
भूतकाळातील ज्ञानाचा उपयोग करुन भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमानकाळ हे उत्तम साधन असते. आम्हाला हे समजेल आणि त्याप्रमाणे आचरण घडेल तोच आमचा सुदिन…
कोणत्याही ज्ञानशाखेचा विषय निघाला की, ही शाखा आमच्या पूर्वजांना पूर्णपणें माहिती होती असें सांगणारे कांही लोक भेटतात. तर काहींचें म्हणणे असें असतें की, भारतांत असणारें ज्ञान है परभृत आहे. भारतीयांनी त्यांत स्वतःची अशी कोणतीहि भर घातली नाही. त्यांनी स्वतः काहीहि नवीन निर्माण केलें नाही. विचारांच्या या दोन्ही टोकांपैकी एकांत भारताच्या अभिनिवेशी अतिगौरवाचा भाग असतो, तर दुसऱ्यांतून न्यूनगंडाने पछाडलेल्या दुबळ्या मनोवृत्तीचें दिग्दर्शन असतें. परंतु कोणत्याहि परिस्थितीचें वास्तव ज्ञान हें प्रगतीला पोषक असतें. या वास्तवज्ञानाचा एक भाग म्हणून आज प्राचीन भारतांत असलेल्या काही विमानांचा परिचय घडविण्याचें ठरविलें आहे.
प्रथम रामायणांतील पुष्पक विमानाचा विचार करायला हवा. इतिहासाच्या पृष्ठांवर सुवर्णांकित झालेलें हेंच पाहिलें विमान आहे. याच विपुल वर्णनें रामायणांत विखुरलेली आहेत. हें दिव्य विमान मनोवेगी आणि बसलेल्याच्या इच्छेप्रमाणे गति व रूप धारण करणारें होतें. याचा आकार विस्तृत असून त्यांत सोन्यारूप्याचे स्तंभ होते. स्तंभांवर लांडग्यांची चित्रे काढलेलीं होतीं, आणि तें सर्व बाजूंनी अलंकृत केलेलें होतें. त्यांत थंडी नव्हती. उष्णताहि नव्हती. सर्व ऋतूंमध्ये तें शुभ विमान सुखावह होतें. वायुमार्गात लटकत असलेलें पुष्पक विमान म्हणजे चित्रविचित्र वस्तूंच्या समुदायाचें एक भांडारच होतें. पाहणाराचें मन तें रमविणारें होतें. शरद ऋतुतील चंद्राप्रमाणे तें निर्मल होतें. तारवटलेले डोळे असणारे, बहुभक्षक, महावेगवान् आकाशांत संचार करणारे हजारो भूतगण त्याचे वाहक होते. देवांनाहि दुर्लभ असलेल्या या विमानाचा परिचय आदिकवीच्या शब्दांतच करून घ्यायला हवा –
ज्वलनार्क प्रतीकाशौ सुकृत विश्वकर्मणा ।
हेमसोपानयुक्तंच चारूप्रवरवेदिकम् ।।
जालवातायनैर्युक्तं काञ्चनैः स्फटिकैरपि ।
इंद्रनील महानील मणि प्रवर वेदिकम् ।।
विद्रुमेण विचित्रेण मणिभिश्च महाधनैः।
निस्तुलाभिश्च मुक्ताभिस्तले नाभिविराजितम् ।।
चंदनेन च रक्तेन तपनीयनिभेन च ।
सपुष्यगंधिता युक्तमादित्य तरूणोपमम् ।।
(सुंदर. ९. १५-१८)
अर्थ – विमानाला सूर्य व अग्नि यांच्याप्रमाणे तेजस्वी अशा सोन्याच्या व स्फटिकाच्या जाळ्या व खिडक्या होत्या. त्यांत सोन्याचे जिने केलेले होते. सुंदर व उत्तम अशा बसायच्या जागा तयार केल्या होत्या. नाना प्रकारचीं पोंवळीं, महामूल्यवान् रत्नें, निरूपम मोतीं यांनी तयार केलेल्या फरशीने विमान झळकत होतें. आरक्तवर्ण आणि सुवर्णवर्ण अशा सुगंधी चंदनाने युक्त असलेलें हें विमान बालसूर्याप्रमाणे तेजस्वी होतें.
“विमानांत वैडुर्य रत्नांचे, रूप्याचे व पोवळ्याचे पक्षी केलेले होते. विविध द्रव्यांनी विविध प्रकारचे भुजंग बनविलेले होते. शुभ अवयवांनी युक्त असलेले घोडे तयार करून त्यांत बसविले होते. पक्ष्यांच्या पंखांवर पोवळ्याचीं व सुवर्णाची फुलें काढलीं होतीं. ज्यांनी आपले वक्र पंख लीलेने संकुचित आहेत अशा प्रकारचे कामोद्दिपक पंख असलेले पक्षी तिथे तयार केले होते. त्यांच्या चोची सुंदर होत्या. लक्ष्मीला अभिषेक करीत असलेल्या हत्तींचीं चित्रें विमानांत काढलीं होतीं. हत्तींच्या सोंडांमध्ये कमलकेसर होतें (सुंदर. ७. १२-१४).
वाल्मीकीने या विमानाच्या वर्णनाबरोबर त्याचा इतिहासही दिला आहे.
तो इतिहास मुळांतूनच उद्धृत केलेला बरा –
ब्रम्हणोऽर्थे कृतं दिव्य दिवी यद्विश्वकर्मणा ।
विमानं पुष्पकं नाम सर्व रत्नविभूषितम्।।
परेण तपसा लेभे यत्कुबेर पितामहात्।
कुबेर मोजसा जित्वा लेभे तद्राक्षसेश्वरः।।
(सुंदर ९. ११-१२)
अर्थ – हें पुष्पक नांवाचें विमान सर्व रत्नांनी विभूषित झालेलें आ होतें. हें दिव्य विमान पूर्वी विश्वकर्म्याने स्वर्गामध्ये ब्रम्हदेवाकरिता तयार केलेलें होतें. हें ब्रम्हदेवापासून कुबेराला घोर तपश्चर्या केल्यानंतर प्राप्त झालें होतें; परंतु राक्षसाधिपती रावणाने स्वपराक्रमाने कुबेराला जिंकून त्याच्याकडून तें घेतलें.
या इतिहासाला हवा असलेला प्रत्यंतरपुरावाहि मिळतो. सीतेने आपल्याला वश व्हावें म्हणून रावणाने आपल्या पराक्रमाचे पोवाडे तिच्यापुढे गायिले आहेत. त्यांतीलच हें एक निवेदन आहे.
पुष्पकं नाम सुश्रोणि भ्रातुर्वैश्रवणस्यमे ।
विमानं सूर्यसंकाशं तरसा निर्जितं रणे।।
विशालं रमणीयंच तद्विमानं मनोजवम् ।
तत्र सीते मया सार्धे विहरस्य यथासुखम् ।।
अर्थ – हे सुंदरी! मी आपल्या वैश्रवण नावांच्या भावाचें सूर्यासमान तेजस्वी असलेलें विमान संग्रामांत स्वसामर्थ्याने जिंकून आणलें आहे. आणि तें विमान विस्तृत व रमणीय असून त्याची गति मनाप्रमाणे शीघ्र आहे. याकरिता हे सीते, त्या विमानामध्ये माझ्यासह यथेष्ठ क्रिडा कर.
रावणाने कुबेराबरोबर केलेल्या युद्धाचा वृत्तान्तहि उत्तरकांडांत (अध्याय १५) आला आहे. प्रस्तुत त्या स्थळीं इतिहासाचा वृत्तान्त देणे अस्थानी ठरेल. केवळ पोषक पुरावा म्हणून याची नोंद करीत आहे.
रामचंद्राने रावणाचा पराभव केला, अर्थातच हे विमानहि नंतर रामाकडे यायला हवे. परंतु शोषणरहित साम्राज्याची कल्पना रामचंद्रांच्या मनात असल्याने ते विमान बिभीषणाकडेच राहिले. विभीषण कृतघ्न नव्हता, कृतज्ञ होता. लंकाविजयानंतर रामचंद्र अयोध्येला जायला निघाले असता बिभीषणाने त्यांच्या सेवेसाठी हे विमान आणून दिले. त्या वेळी ते शृंगारलेले होते. त्यावर शेतपताका व ध्वज लावलेले होते, घुंगुरांच्या माळांनी ते वेढून टाकले होते. (युद्ध. १२१. २३-२९). सुग्रीव, बिभीषण आणि अमात्यांसह राम त्या विमानांत आरूढ झाले. सर्वांचें आरोहण झाल्यावर, रामाने अनुज्ञा दिल्यावर मोठी गर्जना करीत तें उत्कृष्ठ यान आकाशांत उडालें. विमान आकाशांत गेल्यावर रामाचेंहि चित्त प्रफुल्लित झालें. राम भरताच्या आश्रमानजीक आले. तिथे सर्वांसह विमानांतून खाली उतरलें. नंतर त्या अनुपम विमानाला उद्देशून रामचंद्र म्हणाले, “वैश्रवण राजाला तूं नेत जा, मी तुला अनुज्ञा देतों.” रामाची आज्ञा होतांच पुष्पक विमान कुबेराकडे चालतें झालें. परंतु त्या श्रेष्ठ वैश्रवणाने पुष्पकाला रामाच्या सेवेसाठी पुनरपि पाठविलें. या वेळी रामचंद्र म्हणतात, “हे श्रेष्ठ विमाना, असें असेल तर तुझें स्वागत असो. कुबेराची संमति असली म्हणजे आमच्यावर वर्तनासंबंधी दोष येणार नाही.” आदर्श राजा आणि त्याची प्रजा यासंबंधांतील आणि साम्राज्यसंस्थापक रामचंद्राच्या वर्तनांतील ही एक लक्षणीय बाब आहे. आजहि ती आचरणीय आहे. धर्म ही आचरणाची बाब असते हें रामचंद्रांनी प्रत्यक्ष दाखवून दिलेलें आहे. आणि म्हणून सहस्त्रो वर्षे लोटली तरी रामराज्याचा आदर्श नष्ट होत नाही.
रामायणानंतर भारत-भागवतांतील विमानांचा विचार ओघानेच येतो.
मायावी विमान “सौभ”
शिशुपाल असावध असतांना, युद्धाच्या विचारांत नसतांना, श्रीकृष्णाने त्याला ठार केलें, असा शालवाने श्रीकृष्णावर आरोप केला. आणि या गोष्टीचा सूड घेण्याचा तो विचार करूं लागला. श्रीकृष्ण राजसय यज्ञासाठी पांडवांकडे गेला आहे, ही संधि साधून शाल्वाने आपल्या मायावी विमानाच्या साह्याने द्वारकेवर स्वारी केली. या विमानाचें नांव सौभ असे आहे. हें विमान नगराकार असून (३. १४-२) त्याची रचना मेरूपर्वताच्या शिखराप्रमाणे होती. (३. ३२-४०). गदाग्रज माधवाने सुदर्शनचक्राच्या साह्याने प्रथम सौभाचा नाश केला आणि नंतर या देवद्रोही दानवाचें शिर त्याने धडावेगळे केलें. श्रीकृष्णाच्या अनुपस्थितीत द्वारकेच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या केशवनंदन प्रद्युम्नाचा आणि कपटयुद्धांत प्रवीण असलेल्या शाल्वाचा घनघोर संग्रामहि महाभारतांत वर्णिला आहे. स्वगर्वाने प्रमत्त झालेला शाल्व कांही काळ विमानांतून उतरून प्रद्युम्नाशी लढला. पण त्याच्यापुढे काहीं चालत नाही, अर्से कळून चुकल्यावर तो पुन्हा विमानाश्रित होऊन आकाशांत गेला. प्रद्युम्न त्याला कंठस्नान घालणार तोंच वासुदेवाने त्याला आवरले. कारण श्रीकृष्णाच्या हातून शाल्वाला गति मिळणार होती. यासंबंधीची एवढीच माहिती महाभारताने पुरविली आहे. (३. १४-२०). इथे शिशुपालाला शाल्वाचा बंधु असें म्हटलें आहे (३. १४-१३). पण या विमानासंबंधी अधिक माहिती भागवतकारांनी दिली आहे (१०. ७६). ही माहिती देत असतांना भागवतकार शिशुपालाला शाल्वाचा सखा असें म्हणतात (१०.७६-२) हें नजरेआड करता येत नाही. भारत-भागवताचा डोळस अभ्यास हा या लेखाचा विषय नाही म्हणून त्याची इथे चर्चा करीत नाही.
भागवतमतें श्रीकृष्णाच्या नाशासाठी शाल्वाने शिवाराधना चालविली. आराधनेच्या कालांत शाल्व रोज केवळ एक मुठभर माती खाऊन राहत असे. त्याची ही घोर तपश्चर्या पाहून आशुतोष द्रवला, आणि त्याच्यापुढे साकार झाला. साकारलेल्या शिवाला पाहून अमंगल हेतु मनांत वागवणारा शाल्व शिवाला म्हणाला
देवासुरमनुष्याणां गंधर्वोरगराक्षसाम् ।
अभेद्यं कामगं वव्रे स यानं वृष्णिभीषणम् ।।
(१०. ७६-६)
“देव, असुर, मनुष्य, उरग, राक्षस, इत्यादि सर्वास ज्याचा भेद करिता येणार नाही, असें एक अद्भुत विमान मला दे ठीक आहे” असें शिवाने सांगितल्यावर शाल्वाने मयासुराकडून एक पोलादाचें भलें मोठें अभेद्य विमान तयार करवून घेतलें. आपली तपश्चर्या फळाला आली म्हणून शाल्वाला आनंद झाला.
या संदर्भात कृष्णदयार्णवांची हरिवरदा ही भागवताच्या १० व्या अध्यायावरील रसाळ टीकेंत दयार्णव म्हणतात
मनुष्य अथवा असुर देव।
उरग राक्षसगण गंधर्व ।।
भूत प्रेत पिशाचें सर्व।
अभेद्य अपूर्व जें यांसी ।।
इंद्रादिकांच्या वज्रप्रहारी।
भंगिलें न वचे जें कां समरीं ।।
असुरविद्या मायिकांसी।
घायी कठोरी न भेदवे ।।
जें न भेदवे महाराक्षसां ।
न जळे महासर्पाच्या विषा ।।
भूत-प्रेतांची कोण दशा ।
जे अभेद्य मनुष्य गंधर्वा ।।
जयाची गति लोकत्रयी।
सवेग जाय चिंतिलें ठायीं ।।
वृष्णियादवा भयंकर पाहीं ।
तें यान देई मज शंभो ।।
(७६. ४०-४३)
आता शाल्वाच्या अशिव हेतूंना घुमारे फुटूं लागले. विमानाच्या साह्याने आपलें मनोरथ पूर्ण होणार हें सुखस्वप्न तो जागेपणींच पाहू लागला. विमानाचा तपशील पुरवितांना भागवतकार म्हणतात, “हें विमान बसणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे वाटेल तिकडे जात असे. दुसऱ्या माणसाची हालचाल समजून घेई, पण हें मात्र कोणासहि दिसत नव्हतें.” कृष्णदयार्णव म्हणतात, “याचा वर्ण शर्वरवत् होता” (७६-४८). या विमानांत बसून शाल्वाची स्वारी वृष्णीवर हल्ला करण्यासाठी द्वारकेकडे निघाली. शाल्वाने प्रथम नगरीला वेढा दिला. भोवतींच्या बागांचा विध्वंस केला. शहरांतील राजवाडे, गोपुरें, गच्च्या नष्ट करविल्या आणि आपण स्वतः विमानांत बसून दगड, वृक्ष, सर्प, गारा, खड्ग इत्यादींचा मारा करूं लागला. या भयंकर वर्षावाने द्वारका दुःखाने आक्रंदूं लागली. त्यातच शाल्वाने वाय्वास्त्राचें स्मरण केल्याने चोहोकडे झंझावात सुटला. दाही दिशा धुळीने भरून गेल्या. अशा तऱ्हेने गगनगर्भी चंचलतर विमानामुळे कृष्णाचें नगर भंगूं लागलें. अशा या अगतिक अवस्थेत सर्व लोक राजवाड्याकडे निघाले. राजवाड्यांत आलेल्या लोकांना प्रद्युम्नाने दिलासा दिला. प्रद्युम्नाचा पराक्रम पाहून शत्रूही त्याचे कौतुक करू लागले. नंतर प्रद्युम्न शाल्वावर चालून गेला. प्रद्युम्नाने पराक्रमाचा परमार्थ गाठला तरी त्याला सौभविमान नष्ट करता आलें नाही. विमान नष्ट कां करता येत नव्हतें याचीं भागवतकारांनी पुरविलेलीं कारणें प्रथम देऊन त्यावरील कृष्णदयार्णवांची टीकाहि देणार आहे. भागवतकार म्हणतात, “इतका रणकल्लोळ माजला तरी शाल्वाच्या सौभ विमानाचा नाश कसा करावा हें त्याला (प्रद्युम्नाला) सुचेना. बराच वेळ तो विचार करीत होता. हें विमान घटकेंत एकच आहे असें दिसत असे तर दुसऱ्या घटकेंत त्याची अनेक रूपें प्रकट होत. क्षणांत ते दृष्टीं पडे तर क्षणांत अदृश्य होई. केव्हा भूमीवर आहे असें वाटे तर केव्हा आकाशांत भ्रमण करीत आहे असें वाटे. कधी पर्वतावर दृष्टीगोचर होई तर कधी नदीच्या पाण्यांत आहे असा भास होई. याप्रमाणे अग्नीच्या कोलतीप्रमाणे तें चोहोकडे फिरत होतें. कृष्णदयार्णवांच्या भाषेच्या सामर्थ्याचें सौंदर्याचें सूचन घडविणारी आणि भागवतकारांचें हृदयाविष्करण करणारीं हीं सूक्तिसुमनें म्हणून आपण हरिवरदाकडे वळले पाहिजे. ही टीका सांगते.
तंव ते चंचल अत्यंततर। नोहे स्थिर पळमात्र।।
गगनीं पवन अवनीं जीवनीं ।
अनेक रूपें दिसतीं नयनीं ।।
एक किंवा अनेक म्हणोनी ।
निश्चय कोणी करूं न शके ।।
क्षणैक दिसे क्षणैक न दिसे।
दूर समीप व्यथावकाशें ।।
तर्किलें न वचेंचि मानसें ।
चांचल्यवशें चमत्कृत ।।
क्षणैक भूतलवर्टी दिसे।
क्षणैक गगनगर्भी आभासे ।।
क्षणैक पर्वतमौळी वसे ।
क्षणैक विलसे सिंधुजळीं ।।
कोलती आंधारी गरगर ।
भवंडिता भासे चक्राकार ।।
न दिसे सांधा भिन्नपदर ।
तैसे सर्वत्र सौभ दिसे ।।
(७६. १३५-१४०)
“त्रिपुरा” विमान
सौभ विमानाप्रमाणेच त्रिपुर विमानांनी भागवत महापुराणाची शोभा वाढविली आहे. या त्रिपुर विमानांची माहिती सातव्या स्कंधाच्या दहाव्या अध्यायांत आली आहे. एकदा अचानक मयासुर आणि भागवान् शिव यांच्यांत युद्ध जुंपलें. समस्त दानवसेना मयामागे उभी होती. मयासुर श्रेष्ठ शिल्पशास्त्रज्ञ आणि मायावी म्हणून प्रसिद्ध होता. श्रीकृष्णाच्या सहाय्याने देवांनी दानवांवर विजय मिळवला. ही गोष्ट दानवांच्या मनांत काट्याप्रमाणे सलत होतीं. दानवांनी मयासुराकडून तीन विमानें तयार करवून घेतली. ही तीन विमाने लोखंड, चांदी व सोने या धातूंपासून बनविलेली होतीं. त्यांचा आकार मोठमोठ्या नगरांप्रमाणे होता. त्यांची गति मनाला मागे टाकणारी होती. युद्धासाठी तयार केलेल्या या वायुयानांमध्ये अमाप युद्धसाहित्य होतें. या विमानांचें चलनवलन कोणालाही दिसत नव्हते. यांत बसून असुरसेनापति युद्ध करूं लागले. त्यामुळे देवादिकांचा संहार होऊं लागला. अबाधगतीच्या अदृश्य विमानांमुळे दैत्य सबल होऊन देव निर्बल होऊं लागले. त्यांची शक्ती कुंठित होऊं लागली होती. देवही अनेक विमानांत बसून लढत होते, पण त्रिपुरांच्यापुढे त्यांचा पाड लागेना. देवांचे सारे प्रयत्न विफल होऊं लागले. त्रिपुर विमानें क्षणात देवलोकांत जात असत तर क्षणात यक्षनगरीत पोहोचत असत. त्यामुळे हीं विमानें देवांच्या सर्वनाशाचे कारण ठरूं लागलीं. या विमानांमुळे त्रस्त झालेले इंद्रादि लोकपालांसह सर्व देव शिवाला शरण गेले, आणि एकमुखाने म्हणाले,“आम्ही तुझे म्हणवितों, आमचें तूं रक्षण कर.” शिव त्यांच्या प्रार्थनेने द्रवून गेला. त्याने आपल्या बाणांनी हीं पुरें नष्ट केलीं, बाणांच्या स्पर्शाने पुरांप्रमाणेच आंतील सर्व असुरहि गतप्राण झाले. महामायावी मयासुराने गतप्राण झालेल्या असुरांना उचललें आणि अमृतकूपांत टाकलें. अमृताचा स्पर्श होतांच सर्व असुरांना नवजीवन मिळालें. तें वज्राप्रमाणे महाबलवान् बनले. आपला संकल्प व्यर्थ गेला म्हणून शिव चिंताग्रस्त झाला. विष्णूने शिवाची खंत जाणली आणि त्याने तत्काळ गोरूप धारण करून सर्व अमृत प्राशन केलें. अमृताचा अखंड झरा नष्ट झाल्यावर शिवाने पुन्हा त्या सर्वांचें निर्दाळण केलें.
ऋग्वेदकालीन पुरावे
रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथांमधील विमानांचीं विवेचनें पाहिल्यावर त्यांचा इतिहासाचा थोडा मागोवा घेण्याची इच्छा होणें स्वाभाविक आहे. विमान या शब्दाचे कोशगत अर्थ अनेक आहेत. मंदिरांवरील गोपुरांनाहि विमान असेंच म्हणतात. पण आपल्याला केवळ आकाशसंचारी यानांचाच विचार करायचा आहे. याच्या प्राचीनतेचा धांडोळा घेतांना ऋग्वेदांतील एक ऋचा उद्धृत करून (१-११६) भारतीय संस्कृतीचे व्यासंगी अभिमानी कै. बाळशास्त्री हरदास आपल्या “वेदांतील राष्ट्रदर्शनें” या ग्रंथांत म्हणतात, “या ठिकाणी असलेलें वर्णन विमानाशिवाय दुसऱ्या कशाचेंहि असूं शकत नाही.” प्राचीन भारतीय साहित्यांतील विमानासंबंधीच्या सर्व पुराव्यांचे आलोडन करून श्री. रामचंद्र दीक्षितार म्हणतात, “कांही लेखक संशय प्रगट करून असें विचारतात की, हें खरें असेल काय? पण या संबंधातील पुरावा तर अगणित आहे.” ऋग्वेदकाळापासून ज्ञात असलेली ही विमानविद्या मध्यंतरींच्या काळांत लोप कां पावली असा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर भोजाच्या समरांगण सूत्रधार या ग्रंथांत मिळतें. याने विमानाचें वर्णन केलेलें आहे तें असें – वजनांत हलक्या असणाऱ्या लाकडाचे, दृढ व सुश्लिष्ट बांधणीचें विमान तयार करून त्याच्या आंतील भागांत अग्नि पेटवून ठेवावे. या विमानांत बसलेला पुरुष विमानाच्या दोन पारदरसाचें यंत्र ठेवावें. त्याला खालून उष्णता देणारे अग्नीचे यंत्र अग्नि पेटवून ठेवावे. या विमानांत बसलेला पुरुष विमानाच्या दोन पंख्यांनी गति उत्पन्न केल्यावर आंत असलेल्या पारदरसाच्या शक्तीने सर्वांना आश्चर्यात टाकीत दूर आकाशांत भ्रमण करतो. याचप्रमाणे वजनांत हलक्या असणाऱ्या लाकडाचें मंदिरतुल्य विमान चतुर पुरुषाने शास्त्रीय पद्धतीने तयार करावें आणि त्याच्या आंत पारदरसाने भरलेले उत्तम कुंभ ठेवावे. कपालाकृति लोखंडाच्या भांड्यांत ठेवलेल्या, मंद अग्नीने तापलेल्या पारदरसाच्या गुणाने आणि तापलेल्या व गर्जना करणाऱ्या पारदरसाच्या शक्तीने तें विमान आकाशांत हिंडूं लागतें. लोखंडी, वेगवेगळे अवयव जोडलेलें असे विमान पारदरसाने भरून, तो रस व्यवस्थित तापविला म्हणजे तें विमान सिंहासारखा मोठा आवाज करीत जातें. इतके वर्णन देऊनहि विमानें कशीं तयार करावींत तें लिहिलेलें नाही. याचें कारण विमानविद्येसंबंधी अज्ञान हें नसून, प्रायोगिक ज्ञान गुह्य हें राखले पाहिजे हें आहे. समरांगण-सूत्र हेंच यांत प्राधान्याने असल्याने त्यासंबंधीची गुप्तता राखणें भाग असतें. नाही तर आपलीच विद्या शत्रूच्या हाती पडून आपले मरण आपल्याच हाताने ओढून घेतल्यासारखे होतें; परंतु भारद्वाजाने यंत्रसर्वस्व नामक ग्रंथांत या विद्येच्या रहस्यांचे उद्घाटन केले आहे. या ग्रंथांतील सूचनांच्या आधारावर इ.स. १८९० साली मुंबईमध्ये विमान तयार केलें गेलें आणि त्या विमानानें अवकाशांत उड्डाणहि केलें होतें अशी नोंद “प्राचीन भारतीय साहित्यकी सांस्कृतिक भूमिका” या ग्रंथांत डॉ. रामजी उपाध्याय यांनी केली आहे (पृ. ११०६).
अगस्त्य नावाचा एक शिल्पशास्त्रज्ञ दक्षिणेंत होऊन गेला. त्याने अगस्त्य संहितेंत विमानें तयार करण्याची कृति दिली आहे. असे “हिंदी शिल्पशास्त्र” (पृ. ३२) या ग्रंथाचे कर्ते श्री. कृ. वि. वझे यांनी म्हटलें आहे.
आतापर्यंत आपण विमानांच्या वर्णनांचा आणि त्याच्या इतिहासाचा स्थूल आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मध्ययुगांतील काळांत आमचा बौद्धिक कस इतका कमी झाला की, प्राचीन काळी भारतांत विमाने होतीं या गोष्टींवर विश्वास ठेवायलाहि आमचें मन तयार होईनासें झालें. परंतु काहींनी या पूर्वदिव्याच्या जोरावरच आपला भावी काल रम्य करण्याचा प्रयत्न केला. पण आज पुन्हा आपण अतीताच्या बाबतींत करंटे बनत चाललो आहोत. भूतकालीन ज्ञानाचा उपयोग करून भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान कालासारखें उत्तम साधन नसतें. परंतु हें आम्हांला सुचेल आणि तसें आचरण घडेल तोच आमचा सुदिन होय.
-रा. शं. नगरकर
व्यास प्रतिभा दिवाळी २०१५ मधून साभार….
(साभार : सह्याद्री दिवाळी अंक, १९७०)