खरं आहे हे ! आज जी विकतची काही मऊ मऊ पांघरुणे मिळतात, त्यात कृत्रिमरीत्या तयार केलेली फर वापरली जाते. त्यात जे रंग डाय करण्यासाठी वापरले जातात, ते पण अॅलर्जी वाढवतात, असे लक्षात येत आहे. सहज हातात धरून झटकली तरी ही फर वाऱ्यावर उडताना नुसत्या उघड्या डोळ्यांना दिसते.
February 8, 2018
“जा तेल लावीत” असे वाक्य आपण काही वेळा रागाने म्हणतो. हे खरं तर सकारात्मक वाक्य आहे.
April 6, 2017
१)गाईच्या दुधाचे दही:
चवीलागोड,आंबट,उष्ण,स्निग्ध,बलकारक, पुष्टिकर,भुक वाढविणारे व अजीर्णात उपयुक्त आहे.
२)म्हशीच्या दुधाचे दही:
चवीला गोड,आंबट,पचायला जड,स्त्राव उत्पन्न करणारे,स्निग्ध,वातनाशक,कफकर,रक्तदुषित करणारे,शुक्र व वजन वाढविणारे आहे.
३)शेळीच्या दुधाचे दही:
मल अर्थात संडासलाघट्टकरणारे,हलके त्रिदोषनाशक,भुक वाढविणारे,वजन वाढविणारे आहे.
आता आपण दह्याचे काही घरगुती उपचार पाहूयात:
१)कुळीथाचे अजीर्ण झाले असता ताजे दही कपड्यात बांधून टांगून ठेवावे व त्याचे निथळणारे पाणी प्यावे.
२)भुक लागते पण तोंडावर चव नाही असे असल्यास भोजन करताना मध्ये मध्ये दही+सैंधव+ खडी साखर हे मिश्रण घ्यावे.
३)पातळ जुलाब होत असल्यास दही+तूप+सैंधव हे मिश्रण भातात मिसळून खावे.
४)दह्यावरची साय २ चमचे+१ चमचा त्रिफळा चुर्ण+१ चमचा मध हे मिश्रण रोज रात्री घेतल्यास डोळ्यांना हितकर आहे.
५)कृश शरीराच्या व्यक्तींनी वैद्यांचा सल्ला घेऊन आठवड्यातून दोन वेळेस दुपारच्या जेवणात दही व खडी साखर हे मिश्रण घ्यावे.
दही अतिप्रमाणात खाल्ल्यास कफ व पित्ताचे विकार होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 12, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग दोन
ज्यांना रात्रीचं काम करण्याची मजबुरी असेल त्यांनी काय करावं ? रात्रीच्या जागरणाच्या निम्मे वेऴ जेवणापूर्वी दिवसा झोपावे. आपलं जेवढं काम असतं, जसं काम असतं, त्यामानाने पुरेशी झोप घेतलीच पाहिजे.
शांत झोपेमधे शरीरातील सर्व अवयवांना विश्रांती मिळत असते. अधिक जोमाने काम करण्यासाठी ही विश्रांती उपयोगी होते. दिवसभर काम करून जी उर्जा संपून जाते, ती मिळवण्यासाठी रात्र उपयोगी होते.
