तू माझी माऊली । तू माझी साऊली ।
पाहतो वाटुली । पांडुरंगे ॥१॥
तू मज एकुला । वडिल धाकुला ।
तू मज आपुला । सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव । तुजपाशी असे ।
तुजविण ओस । सर्व दिशा ॥३॥
June 15, 2026
गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती ।
श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१।
भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी ।
शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२।
प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती ।
विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३।
भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर ।
पवित्रता भासे तेथे, बघता बाह्य परिसर ।४।
गर्दी होती भाविकांची दर्शन घेण्या तेथे ।
साडी चोळी नेसवूनी अभिषेक करीत होते ।५।
सामील झाला तोही इतर भक्त मंडळीत ।
मनी इच्छीले कमी न पडावे तिच्या सेवेत ।६।
साडी चोळी बांगड्या आणि पक्वान्नाचे ताट ।
अर्पण केले जगदंबेला म्हणून स्तोत्र पाठ ।७।
पूजा अर्चा संपवूनी डोंगर पायथी आला ।
यथासांग विधीने मनी तोषला ।८।
संपत असता यात्रा घटना एक घडली ।
एक दुर्बल भिकारी, चक्कर येऊनी पडली ।९।
धावून गेला मदत करण्या हा तिजला ।
औषधोपचार करूनी, अन्न देई पोटाला ।१०।
आशीर्वाद घेऊनी गेला, त्या दुर्बल बाईचे ।
समाधान देई आनंद, त्याला या घटनेचे ।११।
यात्रेमधला खरा आनंद तो यातच मिळाला ।
श्री देवीच्या पूजेहूनी क्षण हा श्रेष्ठ तो ठरला ।१२।
केली होती पूजा सेवा जीवंत आईची ।
अंतर्मनाने पोच दिली खऱ्या समाधानाची ।१३।
डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
September 21, 2020
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची
जोम असतां शरिरीं तुमच्या, करिता देहासाठीं
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, प्रभू चिंतना पोटीं
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा प्रभूचे मार्गे
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त
मिळणाऱ्या त्या ऊर्जेला तुम्हीं, खर्च करा चिंतनांत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 22, 2019
UK निघालंय् काडीमोड घ्यायला EU पासून
देशाच्या भवितव्याची बाब आहे ही.
पण MPs वागतायत् असे, की
जगात UK ला काडीची किंमत राहिली नाहीं.
EU मोडतंय् बोटं
पण तें बेटं
करणार काय !
ब्रेक्झिटवाल्या UK ला
‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’
म्हणणं आहे प्राप्त,
नाहीं अन्य उपाय.
कोण द्वाड?
EU की UK?
कोण unreasonable?
EU की UK?
कोणाला कायकाय हवं आहे ?
अन् कोण त्याला म्हणत नाहींये Ok ?
अगं बाई, थेरेसा मे
आतां झालं बस्स
आतां खाली बस.
आजवर झालीय् सगळी चर्चा फोल
आतां Parliament घेतेय् कंट्रोल.
अगं, तूं Houseमधें अऽस किंवा नऽस
आम्हाला ‘नन्ना’चा पाठ
झाला आहे पाठ.
ब्रेक्झिट चा आत्मा काय आहे ?
Exit की Backstop ?
की परदेशी नागरिक ?
की, टिकणें उद्योगधंद्यांची मत्ता ?
की, नोकर्यांची सुरक्षितता ?
अन् continued आर्थिक सुबत्ता ?
Priority काय आहे ?
Why आहे ?,
तें कुणीच सांगत नाहींये बेटा.
फक्त चर्विचर्वण चालूं आहे.
Parliament मधें जे कांहीं घडतंय्
तें फारच हळूं आहे.
Common Market
की Common Customs-tariff ?
पण कसल्याच विकल्पाची
होत नाहीं तारीफ.
सगळेच विकल्प
होतायत् fail.
होणार की काय
ब्रेक्झिट ची गाडी derail ?
UK ला घ्यायचाय् काडीमोड
ब्रेक्झिट च्या नांवं;
पण, त्याच्या terms काय
तें कुणालाच नाहीं ठावं.
ब्रेक्झिट-भाषणांत
Point of Order
उठसूठ.
चालूं आहे PM चं
बस आणि ऊठ
बस आणि ऊठ.
-- सुभाष नाईक
October 21, 2019
आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे
रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?
निसर्गाच्या ठेव्या मधल्या, सर्व वस्तू सुखदायीं
निवडून घे तूं त्यातील, आनंद देतील काहीं
केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य
आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य
मनाचा हा खेळ जहाला, सुख दुःख समजणें
निसर्ग प्रयत्न करितो, सदैव सुख देत जाणें
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 1, 2019
कर पडले चरणीं
भाव जाण देवा ।।धृ।।
देह झुकला पुढती
लिनतेनें मान वाकती
मनाची करूनी एकाग्रता
भावनेला वाट देतां
अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १
कर पडले चरणी भाव जाण देवा,
प्रथम येई भावना,
जागृत करते मनां
मनाचा ताबा देहावरी
तेच तुजला प्रणाम करी
घे प्रभू जाणूनी अत:करणातील ठेवा २
कर पडले चरणी भाव जाण देवा
मुखीं नाम तुझे घेई
देह सारा शहारून जाई
आनंदाची फूटते उकळी
नाचते मन सर्व काळी
मनाचा चंचल स्वभाव समजोनी तूं घ्यावा ३
कर पडले चरणी भाव जाण देवा
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 13, 2016
February 5, 2022
आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 3, 2020
प्रेम क्षमा,प्रेम तमा,डोळ्यातील अन कारून गरीमा
प्रेम असू,प्रेम हसू,हृदयातील अन दारूण जखमा
प्रेम रंग, प्रेम दंग,मेंदूतील अन विरळ प्रतिमा
प्रेम सूर, प्रेम स्वर,कंठातील अन मंजुळ नगमा
प्रेम जीवन,प्रेम संजीवन,सुखदुःखाचे अन अनुबंधन
प्रेम बंध, प्रेम संबंध, देहदीलाचे अन रणकंदन
प्रेम मोह, प्रेम संमोहन,सुचे न काही तुझेच। चिंतन
प्रेम संग, प्रेम संगम,दोन दिलाचे एकच स्पंदन
प्रेम चिंता,प्रेम चिंतन,अन प्रेम तारुण्याचे आमंत्रण
प्रेम गीत,प्रेम संगीत,श्रावणातील अन अमृत सिंचन
प्रेम दुवा,प्रेम दवा, प्रेम असे अन वाऱ्यापरी अमूर्त
प्रेम धर्म,प्रेम कर्म,माणुसकीचे असे अन खोल गर्त
- महेश सूर्यवंशी
(कागल)
August 23, 2018
मराठदेशाच्या मातीचा गर्जा जयजयकार
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
उन्नत दुर्गम सह्यकड्यांचा
निबिड वनें, बेलाग गडांचा
जलदुर्गांच्या दृढ पंक्तीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
चपळ, वायुसम घोडदळांचा
शूर मावळ्यांच्या टोळ्यांचा
गनिमी काव्याच्या क्लृप्तीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
अतूट बुरुजांच्या रांगांचा
लखलख पात्यांच्या खड्गांचा
ढालीसम निधड्या छातीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
पावन ईप्सित, जीनवनिष्ठा
ध्येयपूर्तता हीच प्रतिष्ठा
स्वराज्यअमृतघटप्राप्तीचा गर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
शक्ति-युक्ति-नीतीचा संगम
प्रजासुखा कायम अग्रक्रम
श्रीरामासम शिवनृपतीचा जर्जा जयजयकार ।।
मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।।
- सुभाष स. नाईक
मुंबई
M- 9869002126.
eMail : vistainfin@yahoo.co.in.
Website : www.subhashsnaik.com
www.snehalatanaik.com
February 21, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti