वाऱ्यावरची वरात

मी नाटकाचे दौरे किंवा इतर काही कार्यक्रम नसले की, रोज अभिषेकी बुवांच्या घरी जात असे. ‘लाडकी लक्ष्मी’ नाटकाच्या गोव्याच्या दौऱ्यात एक दिवस सुट्टी होती. माघी पौर्णिमेचा दिवस. मंगेशीला मोठा उत्सव असतो. रात्रभर जागरण, पहाटे रथोत्सव. खूप उत्साही वातावरण असतं. आम्ही मंगेशीचे महाजन. आमचा मुक्काम मंगेशीहून जवळच्याच माशेल गावात होता. मी मंगेशीला पोहोचलो. म्हटलं, गोव्यात आहोत तर उत्सव पाहुया. बुवांच्या तिथल्या घरी गेलो. म्हटलं आई, भाऊला भेटावं. बघतो तर काय प्रत्यक्ष अभिषेकी बुवाच !



मी नाटकाचे दौरे किंवा इतर काही कार्यक्रम नसले की, रोज अभिषेकी बुवांच्या घरी जात असे. ‘लाडकी लक्ष्मी’ नाटकाच्या गोव्याच्या दौऱ्यात एक दिवस सुट्टी होती. माघी पौर्णिमेचा दिवस. मंगेशीला मोठा उत्सव असतो. रात्रभर जागरण, पहाटे रथोत्सव. खूप उत्साही वातावरण असतं. आम्ही मंगेशीचे महाजन. आमचा मुक्काम मंगेशीहून जवळच्याच माशेल गावात होता. मी मंगेशीला पोहोचलो. म्हटलं, गोव्यात आहोत तर उत्सव पाहुया. बुवांच्या तिथल्या घरी गेलो. म्हटलं आई, भाऊला भेटावं. बघतो तर काय प्रत्यक्ष अभिषेकी बुवाच !

त्यांचे सासू-सासरे गोवा पहाण्यासाठी आले होते. मला बुवा म्हणाले, ” तुम्ही इथे कसे? ” मग सगळी हकीकत सांगितली. ( बुवा माझ्याशी बोलताना मराठीत आणि कोकणीत बोलत. मराठीत अहो जावो आणि कोकणीत अरे तुरे!) दुसऱ्या दिवशी आमचा बेळगावला प्रयोग होता. बुवांनी विचारलं, ‘नंतर तुम्हाला काही काम आहे का मुंबईत? ”

म्हटलं, “नाही.

“मग असं करा. बेळगावचा प्रयोग झाला की इकडेच या. या दोघांना दाखवून पाठवून देऊ. आणि आपण राहू आठवडाभर.

यावर हो म्हणण्यापलीकडे काही करण्याचीच गरज नव्हती. मी बेळगावहून परत मंगेशीला आलो. मी न पाहिलेली काही ठिकाणं मला पहायला मिळाली. त्यात सावई वेरे या गावातील अनंताचं अतिशय सुंदर मंदिर पहायला मिळालं. नंतर आठ दिवस बुवांच्या सहवासात कसे गेले कळलंच नाही.

मुंबईला परत आल्यावर नित्यनेम सुरू झाला. एकदा सकाळी मी बुवांकडे गेलो. थोड्या वेळाने चक्क भाई (पु. ल . ) आणि सुनिताबाई जोडपं हजर झालं. गप्पाटप्पा झाल्यावर भाई जायला निघाले.

आहे.” तेव्हा मी त्यांना म्हटलं, “भाई, मला तुमच्याकडे एकदा काम करायचं ”

‘अगोदर का नाही बोललास, तुला ‘वटवट’मध्ये घेतला असता.

मी म्हटलं, “जाऊदे. पण हे लक्षात ठेवा.’ तेव्हा म्हणाले, “छोटं काम असलं तर करशील? ” त्यांनी ‘वासवदत्ता’ नाटक पाहिलं होतं.

मी हो म्हटलं. “अगदी दोन ओळीचं जरी काम असलं तरी करीन. पण तुमच्या हाताखाली काम करायचं आहे. ”

बरं म्हणून निघून गेले.

थोड्या दिवसांनी ‘चंद्रलेखा’चा निर्माता मोहन वाघ माझ्या घरी. त्याला बघून मी आश्चर्यचकित झालो. मोहन म्हणाला, “मी भाईंच्या ‘वाऱ्यावरची वरात’चे हक्क घेतले आहेत. त्या प्रयोगात तुला छोटी भूमिका द्यायची असं भाई मला बोलले आहेत.” माझा आनंद गगनात मावेनासा झाला. लालजी देसाई जी भूमिका करत होते त्यासाठी भाईंनी माझी शिफारस केली होती.

मोहन म्हणाला, “तुझ्या नाईटचं काय? ”

मी म्हटलं, “मी नाईटसाठी काम करतच नाहीये. भाईंनी माझं नाव सुचवणं हीच फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ”

१९७१ सालचा शेवटचा महिना. आम्हाला पंधरा दिवस पुण्यात राहून तालमी करायच्या होत्या. युद्धाचे दिवस होते. बालगंधर्वला मुक्काम. सकाळी नऊ ते एक तालीम, एक ते दोन लंच आणि दोन ते सहापर्यंत पुन्हा तालीम असा दिनक्रम होता. भाईंचं काम वसंतराव देशपांडे करणार होते. फक्त श्रीकांत मोघे (‘याहू’ फेम ) हा मूळ संचातला होता. बाकी सर्व चंद्रलेखाचे कलाकार होते. आशालता वाबगांवकर होती. वसंतरावांपासून ढोलकीवाल्यापर्यंत भाई तालीम घ्यायला उभे रहायचे.

पंधरा दिवसात भाईंनी नव्वद टक्के नाटक बसवलं. नेपथ्य, कपडेपट वगैरे जबाबदारी निर्मात्याची. उरलेलं दहा टक्के नाटक बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी इथे बसवलं. डिसेंबरच्या शेवटी शेवटी नाटक रंगमंचावर आलं.

‘रेव्हू’ या एका नवीन नाट्यप्रकाराची ओळख झाली. गाण्याचं विडंबन (विटंबना नव्हे) कसं करायचं हे प्रत्यक्ष भाईंकडून शिकायला मिळालं. मला काम असं फारसं काही नव्हतं. परंतु वसंतरावांपासून ढोलकीवाल्याची तालीम पहाणं हाच एक मोठा अभ्यास होता. भाईंनी स्वतः त्याचे अनेक प्रयोग केलेले असल्यामुळे त्याची नस नस त्यांना माहिती होती. त्यामुळे केव्हा कुठे काय करायचं, कसं करायचं याचा पक्का आराखडा त्यांना माहीत होता.

कर्फ्यू असल्यामुळे सहानंतर आम्ही सगळे बालगंधर्वला परत येत असू. कधी कधी भाई आमच्याशी गप्पा मारायला येत. चिंतामणरावांच्या कंपनीतील गोष्टी, ‘नाट्यनिकेतन’, ज्योत्स्नाबाई भोळे, मो. ग. रांगणेकर यांच्याबरोबरचं कंपनीतील आयुष्य, नाटकातली स्वगतं! ते पंधरा दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातील सोन्याचे दिवस होते.

पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे होता. भाई आणि सुनिताबाई दोघेही पहिल्या रांगेत प्रयोग पहायला बसले होते. प्रयोगाच्या आधी सर्वांना भेटायला रंगमंचावर आले. नमस्कार चमत्कार झाल्यावर सर्वांना शुभेच्छा दिल्या.

सुनिताबाई वसंतरावांना म्हणाल्या, “वसंतराव, मी समोर बसणार आहे. जर डोळ्यांच्या कोपऱ्यातून माझ्याकडे पाहिलं तर जीभ काढून दाखवीन !” हिंदीमध्ये ज्याला कनखियोसे देखना म्हणतात. तसं पाहण्याची वसंतरावांना सवय होती. त्याला उद्देशून त्या तसं म्हणाल्या असाव्यात.

प्रयोग सुरू झाले आणि प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल ! पुण्याच्या बालगंधर्वमध्ये तर एकापाठोपाठ एक असे दोन दोन प्रयोगही हाऊसफुल्ल व्हायचे. या नाटकाचे पुणे, मुंबई, नाशिक पलीकडे फारसे प्रयोग झाले नव्हते. ते यावेळी झाले. नागपूर, विदर्भ दौरा, कोकण, गोवा दौरा असे अनेक दौरे झाले. प्रयोगाचा मुख्य भार वसंतरावांवरच होता. त्यामुळे तीन प्रयोगांनंतर एक विश्रांती असायची. वसंतरावांकडून दौऱ्याच्या वेळी गप्पा, गाणी, किस्से ऐकणं हाही एक आगळावेगळा अनुभव होता. शिरप्याच्या बापाची साक्ष, मुंबईची सकाळ ते आपल्या पद्धतीनं अतिशय सुंदर रंगवीत. पूर्वीची ‘वरात’ जशी होती तशीच्या तशी ती आमच्यापर्यंत भाईंनी पोहोचवली. फरक फक्त एका शब्दाचा. पूर्वरंगामध्ये लेखक बेगडेवाडी या गावाला प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचतो तो प्रसंग. त्याची ओळख करून देताना मूळ वाक्य असं होतं, ‘ह्ये धेसपांडे, साहित्यिक हायेत.’ नंतर बदल झाला, ‘ हे धेसपांडे ह्ये गानारे हाईत.’ बाकी सगळं जसं होतं तसंच. बदल करायची गरजच पडली नाही. त्यानंतर चंद्रलेखानं ‘ वरात’च्या दोन – तीन आवृत्त्या काढल्या. त्याचं कसं काय स्वागत झालं कोण जाणे?

Author