नाईट शिफ्टमधे काम करत असलेल्या कामगारांना कोणत्याही रोगाची लागण लवकर होते. परिणामी त्यांना अनेक रोगांना सामोरे जावे लागते. विशेषतः चालक, वाॅचमन या वर्गामधे पचन हमखास बिघडलेले असते. पचन बिघडले की, वात वाढतो, पित्त वाढते, तयार झालेल्या अन्नरसाचे शोषण आणि पुढे शरीराचे पोषण होत नाही, पोट सुटत जाते, दिवसा जास्ती झोप घेतल्याने सूर्याच्या शक्तीचा योग्य वापर शरीराला करून घेता येत नाही, घाम कमी येतो, आमनिर्मिती जास्त होते, चरबी वाढते, प्रतिकारशक्ती कमी होते. रोग होतात. अशा रात्रपाळी मंडळींनी आपल्या जेवणामधे थोड्याश्या पाचक, गरम स्वभावाच्या पदार्थांचा वापर करायला हवा. जसे काळी मिरी, जिरे, आले, लसूण, सुंठ, धने. रात्रीच्या वेळी काम करताना वारंवार घेतला जाणारा चहा कमी करून त्याऐवजी सुंठ, मिरी, तुळस, खडीसाखर किंवा गुळ, धने, वापरून केलेला कषाय दुधाशिवाय घ्यावा. रात्रीचे काम आणि रात्रीचे जेवण यामधे देखील तीन तासाचे अंतर असावे. म्हणजेच सायंकाळी सहा सातच्या आत जेवून नंतर आठ नऊ वाजता कामासाठी जावे. मधे खूप भुक लागली तरच खावे, त्यामधील खाणे हे सुद्धा राजगिरा लाडू, चिक्की, फुलवलेले पोहे, लाह्या, पाॅपकाॅर्न असेच हलकेफुलके असावे. फळे, दूध, ज्युस असे पचायला जड होईल असा आहार रात्री नको.
रात्रपाळी कामगारांमधे वात जास्ती प्रमाणात वाढत असतो. म्हणून या कामगारांनी झोपण्यापूर्वी कानात, तळपायाला, डोळ्यांना, डोक्यावर आणि बेंबीमधे थोडे तेल लावावेच. कोकणात तेल म्हणजे खोबरेल, घाटमाथ्यावर शेंगतेल, बाकी सर्व प्रदेशात तिथे उपलब्ध होणारे स्थानिक तेलबीयांचे तेल. नाहीतर सदाबहार तीळतेल.
पहाटे जेव्हा कामावरून परत येणे होईल तेव्हा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या नेहेमीच्या कामापेक्षा वेगळा व्यायाम करावा. जर रात्रौ कष्टाचे काम झालेले असेल तर सकाळी व्यायाम देखील हलका फुलका करावा, जसे प्राणायाम, नमन मुद्रा, ओंकार, कपालभाती, काही योगासने आणि सूर्यनमस्कार !
आणि ज्यांचे रात्रीचे काम केवळ लिखापटीचे किंवा कंप्युटर वर फक्त टाकटुक करायचे असेल त्यांनी मात्र या व्यायामाबरोबरच घाम आणणारे एरोबिक्स, दंड, जोर, बैठका, दोरीच्या उड्या, असे वेगवान व्यायाम करावेत. ज्यामुळे श्वासाची गती वाढेल आणि संपूर्ण शरीरातील रक्तसंचार गतीमान होईल.
स्नान करावे, नाश्त्याला पोटभर काहीतरी असावे. आहारामधे दही घेतले तरी चालते. ( पण आवडत असेल तरच आणि पचत असेल तरच नाहीतर नियम म्हणून नको ! ) त्यातील वात वाढवणारे पाणी काढून टाकावे, आणि चांगले फेसून थोडी साखर घालून सात आठ चमचे दही जेवताना खायला काहीच हरकत नाही.
आणि सूर्याच्या प्रकाशात हवेशीर जागी झोपावे. थोडक्यात एसी नकोच. सूर्याचे थेट किरण अंगावर पडले की उर्जा तयार होते. कोई मिल गया मधला "जादू" आठवतोय ना, तस्से !
मध्यंतर हवे असल्यास मधेच उठून पुनः छोटी हलकी कामे, व्यवहारातील आवश्यक कामे करून, पुनः थोडी झोप घेऊन सायंकाळी सहा वाजता उठून पूर्ण जेवण घेऊनच कामासाठी निघावे.
सूर्य असणे आणि सूर्य नसणे या दोन गोष्टी खूप काही बदल शरीरात आणि मनात घडवून जातात.
एक सूत्र नक्कीच लक्षात ठेवावे, ते म्हणजे झोपायचे कसे आणि केव्हा ! जेवणानंतर लगेच झोप घेतल्याने चरबी वाढते, जाडी वाढते, कफाचे आजार, मधुमेह वाढतात, हे आपण यापूर्वी पाहिले आहेच. म्हणून एक युक्ती करावी. जेवणानंतर झोपण्याऐवजी जेवणापूर्वी झोप पूर्ण करावी आणि नंतर उठून जेवून पुनः कामाला लागावे.
ही युक्ती, आरोग्य नियमातील ही पळवाट फक्त रात्रपाळी करणाऱ्या मजबूर प्राण्यांसाठीच. इतरांना किंवा त्याच्या नातेवाईकांना नाही. !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.05.2017
May 17, 2017
शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते.
या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे.
काही जण समजत होते, माणूस शाकाहारी.
काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. पण "त्याच्या" नियमानुसार, ना माणूस शाकाहारी ना मांसाहारी ना मिश्राहारी.
मिश्राहारी ही अगदी सोयीस्कर पळवाट झाली.
म्हणजे उपवासाच्या दिवशी फळाहार पण करायचा आणि वडे भजी पण खायची. तसे झाले.
त्याच्या डिक्शनरीमधे मिश्राहारी हा हायब्रीड शब्दच नाही.
माणसाची वैशिष्ट्ये बघूया. म्हणजे त्याला अपेक्षित असलेले माणसाचे नियम आपोआप समजून येतील. .
शाकाहारी प्रमाणेच पाणी ओठानेच पितो, जीभेने चाटत बसत नाही.
समुहाने शांतपणे एकमेकांवर डूक न धरता जेवतो.
रोज आंघोळ करतो. पाण्याची आवड आहे.
अंगाला घाम येतो आणि शरीराचे तापमान संतुलीत ठेवायला मदतच होते.
जेवताना अगदी सावकाश जेवतो. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे वचावचा किंवा शाकाहारी प्राण्यांप्रमाणे भराभरा जेवत नाही.
खाल्लेले अन्न पुनः पचनासाठी परत तोंडात आणत नाही. रवंथ करीत नाही.
तोंडातील लाळेचे रासायनिक पृथक्करण केले असता, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते. आतड्यांची रचना, लांबी पण वेगळीच असते.
मांसाहारी प्रमाणे माणसाची नखे आत बाहेर करता येत नाही. शाकाहारी प्रमाणे स्थिर आहेत. धारदार टोकदार नाहीत. त्यामुळे नखांनी शिकार करता येत नाही.
शिकार करण्यासाठी वेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. एवढेच नव्हे तर समोरचे मांस खाण्यासाठी भाजणे, जाळणे, तळणे, शिजवणे इ.इ. वेगळ्या संस्काराची आवश्यकता पडते. खाण्यासाठी सुद्धा काटे चमचे सुऱ्या घेऊन जणुकाही लुटुपुटुचे आभासी युद्ध करावे लागते.
शिवाजी महाराजांना अफजल्ल्याचे पोट फाडण्यासाठी वेगळी वाघनखे वापरावी लागली, आणि हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताना देखील सिंहनखे धारण करावी लागली. त्यासाठी मानवरूप सोडून नरसिंह अवतार घ्यावा लागला. पण भगवंतांनी पण नियम नाही मोडला.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे. ज्याला जो नियम घालून दिला आहे, तोच नियम प्रत्येकाने पाळावा.
आणि नियम मोडला तर शिक्षा ही होणारच.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
1.10.2016
October 1, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !
जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.
एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.
तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.
प्रकृती म्हणजेच निसर्ग !
सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.
बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.
रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.
ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.
हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
कारण,
शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.05.2017
May 12, 2017
गहू खायचा नाहीतर तांदुळ !
एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो.
गहू बंद केला तर
कल्पना सुद्धा करवत नाही.
मग डब्यात काय देणार ?
यांना काय सांगायला जातेय,
आम्हाला वेळच नाही,
आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ?
नुसतं हॅवाॅक आहे झालं !!
सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या काॅमेंटस ऐकाल्या की, त्यांना सांगावेसे वाटते, एक महिनाभर गंमत म्हणून, व्रत म्हणून, अक्कल गहाण टाकून, पूर्वग्रहदूषित ठेवून, गहू बंद करून पहावा. गहू बंद केला तर, अनेक नवीन पर्याय सुचु लागतील. याचा वापर केल्याने सजण आणि सर्वजण खुश होतील.
गव्हाऐवजी कोकणात तीन चार पर्याय उरतात. तांदुळ, नाचणी, उडीद आणि मका
कोकणाशिवाय अन्य प्रदेशात ज्वारी, बाजरी, मका ही धान्ये पण पोटभरतीची आहेत. किंवा धान्ये एकत्र करून पण वापरता येतील. भाजून ठेवली तर आणखीन चांगले. थालीपीठ आणि लोणी, एकत्र केलेल्या पीठाची धिरडी, उत्तप्पा, दशम्या, पराठे, घावन, वडे, एवढे उत्तम प्रतीचे पर्याय असताना त्या चपातीत जीव का गुंततो ते कळत नाही. ( चपाती एकेकाळी मलापण खूप आवडत होती. पण एकदा (प्र)देशप्रेमाचे भरते आले आणि आवडतीची, नावडती झाली ! )
मुंबैत तर चपाती पण नाही. नुसता वीतभर लांबीचा फुलका. पीठाचा गोळा चार पाच वेळा इकडून तिकडून फिरवला, एका बाजूने भाजल्या सारखा होईपर्यंत परतून लगेच तवा बाजुला करून गॅसवर शेकलं की लगेच डब्यात.
कोळश्याच्या शेगडीवर भाजलेला फुलका मात्र मस्त दिसतो. कमी वेळात कोणताही अन्नपदार्थ तयार करू नये, त्याच्यावर पूर्ण अग्निसंस्कार झाला पाहिजे. हे लक्षात ठेवावे.
पोळी करण्याचं कसब वेगळंच असतं. कणीक थोडीशी लाटून घेऊन, तेल पीठ लावून त्रिकोणी घडी करून पुनः तिचा आकार गोल करणं ही कला आहे. नाहीतर ऑस्ट्रेलिया, जपान भाजले जातात. थोडा वेळ जास्ती जातो, म्हणून सेकंदावर धावणाऱ्या मुंबईत पोळी नाही. पोळीला चपाती हा शब्द कुठुन आला माहीत नाही.
पोळी म्हटली की, पुरणाची पोळी, गुळाची पोळी, बेसनाची खमंग पोळी आठवते. प्रदेशानुसार यांची नावे बदलत जातात. काहीजण यालाच मांडे पण म्हणतात. बेसन तव्यावर ऑम्लेटसारखे फ्राय केलेतर त्याला पोळा असेही म्हणतात.
ज्यांना उपाय करायचा असेल त्यांनी जरूर असा बदल करून पहावा, नाहीतर आहेच मग. बटाट्याची भाजी आणि चपाती....
सांगायचे काय तर एवढे प्रकार उपलब्ध आहेत.
नाहीतर मराठमोळ्या सदाबहार भाकऱ्या. आफळेबुवांच्या भाषेत, तानाजी भाकरी म्हणजे दीड फूट लांब रूंद. फक्त हातावर वाढवत नेलेली ही भली मोठ्ठी भाकरी न तुटता, गरगरून फुगत, तव्यावरून ताटात येईपर्यंत तश्शीच रहाते, हे वैशिष्ट्य.
बाजरीच्या तीळ लावून खमंग खरपूस भाजलेल्या भाकरीवर लोण्याचा गोळा. आणि बरोबर वांग्याची भाजी आणि लसणाचे तिखट.
आठवणींच्या प्रदेशात जायचं नाही असं ठरवलं तरी मन सारखं जात रहातं. जायला काही हरकत नाही, पण येताना येववत नाही. इतकंच.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
30.10.2016
October 30, 2016
उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकामधे नमूद केलेले आहे.
February 15, 2018
।। गजाननाय नम: श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि ।।
गजाननप्रिय दुर्वा खरोखरच तन मन शांत करायचे महत्त्वाचे कार्य करते.
ह्याचे जमीनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप असते.अनेक पर्व असणारे व ह्या पर्व संधी जवळ उगवणारी मुळे ही पुन्हा जमीनीत शिरतात व पुन्हा वाढतात व पसरतात.ह्याची पाने १-१० सेंमी लांब असून,फुले हिरवी अथवा वांगी रंगाची एका मंजीरीत २-८ असून मंजीरी १-८ सेंमी लांब असतात.बिया अगदी बारीक पिंगट रंगाच्या असतात.
ह्याचे उपयुक्तांग पंचांग आहे.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:
ह्याची चव तुरट,गोड,थंड गुणाचे असून हल्के असते.ही कफपित्तनाशक अाहे.
चला आता ह्याचे शरीराला काय फायदे आहेत ते जाणून घेऊया:
दुर्वाचा लेप हा आघात,जखम,व्रण ह्यात लेप केल्यास डाग कमी होतात व वर्ण सुधारतो.
डोळ्यांची आग होत असल्यास दुर्वा फायदेशीर आहे.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करायला उपयुक्त आहे.
स्त्रियांच्या अंगावर लाल अथवा पांढरे जात असल्यास दुर्वारस फायदेशीर ठरतो.
दुर्वा गर्भाशयाची शक्ती वाढविते.
वारंवार तहान लागणे,उल्टी होणे ह्यात देखील दुर्वा उपयुक्त आहे.
मनाला शांत करणे हा अलौकिक गुण ह्या वनस्पती मध्ये आढळतो म्हणूनच तर गणपतीला ह्या वाहिल्यास आपले ही मनशांत होते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९६०६९९७०४
July 30, 2017
शाकाहारी प्राण्यांचा जबडा आगदी आ वासून उघडत नाही. (अपवाद पाणघोडा ) थोडासाच उघडतो, पण यांचा खालील जबडा वर खाली तर होतोच, पण आजुबाजुला पण हलतो. रवंथ करायचे असते ना. तुकडे करून गिळायचे असतील तर जबडा मोठ्ठा उघडावा लागतो, पण छोटे छोटे घास करीत चावून बारीक करायचे असल्याने खालचा जबडा आणि वरचा जबडा विशिष्ट पद्धतीने एकमेकांवर घासावा लागतो, तेव्हाच अन्न भरडले जाते, बारीक होते. पण मांसाहारी प्राण्यांचा खालचा जबडा फक्त वर आणि खालीच हलतो.
त्यामुळे मांसाहारीना भक्ष्य परत आत ढकलण्यासाठी मानेची हालचाल करावी लागते. मानेला हिसका देऊन, मान थोडीशी मागे नेऊन, तोंड पुढे आणावे लागते, तेव्हाच ते भक्ष्य आत ढकलले जाते. मगर कशी खाते आठवून पहा. पकडलेल्या हरणाला, दातांनी आवळून मारल्यावर, त्याला पुनः वर उडवून खायची सवय असते. जबडा मोठा असला तरी भक्ष्याला गिळताना, त्यांच्यावरील दातांची पकड थोडी सैल करून, काही क्षणांसाठी त्याला सोडावे लागते, म्हणून एकदा भक्ष्याला धरल्यावर मरेपर्यंत काही काळ भक्ष्यावरील आपली दातांची पकड सैल होऊ देत नाही.
पण घोडा गाढवाला चारा खाताना मान हलवावी लागत नाही, की चारा उडवून खावा लागत नाही.
शाकाहारी प्राण्यांच्या दाढा खूप मजबूत असतात. पसरट असतात. हत्तीसारख्या प्राण्यांच्या दाढा, एका मोठ्या वीटेएवढ्या आकारात असतात. दोन्ही जबड्यात वर खाली समान संख्येत असतात.
शाकाहारी प्राणी जेवताना समुहाने आणि शांतपणे जेवतात. त्यांची वृत्ती स्थिर असते. गाय बैल म्हैशी चरताना एकत्रच चरत असतात. आपले अन्न फक्त आपल्यालाच मिळावे, असे यांना वाटत नाही. दुसऱ्यांना मिळू नये, अशी भावना अजिबात नसते. शांतपणे एकमेकांवर डूक न धरता खातात.
नजर शांत असते. खुनशी नसते. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण बघू शकतो. निरागस दिसतात. जेवत असताना सुद्धा नजर बदलत नाहीत. चोरून, घाबरून खाल्ल्यासारखे करत नाहीत. भरभर खातील पण वचावचा खाणार नाहीत.
सर्व शाकाहारी प्राणी मस्त आंघोळ करतात. पाण्याचा द्वेष, तिटकारा करीत नाहीत. अंगावर पाणी घातले तरी पळून जात नाहीत. कुत्र्यांना आंघोळ घालताना काय नाकीनऊ येतात, ते ज्यांचे त्यांनाच ठावूक.
हत्तींचे स्नान आठवून पहा. कसे पाण्यात मस्त डुंबतात आणि म्हैशी, पाणघोडे चिखलात कसे लोळतात. मुळात पाण्याची, आंघोळीची आवड असणे महत्वाचे, जी शाकाहारी प्राण्यांच्या रक्तात जन्मापूर्वी पासूनच असते.
यांच्या अंगाला घाण वास येत नाही. थोड्या कमी जास्त प्रमाणात घाम येतो, सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन पण होते.
शाकाहारी प्राणी अंग स्वच्छ करायला सारखे चाटत बसत नाहीत. की यांना अंगाचे तापमान संतुलीत ठेवण्यासाठी जीभ बाहेर काढून, सारखी सारखी शीतकारी, शीतली करावी लागत नाही. बघीतलंय कधी बैलाला, कुत्र्यांसारखं फासण्या मारताना. ( फासण्या मारणे म्हणजे तोंड उघडे ठेवून जोरजोरात श्वासोच्छ्वास करणे )
आवाजामधे पण किती सौम्यता असते ना, भसाडा आवाज मुळीच नसतो. गाईच्या हंबरण्यात देखील हम्माऽऽऽ, मां असते. माया असते, वात्सल्य ऐकू येते. एक प्रकारचा गोडवा असतो. आवाज ऐकून भीती तर नक्कीच वाटत नाही.
एकदा खाल्लेतरी पचन पूर्ण झाल्यावर साधारणपणे आठ ते सोळा तासात परत भूक लागते. पुनः खावे लागते. भूक लवकर लागली तरी, अन्न पचायला मात्र वेळ जास्ती लागतो. खाल्लेल्या अन्नामधे विशेष अहितकर काहीच नसल्याने अन्न पोटात पुढे पुढे ढकलून त्याज्य भाग बाहेर काढायला बारा सोळा तास लागले तरी विशेष नुकसान होत नाही. यांची आतडी लांबीला जास्ती असतात. पाचक स्राव कमी अधिक प्रमाणात टप्प्यानुसार पाझरत जातात.
ईश्वराने यांना खायला भरभर शिकवले, पण पचवायला मात्र पुरेपुर वेळ दिला.
भगवान के घर देर है पर अंधेर नही !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
28.09.2016
September 28, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti