।।उमापुत्राय नम: बिल्वपत्रं समर्पयामि।।
शंकराला प्रिय अशी हि वनस्पती त्यांचे पुत्र गजानन ह्यांना देखील पत्री म्हणून वाहिली जाते कारण तिच्यात बरेच औषधी गुणधर्म दडलेले आहेत म्हणूनच हे आपणा सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नाही.
बेलाचे झाड हे ८-१० मीटर उंच असते व ह्याच्या बुंध्याचा घेर १-१.२५ मीटर एवढा असतो.हा वृक्ष काटेरी असतो व ह्याची पाने त्रिदल युक्त अर्थातच तीन छोटी पाने मिळून हे पान बनते.फुले हिरवट पांढरी सुगंधी व ४-५ पाकळ्यांची असतात.
फळ मोठे गोल किंवा अंडाकार धुरकट पिवळे असून पिकल्यावर त्यावर नारंगी झाक दिसते.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
कच्चे फळ हे चवीला तिखट,कडू,तुरट असते व उष्ण गुणाचे हल्के व स्निग्ध असते.
तर पिकलेले फळ हे चवीलातिखट,कडू,तुरट,
गोड असते व उष्ण पचायला जड व रूक्ष असते.
हे शरीरातील वात व कफ दोष कमी करायला मदत करते.
आता ह्या बेलाच्या वृक्षाचा उपयोग कुठे केला जातो ते थोडक्यात पाहूयात:
कच्चे फळ हे भुक वाढविणारे,पचनक्रिया सुधारणारे,मल बांधुन ठेवणारे कृमिनाशक आहे म्हणूनच ह्याचा उपयोग जुलाब,आव पडणे,भुक मंदावणे ह्यात केला जातो.
पिकलेले फळ हे सौम्य रेचन करते म्हणून पोट साफ होत नसल्यास ह्याचा उपयोग होतो.
बेलफळाची साल हि काढा करून वारंवार उल्टी होत असल्यास उपयुक्त आहे.
बेलाच्या वृक्षाचे मुळ हे हृदयाला हितकर असल्याने हृदयविकारात उपयोगी आहे.
बेलाची पाने ही अंगावरील सूज कमी करतात,तसेच ती वेदनाशामक म्हणून उपयोगी आहेत.डायबेटीस मध्ये लघ्वीतून साखर जाणे व वारंवार लघ्वी होणे ह्यात देखील बेलाची पाने उपयुक्त आहेत.
तर आपण पाहीलेच असेल की बेलाचा वृक्ष किती औषधी गुणांनी युक्त आहे तो आणी म्हणूनच ह्याला गणपती प्रिय पत्रीमध्ये मानाचे स्थान आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 1, 2017
काय हा पडवळ्या सारखा दिसतो लांबच लांब असा ठोमणा शरीरयष्टिने कृश व उंच व्यक्तीला मारला जातो.हि भाजी जर रात्री कुणी काळोखात जमिनीवर पाहिली तर साप आहे असे समजून किंचाळल्याशिवाय रहाणार नाही.असे लांबच लांब असे हे पडवळ.
ह्याची चटणी,कोरड,भाजी,भजी असे विविध प्रकार आपण करून खातो.आणि हे सगळेच पदार्थ अगदी चविष्ट लागतात बरं का.
ह्या पडवळाचे वेल असमतोल आपण ज्याची भाजी करून खातो ते पडवळ हे त्या वेलिचे फळ असते.औषधासाठी वापरतात ते पडवळ कडू असते पण स्वयंपाकात आपण गोड पडवळ वापरतो.त्यामुळे आपण गोड पडवळाचे औषधी उपयोग पाहूयात.
पडवळ हे चवीला गोड व थंड असते व हे शरिरातील तिन्ही दोष कमी करते.आता ह्याचे औषधी उपयोग पहायचे ना:
१)भूक न लागल्यास पडवळ उकडून वाटावे व सुप बनवा त्यात १/५ चमचा हिंग+१ चमचा जिरेपूड +१/२ चमचा ओवा घालून ३-४ दिवस प्या.
२)व्यवसाया निमित्त कायम ज्यांचा संपर्क उष्णतेशी येतो त्यांच्या आहारात कायम पडवळाची भाजी असायला हवी.
३)जाडी कमी करायची आहे पण उपाशी राहणे जमत नाही का?पडवळ २०० ग्राम+कुळीथ २० ग्राम एकत्र शिजवून सूप करून त्यात जिरे,दालचिनी,ओवा ह्यांची पूड मिसळून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तींच्या आहारात पडवळाची भाजी नियमीत ठेवावी.
५)अंगात उष्णता,हातापायांची आग होणे,चक्कर येते,संडासला साफ न होणे अशा तक्रारी मध्ये १०० ग्राम पडवळ+१० ग्राम काळ्या मनुका+२० ग्राम आवळकाठी यांचा काढा करून द्यावा.
कोवळा पडवळ खाण्याचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
पोटाच्या एक्स-रेमध्ये त्यातील इंद्रियांची माहिती फारशी कळत नाही हे आपण मागील सदरामध्ये पाहिले. त्यातल्या त्यात स्वस्त दरात पोटाची सखोल माहिती माहिती मिळवण्यासाठी सोनोग्राफी खूप मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते.
November 1, 2010
दुध हे पुर्णान्न आहे पण देशी गाईचेच बरं का!
देशी गाईमध्ये देखील गीर हि प्रजाती जी मुळ गुजरात येथील आहे तिचे दुध सगळ्यांपेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे. देशी गायीचे दुध हे तुलनेने भरपूर गुणांनीयुक्त,पचायला हलके, स्निग्धांश कमी असणारे असे असते.
लहान मुलांना देखील काही कारणाने आईचे दुध मिळत नसेल तर पावडरचे दुध घालून त्यांचे पोट खराब करण्यापेक्षा गाईंचे दुध पाजावे.असे म्हंटलेच आहे ना माय नसेल तिथे गाय आहे.आणी कसा योगायोग आहे पहा ना आई जशी आपल्या बाळाला पोटात ९ महीने वाढवते तशी गाय देखील ९ महिन्यांनीच व्याते.
आपल्या भारतीय संस्कृतींत गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे ते काही उगाच नव्हे.गाय हि खरोखरच पुजनीय आहे.असे म्हणतात कि गोमातेची सेवा केल्याने सर्व पापकर्मांचे क्षालन होते.तसेच गाईच्या उदरात ३३ कोट देव वसतात असे म्हणतात.
गाईंचे दुधच नव्हे तर मुत्र,शेण हे देखील औषधी गुणधर्म युक्त आहे.गाईच्या वाशिंडावर जी सुर्य किरणे पडतात त्याचे रूपांतर सोन्यामध्ये होते आणी ह्या सोन्याचे अंश गाईच्या दुधात सापडले आहेत हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच देशीगायीचे दुध हे पिवळया रंगाचे असते.
आधुनिक विज्ञानाच्या संशोधनातून असे आढळले कि देशी गाईच्या दूधामध्ये A-2 protein आढळते जे आपल्या आरोग्याला अत्यंत फायदेशीर आहे.
पण आपल्या देशाची विवंचनाच अशी आहे कि आपण हातचे सोडुन पळत्याच्या मागे धावत असतो.आणी ह्याच मुळे आपल्याला आपले अस्तित्व गमवायची पाळी आली आहे.होय बरोब्बर ओळखलेत तुम्ही माझा रोख कुठे आहे तो.
२५-३० वर्षांपूर्वी आपल्या देशांतील सरकारने काय केले. दुधाचे उत्पादन वाढवावे म्हणून जर्सी हा प्राणी आपल्या देशात आणला आणी त्याची बिजं आपल्या देशांतील दुग्ध उत्पादन क्षेत्रात रोवली. आपण सगळे जर्सी गाय असे म्हणता पण मी त्याला फक्त एक प्राणीच म्हणेन कारण ज्या प्राण्याच्या शरीरात दुध उत्पादन वाढावे म्हणून डुक्कर ह्या प्राण्याचे जीन्स रोवले आहेत त्याला आपण गाय नाही ना म्हणू शकत.आणी ह्या जर्सीचे दुध हे दुध नसून दुधाच्या रूपातले सफेद विष आहे जे आपल्या देशांतल्या पिढीच्या रक्तात इतकी वर्षे भिनले आहे आणी आता ते आपले जहाल रूप दाखवू लागले आहे.थोडक्यात काय जर्सी ह्या पुतनामावशीचे विषारी दुध आपल्या देशांतील बाळकृष्ण दुध म्हणून पित आहेत किंबहुना आपल्या देशांतील यशोदा माताच त्यांना हे पाजत आहेत.तर सांगायचा मुद्दा हा कि जर्सीचे दुध हे slow poison आहे.
जर्सीच्या दुधात असणारे A-1 protein हे त्यामागील खरे कारण आहे.ह्याच प्रथिनामुळे जर्सीचे दुध हे विषारी बनले आहे .आणी त्यामुळे हे दुध पिऊन कर्करोग, डायबेटिस ,हृदयविकार, मानसिक आजार,नपुंसकता इ अनेक भयानक रोग आपल्या देशात वाढले आहेत.खरं वाटत नसेल तर विचार करून बघा.
आता पुढे अजून हानी व्हायच्या आत आपण सर्वांनी शहाणे होऊया.आणी हे जर्सीचे दुध पिणे थांबवून देशी गाईंचे दुंध पिऊया.आपण सर्वांना माझी हि कळकळीची विनंती आहे कि देशी गाईचेच दुध प्या व आपल्या मुलांना पाजा.गाईचे दुध मिळत नसेल म्हशीचे प्या पण जर्सीच्या दुधापासून लांब रहा.
दुध ह्या विषयी पुढील माहिती देण्या आधी मला आपणा सर्वांना जागृत करणे गरजेचे वाटले म्हणून हा लेख.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 1, 2017
जायफळ हा भारतीय स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ.
गोडाची खीर असो साखरभात असो जायफळ घातल्या शिवाय त्यांना मजा नाही.गरम मसाला असो कि दिवाळीच केला जाणारा फराळ ह्याच्या हजेरी शिवाय सगळेच फिके. मसाले दूध म्हणू नका की चहाचा मसाला सगळ्यांतच हा हवा.
असे हे सुगंधी जायफळ ह्याचा भला मोठा उंच सुगंधी व्रुक्ष असतो. आणी जायफळ हे त्याचे फळाचे बी.हे चवीला तिखट कडू असे मिश्र चवीचे असते.आणी उष्ण देखील असते.म्हणूनच शरीरातील वात व कफ दोष कमी करते.
चला आता ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात.
१)मुरूमांवर दुधात उगाळून ह्याचा लेप लावल्यास मूरुमं कमी होतात व चेहर्यावरचे डाग कमी होतात.
२)वारंवार उल्टया होत असतील तर जायफळ तांदूळाच्या धुवणातून उगाळून त्याचे चाटण द्यावे फायदा होतो.
३)लहान मुलांना पोटात थंडी साठून पातळ संडासला होते तेव्हा गाईच्या तूपामध्ये जायफळ व सुंठ समप्रमाणात उगाळून हे चाटण थोड्या थोड्या वेळाने देत रहावे.
४)पोट फुंगून जुलाब होत असल्यास जायफळ लिंबु रसात उगाळून ते चाटण मध्ये मध्ये चाटावे.
५)शरीरावर कुठल्या ही भागावर सुज आली असून तिथे दुखत असल्यास तिथे जायफळाचा लेप करावा.
जायफळ जर जास्त प्रमाणात सेवन केले तर पोटात आग होते,चक्कर येते,छातीत धडधड होते घूसमटल्यासारखे वाटते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 20-धूपं समर्पयामी-भाग एक
षोडशोपचार पूजेमधील पुढील उपचार आहे, धूप दाखवणे. देवासाठी धूप दाखवणे. निर्गुण रूपातल्या ईश्वराला सगुण रूपातील मूर्तीमधे स्थापन करून त्या देवत्वाला धूप दाखवणे. असा हा उपचार !
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः।
आघ्रेयः सर्व देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
असा मंत्र म्हणत धूप दाखवायचा आहे.
उत्तम वनस्पतीच्या उत्तम रसापासून निर्माण झालेला, सुगंधी द्रव्यांमध्ये उत्तम गंध असलेला, सर्व देव देवतांना ज्याचा गंध आवडतो असा धूप मी तुला अर्पण करतो, त्याचा तू स्विकार कर, अशी प्रार्थना करायला सांगितलेली आहे.
या सुगंधी धुपातून तयार होणाऱ्या धुराच्या वासाने वातावरणातील अनिष्ट आणि अदृश्य शक्ती नष्ट होतात. वातावरण सुगंधीत व्हावे, प्रसन्न व्हावे, याकरीता देवाच्या नावे हा धूप सर्व घरामधे पसरवला जातो.
आजच्या भाषेत सर्व घर "फ्युमिगेट" केले जाते. फ्युमिगेशन ही प्रक्रिया आजही ऑपरेशन थिएटर निर्जंतुकीकरणामधे जगभरात वापरली जाते. जे न देखे रवि ते देखे कविच्या स्टाईल मधे जिथे कोणतेही स्थूल द्रव्य अथवा द्रव द्रव्य पोचू शकत नाही, अशा लपलेल्या ठिकाणी हे सूक्ष्म वायुरूप औषध त्वरीत पोचते आणि तेथील छुपलेल्या सूक्ष्म आणि स्थूल दोन्ही जीवजंतुंना बाहेर काढते. देवाला धूप का दाखवायचा ? या प्रश्नाचे हे आहे एका वाक्यातले उत्तर.
खरंच आहे. साधे घर साफ करायचे असेल तर प्रथम केर काढला जातो. स्थूल रूपातील म्हणजे डोळ्यांना सहज दिसतात असे पाल, उंदीर, असे मोठे जीव आणि ढेकूण, किडे, डास, चिलटे, कोळी, मुंगी, वाळवी, असे घरात लपलेले उपद्रवी छोटे छोटे किटक बाहेर काढले जातात. ( आपले रहाते घर, ज्याला मी 'माझे माझे' म्हणत असतो, पण या माझ्याशिवाय कितीतरी जण या माझ्या निवासस्थानात रहात असतात, हे सांगताना, अनेक प्रकारच्या किड्यांचे वर्णन समर्थांनी दासबोधामधे केलेले आहे.)
तर असे हे छोटे मोठे किटक केरसुणीने घराबाहेर काढता येतात. पण जमीनीखाली, किंवा फरशीवर चिकटलेले काही जीवजंतु केरसुणीने काढता येत नाहीत, यासाठी गोमूत्र कालवलेल्या शेणाने सारवून घेणे, पाण्यात विभूती, गोमूत्र टाकून सर्व काचा दरवाजे, तावदाने पुसुन घेणे, शेणखळा किंवा सडा टाकणे, अगदी आजही फिनेल, डेटाॅल, सॅव्हेलाॅन, हार्पिक, लायझाॅल इ.इ. द्रव द्रव्य म्हणजेच सॅनिटायझर वापरून उरलेले, चिकटून राहिलेले जंतु धुवुन टाकले जातात. घराची, जमिनीची जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करीत असतो. यासाठी घन, द्रव पदार्थ वापरत असतो. परंतु एवढ्या उपायांनी पूर्ण घर स्वच्छ शुद्ध होत नाही. छत आणि जमिन यांच्यामधेही काही भाग शिल्लक असतो, जिथे शुद्धी करणारे घन अथवा द्रव पदार्थ पोचू शकत नाहीत. इथे धूर उपयोगी होतो.
भिंतीना पडलेल्या सूक्ष्म भेगा, कपाटांच्या मागे, बेडच्या खाली, उशी, बेडशीट, गाद्यांच्या मधे, कौलारू घरात कौलांच्या मधे लपलेले सापासारखे स्थूल जीव, किंवा फ्रीजच्या मागे, टीव्हीच्या मागे, स्पीकर बाॅक्सच्या मागे, पुस्तकाच्या कपाटातील कसर, केरसुणीने पण जाणार नाही किंवा तिथे सॅनिटायझर पण वापरता येणार नाही. अशा सर्व ठिकाणी धूपं समर्पयामी.
जिथे इतर कोणतेही घन अथवा द्रव द्रव्य पोचू शकणार नाही, अशा ठिकाणी जंतुनाशक म्हणून वायुरूप द्रव्य सहज पोचते आणि जंतुनाशनाचे काम करते.
आले का काही लक्षात ? कोणत्या देवासाठी धूप घालायचा आहे तो !
खरं तर हा धूप देवासाठी नाहीच आहे, तो आहे दानवांसाठी ! पण "मिडीयाला" कसे सांगणार ? देवाला आवडतो म्हणून देवासाठी आम्ही धूप जाळतो, असं सांगितले की सगळेच खुश !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.06.2017
June 13, 2017
केशर म्हटले की पुर्वीच्या काळातील राजा रजवाडे ह्यांची आठवण आल्या शिवाय रहात नाही.किंबहूना हे नाव ऐकल्यावर मला तरी त्यांची आठवण होते.असा हा राजेशाही आश्रय लाभलेला पदार्थ आता जरी सर्व सामान्यांच्या अवाक्यातला झाला असला तरी त्याच्या भोवताली असणारे ते वलय काही कमी झाले नाहीये बुवा.
सांगण्याचा हेतू हा की केशर हा तसा जपून वापरण्याचा पदार्थ आहे कारण आज देखील ह्याच्या किंमती गगनास भिडलेल्या आढळतात.
साधारण पणे राजभोगा मध्येच अर्थात अगदी खास अशा पक्वान्नांमध्येच ह्याचा वापर केला जातो.मिठाई,बासुंदी,मसालेदुध,केशराचा शिरा इ (आणखी पदार्थांची नावे देणे टाळते कारण आपल्या रसग्रंथी उत्तेजीत करून अत्रूप्त ठेवल्याचे पातक माझ्या माथी नको)
तर हा केशर जसा आपण गोड धोड पदार्थात वापरतो तसेच ह्याचे काही औषधी उपयोग देखील आहेत तेच आपण आज पहाणार आहोत.
केशराचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरत असलेले केशर हे त्या फुलात मध्यभागी असतात.
चवीला तिखट,कडू आणी उष्ण गुणाचे असतात.केशर शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतात.
चला आता ह्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:
१)आव पडत असल्यास केशर कडू निंबाच्या रसातून द्यावे.
२)पोटात जंत होत असतील तर केशराचा ४ कांड्या थोड्या कापूरासह २ चमचे दूधात मिसळून द्यावे.असे ८ दिवस करावे.
३)लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल तर ४ केशर कांड्या २ चमचे दूधातून द्यावे.
४)लहान मुलांना उन्हाळयात गोवर उठते ती पुर्ण पणे शरीराबाहेर न पडल्यास त्यांना त्रास होऊ शकतो ह्यासाठी १० केशर कांड्या ६ चमचे पाण्यात रात्री भिजत घालाव्यात व त्यात साखर घालून हे पाणी गोवर थोडे अंगावर फुटलेले दिसले की मुलांना सकाळी हे पाणी पाजावे.
५)पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे,स्त्राव नीट न होणे अशक्तपणा अशा तक्रारी असल्यास १/४ चमचा केशर + २ चमचे जीरे हे मिश्रण दुपारच्या जेवणापुर्वी ३ महीने घ्यावे.
६)शरीरात अशक्तपणा असल्यास व रक्ताची कमी असल्यास १/४ चमचा केशर+ ३ काळे खजूर+ २ चमचे शिंगाडा पीठ +१ चमचा मध हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी घ्यावे.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 17, 2016
हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.
July 26, 2017
वदनी कवल घेता
नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते
नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा
अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदर भरण होणे
जाणिजे यज्ञकर्म
हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया.
मुखी घास घेता करावा विचार.
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझे हाती नित्य देशसेवा
म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा
असा परिवर्तित श्लोक देखील म्हटला जातो. हे श्लोक सामुहीकरीत्या म्हटले जातात.
समुहाने किंवा एकत्रितरीत्या हे श्लोक म्हणण्याचा एक वेगळा अर्थ अपेक्षित आहे.
आपण सारे एक आहोत,
सहनाववतु सहनौ भुनक्तु
यामधे देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे.
एकत्र बसून भोजन करणे, हे एकमेकांची शक्ती वाढवणारे आहे.
आजकालच्या प्रथेनुसार एकत्र जरी आलो तरी, बसून भोजन काही होत नाही. ते यथाकालोद्भव उभ्याउभ्याच होते. डाव्या हाताने कधीही वाढू नये, वाढून घेऊपण नये. पण डाव्या हाताने घेतल्याशिवाय बुफेभोजन होतच नाही. याकरीता, ( फार फार वर्षा) पूर्वी (सौ.) अन्नपूर्णा सर्वांना वाढून नंतरच आपण जेवायला बसत असे. जे काही हवे ते एकदाच घेऊन नंतरच ती जेवत असे. वाढपी लोकांची संगत हीच तिची पंगत. पण तिच्या चेहर्यावर इतरांना वाढण्याचे समाधान झळकत असे.
सर्व पदार्थ वाढून पूर्ण झाल्यावर, अन्नशुद्धी वाढली जाई.
अन्नशुद्धी म्हणजे लोणकढे तूप.
हे तूप (आडव्या चमच्याने) वाढून झाले की, आता आणखी पदार्थ ताटात येणे शिल्लक नाही, असा जणुकाही इशाराच जेवणार्यांना मिळत असे.
म्हणजे अन्नशुद्धी वाढून होईपर्यंत, समोर वाढलेल्या ताटाला हातही लावायचा नाही. असा अलिखित नियमच होता त्यावेळी.
कोशींबीर वाढून होईपर्यंत लोणचे संपलेले, भाजी येईपर्यंत कोशींबीर संपवलेली. याला सहभोजन म्हणत नाहीत.
आता पंगतही कालबाह्य झाली आहे.
एका ओळीत मांडलेली केळीची हिरवीगार पाने, त्यावर रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं आणि गच्च भरलेलं ताट, उदबत्यांचा सुवास,
एका सुरात, एका तालात म्हटलेले श्लोक, हा सर्व माहोल पाहून आधीच अग्निनारायण अवतीर्ण झालेले असत. आणि वाट बघत बसलेले असत फक्त गजराची !
जय जऽय रघुवीर समर्थ ऽऽऽ
हरऽऽहर महाऽऽदेव
आणि नंतर आक्रमणाला जी सुरवात होई, ती अग्निनारायणाने अगदी तथास्तु म्हणेपर्यंत.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
04.09.2016
September 4, 2016
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकोणपन्नास
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग सात
न हुं कुर्याच्छवं पूज्यं प्रशस्तान मंगलानि च !
कोणाच्याही मृत शरीर म्हणजे शवाकडे पाहून तिरस्कार युक्त हुऽऽ असे तुच्छता पूर्वक संबोधू नये.
मरणानंतर वैर संपते, नंतर त्याच्या शवाची हेटाळणी किंवा विटंबना होऊ नये. श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर त्याचे केलेले और्ध्वदेहिक प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला वधल्यानंतर त्याचे थडगे बांधले. दुर्दैवाने पश्चात या थडग्याचे रूपांतर वातानुकूलित महालामधे केले गेले, हे उदात्तीकरण न्यायालयाने देखील अव्हेरले आहे. या उलट पाकिस्तानी सैनिकांनी अनेक वेळा भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची केलेली विटंबना आपणाला आठवण असेलच. इथे भारतीय संस्कारांचे महत्त्व लक्षात येते.
प्रसिद्ध व्यक्ती, विद्वान व्यक्ती, कुठेही दिसल्या तरी त्यांना नमस्कार करावा. एवढेच नव्हे तर सिद्ध वनस्पती दिसताच त्या वनस्पतीना देखील नमस्कार करावा. सिद्ध म्हणजे ज्यांचे औषधी गुणधर्म प्रसिद्ध आहेत अशा वनस्पतीना मनोमन वंदन करावे.
वेली वनस्पतीना देखील भावना असतात, त्यांना देखील स्पंदने कळतात. प्रत्यक्ष डोळे नसले तरी आजुबाजुला काय आहे, याची माहिती त्या घेत असतात. त्याचा आधारही आपल्या तंतु प्रतानाद्वारे घेतात. आपल्या आवाजाला, बोलण्याला, स्पर्शाला त्या प्रतिसाद देतात. माणसाच्या सहवासाने चाफा बहरतो, लाजरी स्पर्श झाला की लाजते, राहत्या घराजवळील काजु अधिक फळ देतो. हे तर प्रत्यक्षात दिसते.
आपला जन्म ज्या नक्षत्रावर झालेला असतो, त्या नक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो. म्हणजेच आपला तो वृक्ष आराध्य असतो. आपले रक्षण करणारा आपला वृक्ष आपल्याला माहिती हवाच. जेव्हा कुठेही उत्तर सापडत नाही, तेव्हा हा वृक्ष आपले आरोग्य रक्षण करायला मदत करतो.
नक्षत्र वृक्ष या कन्सेप्ट अनुसार काही ठिकाणी नक्षत्र उद्यान, हर्बल गार्डन, सुरू झालेल्या आहेत.
नक्षत्र कोणतेही असो. वनस्पतीचे संरक्षण तर झालेच पाहिजे. त्यासाठी वनस्पतींची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजुबाजुला असंख्य वनस्पती दिसतात, त्यांची नावे औषधी गुणधर्म आपणालाच माहिती असत नाहीत. हे गुणधर्म जर समजून घेतले तर अनेक छोट्या छोट्या आजारामधे आपण त्या वापरू शकतो. आणि हे ज्ञान फक्त आयुर्वेदच देऊ शकतो.
या वनस्पतीचे संरक्षण व्हावे, यांची ओळख पुढील पिढीला व्हावी, एखादी वनस्पती आपल्या जवळपास कुठे आहे याची आपल्याला माहिती असावी, यासाठी देवाच्या नावाने पत्री पूजा वाहाण्याचे कर्मकांड आपल्या धर्मात सांगितलेले आहे. वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, आवळी भोजन, कुष्मांड नवमी, शमी आपट्यासाठी दसरा, दुर्वांसाठी गणपती, बेलासाठी महादेव, देवीसाठी कमळ, विष्णुंसाठी तुळस, मारूतीरायासाठी रूईची माळ, अशा अनेक वनस्पतीसाठी अनेक सण आणि देवता निश्चित करून ठेवण्यामागील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. म्हणजे या प्रथा आणि कर्मकांडे का सुरू झाली याची उत्तरे सहज मिळतील.
प्रत्येक वनस्पतीकडे आदराने पहावे, तिच्यातील औषधी गुणाचे ज्ञान मिळवावे, तिचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी या वनस्पतीना देवतेसमान दर्जा देणारे आमचे ऋषी खरंच "ग्रेट" होते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०७.०९.२०१७
September 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti