प्रत्येक घरात स्वत:ला जाणे शक्य नाही म्हणून ईश्वराने आई निर्माण केली. स्त्री-पुरुष प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी त्याला काही पुरुषांमध्ये मातृहृदय टाकावे लागते. त्याच्या आदेशानुसार त्यातले काही संतमहात्मे बनून जगाच्या कळवळा घेऊन पृथ्वीवर अवतरतात, तर काही प्रपंच करण्यासाठी येतात. प्रपंच करीत असले तरी त्यांची कळवळ्याची जाती संतांप्रमाणेच असते. माझे बाबा त्यांच्यापैकी एक हे निश्चित.
संन्यस्ताची विरक्ती, तत्त्वज्ञाची तत्त्वनिष्ठा, विचारवंताची चिंतनशीलता आणि मातेची वत्सलता या सर्व गुणरसायनांनी परिप्लुत असलेले माझे बाबा! एका गरीब शिक्षकाच्या घरात त्यांनी पंच्याऐंशी वर्षांपूर्वी जन्म घेतला. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत करीत ते मोठे झाले. इतके मोठे झाले की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विशाल वटवृक्षाच्या छायेत जीवनप्रवासातील अनेक पांथस्थ विसावले. असे माझे बाबा !
अशा माझ्या बाबांच्या जीवनपर्वाचे उत्तरायण सुरू झाले. संजीवन हॉस्पिटलच्या आय.सी.यू.मधे बाबांना अॅडमिट केले गेले. गेल्या दोन-चार दिवसात त्यांचे खाणेपिणे जवळपास बंदच झाल्यासारखे होते.
बिछान्यावर उठून बसणे, हाताने त्यांच्या लाडक्या होमिओपथीच्या गोळ्या घेणे हेदेखील त्यांना दुरापास्त झाले.
“बाबा ! ऐका माझं, तुम्ही काही घेतलं नाहीत तर जबरदस्तीनं दवाखान्यात न्यावं लागेल. मग सलाईन लावतील. चालेल का तुम्हाला?
“मी हे निक्षून सांगितले तेव्हा ते नेहमीप्रमाणेच म्हणाले, “नको, नको ! मला दवाखान्यात जायचे नाही. जे काही व्हायचे आहे ते इथंच घरात होऊद्या. माझं जाणं आता लांबवू नका.
एखाद्या नवख्या माणसाला हे बोलणे विचित्र किंवा भित्रेपणाचे वाटू शकते; पण बाबांची मनोरचनाच वेगळी होती. विलक्षण ताकदीची. ‘जगण्याचं प्रयोजन पूर्ण झालं आहे. आता इच्छेप्रमाणे पैलतीरी जाणं हेच एकमेव ईप्सित उरले आहे. आता थांबणं नको. शरीराला असहाय स्थितीत टिकवून ठेवणं नको. तू डॉक्टरांच्या मदतीनं हा प्रयत्न करणार असशील तर मला तो डॉक्टरही नको अन् औषधही.” औषधांना नकार देण्यामागची त्यांची भूमिका मला व घरातल्या सर्वांना माहीत होती; पण त्यांना आमच्यातून निघून जाण्याची घाई असली तरी मला ती असणे कसे शक्य होतं? पण त्यांच्या वृध्दापकाळी प्रौढ वयातील मला त्यांचा इतका धाक वाटत होता. त्यामागे त्यांची कनखर वृत्ती, त्यांच्याबद्दल वाटणारा असीम आदर हीच कारणे होती आणि कुठेतरी स्वतःच्याही नकळत मीही मनाशी हे ठरवले होते की त्यांच्या बाणेदार, स्वाभिमानी जगण्यासारखाच त्यांचा मृत्यूही असायला हवा. त्यांचे मरण छान असायला हवे. त्यांची ती इच्छा पूर्ण करणे माझ्या हातात नव्हते मुलगी म्हणून शक्यही नव्हते. पण ती घटिका येईल तेव्हा किमान ते घरात असावेत, त्यांची आवडती माणसे त्यांच्याजवळ असावीत अन् त्यांनी शांतपणे एखाद्या ज्योतीसारखे मालवून जावे. त्यांची ही इच्छा मी नाही तर कोण पुरवणार होते?
बाबांना आय.सी.यू.त ठेवले. पण मी आजारी आहे हे कुणाला कळवायचे नाही. असे त्यांनी मला निक्षून सांगितले होते अन् मी त्याला होकार दिला होता. देणे भागच होते. कारण अशा असहाय स्थितीत ते गादीला खिळून असलेले कुणी त्यांना पाहावे व सहानुभूती, दुःख दाखवावे हे त्यांना मानवण्यासारखे नव्हते. आय.सी.यू.तले डॉक्टर्स राऊंडला आले की हसतमुखाने त्यांना हॅलो करायचे. त्यावेळी क्रिकेटची मॅच सुरू होती. “डॉक्टर ! पेपर मिळेल का वाचायला? “काय वाचायचं आहे बाबा? आता पूर्ण विश्रांती घ्यायला हवी तुम्ही.”
“अहो, मॅच सुरू आहे ना? सचिनचे किती रन्स झाले? ”
“आय डॉक्टर हे ऐकून थक्क झाले; पण लगेच त्यांनी पेपर मागवून त्यांना दिला. त्यानंतर ते तपासत असताना, प्रत्येक वेळी बाबा म्हणायचे, ॲम परफेक्टली ऑलराईट, डॉक्टर. का मला इथं ठेवलंय? घरी जाऊद्या. तुमच्या इथे मला हवं ते काहीच नाही, मला खरच काहीही झालेलं नाहीय.”
“जाल की घरी, लवकरच जाल ! पण अजून थोडे दिवस रहा आमच्या सोबत, तुम्हाला रोज पेपर मिळेल. आणखी काय हवंय? ” “मला माझ्या कॉटजवळ एक स्टूल हवाय. त्यावर पाण्याचं भांडं, पेला. एक रायटिंग पॅड, कोरे कागद, पेन आणि माझा चष्मा का बरं काढता तुम्ही सारखा? तो नका काढत जाऊ.’ ”
चौऱ्याऐंशी वर्षाच्या आ.सी.यू.तल्या पेशंटचे हे खेळकरपणाचे बोलणे ऐकताना तेथील उदात्त वातावरणच बदलून जायचे. ऑक्सिजनचा मास्क लावताना अडचण यायची म्हणून चष्मा काढावा लागायचा; पण त्यांना ते मान्य नसायचे. दोन दिवसांतच आय.सी.यू.तल्या वॉर्डबॉयपासून डॉक्टरापर्यंत ते कुणाचे बाबा तर कुणाचे आजोबा झाले. इतरांना आश्चर्यचकित करणारे त्यांचे वर्तनाविष्कार माझ्यासाठी नवीन नव्हते. मी डॉक्टरांना म्हणाले, “खरं काय ते स्पष्टपणे मला सांगा डॉक्टर. माझ्या मनाची तयारी झालेली आहे.” “खरं सांगतो मॅडम, हे त्यांचे शेवटचे दुखणे आहे. छातीत कफ मोठ्या प्रमाणात आहे. फुफुसं त्यामुळे डॅमेज होत आहेत. मृत्यूला काही तरी कारण लागतं. तसं हे त्यांच्यासाठी शेवटचं निमित्त आहे. ”
डॉक्टरांचं ऐकून अपेक्षित असलं तरी पायाखालची वाळू सरकली. बाबांजवळ गेले. अॅडमिट होऊन आता चार दिवस झाले होते. ते लिक्विड डायटवर होते. गिळताना त्रास होत होता म्हणून अन्ननलिकेत नळी टाकली होती. औषधांचा परिणाम म्हणून की काय पण ते सारखे झोपलेले आहेत असे वाटायचे. नाकावर ऑक्सीजन मास्कही होताच. त्यांचे बोलणे बंद झाले. कुणी त्यांच्याजवळ गेले की लगेच खुणेने पॅड मागायचे. त्याला कागद लावलेले असायचेच. एक लाल रंगाचा स्केचपेन त्यांना डॉक्टरांनी दिला होता. त्यांचे सगळे बोलणे त्या पेन-कागदामार्फत व्हायचे. त्या दिवशी ते कागद मी वाचत होते. एका तरुण डॉक्टर मुलीला त्यांनी प्रश्न लिहिला होता. ‘दोनाचे चार हात कधी? ‘ तिच्यासाठीच पुढे लिहिले होते. तुला इथे नोकरी करायची आहे, सांभाळून राहा. सगळीच माणसे चांगली व सरळ नसतात. त्या डॉक्टरने त्यांना आजोबा का मानले असावे हा प्रश्नच राहिला नव्हता. पुढे ते डॉक्टर गौरीचे आजोबा म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
एकदा त्यांनी माझ्यासाठी लिहिले, ‘समीर, स्नेहलला बोलावून घे.’ मी एकदम दचकले. कारण माझी मुले आधीच आलेली होती व हॉस्पिटलमध्ये रोज त्यांच्याजवळ बसत असायची. हे ते विसरले कसे? मी डॉक्टरांना हे सांगीतले. ते काही बोलले नाहीत. एवढेच म्हणाले, ‘ते म्हणतात तसं करा. ज्यांना भेटायचं आहे त्यांना बोलावून घ्या. खरं तर या वयातला अशा पेशंटला आम्ही लगेच घरी न्यायला सांगतो; पण बाबांची इच्छाशक्ती फार तीव्र आहे. म्हणून आपण शक्य तेवढे प्रयत्न. करीत आहोत.’
मी बाबांना विचारले कुणाला भेटायचं आहे का? त्यांनी लिहिलं ‘फक्त विमलला बोलव.’ विमल, माझी आत्या. त्यांची धाकटी बहीण. तिच्यात त्यांचा फार जीव; पण तसा त्यांचा जीव कोणात नव्हता? माणसे जोडणे व टिकवून ठेवणे हे तर त्यांच्या स्वभावातच होते. माझे लग्न होऊन मी सासरी गेले तरी माझ्या मैत्रिणी कायम त्यांच्या मुलीच राहिल्या. मला भेटायच्या नाहीत; पण आवर्जून त्यांना भेटायला जायच्या. त्याच नाही तर त्यांचे यजमान, त्यांची मुले सगळ्यांनाच ते ‘आपले’ वाटायचे. माझी मुले त्यांच्याकडे शिकायला होती. त्यांच्या मित्र-मैत्रिणींचेही ते आजोबाच होते.
केवळ संबोधनापुरते नव्हे तर खरोखरचे, मनापासून. कुणीही यावे, हक्काने आपली अडचण सांगावी, दुःख सांगून मन मोकळे करावे. त्यांच्याशी बोलून धीर आला नाही असे कधी व्हायचंच नाही. “धीर धर, हॅव पेशन्स ! एव्हरी प्रॉब्लेम हॅज ए सोल्युशन. निघेल, यातूनही मार्ग नक्कीच निघेल, मार्ग हा असतोच.” ही वाक्य काही नवीन नाहीत; पण त्यांच्या तोंडून ऐकली की त्यातली सत्यता पटायची व मनाला खरंच उभारी यायची.
इतकी माणसे जोडूनही ते कुणाचेच नव्हते. पाण्यात राहून न भिजणाऱ्या कमलपत्राप्रमाणे होते ते. कितीतरी जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. रक्ताच्या नात्यांसाठी, मानलेल्या नात्यांसाठी. काही कामे स्वतःहून अंगावर ओढवून घेतली. शारीरिक मर्यादांची तमा बाळगली नाही. ‘कमिटमेंट’ म्हणजे काय याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. पण ते ते काम संपले की लगेच अलिप्त झाले. ‘एकटा राहीन; पण कुणावर ओझं बनून राहणं मलाच आवडणार नाही.’ हे त्यांचे आवडते तत्त्व होते. कुणापुढे त्यांच्या शारीरिक असहायतेचे कौतुक त्यांनी कधीच केले नाही. इतका कणखरपणा, इतकी तत्त्वनिष्ठा त्यांनी कोठून मिळवली? ज्ञानेश्वरी व त्यांचे गुरू डॉक्टर करंदीकर ही त्यांची श्रद्धास्थाने होती. हे मला तर माहिती होतेच; पण अनेक वर्षापूर्वी, जेंव्हा ते तरुण होते, जेंव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी अजून अभ्यासायला घेतली नव्हती, त्यांचे गुरू त्यांना भेटले नव्हते, तेंव्हाही ते असेच होते. मनाने अतिशय कणखर पण अतिशय संवेदनशील. आपल्या माणसांबाबात अतिशय हळवे.
मी तर त्यांची एकुलती एक मुलगी होते. जणू त्यांचा बहिश्चर प्राणच! माझी लहानपणीची खेळणी त्यांनी अतिशय जपून ठेवली. मला आठवते, एक मातीचा छोटासा सुंदर मोर माझ्यासाठी त्यांनी आणला होता. त्याला एका बाजूने निळा रंग लावून माझी कलाकारी त्यांना दाखवली. त्यामुळे तो मोर दुरंगी झाला होता. माझं कौतुक म्हणून त्यांनी सर्वांना तो दाखवला. पुढे तो माझ्या हातून फुटला. नंतर त्याचे काय झाले मला ठाऊक नव्हते. फार वर्षांनी त्यांची भली मोठी ट्रंक उचकण्याचा माझा आवडता चाळा करतांना एक डब्यात मला त्या मोराचा मानेपासूनचा वरचा भाग सापडला. अजूनही तो दुरंगी तुकडा या डब्यातच आहे. त्याच डब्यात एक राखी आहे. आजोबांनी त्यांना दिलेला एक रुद्राक्ष व लांब साखळी असलेले घड्याळ आहे, एका मित्राने दिलेली सापाची कातदेखील आहे. वस्तू सांभाळायच्या त्या वस्तूंसाठी नव्हे तर कोणती तरी आठवण त्यामुळे जपली जाते असे ते म्हणायचे. त्यांना ते आवडायचे. माझ्या बालपणी ते परगावी नोकरीसाठी असताना घरी सुटीच्या दिवशी यायचे. रात्र व्हायची. मला झोप येत असायची. मी आईला म्हणायचे, ‘बाबा आले की मला उठव.’ अगदी शपथा घालत असे मी तिला. बाबांनाही चैन कुठली? आले की ते मला उठवायचे. जवळ घ्यायचे. त्यांना गळामिठी घालून मी तशीच मग त्यांच्या मांडीवर झोपून जायचे.
प्रत्येकाचे बालपण सहसा आईच्या आठवणींनी व्याप्त असते. माझ मात्र तसे नव्हतं. माझ्या विश्वात बाबांएवढी जागा कुणालाच नव्हती. माझे ते जसे वडील होते तसे वाढत्या वयात माझे जिवलग मित्रही होते, बापलेकीमध्ये एवढी प्रगाढ मैत्री असू शकेल हे कुणालाही खरे वाटण्यासारखे नाही; पण मित्राशी मन मोकळं करावं तसं आम्ही दोघे एकमेकांशी बोलायचो. त्यांचे बालपणापासूनचे जीवन, त्यातील महत्त्वाच्या टप्प्यांसह मला ठाऊक होते. मी ही कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपवली नाही. मी प्रेमात पडल्यानंतर मला आलेली प्रेमपत्रे, आईच्या हातात पडू नयेत म्हणून मी त्यांच्याजवळ ठेवायला द्यायचे. त्यांच्यातला हळवेपणा माझ्यात आला; पण सबुरी मात्र आली नाही. त्यामुळे अनेक चढ-उतारांना सामोरी जाताना मला विलक्षण मनस्ताप व्हायचा. अर्थात; प्रत्येक वेळी त्यांच्याशिवाय कुणी समजूत काढणारा अन्य कुणी नसायचाच.
माझं लग्न मीच ठरवले म्हटल्यावर त्यांनी अजिबात विरोध केला नाही. सर्व शांतपणे ऐकून घेतले. मुलाकडची सगळी माहिती काढून घेतली. मग मला म्हणाले, “माझी हरकत नाही; पण आज दोन साड्या नेसत असशील तर नंतर एका साडीवर राहावं लागेल, चालेल का तुला?” इतक्या कमी शब्दात लग्नानंतर कराव्या लागणाऱ्या तडजोडींचे प्रातिनिधिक चित्र त्यांनी माझ्यासमोर उभे केले. अर्थात माझी तयारी होतीच; पुढे मग आईचा विरोध असून बाबांच्या पुढाकाराने लग्न ठरले व मोठ्या समारंभाने झाले. त्यावेळी सासरी निघताना बाबांना मारलेली मिठी, त्यांचा तो स्पर्श अजून इतक्या वर्षानंतरही मी अनुभवते. नंतरच्या माझ्या सांसारिक तडजोडी, मुलांचा सांभाळ, छोट्या-मोठ्या नोकऱ्या प्रत्येक बाबतीत त्यांनी माझी साथ दिली. जावयाला त्यांनी मुलगा मानले. त्यालाही उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
त्यांच्या नोकरीतही सर्वोच्च पदापर्यंतच्या सर्व पायऱ्या ते चढले. शिक्षण, अधिकाराची उच्च पदे यांचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. सर्व टप्प्यात त्यांची प्रतिमा अगदी स्वच्छ, कामसू व प्रेमळ अशीच राहीली. हाताखालच्या कनिष्ठ शिपायांशीही त्यांचे घरगुती संबंध होते.
असे माझे बाबा, माझे वडील, गुरू, मित्र असल्याने माझे आदर्श तेच झाले. काळाच्या प्रवाहात ते शरीरप्रकृतीने खचत गेले. मनाने मात्र तसेच राहिले. ज्ञानेश्वरी व गुरूंची भेट झाली. आधीच स्थिर असलेल्या वृत्ती अधिकच शांत होत गेल्या. ते एकांतप्रिय झाले. हळू-हळू माणसांशी संपर्क कमी होत गेला. स्वत: कुणाकडे जाणे बंद केले. ज्ञानेश्वरी त्यांच्या रक्तात भिनत गेली. ज्ञानेश्वरीवर खूप लिखाण केले. त्याचे पुस्तक काढायला मात्र ठाम नकार दिला. जेव्हा लिखाणही झेपेनासे झाले तेव्हा सर्व लिखाण नदीला अर्पण केले. त्यावेळी मला तुकारामांची आठवण झाल्याखेरीज राहिली नाही.
अशा माझ्या बाबांचे मीही खूप लाड करायचे ठरवले होते. जेव्हा ते शरीराने पूर्ण असहाय झाले तेव्हा मी त्यांचे लहान मुलासारखे सारे काही करू लागले. त्यांची आंघोळ, स्वच्छता, तेल लावून त्यांच्या शुभ्र पण जावळासारख्या मुलायम केसांचा भांग पाडताना मी त्यांची आईच आहे असे मला वाटायचे. त्याच वात्सल्य भावनेने माझा ऊर भरून यायचा. ‘किती छान पाठ दाबून देतेस गं. फार आराम वाटतो तुझा हात फिरला की’ असे म्हणाले की मला कृतकृत्य वाटायचे. अॅलोपॅथी व दवाखाना या दोन गोष्टींचा विरोध मात्र त्यांचा अतिशय कडवा होता. जेव्हा ते जवळजवळ बेशुद्धावस्थेत गेले तेव्हाच त्यांना हॉस्पीटलमध्ये आणता आले होते.
आय.सी.यु.त त्यांना दहा दिवस ठेवले. त्यांनी लेखनासाठी वापरलेले दवाखान्याचे कागद संख्येने वाढत गेले. शेवटी शेवटी त्यांनी ‘प्रायोपवेशन’ हा शब्द लिहायला सुरुवात केली. ‘घरी न्या’, ‘आजच ना’, ‘उद्यापासून औषध, खाणं पिणं बंद,’ असे लिहू लागले. झोपेत हाताचा धक्का नळीला किंवा मास्कला लागू नये म्हणून त्यांचे हात हलकेपणाने बांधले होते. ते लक्षात आल्यावर त्यांच्या मानी स्वभावाला ठेच लागली. त्यांनी हात मोकळे करून मागितले व लिहिले “माझे हात बांधू नका, मी कैदी नाही.”
डॉक्टरांच्याही लक्षात आले की आता फार थोडा अवधी राहिला आहे. त्यांनी मला कल्पना दिली. माझ्या बाबांच्या जीवनयात्रेची इतिश्री दवाखान्यात नळ्या लावून व्हावी हे त्यांच्याप्रमाणेच मलाही पटणारे नव्हते. मलाही त्यांना शांत, सुंदर मृत्यू यावा असेच वाटत होते. त्यांच्या संपूर्ण आयुष्याला, संन्यस्त वृत्तीला शोभेल असा. त्यांना घरी आणायचे ठरवले. घर स्वच्छ केले. त्यांच्या खोलीची सुंदर रचना केली. माझ्या मुलांनी त्यांना घरी आणले. दवाखान्यातून येताना ते पूर्ण शुद्धीत होते. कागदावर सर्वांसाठी ‘शुभ दीपावली’ लिहिले. हात हलवून सर्वांचा निरोप घेतला.
घरी आणले. त्यांच्या खोलीत नेले. सगळीकडे त्यांनी जणू काही अखेरचे पाहिले. माझ्याकडे, नातवांकडे, जावयाकडे. स्निग्ध दृष्टीने पाहिले व डोळे मिटून घेतले. अजिबात तडफड, तगमग, वेदना काहीच नाही. तो दिवस नरकचतुर्दशीचा होता. माझ्या जीवनातील तेजस्वी ज्योत मालवली होती. प्रायोपवेशनाची वेळ काळाने त्यांच्यावर येऊच दिली नाही. एकटेपणाने हट्टाने एका तपाचा दीर्घकाळ काढल्यानंतर शेवटची दोन वर्षे ते माझ्याकडे आले होते. शेवटी त्यांच्याजवळ सगळेच होते. याचेच मला इतके समाधान झाले की, त्याखाली त्यांच्या जाण्याचे दुःख जणू झाकल्यासारखे झाले. मला रडू येईना. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस (त्यांचा) गोड व्हावा.
आज माझ्याजवळ माझे बाबा नाहीत. पण मी त्यांचाच अंश आहे. म्हणून माझ्यातही ते आहेतच. त्यांच्या आठवणी आहेत. त्यांची पत्रे आहेत आणि दवाखान्यातले त्यांचे ते लाल अक्षरातले, वेडेवाकडे, थरथरत्या हाताने लिहिलेले काही शब्द आहेत आणि कुणाला तरी वरदान म्हणून लाभलेले त्यांचे नेत्रही आहेत. एवढे पुरेसे नाही का?