आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ
विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.
औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.
औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
...... श्रद्धय हरिकिर्तनम।
मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.
अकाल मृत्यु हरणम्
सर्व व्याधी विनाशनम्,
विष्णुपादोदकं तीर्थे
जठरे धारयाम्यहम् ।
असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.
हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)
आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.
"मेरे लिए दुवा करो,"
"प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.
केवळ औषध काम करत नाही.
हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
27.04.2017
April 27, 2017
आहारातील या ग्लोबल बदलाचे परिणाम रोग स्वरूपात भोगावे लागणार आहेत हे नक्की. बदलाचे परिणाम आपणा सर्वाना समोर दिसत आहेत. सुदृढ, काटक, कोकणी माणसाची पोटे सुटु लागली. बुद्धीजीवी, बैठे काम करणारा श्रमजीवी शेतकरी, मधुमेहासारख्या आजाराच्या फाईल्स, मोठ्या अभिमानाने डाॅक्टरांच्या टेबलवर आपटून टाकू लागला.
December 6, 2016
सदा सर्वकाळ मिळणारी हि भाजी दोन प्रकारात मिळते लाल व पांढरा माठ (पांढरा म्हणजे हिरवा बरंका नाहीतर तुम्ही पांढ-या पानांची भाजी समजाल ?).हि भाजी तशी लई फेमस कारण हि सगळीकडेच मिळते.
ह्या भाजीबद्दल देखील लोंकात मिश्र भावना आढळते काहीजणांची आवडती तर काही जणांची नावडती.लालरंगामुळे मुलांना आवडते पण काही वेगळी कल्पक बुद्धीवापरून काही चटपटीत,सुंदर आणि पौष्टिक असे काही करून दिल्यास.
ह्या भाजीचे देखील वेगवेगळे प्रकार करून आपण खाऊ शकतो जसे सुकी भाजी,पिठ मारून,रस्सा भाजी,कटलेट इ.पण खरोखरच हि भाजी शेतात आणि शिजवून केल्यावर देखील सुंदर दिसते.
हि भाजी चवीला गोड,थंड आणि पित्तकमी करते पण कफ व वात दोष वाढविते.
ह्या भाजीचे देखील औषधी उपयोग आहेत.आता आपण ते पाहूयात.
१)माठाच्या पानांची चटणी हळद व मीठ घालून गळवांवर बांधावे गळू लवकर पिकुन फुटतो.
२)पायांच्या भेगातून रक्त येत असेल तर माठाचा रस+ एरंडेल तेल घालून मलम करावे व ते भेगांवर लावावे.
३)हिरड्यांतून रक्त येत असल्यास माठाच्या रसाने गुळण्या कराव्यात.
४)तीक्ष्ण औषध उपचारानंतर शरीर अशक्त होते तेव्हा माठाची बिन्मसाल्याची भाजी गव्हाचे फुल्क्यांसह खावे व माठाचा रस घालून पाणी प्यावे.
५)बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास माठाची भाजी आठवड्यातून एकदा खावी व पोटास मोहरीचे तेल लावावे.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्याने वारंवार शौचास होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 20, 2016
शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता?
भात किंवा भाकरी.
प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते.
ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो.
बाजुला पोळी असते.
आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. ज्वारी बाजरी किंवा मका गहू यापासून बनवलेली रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी हा जेवणातील मुख्य पदार्थ होतो.
रोट म्हणजे हातावर किंवा पाटावर थापून, जाडसर केलेले असतात. तव्यावर एकदा आणि तवा उतरवून पुनः थेट अग्निवर, असे दोन वेळा हे रोट भाजले जातात. आकाराने मोठे ते रोट. आकाराने जरा लहान ती रोटी. रोट, रोटी आणि भाकरी यात आणखी एक फरक आहे तो म्हणजे भाकरीला गरम तव्यावर घातले की लगेच पाणी लावले जाते. रोटीला पाणी पण नाही तवा पण नाही. थेट अग्नीच्या संपर्कात.
अग्निचा संस्कार जेवढा जास्त तेवढा पदार्थ पचायला हलका. हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवावे.
हे रोट भाजताना जर तंदुर वापरली, म्हणजे अग्नि आणि रोट यामधे तव्याचा कोणताही अडथळा न येता हे जाडेभरडे रोट थेट अग्नीवर खमंग भाजले जातात. त्यातील पाणी लवकर सुकवले जाते. ते फुलतात, फुगतात, पापुद्रा वेगळा होतो. आतपर्यंत उष्णता जाते आणि पचायला हलके होतात. पोटही लवकर भरते.
हे तवे पूर्वी खापराचे किंवा मातीचे असायचे. नंतर लोखंडी किंवा बीडाचे म्हणजे मिश्र धातुचे असायचे. आता हिंडालियमचे. हिंडालियम हा पण एक मिश्र धातु. आजचे विज्ञान सांगते, या धातुची झीज लवकर होते. उष्णता मिळाली की त्याला चरे पडतात, त्यातील धातु अन्नातून पोटात जातात. म्हणून त्याचा वापर नियमितपणे जेवणात असेल तर मूतखडा होण्याचे प्रमाण वाढते. किंवा जो विषारी आहे. इंग्रजांच्या काळात बंदीवान कैद्यांना तुरूंगातील भोजन याच अॅल्युमिनीयम वा हिंडालियमच्या ताटल्यातून दिले जायचे. पिक्चरमधे आपण बघतोच.
आज आम्ही ही अॅल्युमिनीयम हिंडालियमची भांडी, स्वस्त वाटतात म्हणून, पटकन स्वच्छ होतात म्हणून, आमच्या घरात वापरायला सुरवात करून, स्वतःलाच स्वतःच्या घरामधे बंदिस्त कैदी बनवून टाकले आहे.
लवकरच सुटका करून घ्यायला हवी ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.10.2016
October 23, 2016
मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हा प्रामुख्याने मेंदूचा व स्पायनल कॉर्डचा तपास करण्यासाठी वापरला जातो. दमादियन आणि लॉटरवर्ग या शास्त्रज्ञांनी विद्युतचुंबकीय क्षेत्राचा वापर करुन, संगणकाच्या सहाय्याने शरीराच्या विविध भागांच्या उभ्या, आडव्या, तिरक्या अशा कोणत्याही अॅंगल्समध्ये प्रतिमा काढून प्रतिमा विच्छेदन शास्त्रच प्रगत केले (इमेजिंग सर्जरी).
December 3, 2010
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे सत्तेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग पाच
शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये. गरज लागल्यास कोणाला तरी सोबत घेऊन जावे, म्हणजे अपघात, चोर, शत्रू, यांच्यापासून भय राहात नाही. रात्रौ घराबाहेर जाताना डोक्यावर शिरस्त्राण घालूनच बाहेर पडावे. दिवसा तशी आवश्यकता नाही.
भर दुपारी, सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी रात्री मध्यरात्री तीन किंवा चार रस्ते जिथे मिळतात, तिथे बसू नये. जिथे पूर्वी कोणाची हत्या (खून) झाली असेल असे जंगल, पडकी घरे, स्मशान इ. ठिकाणी दिवसा पण जाऊ नये.
अगदी चॅलेंज स्विकारून, कुणीतरी जातीलही, पण जो धक्का मनाला बसलेला असतो, त्यातून सावरणे कठीण होते, हे नक्कीच! अश्या धक्क्याने बनलेले अनेक मानसिक रुग्ण पाहायला मिळतात.
हे एवढे सगळे सांगण्याचे कारण केवळ भूताटकी नव्हे तर, अशा जागी दिवसा अथवा रात्री गेल्यास एकांतामुळे, निर्जन स्थळी गेल्यावर, आपल्याला काही झालेच तर कोणाला कळणार देखील नाही. यासाठी आपला जाण्याचा ठावठिकाणा सांगून बाहेर पडावे, आपली ओळख पटेल असे काहीतरी आपल्याजवळ असावे, घरच्यांना संपर्क करता येईल, असा फोन नंबर नाव गाव पत्ता खिशात अथवा पर्समधे ठेवावा.
त्या ठिकाणात भर म्हणून हाॅस्पीटल्सचा उल्लेख देखील करायला हरकत नाही. रूग्णाला बघायला हाॅस्पीटलमधे गेलं नाही तर लोक काय म्हणतील? काही लोकामध्ये यावरुन रागरुसवे पण होतात. पण खरच हाॅस्पीटलमधे गर्दी केली तर तिथल्या व्यवस्थापनेला पण अडचण होते. तिथे बघायला येणाऱ्या मंडळींच्या नकारात्मक चर्चेने बऱ्याचदा रूग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचे मनोबल कमीच होते.
शिवाय तेथील वातावरण, वास, रुग्णांचे विव्हळणे, मृत्युनंतरचा आलाप, अपघातात क्षतीग्रस्त रुग्णांचे रक्त, मांस इ. पाहायलादेखील भीती वाटते. चक्कर येते, मग अशा ठिकाणी कमकुवत आणि कोमल भावनाप्रधान मनाच्या मंडळीनी अजिबात जाऊ नये. गर्भिणी, वृद्ध, लहान मुलांना तर अजिबात नेऊ नये.
वाढ(व)लेल्या रोगामुळे जी भीती मनात निर्माण झाली आहे, त्या भीतीपोटी अनेक वेळा आपले मन कच खाते आणि दोरीला साप समजू लागते. आणि पोटातील गॅसला किंवा वाढलेल्या पित्ताला हार्ट अॅटॅक समजू लागते. मग रात्रीच्या वेळी डोक्यावर पडलेल्या पानाला सुद्धा मन घाबरते. आणि शरीरातील काही हार्मोन्स बदलतात. एकदा हाॅर्मोन्स बदलू लागली की एकाचा परिणाम दुसऱ्या ग्रंथीवर होतो आणि सगळं च बिनसते. जसे सुरू असलेल्या घड्याळातील एकच काटा आपण हलवू शकत नाही, तीन काटे फिरायच्या अगोदर आतील काही चक्रे फिरतात, तेव्हा ते तीन काटे हललेले आपणाला दिसतात, तसंच शरीरात देखील एक हाॅर्मोन बदलवण्याचा प्रयत्न केला की, त्याबरोबर इतर हार्मोन्स देखील आपोआपच बदलतात, जे शरीराला हानीकारक असते.
हे बदल कोण करतंय तर भीतीयुक्त मन ! म्हणून जिथे भीती उत्पन्न होईल अशा ठिकाणी शक्यतो एकट्याने जाऊ नये. ज्यांची मनं निर्ढावलेली आहेत, त्यांची गोष्ट वेगळी !
सावध करणे हे आमचे काम आहे, ज्यांना स्मशानात जाऊन झोपावेसे वाटते, त्यांना स्मशानही मोकळे आहेच.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०५.०९.२०१७
September 5, 2017
आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ.
सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात.
आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात.
गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील.
भारतीय आहारात पंधरावीस प्रकारचे मुख्य पदार्थ मसाला बनवण्यासाठी वापरले जातात. मुख्यत्वेकरून मिरी, दालचिनी, लवंग, बडिशेप, खसखस, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, धने, मोहोरी, हिंग, हळद, यासारखे सुके पदार्थ वापरले की सुका मसाला आणि कांदा, लसूण, नारळ, शेंगदाणे वापरून केलेला ओला मसाला होतो.
मसाल्यातील एक दोन पदार्थ कमी जास्त केले की, मसाल्याचा स्वाद बदलत जातो. जिरे जास्ती वापरले की तो पावभाजीचा मसाला होतो, धनेपावडर जास्त वापरली की सांभार मसाला होतो. त्यामुळे प्रत्येक तिखट पदार्थ कमी जास्त प्रमाणात आपले परिणाम दाखवतात.
गंमत अशी आहे, हे मसाल्याचे पदार्थ तर सर्वच गृहिणी वापरतात, पण हे सर्व मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदीय औषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यांचा युक्तीने वापर केला तर आपला आहार हेच परिपूर्ण औषध होऊ शकतो, हे ज्या गृहिणींना समजले, त्या सुगृहिणी !
या प्रत्येक मसाल्यामधे एकतरी उडनशील तेल असते, जे त्या पदार्थाला विशिष्ट सुगंध, आणि विशिष्ट चव देते. हे तेल औषधी असते, औषध म्हणून पोटात जाणे अपेक्षित आहे.
पण जीभेच्या चोचल्याच्या मागे लागून आपण खमंगपणा वाढण्यासाठी मसाले भाजून वापरायला सुरवात केली आणि मूळ औषधापासून, आहार लांब होत गेला.
काही औषधी बनवताना भाजावी लागतात, शिजवावी लागतात, तळावी लागतात, त्यातील काही पदार्थांचे गुण वाढवायचे असतात तर काहींमधले दोष काढावयाचे असतात, जसे हिंग हा तुपात भाजून वापरावा, मोहोरी तेलात तडतडल्यावर शुद्ध होते. म्हणजे त्यातील उष्णतीक्ष्ण गुण थोडे कमी होतात.
त्यामुळे हा अग्निसंस्कार करणे आवश्यक असते. पण काही ठिकाणी मात्र हे मसाले औषध पूर्ण तयार झाल्यावर कच्च्या स्वरूपात वरून घालायला सांगितले आहे. याला आयुर्वेदीय औषधांच्या परिभाषेतमध्ये प्रक्षेप म्हणतात.
मसाल्याचे पदार्थ भाजले की त्यातील उडनशील तेल उडून जाते, जे पोटात जाणे अपेक्षित असते, त्यामुळे मसाला न भाजता आहारात वापरला तर आपले जेवणच औषधी होईल. म्हणजेच युक्ती वापरली तर आहार हेच औषध बनते.
"आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील तारांगणे" च्या धर्तीवर हे मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाहीत, असे ठरवले तर जेवणातील औषधी भाग जवळपास संपूनच जाईल.
तिखट खाऊच नका, असे म्हणण्यापेक्षा युक्तीने तिखट खा, असे म्हणणे जास्त गोड वाटते ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
11.11.2016
November 11, 2016
अकाल मृत्युहरणम
सर्वव्याधिविनाशनम,
विष्णु पादोदकं तीर्थं
जठरे धारयाम्यहम् ।।
तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं.
त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा.
तसेच
अच्युतानंद गोविंद
नामोच्चरण भेषजात ।
नश्यन्ति सकला रोगाः
सत्यम् सत्यम् वदाम्यहम् ।।
हा श्लोकदेखील म्हणतात.
अन्न असो वा औषध, देवाचं नाव घ्यावं आणि निश्चिंत व्हावं.
मी परत परत खात्रीनं सांगतोय, असं श्लोककर्ता वारंवार बजावून सांगतोय, पण नाही पटत.
औषधं सर्व रोगानाम्
श्रद्धया हरिसेवनम असं वाग्भटाचार्यदेखील म्हणतात.
काही गोष्टींची कारणमिमांसा केली तरी बुद्धीच्या स्तरावर उत्तरे मिळत नाहीत. अनेक औषधे तयार करत असताना काही विशिष्ट श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणावेत, म्हणजे औषधाची कार्यकारी क्षमता वाढते.
याला अनुभवाशिवाय दुसरा वैज्ञानिक पुरावा काय देता येणार.
मी घेत असलेले अन्न किंवा औषध हे ईश्वरीय इच्छेने घेत आहे, माझे कर्तृत्व शून्य आहे. अशी मनाला सम किंवा शून्य स्थितीत आणून ठेवणारी अवस्था निर्माण करून जेव्हा अन्न वा औषध सेवन केले गेले तर त्याचे परिणाम सकारात्मक दिसतात, असे आजचे मानसोपचार तज्ज्ञ देखील म्हणतात.
हे केवळ भारतीय लोकच म्हणतात, असंही नाही, होमीयोपॅथीमधे पण आय ट्रीट, ही क्युयर्स असंच म्हणतात ना !
अगा म्या नाही केले असे माऊलींचे शब्द आहेत. असो.
अन्न सेवन करत असतानाची भावना महत्वाची असते. म्हणून अन्नसेवन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा.
यात आणखी एक भाव असतो, तुझेच तुजला अर्पण !
तूच तुझ्या शक्तीने तयार केलेले, तुझे अन्न मी तुला अर्पण करतो.
ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवाला आम्हीच बनवले आहे, आम्हीच निवृत्त केले आहे, अश्या विचारसरणीच्या मंडळींनी देखील त्या अज्ञात शक्तीला शरण जावे, आपण घास घेण्यापूर्वी हा विचार जरूर मनात निर्माण करावा.
आता नैवेद्यातील कर्मकांड.
वाढलेल्या पानाभोवती पाणी हातात घेऊन, ताटाभोवती डावीकडून ऊजवीकडे गोलाकार फिरवावे. आणि ताटातील चार सहा शीते बाहेर काढून ठेवावीत. पाण्याची ही गोलाकार रेषा ही ताटात येणाऱ्या सूक्ष्म जीवांसाठी जणुकाही लक्ष्मणरेषा तयार झाली. आता बाहेरील जीव ताटात येणार नाहीत, पण त्यांना सुद्धा आपल्यातील अन्नाचा भाग मिळावा, पाण्याच्या काढलेल्या रेषेवरून, अन्न शोधत येणार्या जंतुना पटकन अन्न मिळावे. म्हणून चित्राहुती.
असंही असू शकेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
11.09.2016
September 11, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 38
नैवेद्यम् समर्पयामी - भाग बारा
अन्नंब्रह्मारसोविष्णुर्भोक्तादेवोमहेश्वरः।।
अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्नाच्या सहा चवी या स्वयं विष्णु आहेत. आणि भोजन करणारा हा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आहेत. म्हणजे आपण जे जेवतो ते भोलेनाथांसाठी असा भाव ठेवावा.
अहं वैश्वानरोभूत्वाप्राणिनांदेहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नंचतुर्विधम् ।।
अमृतोपस्तरणमसी...पाश्य मौनी ।
.....जलंस्पृष्ट्वा यथेष्टं भोजनंकुर्यात् ।।
एकदा जेवायला सुरवात केली की जेवण संपेपर्यंत मौन पाळावे. यथेष्ट (यथेच्छ नव्हे ! यथा इष्ट, म्हणजे जे आपल्या प्रकृतीला योग्य असेल ते! आणि यथेच्छ म्हणजे मला जे खावेसे वाटते ते. किती फरक आहे ना ! शेवटी आरोग्य महत्त्वाचे!
जेवण पूर्ण झाले की, जी आपोषणी घ्यायची असते, त्या पळीभर पाण्यामधील अर्धे पाणी अंगठ्यावरून पितरांसाठी जमिनीवर सोडायचे असते.
किती सूक्ष्म विचार केला आहे पहा, हात आणि तोंड धुवायला अंगणामधे जावे. (ताटामधेच किंवा बाऊलमधेच पुचुक पुचुक करू नये.) येताना पायावर बाहेरील जमिनीवरचे जे जीवजंतु अंगावर येऊ नये म्हणून परत येताना सुद्धा हातपाय धुवूनच घरात यावे. (अंगणादौ पाणिमुखेसंशोधयेत् । हस्तौ पादौ प्रक्षाल्याचम्य शतपदनिगत्वा।)
हातपाय धुवून येताना पोटावर हात फिरवत यावे आणि अग्निदेवतेला सांगावे, "मी जे अन्न खाल्लेलं आहे ते, काहीही शेष न राहाता जिरून जावे. या देहाला सुख प्राप्त व्हावे, या अन्नामुळे माझे सर्व शरीर रोगरहित व्हावे."
हे म्हणत म्हणत, असा भाव मनात ठेवत, पोटावरून उलटसुलट हात फिरवावा, म्हणजे जेवताना अन्नपाण्याबरोबर गिळली गेलेली हवा किंवा पचनामधून तयार झालेला वात बाहेर येतो. (ज्याला आपण ढेकर म्हणतो.) आणि पचन सुधारते.
(....इत्युदरंपरिमृज्य.....)
(ही सर्व संस्कृत अवतरणे ऋग्वेदीय ब्रह्मकर्म या पोथीतून घेतली आहेत.)
जेवण झाल्यावर पोटावरून हात फिरवणे ही किती छोटी गोष्ट आहे, ( असे रोज दोन्ही वेळा करावे, म्हणजे आपले पोट किती वाढत आहे याकडे आपले लक्ष वेधले जाते हा दूरदृष्टीचा अॅगल ) पण तेवढा सुद्धा वेळ आपल्याकडे असत नाही. पोट पुढे यायला लागले की मग मात्र पोट पुढे आलेल्याच डाॅक्टरांच्या दवाखान्यात किती वेळ जातो, याचे मोजमापच नाही. ????
भोजनापूर्वी कुत्रा, मांजर, पोपट आदि पाळीव प्राणी यांना जेवू घालावे. घरासमोर आलेल्या अतिथीला अन्नदान करावे. घरामागे बांधलेल्या गाईवासरांसाठी गोग्रास काढावा. जेवायला सुरवात करताना भूतबली काढावा, कावळ्याला घास ठेवावा. आणि जेवणानंतर पितरांसाठी अन्नपाणी द्यावे.
असा समष्टी विचार भारत सोडून अन्य कोणत्याही देशात केला जातो का ? केला जात असेल का ?
नक्कीच नाही.
म्हणून तर संपूर्ण जगामध्ये फक्त आपल्या प्रिय भारत देशाला "माता" असे संबोधले जाते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
01.07.2017
July 1, 2017
पंजाब मध्ये प्रमुख आहार घटक असलेले हे धान्य कधी आपण कोकण गोवा प्रांतीय मंडळींनी आपलेसे केले हे आपले आपल्यालाच
समझले नाही.
तरी आता आपल्या प्रदेशामध्ये देखील बरीच मंडळी वेगवेगळ्या स्वरूपात ह्याचे सेवन करताना पण पहातो.जसेरवा,सांजा,पिठ,खीर,पुरी, चपाती,पराठा,लाडू इ.
म्हणूनच ह्या गव्हाचे गुण धर्म आपण ह्या सदरात पाहुया.
गहू चवीला गोड,थंड,पचायला जड,स्निग्ध,सारक,वात पित्त नाशक,कफकर,बलकारक,वजन वाढविणारे,मोडलेले हाड सांधायला मदत करणारे असतात.
आता ह्याच गव्हापासून निर्मित वेगवेगळे पदार्थ व त्यांचे गुणधर्म आपण पाहुया:
१) गव्हाचा मंड:
उष्ण,मल बांधून ठेवणारा,गोड,पित्तनाशक आहे.
२) रोटगे:
गोड,बल्य,कफकर,वातपित्तनाशक,सारक,वजनवाढविणारे,वातानुलोमक,धातुवर्धक,रुचिकर असतात.
३) रोटगे (शेणीच्या थाळीत आग करून धुर नाहीसा झाल्यावर त्यात घालून भाजलेले रोटगे):
पौष्टीक,धातुवर्धक,पचायला हल्के,भुक वाढविणारे,कफनाशक,बल्य.
४) भाकरी:(तव्यावर भाजून मग निखाऱ्यावर भाजलेली):
पचायला जड,बलकर,रुचिकर,पौष्टीक,
धातुवर्धक,कफकर,वातनाशक.
५) सांजापोळी:
पचायला जड,शुक्रवर्धक,कफकर,वातपित्तनाशक
बल्य,वजन वाढविणारी.
६) घारगे:
पचायला जड,वृष्य,बलकारक,रुचिकर,पुष्टीकर,कफकर,वातपित्तनाशक.
७) घिवर:
पचायला जड,धातुवर्धक,हृदयाला बल देणारे,धातुवर्धक,वात पित्तनाशक,कफकर.
८) लाडू:
गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,वात पित्तनाशक,कफकर,शुक्रधातु वाढविणारे,बलकारक.
९) शीरा:
गोड,पचायला जड,कफकर,वात पित्त नाशक,बल्य,वजन वाढविणारे,श्रम हारक.
१०) गव्हाची खीर:
पचायला जड,कफकर,वजनवाढविंणारी, वातपित्तनाशक,वृष्य,धातुवर्धक,शुक्रवर्धक, हृदयाला हितकर आहे.
गव्हाचे पदार्थ खायचा अतिरेक केल्यास कफाचे विकार,स्थौल्य येऊ शकते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti