खावे. पण गरज असेल तर खावे.
खावे. पण आवडत असेल तर खावे.
खावे. पण हितकर असेल तर खावे.
खावे. पण सहज उपलब्ध असेल तर खावे.
खावे. पण भूक असेल तर खावे.
खावे. पण पचवू शकत असेल तर खावे.
खावे. पण तयार करता येत असेल तर खावे.
खावे. पण जिभेला चव असेल तर खावे.
सगळ्या यातना काढतोय त्या पोट भरण्यासाठीच !
आणि आपल्या कृतीने जर..
पोटच बिघडत असेल तर, कशाला खावे ?
पचवू शकत नसू तर, कशाला खावे ?
गरज नसेल तर, कशाला खावे ?
आवडत नसेल तर, कशाला खावे ?
पिकतच नसेल तर, कशाला खावे ?
विकतचे आणून कशाला खावे ?
तोंडाला चव नसेल तर कशाला खावे?
केवळ आस्य आहे म्हणून ?
मुखी घास घेता करावा विचार,
कशासाठी मी, हे अन्न सेवणार ?
प्रत्येक घास खाण्यापूर्वी असा विचार करावा.
जीभ हा अत्यंत स्वार्थी अवयव आहे.
"मला बरं वाटतंय म्हणून मी खातेय,
इतरांना होणाऱ्या यातनांचे मला काय ?
असा अविचार जीभ करते.
ज्या एकीमुळे अवयवांची युती तुटत असेल, तिचे काय करायचे ? असे ठरवून बाकीचे सगळे अवयव त्याच्याकडे मागणी करतात, तो सर्व शक्तीमान तिला शिक्षा फर्मावतो, आणि जीभेची चवच काढून घेतो.
कठोर शिक्षा !
तिच्यावर बहिष्कार.
"तिला जे हवंय ते द्यायचं नाही, जोपर्यंत बाकीच्या अवयवांच्या यातना संपत नाहीत, पुनः युती होत नाही, तोपर्यंत तिला विसरून जा."
आणि तो तिची चवच काढून घेतो.
आता यापलीकडे जाऊन जो हट्टाने खाणार त्याला प्रमेहासारखी शिक्षा तोच देणार.
डाॅक्टरांकडे गेल्यावर त्यांना पहिल्यांदा बघावीशी वाटते तीला. जीभेला. तपासायला दाखवायला सांगतात ती जीभ. तिला तपासल्यानंतर डाॅक्टरना सहज कळते, आत हिने काय काय घोटाळे करून ठेवले आहेत ते !
आणि डाॅक्टर देखील पथ्य सांगतात, जोपर्यंत अवयवांची तिच्याशी परत युती होत नाही, तोपर्यंत, हे अजिबात खाऊ नका. तमुक पिऊ नका.
हे युती तुटणे अगदी पुरातन काळापासून चालत आलेले आहे. हे ज्याला कळले तो तरला.
आपले पूर्वज देखील काही कमी खवय्ये नव्हते. वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या संस्कारांचे, एकाहून एक सरस पदार्थ तयार केले जात होते. ते लिखित स्वरूपात क्षेमकुतुहल सारख्या ग्रंथात पहायला मिळतात. त्यावेळेच्या पदार्थांची नावे संस्कृत मधील होती. आता बोलीभाषेत वेगवेगळी तयार झाली. आणि सर्व पदार्थ उत्तमात उत्तम द्रव्ये वापरून केले जात होते. साजूक तुपातल्या जिलब्या, गावठी गाईच्या दुधाची रबडी, घरातल्या चक्क्याचे रवाळ रसाला म्हणजे श्रीखंड, घरात जात्यावर ओव्या म्हणत दळलेल्या पीठाचे वडे किती सांगू ?
आता फक्त फरक एवढाच आहे की सगळे पदार्थ विकतचे, पामतेलात तळलेल्या जिलब्या आणि डालड्यात तळलेले कृत्रिम गुलाबाचा वास घातलेले गुलाबजाम. फरक आहेच ना !
जिभेचे चोचले नव्हते ते, त्यावेळची गरज होती. श्रम पण तेवढेच होते ना ! आता श्रम कमी झाले आणि खाण्याचे पदार्थ अति झालेत. परिणाम आजुबाजुला दिसतोच आहे.
आणखी एक फरक लक्षात येण्याजोगा, तो म्हणजे पूर्वी पुरणपोळीसाठी होळी पौर्णिमेच्या दिवसाची वाट पहावी लागत असे. गुळपोळ्या फक्त संक्रांतीला, श्रीखंड फक्त पाडव्याच्या मुहूर्तावर. लग्न मुंज असेल तरच लाडू. नाहीतर नाही.
आता बाजारात केव्हाही जा.
जो जे वांछिल तो ते सर्व काळ !
सर्व मधुर रसाचे पदार्थ चाॅकलेट पासून गुलाबजाम पर्यंत, मुबलक प्रमाणात समोर हजर असतात.
आपल्या सणांची रचना त्या त्या वातावरणातील हवामानावर आणि उपलब्ध साधनसामुग्री वर केली गेली आहे. त्यामुळे त्यावेळी ते पदार्थ खायलाच हवे असतात. आता जानेवारी फेब्रुवारी मधे अगदी रथसप्तमी पर्यंत तीळाचे लाडू मिळतात, ते आत्ताच, या सीझनला खाण्यासाठीच असतात.
सणांच्या निमित्ताने खाल्ले तर मनाची, वातावरणाची, परवानगी घ्यायची बिलकुल गरज नाही.
नाहीतर नंतर या मधुर सुखाच्या यातना ठरलेल्याच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.02.2017
February 4, 2017
लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.
September 3, 2016
आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे पहाणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.
December 3, 2016
१)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे.
२)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो.
३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले.
४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे.
५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये.
६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे.
तुप कोणी खाऊ नये:
स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे,
अजीर्ण,जुलाब व कफाचे विकार असल्यास तुप सेवन करू नये.
तूपसेवनाचाअतिरेक केल्यास,मळमळ,
उल्टी,जुलाब व शरीरात अवास्तव चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 24, 2017
शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते.
या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे.
काही जण समजत होते, माणूस शाकाहारी.
काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. पण "त्याच्या" नियमानुसार, ना माणूस शाकाहारी ना मांसाहारी ना मिश्राहारी.
मिश्राहारी ही अगदी सोयीस्कर पळवाट झाली.
म्हणजे उपवासाच्या दिवशी फळाहार पण करायचा आणि वडे भजी पण खायची. तसे झाले.
त्याच्या डिक्शनरीमधे मिश्राहारी हा हायब्रीड शब्दच नाही.
माणसाची वैशिष्ट्ये बघूया. म्हणजे त्याला अपेक्षित असलेले माणसाचे नियम आपोआप समजून येतील. .
शाकाहारी प्रमाणेच पाणी ओठानेच पितो, जीभेने चाटत बसत नाही.
समुहाने शांतपणे एकमेकांवर डूक न धरता जेवतो.
रोज आंघोळ करतो. पाण्याची आवड आहे.
अंगाला घाम येतो आणि शरीराचे तापमान संतुलीत ठेवायला मदतच होते.
जेवताना अगदी सावकाश जेवतो. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे वचावचा किंवा शाकाहारी प्राण्यांप्रमाणे भराभरा जेवत नाही.
खाल्लेले अन्न पुनः पचनासाठी परत तोंडात आणत नाही. रवंथ करीत नाही.
तोंडातील लाळेचे रासायनिक पृथक्करण केले असता, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते. आतड्यांची रचना, लांबी पण वेगळीच असते.
मांसाहारी प्रमाणे माणसाची नखे आत बाहेर करता येत नाही. शाकाहारी प्रमाणे स्थिर आहेत. धारदार टोकदार नाहीत. त्यामुळे नखांनी शिकार करता येत नाही.
शिकार करण्यासाठी वेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. एवढेच नव्हे तर समोरचे मांस खाण्यासाठी भाजणे, जाळणे, तळणे, शिजवणे इ.इ. वेगळ्या संस्काराची आवश्यकता पडते. खाण्यासाठी सुद्धा काटे चमचे सुऱ्या घेऊन जणुकाही लुटुपुटुचे आभासी युद्ध करावे लागते.
शिवाजी महाराजांना अफजल्ल्याचे पोट फाडण्यासाठी वेगळी वाघनखे वापरावी लागली, आणि हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताना देखील सिंहनखे धारण करावी लागली. त्यासाठी मानवरूप सोडून नरसिंह अवतार घ्यावा लागला. पण भगवंतांनी पण नियम नाही मोडला.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे. ज्याला जो नियम घालून दिला आहे, तोच नियम प्रत्येकाने पाळावा.
आणि नियम मोडला तर शिक्षा ही होणारच.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
1.10.2016
October 1, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषध काम करत नाही - भाग तीन
स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.
आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.
प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.
केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!
रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.
अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू...
औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.
हे म्हणजे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.
नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.04.2017
April 21, 2017
अष्टांग संग्रह सूत्रस्थान या ग्रंथामधे अकराव्या मात्राशीतीय नावाच्या अध्यायात श्लोक क्रमांक 64 ते 68 या मधे काय सांगितले आहे ते पाहूया. फार सुंदर आहे. त्यातील मतीतार्थ सांगतो.
" जसे रेल्वेचं इंजिन धावत असताना, त्याला इंधन जास्ती प्रमाणात लागते. इंजिन सुरू आहे, पण नुसते उभे असेल, तर इंधन कमी प्रमाणात लागते, तसेच शरीराला इंधनाची जास्ती आवश्यकता असते. पण रात्रौच्या वेळी इंधनाची फार आवश्यकता नसते."
व्यवहारातील अत्यंत समर्पक उदाहरण ग्रंथकारांनी दिले आहे. कोणत्याही यंत्राचे असेच असते. जेव्हा काम जास्ती तेव्हा इंधन जास्ती. काम नसेल तर इंधनाची गरज जास्ती रहात नाही.
समजा आपल्याला तीन चारशे किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर सुरवातीला गाडीमधे आपण इंधन पूर्ण भरून घेतो. मग लवकर रिझर्व्ह लागणार नाही. दर वीस पंचवीस किलोमीटरला दोन दोन लीटर इंधन घालत पुढे जायचे , असं करतो का आपण ? नाही ना ! मग दर दोन चार तासाने खायचे हा नियम कुठुन काढला ?
एकदा दहा माणसाना पुरेल एवढा चहा करायचा हे ठरलं तर एक एक कप चहा करीत रहायचं की एकदम दहा कप चहा करायचा ? की एक कप चहा उकळला कि त्यातच परत एक कप पाणी घालून पुनः साखर पावडर घालायची ? असं दहा वेळा करायचं ?
एकदा ठरलं की प्रश्नच संपला. तसंच जेवणाचं पण आहे. माझं आजचं काम कसं आहे, किती काम करायचं आहे, त्याला इंधन किती लागणार आहे, हे सुरवातीला (सकाळी) ठरवून घ्यायचं आणि इंधन भरायचं.
एवढं मी जेवलंच पाहिजे, नाहीतर ताकद येणारच नाही, असा नियम करून जेवू नका. कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे,
आपली कामे देखील दिवसाचीच खूप असतात. म्हणून सकाळचे जेवण जास्ती प्रमाणात घ्यावे. ज्या दिवशी कामे कमी असतील तेव्हा खाणेही कमी असावे. पण व्यवहारात नेमके उलटे घडते. जेव्हा सुट्टी असते, तेव्हाच पोटावर अत्याचार जास्ती होतात.
अगदी क्वचित रात्रपाळीला प्रश्न येईल, पण नियम तोच जेव्हा काम जास्ती तेव्हा अन्न जास्ती. आणि सूर्यास्तापूर्वी जेवण संपलेच पाहिजे. तरच उर्जा निर्माण होईल. जेव्हा रात्रपाळी असेल तेव्हा सायंकाळी जेवणाचे प्रमाण जास्त आणि सकाळी कमी जेवावे. आणि जेव्हा नियमितपणे दिवसा काम असेल तेव्हा सकाळी जेवण जास्ती प्रमाणात आणि सायंकाळी अगदी कमी जेवावे.
......म्हणजे गाडी ओव्हर लोड होत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.03.2017
March 10, 2017
मांसाहारी प्राण्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. जी खास आहेत. वैश्विक सत्य आहेत. म्हणजे जगात कुठेही गेलात तरी ही सत्य बदलत नाहीत. वाघ भारतात असो, वा बांगला देशात त्याची वैशिष्ट्ये तीच रहातात.
सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभेने पितात. जीभ खूप खरखरीत असते. जीभेला आतल्या बाजूला वळलेल्या खाचा असतात. त्यामुळे पाणी चाटले जाते. चाटलेले पाणी या खाचांमधे भरलेले रहाते. सिंह पाणी पिताना पाहिलेत. सिंहच कशाला कुत्रा, मांजर देखील असंच पाणी पितात.
यांचे दात आणि सुळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. भक्ष्य पकडण्यासाठी, खाल्लेले मांस तोडण्यासाठी, हाडे फोडण्यासाठी, सुळे आतमधे वळलेले, वर खाली दोन्ही जबड्यात असतात. या सुळ्यांना धार असते. तीक्ष्ण टोके असतात. यामुळे भक्ष्य एकदा पकडले की सहसा सुटत नाही. मगरीच्या तोंडातील दातांची रचना लक्षात घ्या.
यांना अन्न बारीक करायचे नसते. अन्न रवंथ करायचे नसते. सुळ्यांनी भक्ष्याचे तुकडे केले की अख्खे तुकडे गिळतात. म्हणून यांच्या जबड्यात दाढा कमी असतात. दाढा कमी, चावणे नाही म्हणून यांची पचन करणारी आतली अन्नपचन करणारी काही एन्झाईम्स खूप जास्ती प्रमाणात पाझरत असतात, ज्यामुळे त्या अम्लामधे मांसाचे तुकडे सहज विरघळून जातात. अजगर तर अख्खी नीलगाय गिळतो. त्याच्या पोटात एवढे तीक्ष्ण पाचकरस असतात की त्यात नीलगाईची शिंगे, हाडे, केस, दात, पायाचे खूर सगळं काही सहज विरघळून जाते. यांना शिजवणे सोडाच, जाळले तरी ते भस्म होत नाहीत, असे हे अत्यंत कठीण अवयव पोटातील पाचकरसात सहज विरघळून जातात. ईश्वराने/ निसर्गाने, त्यांना अन्नपचन करण्यासाठी केलेली ही मदतच आहे. त्यामुळे यांनी अन्नाचे तुकडे गिळले तरी सहज पचून जातात. अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर असे काही लक्षणे किंवा आजार त्यांना नसतात.
पायांची नखे देखील सुळ्यांप्रमाणे टोकदार धारदार आणि तीक्ष्ण असतात.झडप घालून भक्ष्याला पकडणे, परत सुटू नये म्हणून नखे रोवून ठेवणे, गरूड, घार, घुबडाची नखे पाहिलीत किती अणकुचीदार असतात ती !
या नखांचे आणखी एक वैशिष्ट्य. ती हलवता येतात. आत बाहेर करता येतात. भक्ष्याला पकडण्यासाठी ही रचना असते. काम झाले की फोल्डींग करून ठेवायची.
यांना अंगावर पाणी घ्यायचा खूप कंटाळा येतो.त्यामुळे ही मंडळी आंघोळ करीत नाहीत. यांच्या अंगाला खूप उग्र वास येतो. दुर्गंधी पण असते.
आवाज तर विचारूच नका. एवढा मोठा आणि भेदक असतो, की डरकाळी फोडली तरी उरात धडकी भरावी.
त्यांची नजर पण एवढी तीक्ष्ण असते, की दूरवरचे भक्ष्य देखील सहज दिसते. घारीला किती वरून जमिनीवर असलेले भक्ष्य दिसते.
आणि यांनी एकदा पोटभर खाल्ले तर पुढे आणखी काही दिवस एखादा प्राणी खायला नाही मिळाला तरी चालते. एवढे प्रोटीन्स त्यांना मिळतात की ते पुढे पुरवून पुरवून वापरता येतात. हाय प्रोटीन डाएट !
सर्व मांसाहारी प्राणी नजर रोखून ठेवत, कळपाने, समुहाने ठरवून शिकार करतील, पण शिकार खाताना एकट्या एकट्यानेच खातील, डूक धरून खातील. खाताना इतर कोणी त्याचेच भाऊबंद शिकार खायला आले तर त्यांच्या अंगावर गुरगुरतील, ओरडतील, धावून जातील. मांजराची पिल्ले, उंदीर पकडताना बघीतलंय कधी.
ईश्वराने यांची आतडी लांबीला कमीच ठेवली आहेत, न जाणो कोणता रोगट प्राणी चुकुन खाल्ला गेला, तर तो लवकरात लवकर पोटातून बाहेर पडून जावा. पुढे जाऊन त्याच्या शरीरातील रोगजंतु, किंवा टाॅक्झीन्स, खाणाऱ्याला त्रास देणार नाहीत.
ईश्वर /निसर्ग महान आहे.
.......क्रमशः ऊद्या
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
25.09.2016
September 25, 2016
दूध न देणारी गाय, शेतीसाठी निरूपयोगी ठरलेला बैल, शेरडू न देणारी शेळी, रेस हरणारा घोडा, यांना पोसून काय उपयोग? असा विचार करणारी पिढी भारतात जन्माला येतेय. हे संस्कारवान भारतीय संस्कृतीचे दुर्दैव नव्हे काय ? मग आईबाबांना देखील वृद्धाश्रमात टाकायला यांना लाज वाटेनाशी होतेय....
......आणि यात गैर ते काय ?
.......पोराच्या बोटाला धरून पाळणाघरात नेणाऱ्या आईबाबांना नंतर त्यांचे पोर हाताला धरून वृद्धाश्रमाची वाट दाखवणारच.......
.......त्यात नवीन पिढीचे काय चुकले ?
.......प्रत्येक गोष्ट पैश्यावर मोजणाऱ्यांना हीच शिक्षा योग्य आहे. असे कधीतरी वाटते.
पाश्चात्यांच्या संस्कारांना एवढे डोक्यावर बसवले की, आपले हित कशात आहे हेच कळेनासे झाले आहे.
बरे जे कोणी संस्कृतीचे रक्षण करणारे आहेत, त्यांच्यावर तथाकथित संस्कृतीरक्षक अशी उपहासात्मक पदवी देणारेही भारतीयच आहेत. प्रत्येक गोष्टीत फक्त पैसा आणि पैसाच बघणे ही पाश्चात्य वैश्यवृत्ती आहे. हा भारतीय विचार नाही, हे सुद्धा आता कळेनासे झाले आहे.
मग आम्ही भारतीय संस्कृतीरक्षक गाईला गोमाता का म्हणतो हे यांच्या कसे लक्षात येणार ? आणि मातेचे संरक्षण करायचे असते, हे यांना कोणत्या स्तरावरून समजावणार ?
उपयोगिता संपली की या जनावरांना क्रूरपणे, निर्दयपणे खाटीकखान्यात पाठवावे ?
काय म्हणावे या वैचारिक गुलामीला ?
"यांना कत्तलखान्याची वाट दाखवली तर यात गैर ते काय, यांचे पोषण करण्याच्या हट्टापायी भारतीय शेतीचे आजवर नुकसान होत आले आहे. अनुत्पादक गोष्टी तात्काळ संपवल्या पाहिजेत," असे आग्रहाने प्रतिपादन करणारे, एक महत्वाची गोष्ट विसरतात, कि भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टी ने पशुधन ही प्रेमाची गोष्ट आहे. ज्या बैलांबरोबर आयुष्यभर त्याच्या साथीने आपली उपजिवीका वाहिली, कष्ट करवून घेतले, त्यांची उत्पादकता आणि उपयुक्तता यांचा पैशात हिशोब खऱ्या भारतीय शेतकऱ्याला मंजूर नसतो.
मोठ्यामोठ्या बंगल्यात राहून भाकड पशुधनावर, विनाकारण पोषणाचा आळ ठेवत, चर्चासत्रे झोडणारे मात्र, त्यांच्या बंगल्याची राखण करणाऱ्या कुत्र्याला किंवा लळा लावलेल्या मांजराला, ती वयस्कर झाल्याने आता नष्ट करू, ठार मारू असा विचार करताना दिसत नाहीत. असे का ? (अजून तरी कुत्र्यामांजराचे मांस खायला यांनी सुरवात केली नाही म्हणून असेल कदाचित.....)
एक भाकड गाय देखील नीट नियोजन केले तर दोन माणसाचे कुटुंब पोसू शकते, हे व्यावहारिक भारतीय सत्य आहे. याचा अभ्यास आता पाश्चात्य करू लागले आहेत.
तेव्हा पाश्चात्य संस्कारांनी बुद्धी भेद करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे कि, भारतीय संदर्भ, भारतीय ग्रामीण जनतेची मानसिकता, त्यांची निरूपयोगी पशुंकडे पाहाण्याची दृष्टी, एकुण आर्थिक कुवत आणि सरकारी स्तरावरील पशुधनाची पैदास, ही इतर देशातील आकडेवारीपेक्षा, भारतीय आकडेवारीमधे आणि भारतीय मानसिकतेमधे फार वेगळे अंतर ठेवते.
दुर्दैवाने भारतातला एक मोठा वर्ग, जो पूर्णतः शाकाहारी म्हणून ओळखला जाई, त्या कुशाग्र बुद्धीतील काही जणांकडूनच आज मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे समर्थन होताना दिसत आहे.
हा बुद्धि भेद करणाऱ्यांना लवकरच सद्बुद्धी दे रे परशुरामा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
13.10.2016
October 13, 2016
नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.
माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.
आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.
नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.
नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.
तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!
चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:
शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.
नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 23, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti