या कुशीखाली दबले गेलेले अन्न, मला पचनासाठी घेता येईल".
पण कुठचे काय ! दोन तास झाले तरी, पोट हलायची बातच नाय. खड्डा कसा पडणार ? बिचारे भगवान वाट बघून निघूनही जातात. मग काय होणार ?
बरं असं एखादा दिवस झाले तर ठीकाय, पण असं दररोज व्हायला लागलं तर काय करणार ?
दरवाज्याला कुलुप बघून भांडी कामवाली बाई जशी परत निघून जाते, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नेहेमीच्या वेळेवर परत येते, तोपर्यंत बाथरूममधल्या, तसेच पाणी खात पडलेल्या भांड्यांमधे पुनः रात्रौची भांडी अस्ताव्यस्त अडकून पडलेली असतात., 'तिची' वाट बघत ! बाथरूममधे अगदी पाय टाकायला पण जागा उरलेली नसते.
तसंच पोटातल्या अन्नाचं होतं. वेळेत पचन झालं नाही. जर हा खड्डा तयार झाला नाही तर काय होणार ? हा खड्डा, ही रिकामी जागा तयार होणं महत्त्वाचे असते.
मुख्य नदीतील पाणी जर ओहोटीच्या वेळी समुद्रात गेले तरच, नदीला जोडल्या गेलेल्या छोट्या छोट्या ओहोळातील पाणी, कचरा, घाण इ. अडकलेले पदार्थ पुनः नदीच्या पात्रात ढकलले जातील तसे, मुख्य स्रोतसातील अन्न पुढेपुढे ढकलत जाऊन, तिथे जागा झाल्याशिवाय आजूबाजूच्या छोट्या स्रोतसातील चांगले वाईट स्राव मुख्य स्रोतसामधे कसे पोचणार ?
तसेच पोटातही, खड्ड्याची जागा होणे, जागे राहून, अन्नाला, आणि अन्न पचनासाठी आलेल्या इन्शुलीन सारख्या स्रावांना, जागा करून देणे महत्त्वाचे असते. जर आत जागाच नसेल तर, "पॅन्क्रीयाज" मधे तयार झालेले "इन्शुलीन" आत जागा नाही या एका कारणास्तव, कुलुप असलेल्या दरवाजासमोर वाट पहाणाऱ्या कामवालीसारखे, काहीच करू शकत नाही. बिचारे पोटात उतरूच शकत नाही. आणि परत आपल्या स्वस्थानी जाते. तिचे अधिपती भगवान विष्णु स्वरूपी मेंदू महाराजांना ही बातमी कळते, ते देखील "दखल घेतली", असं म्हणण्या पलीकडे काही करू शकत नाहीत.
अशी जागा, असा खड्डा जर तयार नसेल तर......??
तर पालक विष्णुंचा कोप होऊन ते एक दिवस म्हणतील, "जावा खड्ड्यात! "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
04.05.2017
May 4, 2017
आतमधे साधं मोबाईलवर बोलत बसलो तरी जे तोंड उघडं रहातं, तेवढा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे भलाई यातच आहे की रिकाम्या हातानी आत जावं आणि लगेचच रिकामं होऊन यावं.
February 16, 2018

पुर्वीच्या काळी खोडकर विद्यार्थी वर्गात ह्याच्या शेंगा वरील लव बाकावर अथवा शिक्षकांच्या खुर्चीवर घालून मुलांच्या व शिक्षकांच्या नाकी नऊ आणत अशी हि खाजकुहिली.जिच्या शेंगेवरील लवंगेचा स्पर्श जर अंगास झाल्यास भयंकर खाज सुटते.
ह्याचा वर्षायू वेल असून पाने ७-१३ सेंमी लांब,त्रिदलीय असून पानांवर बारीक लव असते.फुल १५-३० सेंमी लांब व मंजिरी स्वरूप असते.फुले वांगी निळ्या रंगाची असतात.फळ शेंगेच्या स्वरूपात ५-१० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असते ह्याच्या कडा वाकड्या असून शेंगेवरील दाट लव असते.प्रत्येक शेंगेत ५-६ धुरकट व चपट्या बिया असतात.बीज मज्जा पांढरी असते.
ह्याचे उपयुक्तांग बीज,मुळ व रोम असून कपिकच्छू चवीला गोड,कडू असून थंड गुणाची व जड व स्निग्ध असते.हे गोड,जड व स्निग्ध असून वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)फलरोम क्षोभ उत्पन्न करून कृमिनाशक कार्य करतात म्हणून फल रोम हे गुळ,मध व लोण्यासह मिसळून देतात व त्यानंतर रेचक औषध दिले जाते ज्यामुळे कृमी मरून पडतात.
२)कपिकच्छू बीज शुक्रवृद्धि करते म्हणून नपुंसकत्वात हे उपयुक्त आहे.
३)कपिकच्छू मुळ हे आर्तवजनन असल्याने मासिकपाळीच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.
४)कृशता व अशक्तपणा ह्यात कपिकच्छू बीज उपयोगी आहे
५)गोड चव व थंड असल्याने बाळंतीणीमध्ये स्तन्यवृद्धि करण्यास कपिकच्छू बीज उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
January 15, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti