(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल भाग ५६ – चवदार आहार -भाग १८

    नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी.

    जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही.
    दिसायला बारीक सुरकुतलेली जरी दिसली, तरी जिभेवर चुरूचुर निर्माण करणारी चव काही औरच असते.

    त्रिकटू या आयुर्वेदीय प्रक्षेप द्रव्यातील सुंठ आणि पिंपळीच्या मधे बसलेली ही मिरी कच्चीच वापरली जाते, हे बहुधा पाश्चात्य मंडळींनी पाहिले, तेव्हापासून ते काळी मिरीची पावडर सूप सॅलेडमधे वापरू लागले. मिरची वापरण्याएवढी आपली योग्य प्रकृती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मिरचीची तहान त्यांनी मिरीवर भागवली बहुतेक !

    आजारपणातून उठल्यावर पहिला घासाच्या तूपभातावर मिरी हवीच. सकाळी दात घासण्याच्या दंतमंजनापासून, पापड आणि ऊसळीपर्यंत तर असतेच. पण अगदी आमरसाच्या वाटीत जावून तुपाच्या बरोबरीने विराजमान होणारी ही मिरी.

    सणसणीत उष्ण तीक्ष्ण गुणाची, उत्तम दीपक म्हणजे भूक वाढवणारी, पाचक म्हणजे पचन घडवणारी, घाम आणून ताप कमी करणारी, ह्रदयाला हितकर, उत्तम जंतुघ्न, कृमींचा नाश करणारी, स्रोतसांमध्ये असलेला आमाचा चिकट अडथळा स्वशक्तीने दूर करणारी, आतून जखम स्वच्छ करणारी, सर्दी खोकल्यापासून डायबेटीस आणि ह्रदयरोगापर्यंत अप्रतिम रिझल्ट देणारी, वात कफावर विजय मिळवणारी आणि पित्ताला वाढवणारी असते. सर्व रोगांचे मूळ असलेल्या, मंद अग्निला वाढविणारी असल्यामुळे, वैद्यप्रिया बनलेली आहे.

    जिथे पाणी, आंबटपणा, गोडपणा जास्त असतो, तिथे मिरी वापरली जाते. म्हणून कदाचित कोकणात जास्त वापरली जाते. कोकणात उत्पन्न होत असल्याने कोकणी प्रकृतीला सहजपणे मानवणारी, तसाच स्वभाव बनवणारी, पण अंतिमतः सुखकर ठरणारी, ही मिरी म्हणजे अगदी कोकणप्रिया. कोकणी महिलेला आपल्या गळ्यामधील मंगळसूत्रातील जणु काळे मणीच वाटावेत, एवढी प्रिय.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    18.11.2016

      November 18, 2016


  • किचन क्लिनीक – कच्चे केळे व केळफूल

    किचन क्लिनीक – कच्चे केळे व केळफूल

    आपल्या पैकी ब-याच मंडळींना कच्च्या केळ्याची भाजी व केळफूलाची भाजी नक्कीच आवडत असणार.कच्च्या केळीचे काप,भाजी,भजी,चिप्स अगदी छान लागतात तर केळफूलाची भाजी,कटलेट देखील रूचकर लागतात बरं का.

    जसे ह्या दोघांचा स्वयंपाकात उपयोग होतो तसाच ह्याचा युक्तीपुर्वक वापर केल्यास आपण ह्याचा घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो.

    कच्चे केळे हे तुरट गोड थंड गुणाचे असून शरीरातील कफ पित्त कमी करते तर केळफूल हे चवीला कडू तुरट असून उष्ण असते व हे शरीरातील वात कफ हे दोष कमी करते.

    आता ह्यांचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)जुलाब होत असल्यास कच्च्या केळीचा चीक तांदुळाच्या पेजेसह प्यावा.

    २)संडासमधून आव पडत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून द्यावा.

    ३)अपचन,अम्लपित्त ह्यात कच्च्या केळीच्या पिठाच्या चपात्या कोरड्याच खाव्यात

    ४)मधुमेही रूग्णांना कच्च्या केळीची व केळफूलाची भाजी पथ्यकर आहे.

    ५)कच्च्या केळीच्या सालीची राख एरंडेल तेलात मिसळून पायाला पडणा-या कात्र्यांवर लावावे.

    ६)मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून खायला द्यावा.

    कच्ची केळी व केळीचे बोंड खायचा अतिरेक केल्यास संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016


  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ४

    पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ?

    पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत.

    जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे नाहीत.

    मुंबई सारख्या शहरात पालेभाज्या रेल्वे लाईनच्या बाजुला कसल्या पाण्यावर पिकवतात ते सर्वजण बघतात.

    पालेभाज्या जमिनीलगत वाढतात, म्हणून त्या नीट धुवूनच घ्याव्या लागतात. शहरात तर चक्क गटाराच्या पाण्यात धुवुन मार्केटमधे आणतात. अश्या धुण्याने किती जंतुसंसर्ग वाढेल?
    कधी विचार केलाय याचा ?

    बरं या पालेभाज्या अधिक हिरव्यागार दिसण्यासाठी, अधिक टवटवीत दिसण्यासाठी, अधिक लवकर तयार होण्यासाठी त्यावर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातोय. एका सर्वेक्षणात तर असे आढळले आहे की जंतुनाश होण्यासाठी जे प्रमाण वापरले जायला हवे त्यापेक्षा किमान पाचशेपट अधिक जहाल रसायन या पालेभाज्यांवर फवारले जातेय. ही माहिती खते आणि फवारणीची रसायने विकणाऱ्या एका होलसेल विक्रेत्यानेच एका व्हिडिओ द्वारे सांगितली आहे. तो म्हणतो, "इसी से हमारे मार्केट मे माल जल्दी खतम हो रहा है, हमारा धंदा बढ रहा है ।"

    स्वतःचा व्यवसाय तो वाढवून घेतोच, पण व्यवहारात तो डाॅक्टर मंडळींचा व्यवसाय देखील काही हजार पटीने वाढवित असतो. ते तर पुरस्कार करणारच. त्यांच्या टेक्समधे जे आहे, ते करायलाच हवे ना.

    शुद्ध स्वच्छ निर्जंतुक हे शब्द केवळ पुस्तकात वाचण्यासाठीच शिल्लक राहिले आहेत की काय असे वाटते.

    प्रत्येक जण आपला व्यवसाय कसा वाढेल हेच बघतोय.

    इथे, कुणी कुणाचे नाही राऽजा,
    कुणी कुणाचे नाऽही

    मग काय करायचं ?

    पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या अगदी खात्रीच्या माणसाकडून विकत घ्याव्यात, ज्याने त्या चांगल्या पाण्यावर वाढवलेल्या आहेत. त्याच्या मुळात कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही आणि वरून फवारणीसाठी कोणतेही जहाल विष फवारलेले नाही.

    दुर्दैवाने असा माणूस नाहीच मिळाला तर मार्केटमधील पालेभाज्या नीट पहाव्यात.
    ज्या आकाराने लहान, ज्यांची पाने किडींनी कातरलेली आणि खाल्लेली असतील, ज्यांच्या पानावर भोके पडलेली दिसतील, त्या भाज्या जगायला योग्य वाटल्यामुळे त्या किडींनी खाल्लेली असतात, असा उदात्त विचार करून घरी आणावीत........

    पालेभाज्याविषयी यापूर्वी तीन चार टीपांमधून बराच उहापोह झाला आहे. तरी पण नवीन सदस्यांना हा महत्वाचा विषय कळणे आवश्यक वाटते, म्हणून अजून एखादा भाग पालेभाज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.......

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    19.10.2016

      October 19, 2016


  • किचन क्लिनीक – करमल

    किचन क्लिनीक – करमल

    कोकण गोवा प्रांतात सापडणारे हे फळ.
    ह्या फळाचा उपयोग लोणचे,पाक,मासे अथवा अन्य आमटी मध्ये छान आंबट चव आणायला केला जातो.हे फळ नुसते देखील खायला रसरशीत छान लागते.

    ह्याचे झाड फार मोठे नसते.पाने पातंळ असतात व हा सदाहरित वृक्ष असतो.ह्या झाडाला भरपूर फळे येतात व ह्या झाझापासून आपल्याला छान थंड सावली मिळते.करमलाचे फळ हे शिरांनी युक्त असते तसेच ते कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळे दिसते.

    कच्चे फळ हे आंबट,उष्ण व वातपित्त दोष
    वाढविंणारे असते.तर पिकलेले फळ हे गोड,आंबट चवीचे व थंड असून पित्त शामक असते.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)तोंडाला चव नसणे,जीभेवर जाड पांढरा थर जमणे,तोंड घसा कोरडा पडणे,ह्यात पिकलेली करमले सैंधव व खडीसाखर धालून केलेली चटणी जेवणासोबत खावी.

    २)भुक लागत असून देखील खाल्लेले अन्न नीट न पचल्याने चिकट दुर्गंधयुक्त संडास होणे व त्यामुळे अन्न अंगी न लागणे,अशक्तपणा येणे ह्यामध्ये १ करमल पिकलेले +१/४ चमचा मिरपुड +१/२ चमचा जिरेपूड हे मिश्रण जेवणाच्या मध्ये खावे व मग उरलेले जेवण जेवावे.

    ३)पोटात आग होणे,मळमळणे,भुक न लागणे ह्यात ६ चमचे पिकलेल्या करमलाच रस+ चिमूट सैंधव+१ चिमूट मिरपुड + १ चिमूट जिरेपूड हे मिश्रण दिवसातून दोन वेळा जेवणाच्या आधी घ्यावे.

    कच्ची करमले खाऊ नयेत.

    करमले अतिप्रमाणात खाल्ल्याने संडासला घट्ट होते व दात आंबतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016


  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ६

    हा खेळ आकड्यांचा

    पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे.

    आपण अगदी मुळापर्यंत जाऊ.

    अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या आधारावर ?

    भारतात हैद्राबाद येथे एक युनीट आहे, जे भारतातील अन्नधान्याचे स्टॅण्डर्डायझेशन ठरवते.
    ती संस्था नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्युट्रीशन. एन आय एम.
    ही संस्था आपल्या अन्नधान्यांच्या व्हॅल्युज नक्की करत असते. याची तपासणीची नेमकी पद्धत काय आहे ? हे आकडे येतात कुठुन ? म्हणजे एक वाटी तांदुळामधे किती कॅलरीज आहेत हे मोजण्यासाठी हे तांदुळ एका क्लोज चेंबर मधे ठेवून जाळले जातात. आणि या जळण्यातून किती उर्जा तयार होते, किती वायु बाहेर पडतात, त्यातून किती ह्युमीडीटी तयार होते, किती तेल शिल्लक राहाते, राखेत काय काय मिळते इ. च्या आधारावर हे " आकडे " प्रसिद्ध केले जातात.

    हा केवळ आकड्याचां खेळ आहे. त्यात फार काही तथ्य नाही. केवळ कागदोपत्री पुरावे हवेत म्हणून किंवा काही तरी व्हॅल्युज नक्की करण्यासाठी, अभ्यासाला एक दिशा मिळावी म्हणून ही पद्धत स्विकारली गेली आहे.

    आता लोच्या इथे आहे की, हे केवळ पुस्तकी ज्ञान झाले. व्यवहारात एवढी परम्युटेशन काॅम्बीनेशन दिसतात, त्यांचा विचारच कोणी करत नाही. परदेशात असा विचार शिकवणारा आयुर्वेद नाही. म्हणून आज पाश्चात्य लोक आयुर्वेद शिकायला भारतात येताहेत.

    जसे
    भारतात पन्नास साठ प्रकारचे तांदुळ मिळतात,
    या प्रत्येक प्रकारातील तांदळाच्या गुणधर्मात फरक असणार नाही ?
    फरक असतो.
    आयुर्वेद सांगतो, गुणात फरक असतो. पंजाब मधे तयार झालेले तांदुळ, महाराष्ट्रात तयार झालेले तांदुळ आणि केरळ मधे तयार झालेले तांदुळ यातील गुणांमधे खूप मोठ्ठा फरक आहे. बासमती तांदुळ महाराष्ट्रात खाल्ला गेला तर परिणाम वेगळे. पंजाबमधे दिसणारे परिणाम वेगळे.

    आनूप आणि जांगल असे दोन प्रदेश आणि त्याचे अन्नावर होणारे परिणाम आम्ही आमच्या आयुर्वेदाच्या सात वर्षाच्या अभ्यासक्रमात शिकलो आहोत. त्याची सरकारी परीक्षा दिलेली आहे. मान्यताप्राप्त सरकारी यंत्रणेने तसे प्रमाणपत्र आम्हाला दिलेले आहे.

    आयुर्वेद म्हणजे केवळ पाळेमुळे आणि सापसरड्यांच्या प्रदेशातील आणि भिकारडी माणसे रहात असलेल्या भारत देशातील, रस्त्यावर पाळेमुळे विकणारी मंडळी म्हणजे आयुर्वेद नव्हे. (काही सुशिक्षित व्हाईट काॅलर्ड मंडळींना अजूनही तसे वाटतेय हे भारताचे दुर्दैव आहे. असो. )

    काही तांदुळ साठ दिवसात तयार होतात,
    काहींना नव्वद दिवसही लागतात,
    यांच्या कार्बोहायड्रेटस मधे फरक असणार की नाही ?
    फरक पडतो.
    आयुर्वेद सांगतो, फरक पडेल.

    तयार झाल्यावर लगेच वापरला, तर आणि दोन वर्षे जुना करून वापरला तर फरक पडणार नाही ?
    फरक पडतो.
    आयुर्वेद सांगतो, फरक पडेल.

    सालासकट ( म्हणजे भात while rice with छिलका ) ठेवला तर गुण वेगळे, साल काढून तांदुळ तयार करून ठेवला तर गुण वेगळे. त्यातही पाॅलीश केलेला असेल तर गुण आणखीनच बदलणार.

    सालासकट शिजवून वाळवला तर गुण वेगळे, (ज्याला आपण उकडा तांदुळ म्हणतो. ) सुरय तांदुळाचे गुणधर्म वेगळे.

    तांदुळ भाजून ठेवला, आणि वापरला तर गुण बदलतात, तेलात भाजून शिजवला तर गुण बदलतात, तुपात भाजला तर गुण बदलतात, मंद विस्तवावर भाजला तर गुण बदलतात, अग्नि प्रखर असेल तर फक्त बाहेरून साल जळेल पण आतून कच्चाच असेल, याच्या गुणात फरक पडणार नाही ?

    पाश्चात्यबुद्धीची कावीळ झालेल्यांना कदाचित फरक समजणार नाही, पण ज्यांच्या सरकारमान्य आयुर्वेद सेवेला वीस पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना हे फरक दिसतातच.

    तांदुळ ज्या पद्धतीने खाणार त्या पद्धतीने, (विशेषतः अग्नीचा विचार करून. हा आयुर्वेद तज्ञांचा अगदी आवडीचा शब्द आहे. ) त्याची तपासणी झाली तर ती स्टॅन्डर्ड समजावी असे आयुर्वेदतज्ञ म्हणतात.

    व्यवहारातही असेच दिसते.

    लिखाण वाढतंय, पण विषय पूर्ण होऊदे,
    100 ग्रॅम श्रीखंड दहा निरोगी माणसांना सकाळी दहा वाजता खायला दिले. आजच्या स्टॅन्डर्ड रक्त तपासणी वगैरे सोपस्कार पूर्ण केले.
    पुनः दोन तासानंतर तपासणी केली. तर त्या सर्वांचे रक्त तपासणी रिपोर्ट एकच येतील का ? खरंतर यायला पाहिजेत. पुस्तकात लिहिलंय ना. पण व्यवहारात असं दिसत नाही. त्या प्रत्येक माणसाच्या पचनशक्तीवर त्या श्रीखंडाचा परिणाम वेगवेगळा दिसतो. म्हणून काही जणांची साखर वाढलेली दिसते, काही जणांची कमी होईल काही जणांवर विशेष परिणाम दिसणार नाही.

    केवळ अन्नपदार्थ जाळून त्याची राख तपासणे आणि त्या पदार्थाची गुणवत्ता ठरवणे हे कितपत संयुक्तिक आहे ? राख तांदुळाची आहे इथपर्यंत ठीक आहे. पण ते तांदुळ या प्रकारच्या जमिनीमधे एवढ्या दिवसात तयार झालेले होते. त्यांचा गुणस्वभाव अमुक आहे, हे कसं सांगू शकणार ?

    हे म्हणजे एखाद्या बेवारस प्रेतावर दहन संस्कार झाल्यावर, चार दिवसांनी अस्थि गोळा करायला जावे आणि त्या जळलेल्या हाडावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचे गुणांकन करावे तसे झाले.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    21.10.2016

      October 21, 2016


  • जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 9

    ऋतुनुसार, दिनमानानुसार सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 10 हा काल कफाचा, 10 ते 2 पित्ताचा आणि 2 ते 6 हा वाताचा काळ येतो. असेच सायंकाळ पासून सकाळ पर्यंत समजावे.

    जेवण हे भूक लागेल तेव्हा घ्यावे. भूक असेल तेवढेच घ्यावे. परंतु सूर्य असेपर्यंतच घ्यावे. म्हणजे सर्व साधारणपणे दिवसा जेवावे. रात्रौ जेवू नये.

    व्यवहारात, नियम करायचाच झाल्यास, जेवणाच्या मुख्य वेळा दोन सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात.

    पण आपण समजा दुपारी बारा वाजता पोटभर जेवलो तर पुनः चरचरीत भूक किती वाजता लागेल ? रात्री 8 वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? आठ तास. दुपारचे जेवण पचायला फक्त आठ तास.

    समजा, रात्री 8 वाजता पोटभर जेवलो तर पुनः भुक कधी लागते ? पित्ताची प्रकृती असलेल्यांना सकाळी नऊ दहा वाजता. आणि इतरांना चरचरीत भूक कधी लागेल? चरचरीत भूक लागेल, दुपारी बारा वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? सोळा तास. रात्रीचे जेवण पचवायला सोळा तास ?????

    दिवसाचे जेवण पचायला फक्त आठ तास आणि रात्रौचे जेवण पचायला तब्बल सोळा तास जातात. एवढा वेळ का लागतो ?

    उत्तर सोपं आहे, दिवसा सूर्य असतो म्हणून आणि रात्रौ सूर्य नसतो म्हणून.

    आपण हे पाहिलंय की सूर्य म्हणजे अग्नि.
    पचन घडवणारा तो सूर्यनारायण. हजर असला तर पचन होणारच ना ! त्यात विशेष ते काय ?
    प्रश्न येतो तो, रात्रीचं पचन घडवणार कोण ?

    पचन घडवणे म्हणजे नेमके काय हे पण आपण अन्नपचन कसे होते ? या लेखमालेतून पाहिले आहे. पचन म्हणजे रूपांतरण. एका बाह्य घटकद्रव्याचे रूपांतर शरीराला योग्य होईल अशा अवस्थेत बदलवून घेणं. त्याचे शरीरातील वेगवेगळ्या विकरकामार्फत ( एन्झाईम्स) विघटन घडवून आणणे, त्याचे चांगल्या ( उपयुक्त) आणि वाईट (टाकाऊ) भागात विभागणी करणे, चांगल्या भागातून शरीराचे पोषण करवणे, टाकाऊ भाग जवळच्या मलमार्गापर्यंत आणून ठेवणे, इ. कामे करवून घ्यायला, शरीरातील काही उर्जा संपून जाते. म्हणजे पचन घडवून आणायला, रूपांतरण घडवायला, उर्जा निर्माण करायला उर्जा संपून जाते.

    या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता एक रूपक पाहू. हे उदाहरण ग्रंथात लिहिलेलं नाही. पण समजून घेण्यासाठी थोड्या वेळ पुरतं विचारात घेऊ.

    आपल्या शरीरात एक बॅटरी आहे. जी सोलर एनर्जी वर चालते. सूर्योदय ते सूर्यास्त असं हिचं चार्जिंग सुरू असतं. जोपर्यंत चार्जिंग सुरू असतं, तोपर्यंत सगळी हेवी ड्यूटी कामे करून घ्यावीत. चार्जिंग संपल्यावर जर बॅटरीकडून काम जास्ती करून घेतलं तर बॅटरी लवकर संपून जाईल, अगदी तस्सच होतं पचनाचं.

    सूर्यास्तानंतर या शरीरातील बॅटरी, बॅकअप वर जाते. पचनासाठी लागणारी उर्जा संपू नये असं वाटत असेल तर बॅकअपवर कमीत कमी काम करायचे. म्हणून सूर्यास्तापूर्वी जेवून घ्यावं. जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पचन पूर्ण करून घ्यावं आणि पुढील महत्वाच्या कामासाठी ही बॅटरी रिझर्व्ह ठेवावी. सकाळपर्यंत नो प्रॉब्लेम. पचन पूर्ण. उठल्या उठल्या दोन नंबरचा काॅल येणार. आणि संपूर्ण दिवस चांगला जाणार.

    सायंकाळी एवढ्या लवकर जेवणार म्हणजे सकाळी लवकर जाग येणार. भूक लागूनच जाग येणार. किंवा कदाचित झोपच लागणार नाही. कारण तशी सवयच नाही ना. गेल्या चाळीस वर्षातील चुका दुरूस्त करायच्या असतील तर थोडा त्रास तर होणारच. काहीजणांची थोडी अॅसिडीटी वाढणार.
    हा पोटात पडणारा खड्डा सुखासाठीच असल्याने त्याचं दुःख मानायचं नाही, ( देहे दुःख ते सुख मानीत जावे ) असं आपलं आधीच ठरलं आहे.
    कुछ बडा पाने के लिए कुछ छोटा खोना तो पडता ही है दोस्तो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    04.03.2017

      March 4, 2017


  • कंकोळ

    ह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ते गुळगुळीत व तांबूस रंगाचे व ६-८ मिमी व्यासाचे असते.त्याला वर एक छोटा देठ असतो व ते सुगंधी असून तोंडात धरले असता गार वाटते.

    ह्याचे उपयुक्त अंग आहे फळ व तेल.कंकोळ चवीला तिखट,कडू असते व हे उष्ण गुणाचे असून हल्के रूक्ष व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक असते.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)सुज व वेदना युक्त अवयवांवर कंकोळचा लेप करतात.

    २)मुखरोगात कंकोळाचे फळ चघळायला देतात.

    ३)जखमेवर कंकोळाचे तेल लावतात.

    ४)कंकोळाने घामामुळे येणारी दुर्गंध नष्ट होते.

    ५)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारीत कंकोळ उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️Dr Swati Anvekar

      February 9, 2018


  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

    हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते.

    हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते.
    आता हिचे औषधी उपयोग पाहूया.

    १)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी.

    २)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना कमी होतात.

    ३)मोठ्या व्यक्तिंना क्रुमीचा त्रास झाल्यास करडईची भाजी करडईच्याच तेलात शिजवून खावी.

    ४)लघ्वी चिकट व गढूळ होणे ह्यात करडईच्या पानांचा रस २ चमचे+धणे पूड १ चमचा हे मिश्रण रोज सकाळी ८ दिवस घ्यावे.

    ५)घशात चिकट कफ येणे व तोंडात चिकट लाळ तयार होणे ह्या तक्रारीवर करडईची कोवळी पाने चावून त्याचा रस थुंकावा.

    हि भाजी जास्त खाल्ल्यास डोळ्यांचे विकार,रक्तदोष व पित्ताचे विकार होतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      October 24, 2016


  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १३

    दूध न देणारी गाय, शेतीसाठी निरूपयोगी ठरलेला बैल, शेरडू न देणारी शेळी, रेस हरणारा घोडा, यांना पोसून काय उपयोग? असा विचार करणारी पिढी भारतात जन्माला येतेय. हे संस्कारवान भारतीय संस्कृतीचे दुर्दैव नव्हे काय ? मग आईबाबांना देखील वृद्धाश्रमात टाकायला यांना लाज वाटेनाशी होतेय....
    ......आणि यात गैर ते काय ?
    .......पोराच्या बोटाला धरून पाळणाघरात नेणाऱ्या आईबाबांना नंतर त्यांचे पोर हाताला धरून वृद्धाश्रमाची वाट दाखवणारच.......
    .......त्यात नवीन पिढीचे काय चुकले ?
    .......प्रत्येक गोष्ट पैश्यावर मोजणाऱ्यांना हीच शिक्षा योग्य आहे. असे कधीतरी वाटते.

    पाश्चात्यांच्या संस्कारांना एवढे डोक्यावर बसवले की, आपले हित कशात आहे हेच कळेनासे झाले आहे.

    बरे जे कोणी संस्कृतीचे रक्षण करणारे आहेत, त्यांच्यावर तथाकथित संस्कृतीरक्षक अशी उपहासात्मक पदवी देणारेही भारतीयच आहेत. प्रत्येक गोष्टीत फक्त पैसा आणि पैसाच बघणे ही पाश्चात्य वैश्यवृत्ती आहे. हा भारतीय विचार नाही, हे सुद्धा आता कळेनासे झाले आहे.
    मग आम्ही भारतीय संस्कृतीरक्षक गाईला गोमाता का म्हणतो हे यांच्या कसे लक्षात येणार ? आणि मातेचे संरक्षण करायचे असते, हे यांना कोणत्या स्तरावरून समजावणार ?
    उपयोगिता संपली की या जनावरांना क्रूरपणे, निर्दयपणे खाटीकखान्यात पाठवावे ?
    काय म्हणावे या वैचारिक गुलामीला ?

    "यांना कत्तलखान्याची वाट दाखवली तर यात गैर ते काय, यांचे पोषण करण्याच्या हट्टापायी भारतीय शेतीचे आजवर नुकसान होत आले आहे. अनुत्पादक गोष्टी तात्काळ संपवल्या पाहिजेत," असे आग्रहाने प्रतिपादन करणारे, एक महत्वाची गोष्ट विसरतात, कि भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टी ने पशुधन ही प्रेमाची गोष्ट आहे. ज्या बैलांबरोबर आयुष्यभर त्याच्या साथीने आपली उपजिवीका वाहिली, कष्ट करवून घेतले, त्यांची उत्पादकता आणि उपयुक्तता यांचा पैशात हिशोब खऱ्या भारतीय शेतकऱ्याला मंजूर नसतो.

    मोठ्यामोठ्या बंगल्यात राहून भाकड पशुधनावर, विनाकारण पोषणाचा आळ ठेवत, चर्चासत्रे झोडणारे मात्र, त्यांच्या बंगल्याची राखण करणाऱ्या कुत्र्याला किंवा लळा लावलेल्या मांजराला, ती वयस्कर झाल्याने आता नष्ट करू, ठार मारू असा विचार करताना दिसत नाहीत. असे का ? (अजून तरी कुत्र्यामांजराचे मांस खायला यांनी सुरवात केली नाही म्हणून असेल कदाचित.....)

    एक भाकड गाय देखील नीट नियोजन केले तर दोन माणसाचे कुटुंब पोसू शकते, हे व्यावहारिक भारतीय सत्य आहे. याचा अभ्यास आता पाश्चात्य करू लागले आहेत.
    तेव्हा पाश्चात्य संस्कारांनी बुद्धी भेद करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे कि, भारतीय संदर्भ, भारतीय ग्रामीण जनतेची मानसिकता, त्यांची निरूपयोगी पशुंकडे पाहाण्याची दृष्टी, एकुण आर्थिक कुवत आणि सरकारी स्तरावरील पशुधनाची पैदास, ही इतर देशातील आकडेवारीपेक्षा, भारतीय आकडेवारीमधे आणि भारतीय मानसिकतेमधे फार वेगळे अंतर ठेवते.

    दुर्दैवाने भारतातला एक मोठा वर्ग, जो पूर्णतः शाकाहारी म्हणून ओळखला जाई, त्या कुशाग्र बुद्धीतील काही जणांकडूनच आज मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे समर्थन होताना दिसत आहे.
    हा बुद्धि भेद करणाऱ्यांना लवकरच सद्बुद्धी दे रे परशुरामा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    13.10.2016

      October 13, 2016


  • याला जीवन ऐसे नाव भाग १२

    वाग्भटाचार्य म्हणतात, भोजनापूर्वी पाणी पिल्याने, (भूक मेल्याने, जेवण कमी जाते. परिणामी ) शरीर बारीक होते.

    जेवणानंतर पाणी पिल्याने जाडी वाढते. जेवण झाल्यामुळे अग्नि मंद झालेला असतो. पोटात आलेले अन्न, घुसळण्याचे काम सुरू होऊन,
    पचनाचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी पाणी पिल्याने, उकळी आलेल्या तयार चहात थंडगार पाणी ओतून सर्व चहा परत गार अवस्थेत नेल्यासारखे होते. पुनः तो गरम होण्यासाठी जास्ती अग्निची आवश्यकता पडते. तसेच, पचन पूर्ण होण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. त्यावेळी त्यावर पाणी ओतून चुलीतील पेटलेला अग्नि विझवण्याचे पाप करू नका. असे केल्याने अन्न पोटात तसेच पडून रहाते आणि जाडी वाढते.

    आणि जेवता जेवता पाणी पिल्याने शरीर संघटन जसे आहे, तसेच राहाते. मिक्सरमध्ये नारळ वाटता वाटता जर पाणी घातले तर नारळाचा उत्तम रस निघतो. तसे आहे. वाग्भटाचार्यांच्या ग्रंथातील सूत्रस्थान 5-14 या श्लोकामधून ही माहिती मिळते.

    पाणी कमी करण्यासाठी, आर्द्रता कमी. होण्यासाठी, अग्निची आवश्यकता असते.
    पाणी आणि अग्नि एकमेकाचे पिढीजात शत्रू. जिथे पाणी वापरले जाते, तेथील अग्नि नाहीसा होतो, या व्यावहारिक सत्याला आरसा कशाला हवा ?

    एकदा एका लमाणी माणसांच्या तांड्याशी संवाद साधण्याची संधी शोधली. एका सकाळी 9 वाजता घरातील (घर कुठले, तंबूच ) सर्व आवरून, घरातील सर्व माणसासकट, ही मंडळी आमच्याच घराच्या बाजूला एका स्लॅब घालायच्या कामाला आली. पहिलं काम केलं ते डबे खाण्याचं. त्यांच्या डब्यावर माझं लक्ष होतं. जसं शिंप्याचं लक्ष कपड्याच्या डिझाईनवर, बूट पाॅलिश करणाऱ्याचं लक्ष बूटावर, केशकर्तनकाराचं लक्ष केसांच्या स्टाईलवर असतं, तसं माझं लक्ष खाण्याच्या डब्यावर !

    डब्यात डाळ भात भाकरी आणि लसणाची सुकी चटणी. कापडात गुंडाळून ठेवलेल्या भाकऱ्यांची चवड. त्याच्यावरच लसणाचा लालभडक गोळा. मी त्यांना विचारलं, एवढ्या भाकऱ्या भाजायला सकाळी कधी वेळ मिळाला ? त्यावर त्या लेकुरवाळ्या माऊलीने उत्तर दिलं. "आज नाही भाजल्या, बुधवारी सुटी असते, तेव्हाच भाजून ठेवल्या." मी उलटे दिवस मोजायला सुरवात केली. तो वार होता सोमवार. म्हणजे बुधवार ते सोमवार तब्बल सहा दिवसापूर्वी भाजलेल्या भाकऱ्या ती आत्ता खात होती. मी भाकरी हातात घेऊन बघीतली. कडकडीत पापडच जसा ! मी विचारले, एवढे दिवस या भाकऱ्या टिकल्या कश्या ? ती आपल्या भाषेत म्हणाली, "ते मला माहिती नाही, पण आमच्या भाकरी खाऊन झाल्या की उरलेल्या भाकऱ्या आम्ही सूर्याला दाखवतो."

    कानाखाली झणकन मारल्यासारखे तिचे शब्द कानात घुसले. विज्ञानातले एक व्यावहारिक सत्य त्या अशिक्षित, निरक्षर माऊलीने सहजपणे मला उलगडून दाखवले होते.

    भाकरी सूर्याला दाखवतो, सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. दगडाच्या राशीवर भाकऱ्या पसरून ठेवतो, म्हणजे सूर्य त्यातील पाणी आपल्या उष्णतेने शोषून घेतो आणि त्या टिकवतो. ज्या पदार्थात पाणी कमी तो पदार्थ जास्त दिवस टिकतो, हे व्यावहारिक, त्रिकालाबाधीत, वैश्विक सत्य तिच्याकडून मला शिकायला मिळाले होते.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    19.12.2016

      December 19, 2016