विश्वास

सुनीताच्या चेहऱ्यावर मनातली खुशी तरळून गेली. विश्वास आत आला. पाठीवरची सॅक हातात घेतली. कुठे बसावे हे न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला. सुनीता त्याचे निरीक्षण करीत होती. सहा फूट उंची, कुरळे केस, पिंपल्सनी भरलेला उभट चेहरा, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळी पँट व इन केलेला पांढरा शर्ट. डोळे थोडे मोठे असते तर आपल्या अजयसारखा बराचसा दिसला असता. तिला परदेशात असलेल्या तिच्या मुलाची तीव्रतेने आठवण आली. ती म्हणाली, ‘अरे, बस ना खूर्चीवर, सामान आणलं नाहीस का तुझं? इथं राहायला आलास ना तू?’



नमस्ते मॅडम ! मला सरांनी आज बोलावलं होतं, मी विश्वास. ‘ ‘अरे, ये ना ! आत ये.’

सुनीताच्या चेहऱ्यावर मनातली खुशी तरळून गेली. विश्वास आत आला. पाठीवरची सॅक हातात घेतली. कुठे बसावे हे न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला. सुनीता त्याचे निरीक्षण करीत होती. सहा फूट उंची, कुरळे केस, पिंपल्सनी भरलेला उभट चेहरा, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळी पँट व इन केलेला पांढरा शर्ट. डोळे थोडे मोठे असते तर आपल्या अजयसारखा बराचसा दिसला असता. तिला परदेशात असलेल्या तिच्या मुलाची तीव्रतेने आठवण आली. ती म्हणाली, ‘अरे, बस ना खूर्चीवर, सामान आणलं नाहीस का तुझं? इथं राहायला आलास ना तू?’

‘हो मॅडम, पण अजून मी होस्टेल सोडलं नाही. आधी घरी येऊन तुमची भेट घ्यायला सांगितलं होतं सरांनी, म्हणून.

‘बरं, हे बघ, मी ऑफिसला असते दिवसभर आणि सर कॉलेजला. घरी आता सरांचे वडील आजारी आहेत. वय झालं आहे खूप त्यांचं. त्यांच्यासाठी आम्हाला कुणीतरी सोबतीला हवं आहे. तुला सांगितलंय ना सरांनी? ‘

‘हो, माहितीय मला ते. मी तयार आहे. मी त्यांचं सगळं करीन.
तुम्हालाही मदत करीन. फक्त माझी कॉलेजची वेळ तेवढी सांभाळून घ्या, हे माझं फायनल ईअर आहे.’

‘तीच एक अडचण आहे. हे बघ इथं तू अगदी घरच्यासारखाच राहा; पण कॉलेज तुझं दिवसभर असतं का? तू सायन्स साईडला आहेस ना?’

‘हो, पण मॅडम फक्त प्रॅक्टिकलपुरतं मला जाता आलं तरी चालेल, थिअरी आता जवळजवळ संपतच आली आहे. एखाद दुसरा पिरियड होतो. ‘

‘ठीक, ते बघू. जमवू कसं तरी, काही तास बाबा एकटे राहू शकतात; पण तुला काय काय काम येत? ‘

‘मला सगळं येतं. स्वयंपाकसुध्दा येतो. ‘
‘स्वयंपाक ! तो कसा काय येतो तुला? ‘

‘मॅडम, मी संध्याकाळी हॉटेलमधे नोकरी करीत होतो. रात्री तिथेच राहायचो. तिथं मला सगळं शिकता आलं. भाजी तर मी इतकी बारीक चिरून देईन मॅडम, बघा तुम्ही. सॅलड वेगवेगळ्या आकारात चिरता येतं मला. तिथं खाऊन पिऊन तीनशे रुपये मिळायचे मला. शिवाय टीप मिळायची लोकांकडून.”

“मग का सोडली ती नोकरी?”
“मॅडम, हे शेवटचं वर्ष. दिवसभर कॉलेज, संध्याकाळी हॉटेलमध्ये काम. रात्री फार उशीर व्हायचा झोपायला. अभ्यासच व्हायचा नाही. देशपांडे सरांच्या प्रयत्नानं हॉस्टेलला प्रवेश मिळाला; पण ती फी मला परवडत नाही. मग आपल्या सरांनी मला इकडं बोलावून घेतलं. ”

‘“बरं ! तर मग राहा तू इथं. सामान घेऊन ये आणि आतच. तुझी बाबांची ओळख करून देते. ‘ ”
सुनीताने त्याला बाबांकडे नेले. त्याने वाकून त्यांना नमस्कार केला. बाबा त्याच्याशी बोलू लागले. त्यांना तो आवडला. स्वावलंबना शिक्षण घेणाऱ्या विश्वासचे त्यांना कौतुक वाटले. त्याच्या घरची माहिती त्यांनी विचारून घेतली. विश्वास एकटाच मुलगा होता. दोन बहिणी होत्या. एका खेड्यात त्याचे कुटुंब राहत होते. वडील भिक्षुकी करीत होते. नाममात्र शेतजमीन होती. ‘तुला किती शिकायचं आहे? कोण व्हायचं आहे तुला? ‘ बाबांनी विचारलं. ‘मी एम.बी.ए. होणार आहे.’ त्याने निश्चयाने उत्तर दिले. बाबा हसले. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

दुसऱ्या दिवशी विश्वास घरी आला. एका एअरबॅगमधे त्याचे सगळे सामान होते. चार-आठ दिवसांत तो घरात रुळला. सुनीता व विजय यांची मर्जी राखण्याचे प्रयत्न तो मनापासून करू लागला. घरात सगळ्या कामांना बाई होती. तरी तो स्वतः जेवणाआधी सॅलड चिरून ठेवायचा. चहा करायचा. बाबांची सेवा करायचा. पाठीला औषध लावणे, पाय दाबणे, हाताला धरून अंगणात फिरवणे. त्यांच्याशी गप्पाही मारायचा.

‘सुनीता, आपली मोठी काळजी दूर झाली बघ. या विश्वासचाही आर्थिक प्रश्न सुटला’ विजय.
‘पण, याला आर्थिक मदत किती द्यायची, हे ठरवलं का तुम्ही?’ ‘तो इथंच राहील, आपल्या अजयसारखाच आहे ना तो. त्याला शिकवू आपण. सगळी मदत करू.’ ‘हो, तरी पण हे अगदीच तरुण वय ! लहरी असतं. नीट राहील ना तो? त्याचा स्वभाव तरी तुम्हाला पूर्ण कळलाय का? ‘ “होईल गं सगळं. राहील तो व्यवस्थित. हॉटेल आणि होस्टेलपेक्षा तर खूपच आरामात आहे तो इथं आपल्याकडे. त्यालाही हे कळतच असेल ना.’ ”

सुनीताला हे पटले. तिच्याही मनावरचा ताण दूर झाला. तरुण मुलामुळे घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले. विश्वास हसमतुख होता. गाणे गुणगुणत कामे करायचा, स्वतःची जेवणाची, नाश्त्याची भांडी स्वतः लगेच घासून टाकत असे. सगळ्यांना जेवायला वाढणे, नंतरच्या आवराआवरीत मदत करणे, बाहेरून सामान आणणे, ही कामे त्याने स्वत:हून अंगावर घेतली. सर्व आटोपून सकाळी अकराच्या सुमारास युनिफॉर्म घालून, सॅक खांद्याला अडकवून त्याच्या सायकलवर स्वार व्हायचा तेंव्हा तो अगदी वेगळाच दिसायचा. त्याचा आत्मविश्वास, निश्चयी स्वभाव त्याच्या देहबोलीतून व्यक्त व्हायचा. त्यामुळे तो लाचार, आश्रित असेल अशी कल्पना त्याला बघणाऱ्यांच्या मनातही येऊ शकत नसे. खरं तर परिस्थितीमुळे तो तसाच होता; पण स्वत:चा आब राखून होता. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तो लवकर उठला नाही. सुनीताने त्याला आवाज दिला. त्याच्या खोलीत ती गेली तेव्हा तिला तो किंचित कण्हत असल्याचे दिसले. तिने काळजीने त्याच्या कपाळावर हात ठेवला. चांगलाच ताप होता त्याला. तिने त्याला उठवून बसवले. चहा दिला, क्रोसीन घ्यायला लावली. त्याला वाटणारा संकोच त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं होता. “आज कॉलेजला जाऊ नकोस पडून राहा. आता घाम येईल थोड्यावेळानं.” मला.” “नको मॅडम, उठतो मी. आज आजोबांना आंघोळ घालायची आहे.
“अरे राहू दे, विश्वास. मी घालतो आंघोळ आज त्यांना.” विजय आत येत म्हणाले. ऐकून तर त्याचा चेहरा अधिकच पडला. पण त्याचाही नाइलाज होता. त्या दिवशी तो झोपूनच होता. त्याचे खाणे-पिणे सुनीतानेच केले. तिला रजा घेऊन घरी राहावे लागले. दुपारी ताप एकदम उतरला. संध्याकाळपर्यंत तो उठून बसला. “काल उन्हात फीच्या रांगेत उभा होतो फार वेळ. म्हणून ताप आला असं वाटतं.” “अरे, अशा वेळी डोक्याला रुमाल बांधावा.” “मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तुमच्या मदतीसाठी मी इथं आलो तर तुम्हालाच माझं करावं लागलं. मला कसतरीच वाटतंय हे सगळं.” “अरे, असूदे. अजय आजारी पडला तर मीच करते ना सगळं. ” हे ऐकून विश्वासचे डोळे भरून आले. तो उठून सुनीताजवळ येत म्हणाला, “मॅडम, मला तुमचं दर्शन घेऊ द्या.’ ” “अरे, दर्शन कसलं? मी काय देव आहे का माझं दर्शन घ्यायला? ” “हो मॅडम, आज तुम्ही तुमच्या मुलासारखं मला मानलं. मी पण तुम्हाला आई मानतो अन् आमच्या गावाकडं नमस्कार करण्याला दर्शन घेणं म्हणतात.” असं म्हणत तो वाकून तिच्या पाया पडला.
सुनीताला भरून आले, वात्सल्याला कुठेतरी वाट मिळाली. तिने हलकेच त्याच्या केसांवरून हात फिरवला व “सुखी हो” पुटपुटली. “ठीक आहे, पण आता मला त्रास होऊ नये असं वाटत असेल तर स्वत:ची काळजी स्वत: घेत जा. आज बाबांनाही भेटला नाहीस दिवसभर. त्यांच्याजवळ जाऊन बस जरा वेळ आणि आज रात्री जागून अभ्यास करू नकोस. झोपून जा लवकर.” त्या प्रसंगाने विश्वास व घरातले सगळे यांच्यातील अंतर अजूनच कमी झाले.

बघता बघता दोन महिने उलटून गेले. विश्वास त्या घरातलाच एक झाला. विजय, सुनीता त्याला लागतील तसे पैसे खर्चाला देत होते. परीक्षा फी त्यांनी भरली. एम.बी.ए. च्या एंट्रन्स परीक्षेसाठी त्याने पुणे केंद्र घेतले होते. तो खर्चही त्यांनीच केला. विश्वासच्या घरून काहीच मदत होण्यासारखी नव्हती.
एकदा तो म्हणाला, “मॅडम, मला घरची आठवण येतेय. मी चार दिवस जाऊन येऊ का? ”
“अरे पण मग इथं बाबांचं कसं?” सुनीता.

“माझी बहीण आली आहे सासरहून. आता एकदा जाऊ द्या. मग परीक्षा होईपर्यंत अजिबात जाणार नाही.”शाण घरची आठवण येणे साहजिकच आहे. आपल्या स्वार्थासाठी त्याला अडकवून ठेवणे बरोबर नाही. असा विचार करून सुनीता, विजयने त्याला परवानगी दिली. दोन-दोन दिवस प्रत्येकाने रजा घ्यावी असा पर्याय काढला. विश्वासजवळ खर्चासाठी पैसे दिले. पैसे घेताना तो म्हणाला, “मॅडम, तुमच्याकडून घेतलेले पैसे मी नेहमी लिहून ठेवतो बरं का. एकदा दाखवीन तुम्हाला हिशोब . ”
गण्ड “लिहून ठेवायची काय गरज? ” सुनिताने आश्चर्याने विचारले. तो गावी गेला. त्याच्या त्या वाक्याचा विचार सुनीताच्या मनात आपोआपच येऊ लागला. चार दिवसांनी यायचे सांगून गेलेला विश्वास आठवडा झाला तरी आला नाही. त्याच्या आईचा फोन आला की अजून चार-पाच दिवसांनी तो येईल. खूप दिवसांनी आल्यामुळे त्याला अजून राहायचे आहे. सुनीता, विजय, बाबा साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. तब्बल दहा दिवसांनी तो परतला. नेहमीसारखा हसतमुख वाटला नाही. घर सोडल्यामुळे असेल असे वाटले; पण कुठेतरी सूर हरवलाच होता. पुढच्या एक-दोन दिवसांतच सुनीताच्या लक्षात ते आले. ती चेष्टेच्या सुरात म्हणाली, “काय रे विश्वास, अजून आईची आठवण येतेय का? ” “नाही तसं काही नाही मॅडम. ” “अरे मग असा गंभीर अन् उदास का दिसतोयस तू? काही होतंय का तुला? ” “मॅडम माझी काळजी अजिबात करू नका तुम्ही.” त्याचे तटकन आलेले उत्तर. सुनीता चांगलीच गोंधळली.
“अरे, असं का म्हणतोस तू? तुझी काळजी वाटली म्हणून विचारते. माझ्या अजयसारखा ना तू मला? ” “मला तसं मानू नका मॅडम, खरंच सांगतो, मला घरचा मानू नका.
मी तुमच्याकडे कामाला आहे असंच समजा. मला देशपांडे सर त्यांच्याकडेही राहायला नेणार होते; पण तुमच्याकडे आजोबांसाठी जास्त गरज होती म्हणून मी इथं आलो; पण आता मी बहुतेक तिकडे किंवा हॉस्टेलला परत जाईन.’ “हे बोलणे सुनीतासाठी अगदीच अनपेक्षित होते. तिला वाईट वाटले. अपमानितही झाली ती. घडलेला प्रसंग तिने विजयना सांगितला. तेही विचारात पडले, आपल्या घरी त्याला काय कमी पडले म्हणून तो असे बोलला हे त्यांना समजेना. की गावाकडे कुणी त्याच्या मनात काही भरवून दिले असेल? सुनीता बाबांजवळ हे बोलली. तेही विचारात पडले. त्याच्या वागण्याचे विश्लेषण करू लागले. त्यांनी एक अर्थ लावला व तो सुनीताला सांगितला. त्यानुसार तिने विश्वासशी बोलावे असे ठरले. तिने विश्वासला बोलावून घेतले व म्हणाली, न व्यवह “विश्वास, काय ठरवलं आहेस तू? ” महात एक “कशाचं? ” शिक “इथून जाणार आहेस की राहणार आहेस? “राहावं वाटतंय मॅडम पण जाईन मी.” “अरे पण का? तुला अजून काही हवंय का? इथं काही कमी आहे का? अभ्यास होत नाही का? ” “अभ्यासाचं मला काही वाटत नाही मॅडम; पण मला राग खूप येतो, आवरता येत नाही स्वत:ला. तुम्ही दिलेले पैसे लिहून ठेवलेत मॅडम, आता दाखवतो तुम्हाला.” म्हणत तो उठला. एक वही आणली.
त्यात त्याने आतापर्यंत घेतलेले पैसे तारखा टाकून लिहून ठेवले होते. त्याचा खर्च लिहिला होता. सुनीता आता अधिकच बुचकळ्यात पडली; पण बाबांनी बोलून दाखवलेला अंदाज गृहीत धरून तिने विचारले, “तू हे मला का दाखवतो आहेस कळत नाही. आम्ही तुला कधी हिशोब मागितला नाही. मागणारही नाही. अरे तुला आमच्या अजयच्या जागी मानलंय आम्ही.” आहे?” ” नका ना मानू मॅडम, प्लीज मला तुमचा मुलगा मानू नका. “तू जरा सरळ व स्पष्ट बोलशील का? नेमकं ” तुला काय हवं “मॅडम, मला असं लागेल तसे पैसे मागणं आवडत नाही. ” “आतापर्यंत मी लहानसहान नोकऱ्या करीत आलो आहे. अशा मायेची मला सवय नाही. मला तुमचा नोकरच समजा. मी मागंही एकदा तुम्हाला हे सांगितलं आहे. ” तुम्ही द्या.

“मग तुला महिन्याला पगार हवा आहे का? “हॉटेलमध्ये मला जेवूनखाऊन तीनशे रुपये मिळत होते. तेवढेच, बाबांचा तर्क खरा ठरला होता. तरुण वयातल्या मुलांना लाचार असले तरी ती भावना आवडत नाही. स्वत: काही तरी करून पैसा कमावतो आहे ही भावना प्रतिष्ठेची वाटते. आतापर्यंत सुनीता, विजयने त्याला आर्थिक मदत केली; पण ती नोकर न समजता. त्यामुळे ते त्याचे हक्काचे पैसे आहेत असे त्याला वाटत नव्हते. नेमका त्यामुळेच तो दुखावला गेला होता. तरुण असला तरी अजून लहानच आहे असा विचार करून सुनीताने या प्रसंगाला गांभीर्याने घ्यायचे नाही असे ठरवले. तो मनाने चांगलाच आहे.
वयाचा परिणाम म्हणून तो तसा विचार करतो अशी तिने स्वत:ची समजूत घातली. ती उघडपणे म्हणाली,

“ठिक आहे, इथून पुढं तुला महिना तीनशे रुपये देत जाऊ. आता तर खुश? आधीच स्पष्ट बोलायचं ना, राहायला आलास तेंव्हा. ”

विश्वासने हसायचा प्रयत्न केला; पण चेहरा अधिकच रडवेला झाला. कपाळावर तो टिचक्या मारून घेत बसला. त्याचे डोकं दुखत असावं बहुधा.

विश्वासची सुनीताच्या घरातली नोकरी सुरू झाली अन् त्या दोघांतला मोकळेपणा निघून गेला. त्याचे गप्पा मारणे कमी झाले. निमूटपणे ठराविक कामे तो करायचा. सुनीताशी तो जास्त मोकळेपणाने वागायचा त्यामुळे तिला ते अधिक जाणवायचे. मन कुठेतरी दुखावले गेले होते. आपली ममता याला कळली नाही. याला पैसे तर आपण देतच होतो. देणारही होतो. पण त्याला खात्री नसावी म्हणून हलवून खुंटा बळकट करावा तसा पगार त्याने ठरवून घेतला. बाबा तिला म्हणाले “नको जास्त विचार करूस. त्याचं इथं असणं ही आपली गरज आहे आणि पैसा ही त्याची गरज आहे. बँकेत काम करतेस अन् पैशाचं महत्त्व कळत नाही का तुला? आपण एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी एकत्र आलो आहोत असं समज. निव्वळ व्यवहार म्हणून याकडे बघ. म्हणजे तुला त्रास होणार नाही.” सुनीताने तसेच वागायचे ठरवले. विश्वासची परीक्षा जवळ येऊ लागली. अभ्यासाची गती मात्र अपेक्षेप्रमाणे वाढत नव्हती. अशा वेळी तर मिळेल तेवढा वेळ अभ्यासातच घालवायला हवा; पण तसे होत नव्हते. कारण विचारण्याइतका मोकळेपणा आता राहिलाही नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याला शुध्द बोलणे, शुध्द लिहिणे याविषयी विजयनी दोन-चारदा समजावले होते; पण मला अशीच सवय आहे. खूप जण असंच बोलतात. मला कमीपणा वाटत नाही असे उत्तर दिले. तेव्हापासून विजयनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न सोडून दिला होता. तेव्हाही सुनीताला वाटले होते, असा कसा हा मुलगा? त्याच्या चांगल्यासाठीच सांगणे आहे ना हे?

न राहवून तिने एकदा त्याला विचारले, “विश्वास, हल्ली अभ्यास का कमी झालाय तुझा? एम. बी. ए. व्हायचंय ना तुला? त्याची एन्ट्रन्सची तयारी खूपच असेल ना. शिवाय त्या आधी हे फायनल बी.एस्सी. ची वर्षही चांगलं निघायला हवं.”

विश्वास एकदम गंभीर झाला. थोडा वेळ शांतच होता. मग म्हणाला, “मॅडम, मला अभ्यासाचं वाटत नाही एवढं काही. तुम्हाला आधी नव्हतं सांगितलं; पण आता सांगतोय, हे माझं दुसरं वर्ष आहे फायनलचं.” “म्हणजे काय? फायनलचं दुसरं वर्ष ! मी नाही समजले. ” “मॅडम, मी गेल्यावर्षीच ग्रॅज्युएट झालो असतो; पण माझी कॉपी पकडली गेली अन् मला परीक्षा हॉलमधून बाहेर काढलं. मग त्या पुढचे पेपर्स मी दिलेच नव्हते.” सुनीताला हा एक मोठा धक्काच होता. “काय सांगतोस हे? तू कॉपी करीत होतास !” “सगळेच करतात मॅडम. माझा नंबर ज्या कॉलेजात आला होता ते कॉलेजच त्यासाठी प्रसिद्ध आहे; पण काही जण जे पकडले गेले त्यात नेमका मीही होतो. मी त्यावेळी सरांची खूप विनवणी केली. गरीब विद्यार्थ्याचं नुकसान करू नका म्हणत खूप हातापाया पडलो; पण ऐकलं नाही त्यांनी. त्यांच्यामुळं माझं एक वर्ष वाया गेलं. आता त्या कॉलेजसमोरून जरी गेलो ना तरी ते सगळं आठवतं; अन् खूप राग येतो मला मॅडम. खूप राग येतो. राग आला की डोकं दुखतं माझं खूप.”

गरिबीचे भांडवल अशा प्रकारे करण्याचा त्याचा प्रयत्न बघून सुनीता मनातल्या मनात हेलपाटली गेली. अभ्यासूपणा, प्रामाणिकपणा अशा मूल्यांबद्दल बोलणे म्हणजे त्याच्यासाठी वायफळ ठरले असते. ती गप्प बसली; पण ‘राग येतो खूप अन् मग डोकं दुखतं माझं’ हे त्याचे वाक्य तिच्या मनात घुमत राहिलं.
तसाच एक दुसरा प्रसंग घडला. मराठ्यांच्या आरक्षणाचा, चर्चा चालू होती. तो एकदम तावातावाने म्हणला, “मिळालं आरक्षण मराठ्यांना तर कुणाचं काय जातं? पण मराठ्यांना दिलं तर यांच्या जागा कमी होतात ना! म्हणून विरोध करतायत. मिळाल्या आम्हाला चार नोकऱ्या तर यांचं काय बिघडणार? ”

त्याचा त्रागा पाहून विजय, सुनीता स्तब्धच झाले. विजयनी विचारले ‘“अरे पण तू का या विषयात डोकं घालतोयस? तुला काय फायदा याचा!

“म्हणजे काय? मला पण फायदाच होईल ना याचा. नाहीतर नोकरी मिळणं किती कठीण या दिवसात.”
“म्हणजे तू …?” “हो सर, माझं आडनावच असं आहे की, मी ब्राह्मण की मराठा कळतच नाही सांगितल्याशिवाय. ‘ ” बोलता बोलता त्याचा चेहरा आक्रसला, कपाळाला आठ्या पडल्या. तो बोटांनी कपाळावर टिचक्या मारू लागला. सुनीताच्या लक्षात आले. त्याचे डोके दुखतेय, म्हणजे याला राग आला की काय?

त्याच्या त्या दुखण्याची एक नवीनच धास्ती तिच्या मनात निर्माण झाली. एका विद्यार्थ्याचे भले करायचे म्हणून ही जबाबदारी आपण घेतली ते चुकले की काय अशी शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली.
काही दिवसांनी बाबाचे दुखणे वाढले, त्यांना दवाखान्यात अॅडमिट करावे लागले. चार-पाच दिवसात ते गेले. घरावर शोकाचे सावट पसरले. नातलग आले, गेले. अजयही आला. विश्वासने त्या दिवसांत मनापासून जबाबदारीने सारे काही केले. आजोबा गेल्याचे त्याला खरंच दुःख झाले होते. दवाखान्यातही रात्री तोच राहायचा. सर्वांनाच त्याचे कौतुक वाटले. अजय मात्र परत जाताना म्हणाला, “आई, या विश्वासला तुम्ही आजोबांसाठी आणले होते. आता त्याला परत पाठवा.”

“अरे पण असं मध्येच कुठं जाणार तो? हॉस्टेलवरही आता जागा मिळणार नाही. खर्चही परवडणार नाही रे त्याला. ”

“आई, तू त्याच्या काळजीत वगैरे पडू नकोस, माणुसकी, भावना असला गुंताही करू नकोस. त्याची अशी किती माहिती आहे तुम्हाला? त्याची गरज आहे म्हणून तो इथे राहतो आहे. त्याचा स्वभाव, त्याचे घरचे लोक काही माहीत आहे? तेव्हा त्याला परत पाठवा आता.” अजय निघून गेला, मात्र, जाताना एक संशयाचा किडा डोक्यात टाकून गेला; पण असे एकदम त्याला जा असे सांगताही येईना दोघांना, विश्वास तिथेच राहिला. पंधरा वीस दिवस ढवळलेले वातावरण निवळत गेले. रुटीन सुरू झाले.

आता बाबा नसल्याने दुपारच्या वेळी विश्वास एकटाच घरी असायचा. सुनीता संध्याकाळीच यायची. विजय त्यांच्या कामानिमित्ताने बऱ्याचदा बाहेरगावी जायचे. विश्वासची सोबत आहे. ते एका अर्थाने चांगलेच आहे. दोघांनाही वाटायचे. अचानक एक दिवस शेजारचे जोशी घरी आले. विश्वास बाहेर गेला होता. त्यांनी अत्यंत खाजगी स्वरात सांगितले, “हल्ली दुपारच्या वेळी दोन-तीन वेळा एक मुलगी घरी आली होती. तो एकटाच असतो घरी. नसती भानगड नको तुमच्या मागे लागयला म्हणून सांगतोय बरं का ! काळजी घ्या. या तरुण पोरांचा काय भरवसा? ”

ते ऐकून सुनिता विजय चांगलेच काळजीत पडले. हे काय आता नवीनच लफडे ! विश्वास परतल्यावर विजयने त्याला सरळच विचारले, “विश्वास, अशात कुणी मुलगी आपल्याकडे आली होती का? ” तो एकदम चपापला; पण सावरून घेत म्हणाला, “हो सर, ती माझी नात्यातलीच आहे. आपल्याच कॉलेजात आहे. नोटस् घ्यायला आली होती.” हे उत्तर म्हणजे एक थाप होती हे उघड उघड कळण्यासारखे होते. तरी विजय म्हणाले, ‘’तुमचं जे काय अभ्यास, नोटस्चं काम असेल ते कॉलेजामध्येच करीत जा. घरात कुणाला बोलवायचं नाही. एवढं लक्षात ठेव.’

“बरंय सर. आता नाही येणार कुणी. ” असे म्हणत तो तकन उठला व आपल्या खोलीत गेला. कपाळावर तशाच आठ्या, तशाच टिचक्या. घरातला सुरू असलेला टी.व्ही. देखील कधी बघत न बसणारा हा मुलगा असा का वागतोय हे त्या दोघांना कळेना. वयाचा परिणाम मानला तरी आपल्यामागे एखादे शुक्लकाष्ट नको लागायला.

“सुनीता मला वाटतं, आपण त्याला परत पाठवावं आता. बाबा होते तेव्हा ठीक होतं. आता हा एकटाच घरी राहणार. कॉलनीत चर्चा सुरू झाली तर आपलीच बदनामी होईल.” विजय म्हणाले. सुनिता म्हणाली, “तुम्हीच सांगा त्याला तसं; पण तो जाईल कुठं असा एकदम? ”

पण ते सांगायची वेळच आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वासने आपली बॅग भरली व सुनीतासमोर येऊन उभा राहिला. कालच्या बोलण्यानंतर एक विचित्र ताण तिच्या मनावर आला होता. तिने नुसतेच प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिले. तो म्हणाला, “मॅडम, सरांना व तुम्हाला माझा आता कंटाळा आला आहे. मी जातोय आता.

“अरे पण, तू असा कसा निघालास एकदम. तुला काल जे सर बोलले ते तुझ्या चांगल्यासाठीच होतं ना? चूक कबूल करावी रे लहान मुलांनी.

“माझी काही चूकच नाहीय मॅडम. सर तर खूपच रागावले आहेत. माझ्यावर. मी कसा राहू इथं? जाईन कुठंही, हॉटेलची नोकरी करीन परत.”

बोलता बोलता तो कपाळ बोटांनी दाबू लागला. “सर अजून उठले नाहीत मॅडम. त्यांना सांगा मी गेलो म्हणून.’ ”

एवढे बोलून तो गेलादेखील. सुनीताला आश्चर्य करावे, की दुःख करावे, की सरांना न सांगता स्वत:ची चूक असताना रागावून गेला म्हणून राग धरावा यातले काहीच समजेना. या मुलाचा मनाच्या अंदाजच तिला येईना. जाऊदे, नव्हते त्याच्या नशीबात आरामाने चांगल्या घरात रहाणे. हॉटेलचीच नोकरी आवडत असेल तर आपण तरी काय करणार. तो अन् त्याचं नशीब! सुनीताने स्वत:ची समजूत घालून घेतली. तरी पण स्वत:ला ती विश्वासच्या बाबतीत अपयशी मानू लागली. अजयला फोनवर तिने हे सर्व सांगितले. तो म्हणाला, “बरं झालं स्वत:हून गेला ते. ” सुनीतालाही वाटले बरेच झाले. त्याच्या रागाची तिला काहीशी भीतीही वाटू लागली होती.

असे सात-आठ दिवस गेले असतील. सुनीताचा मोबाईल वाजू लागला. तिकडून विश्वासची आई बोलत होती. म्हणाली, “मॅडम, विश्वास परत यायचं म्हणतोय तुमच्याकडे. तुमच्याकडे ठेवून घ्या. चुकी झाली त्याची. एकदाच माफ करा. एवढं वर्ष पुरं करू द्या त्याला. ”

“अहो पण, तो तर बाहेर राहतो म्हणाला. आम्ही नाही त्याला जायला सांगितलं. तो स्वतः रागानं गेला. आता कशाला परत यायचं आमच्याकडे? ”

“मॅडम, होस्टेलची फी परवडत नाही आम्हाला. जागाही मिळणार नाही आता. हॉटेलवर अभ्यास होत नाही. इतके दिवस सांभाळलं तसं अजून थोडे महिने सांभाळा. एवढे उपकार करा माझ्यावर.
“मला आधी सरांना विचारावं लागेल. त्याच्या मनाला येईल तसं वागणं बरोबर आहे का? राग आला की निघून जायचं खुशाल! गरज त्याला आहे की आम्हाला? “ सुनीता रागावून बोलत होती.

“गरज आम्हालाच आहे मॅडम. तो जरा रागीट आहे स्वभावाने; पण तुमच्यावर फार जीव आहे त्याचा. आल्यापासून सारखा रडतोच. तुमची आठवण काढतोय. उद्या येणार आहे तो तिकडं. तेवढं सांभाळून घ्या. पदर पसरते तुमच्यापुढं.” आईचा आवाज रडवेला येत होता.

सुनीतापुढे आता धर्मसंकट उभे राहिले. तिने विजयना सर्व सांगितले. ते म्हणाले “ठीक आहे, येऊ तर दे आधी. ‘ ”

तो खरंच आला दुसऱ्या दिवशी. आल्या आल्या दोघांच्या पाया पडला. विजय म्हणाले, “जाताना तर मला न भेटता, न सांगता गेलास. आता पाया का पडतोस?

चुकलं सर माझं. मी असं वागायला नको होतं. आता नाही असं करणार. तुम्हीच मला आई-वडिलांसारखे. तुम्ही जा म्हणेस्तोवर मी आता कुठेच नाही जाणार.”

त्याची अजीजी पाहून दोघे विरघळले. त्याला राहण्याची परवानगी दिली; पण आता त्याचा फार विचार करायचा नाही. जेवढ्यास तेवढेच वागायचे. त्याची परीक्षा झाली की त्याला जायला सांगायचे. एवढं त्यांनी ठरवले.

अजयला जेव्हा तो परत आल्याचे समजले, तेव्हा तो चांगलाच चिडला. म्हणाला, “आई, मी इकडे लांब राहतो. एका तापट व लहरी मुलाला तुम्ही परत घरात ठेवून घेतलंत. बाबा बऱ्याचदा गावाला जातात. तू एकटी असतेस घरी. बिनसलं पुन्हा काही आणि केलं रागाच्या भरात त्यानं काही तुला तर काय करायचं? टेन्शन येतं मला इथं. ”

“नाही रे अजय, आता नाही तसं वागणार तो. अरे मुलासारखा मला तो. मी त्याला बरोबर हँडल करते. तू नको काळजी करूस. सुनीताने त्याला समजावले; पण तीही मनातून जरा चरकली होती.”
स्वतःहून घेतलेली जबाबदारी आणि लादली गेलेली व नाइलाजाने घेतलेली जबाबदारी यात फारच फरक असतो. पहिली पार पाडण्यात समाधान असते तर दुसरी पार पाडण्यात काहीशी त्रस्तता असते. विश्वासच्या बाबतीत तसंच घडलं होतं. त्याच्याशी विजयचे बोलणे-चालणे अगदीच कामापुरते झाले. सुनीताचे ही मोकळेपणाने बोलणे कमी झाले. तो फरक विश्वासच्या लक्षात हळूहळू आला. सुनिताने तो पूर्वी आवडीने करायचा ती कामे त्याच्याकडून काढून घेतली. “तुझा तू अभ्यासच करीत जा.” असे सांगून त्याला अलिप्त केले. तोही मग स्वतःपुरते काम झाले की खोलीतच बसून राहायचा. काही दिवसांतच तो भाडेकरूसारखा त्या घरात राहू लागला. फरक एवढाच होता की भाडेकरू भाडे देतो. इथे त्यालाच पगार चालू होता. त्याच्याशी निर्माण झालेल्या मौनाचेच ओझे सुनीताच्या मानगुटीवर बसले.

मार्च महिना सुरू झाला. विश्वासची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संपणार होती. एका सेमिनारसाठी विजयना कॉलेजतर्फे दिल्लीला जायचे होते. आठ दिवस ते बाहेरच राहणार होते. सुनिताला अजयचे फोनवरचे बोलणे आठवले. विजय विश्वासला सांगून गेले. “मी आठ दिवस नाहीय इथं. घराची काळजी घे नीट.” विश्वासने होकारार्थी मान हलवली.

ते आठ दिवस सुनीताला फार जड गेले. परत आल्यापासून गप्प गप्प राहणारा विश्वास अचानक विजयच्या विरोधात बोलू लागला. ते कसे सतत रागवलेले असतात, ते कॉलेजमधे त्याच्याबद्दल इतर सरांना काही सांगत असतील का, माझी काही चूक नसताना अमुक तमुक प्रसंगी ते कसे आणि काय बोलले. वगैरे वगैरे. या बोलण्यावर कसे रीअॅक्ट व्हावे सुनीताला समजेना. “तुझा गैरसमज झालाय. सर तसे नाहीत.” असे सांगून पाहीले. पण त्याला ते पटेना. शेवटी कठोरपणे एकदा ती त्याला म्हणाली, “हे बघ विश्वास, तू या घरात आहेस ते केवळ सरांमुळेच. मी तर तुला ओळखतही नव्हते अन् तू त्यांच्याबद्दल माझ्याकडेच असं कसं बोलू शकतोस? पुन्हा असं बोलू नकोस. मला चालणार नाही ते अजिबात.” तो एकदम चपापला व गप्प बसला.

त्याच्या या विक्षिप्त वागण्या-बोलण्याला सुनीता खरेच कंटाळली होती. त्यानंतर एक-दोन दिवसातलाच प्रसंग. सुनीताकडे ओळखीच्या एक बाई आल्या होत्या. बोलता बोलता सुनीताने सहज विश्वासला चहा ठेव म्हणून सांगितले. बरं म्हणत तो आत गेला. दहा पंधरा मिनिटे झाली तरी चहा आला नाही. म्हणून सुनीता आत गेली. तर ‘पुस्तक डोक्यावर पालथे घेऊन पडून राहीला होता. सुनीताला क्षणात अतिशय संताप आला. तिने जोरात हाक मारली, “विश्वास, चहा करणार होतास ना? “काही न बोलता तो शांतपणे उठला. स्वयंपाकघरात गेला. सावकाश चहा करून आणला. तो एकूण प्रसंग आलेल्या बाईंनाही काहीसा विचित्र नक्कीच वाटला होता.

‘“सांभाळून राहा गं बाई. अनोळखी पोरगा ठेवलास घरात.एकटीच आहेस. काय काय येतं पेपरमधे हल्ली.” जाताना मैत्रिणींनी सल्ला दिला. अर्थात, तो काळजीपोटीच होता; पण राग, भीती या मिश्रभावनांनी सुनीताची झोप उडवली. चहा करण्यास सांगितलेले त्यास आवडले नव्हते हे तिच्या लक्षात आले.

दुसऱ्या दिवशी विश्वासने तिला विचारले, “माझी परीक्षा संपल्यावर मला निकाल लागेपर्यंत इथंच नोकरी करायची आहे, जमलं तर हॉटेलवरच करीन, पण मी इथंच राहीन. राहू द्याल ना मला? ” सुनीता विचार करून निश्चयपूर्वक शब्दात म्हटले.

“नाही विश्वास, हॉटेलवर नोकरी करायची असेल तर तू तिकडेच राहा. तसंही परीक्षेपर्यंतच तू इथं राहणार असं तुझी आई मला म्हणाली होती. ”

“म्हणजे, तुम्ही मला इथं राहू देणार नाही? “नाही, ते आम्हाला गैरसोयीचं होईल. त्याऐवजी आम्ही एखादा भाडेकरू ठेवू शकतो. तू रात्री-बेरात्री घरी येणार. तुझ्यासाठी दार उघडायला आम्ही जागं राहायचं का?
“विश्वासचा मूड बिघडला, चेहरा आक्रसला, लाल झाला. कपाळावर आठ्या चढल्या…. चिमटीत आठ्यांना धरत तो त्याच्या खोलीत गेला. दहा मिनिटांत परत आला. म्हणाला, “मॅडम, मग मी आताच जातो निघून, परीक्षेपर्यंत तरी कशाला राहू?

सुनीताला एकदम धक्काच बसला. “अरे, असा कसा जातोस ! आणि राहशील तरी कुठं ! परीक्षा होऊ दे, मग जा. “राहीन कुठंही. परीक्षेचं मागचं वर्ष वाया गेलं तसं हे पण जाऊ दे. मी नाही राहणार आता.’ ” स्वतःवर ताबा ठेवणं सुनीताला कठीण झाले. “हे बघ विश्वास, तुझ्यावर घराची जबाबदारी टाकून सर गेलेत. ते येईपर्यंत तरी थांब. मग जा हवं तर. मागं ही त्यांना न सांगताच तू गेला होतास. आताही तसाच जाणार का? “ठीक आहे तर मग. सर आले की मी लगेच जाईन. नाही तरी तुम्हा दोघांचा रागच आहे माझ्यावर.” ताड ताड पावलं टाकत तो खोलीत गेला.

त्याच्या वागण्या-बोलण्यानं सुनीता हतबुध्द झाली. कुठून याला घरात घेतले असे तिला वाटले. विजयना फोन लावून तिथे शक्य तितक्या लवकर परत येण्यास सांगितले. तेही काळजीने त्यांचे पेपर वाचन झाले की लगेच दुसऱ्या दिवशी आले. ते रात्री आले तेव्हा विश्वास झोपला होता. तो उठला तेव्हा ते झोपलेले होते. त्याने एवढेच विचारले, “सर आले का?”

“हो, रात्रीच आले. आता त्यांच्याशी बोलून काय ते ठरव. “मी माझं ठरवलंच आहे. बॅग मी रात्रीच भरली होती. आता मी निघतो. थोडे पैसे असले तर द्या. काही दिवसांनी परत करीन. “सुनीताने त्याला अडवले नाही. पाचशे रुपये त्याच्या हातात ठेवले. ते घेऊन तो निघून गेला. आई-वडिलांसारखे मानणारा, तुम्ही जा म्हणेपर्यंत कुठेही जाणार नाही म्हणणारा, वाकून पायावर डोके टेकवून नमस्कार करणारा सुनीताकडे न पाहताच निघूनही गेला. सुनीताचे डोके सुन्न झाले. डोळे भरून आले. विश्वास पहिल्यांदा तिच्या दारात उभा होता तो प्रसंग तिला आठवला. वात्सल्याची एक मंद झुळूक बनून आलेला एक काहूर उठवून निघून गेला. जाताना तिच्या विश्वासाच्या चिंध्या-चिंध्या करून गेला. आता तो कुठे जाईल? परीक्षा देईल की नाही? एम. बी. ए. होईल की नाही? की रागाच्या भरात काही वेडवाकडं…..? या अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात तिचे मन गरगरत राहिले.

Author