(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

    आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.

    यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.

    मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.

    नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.

    रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.

    मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.

    आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.

    हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.

    जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.

    प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.

    निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
    याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.

    अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
    .....आणि वैद्यांनी सुद्धा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.02.2017

      February 14, 2017


  • आजचा आरोग्य विचार – भाग पंचवीस

    केवळ पोटावर चार सहा बिस्किटे दाखवता आली म्हणजे पूर्ण आरोग्य मिळत नसते, जिममधला व्यायाम हा हट्टी व्यायाम प्रकार आहे. विशिष्ट स्नायुंची ताकद विशिष्ट व्यायाम करून वाढवता येते, पण त्याचा परिणाम इतर मांसपेशीवर वा अन्य नाजूक अवयवावर होतो, हे पण लक्षात घेतले जात नाही.

      February 25, 2018


  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ५

    पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो,
    आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ?
    आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात,
    खरं वाटत नाही.
    पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ?
    आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय.
    नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ?

    कालच्या आरोग्यटीपेवरील काही व्यक्त काही अव्यक्त टीका ....

    आपण आपल्या धारणाच बदलून टाकल्या आहेत. म्हणजे जे मूलतः भारतीय विचार होते, ते कालबाह्य म्हणून टाकून दिले आणि ज्या लोकांना संस्कृती म्हणजे काय ? जेवावे कसे, हे माहिती नव्हते, त्यांना हे सर्व आपण भारतीयांनी शिकवले. आज त्यांचा अनुनय आपण करतोय ? ते सांगतात, त्यावर पूर्णसत्य म्हणून विश्वास ठेवतोय. कालाय तस्मै नमः । दुसरं काय ?

    या लेख मालेतून आपण भारतीय आरोग्य ( आजच्या काळात किती श्रेष्ठ आहे हे ) जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण आधीच ठरवलेले आहे. त्यादृष्टीने सर्व लेखन चाललेले आपल्या लक्षात येत असेल.

    आज आमची धारणा अशी झाली आहे, की जे जे पाश्चात्य ते ते चांगले. पण हे आमच्या लक्षात येत नाही, की त्यांच्या धारणा, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, हा भारतीय जीवनपद्धतीपेक्षा कितीतरी भिन्न आहे.

    आजच्या शिक्षणपद्धतीमधला हा दोष आहे की आमचे ते सर्व वाईट आणि पाश्चात्यांचे सर्व योग्य असे शिकवले जाते. हे पण पटणारे नाही काही जणांना.
    टाय बांधला की माणूस सुसंस्कृत, सुशिक्षित वाटतो. हे खरंही असेल पण तो खरंच तसा होतो का ? मग शेंबुड सुद्धा पुसता येत नाही अशा शाळेत जाणाऱ्या पोरांना टाय बांधायची आवश्यकताच काय आहे ? ( टायचा उपयोग शेंबुड पुसण्यापेक्षा आणखी चांगला काय असू शकेल ? ) केवळ दिसण्यापेक्षा आतून तसे भारतीय असणे आवश्यक वाटते.

    मी मोदींची भलावण करतोय असं नाही, पण टाय न लावतादेखील भारतीय पोशाखात आपले व्यक्तिमत्व खुलवता येऊ शकते. विचार भारतीय असला की सगळं शक्य असतं.

    पण काय भुललासी वरलीया रंगा... ही आमची स्थिती झाली आहे. भारताबद्दलचे प्रेम सोडता येत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचा मोह टाळता येत नाही. न घर का ना घाट का अशी अवस्था आपली झाली आहे.

    त्याची कित्ती उदाहरणे सांगू. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती पाश्चात्य विचारांनी वागतोय, सहज हिशोब करीत बसलो होतो, तेव्हा असे लक्षात आले की तब्बल 127 ठिकाणी आम्ही आमच्या मूळ परंपरा, रितीरिवाज, भाषा, पोशाख, चालीरिती बदललेल्या आहेत, ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत चालला आहे.
    म्हणून मी सुरवातीलाच म्हटले, मूळ भारतीय आरोग्यापासून आपण खूप लांब चाललो आहोत.

    पालेभाज्यांच्या पार्श्वभूमीवर डोक्यात येणारे उलटसुलट विचार आजच्या ग्लोबलायझेशनच्या फास्ट ट्रॅक युगात रूचणारे नाहीत, पटणारे मुळीच नाहीत पण काय योग्य होते, आणि आपण काय करीत होतो, ज्यामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहात होते.

    कुठेही शास्त्रीय आधार न सोडता, व्यवहारात काय चालले आहे, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

    मी संपूर्णपणे भारतीय बनण्याचे ठरवलेले आहे. आत्ता सुरवात झालेली आहे. वेळ गेलेली नाही. आजपासून अजून पन्नास वर्षे शिल्लक आहेत.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    20.10.2016

      October 20, 2016


  • याला जीवन ऐसे नाव भाग १८

    जलाचे दोन प्रकार आकाशातून खाली येणारे आणि जमिनीतून वर येणारे.
    त्यातील आकाशातून खाली येणारे पाणी हे जास्त श्रेष्ठ सांगितले आहे.

    पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी स्वच्छ भांड्यात धरणे आवश्यक आहे. जमिनीला स्पर्श झाला की, त्यातील अशुद्धी पाण्यात मिसळायला सुरवात होते.

    पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात ही पाण्याची पहिली शुद्धी आणि ढगाला थंड हवा लागली की त्याची दुसरी शुद्धी. परत पाणी बनते, आकाशातून खाली येते. स्वच्छ आणि शुद्ध असते. परत खाली येताना वायु प्रदूषणामुळे वातावरणातील काही अशुद्धी त्यात मिसळल्या जातात, म्हणून हे पाणी आता शुद्ध करून घ्यावे लागेल. अन्यथा हे पाणी जर प्रदूषण रहित भागातील असेल तर या आकाशीय जलावर कोणत्याही शुद्धी संस्कारांची गरज नाही. देवलोकातील लोकांना जसे अमृत तसे हे अव्यक्तरस आकाशजल मनुष्यांसाठी जीवन आहे, असे ग्रंथकार म्हणतात.

    जसे प्रत्येक ठिकाणी उगवणारा सूर्य तोच असतो, पण प्रत्येक गावातील सूर्योदयाची वेळ गावानुसार वेगवेगळी असते. तसेच आकाशातून पडणारे जल तेच असते, पण ते जेव्हा खाली येत असते, तेव्हा ते स्थानिक दोषांनी युक्त होते. शहरी भागात ही अशुद्धी जास्ती असते. पण ग्रामीण भागात ही अशुद्धी कमी आढळते.

    जमिनीवर पडले की ते मातीत मुरते. मातीतले गुण त्या पाण्यात येतात. या नियमानुसार कोकणात समुद्र काठाला रहाणाऱ्या लोकांना समुद्रातील पाण्यात असलेल्या अतिरिक्त क्षारांचा सामना करावा लागतो. तर हिमालय कि गोद मे आयोडीनची कमतरता जाणवते. कारण तेथील पाण्यात नैसर्गिक अनुपलब्धतेमुळे आयोडीन मिळतच नाही.

    जंगल असलेल्या ठिकाणी पाणी पडले तर ते पचायला हलके होते, तर चिखलमय, दलदल असलेल्या प्रदेशातील पाणी रोग निर्माण करणारे होते. विहिरीतील पाणी हितकर असते. पण तलाव नदी, सरोवर यातील पाणी अहितकर असते.

    जसे जमिनी बद्दल सांगितले आहे तसे ऋतुबद्दल पण सांगितले आहे. ग्रीष्म आणि शरद या ऋतुमध्ये पडलेले आकाशीय जल हितकर असते. इतर ऋतुमधे पडलेले जल रोग वाढवणारे असते.

    दिवसा नभातून पडलेले जल जास्त चांगले असते, तर रात्री पडणारे जल त्यामानाने वाईट असते.

    जेवताना मधे मधे प्यायलेले पाणी पथ्यकर म्हणजेच सर्वांना हितकर असते. पण जेवणाच्या सुरवातीला आणि शेवट घेतलेले पाणी अहितकारक असते, असे शास्त्रकार सांगतात.

    पाणी हे शेवटी पाणी असते. ते कुठे पडते यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असते.

    पाण्याचा थेंब मातीवर पडला तर भूमीत विरून जातो, पण तोच एक थेंब विशिष्ट शिंपल्यात पडला तर त्याचाच मोती बनून जातो.

    शेवटी पात्र महत्वाचे !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    25.12.2016

      December 25, 2016


  • आहाररहस्य १५

    जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे.

      September 15, 2016


  • किचन क्लिनीक – पीच

    किचन क्लिनीक – पीच

    हे चीनी फळ आपल्या देशात देखील थंड हवेच्या ठिकाणी पिकविले जाते.हे फळ जेवढे दिसायला सुंदर तितकेच चवीला देखील सुरेख लागते.

    ह्याची चव आंबट गोड आता फिकट पांढऱ्या रंगांचा मऊ गर असतो.बाहेरून पिवळसर लाल रंगांचे असते.त्याला एक प्रकारचा मादक सुवास येतोय.हे थंड गुणाचे असून ते शरीरातील वातपित्त दोष कमी करते व कफ वाढविते.

    पीच कलर हे नाव ह्या रंगाला ह्याच फळाच्या रंगावरून पडले आहे जो बऱ्याच जणांच्या आवडीचा रंग असतो.

    चला आता आपण ह्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:

    १)मुत्राशयातील खडे विरघळायला १ कप पिचचा रस+१ चमचा धणे पुड हे मिश्रण रोज जेवणा आधी प्यावे.

    २)खुप ताप येऊन लघ्वी कडक होणे,जळजळ होणे,लघ्वीला कमी होणे ह्यात १ कप पिचचा रस+२ चमचे साखर हे मिश्रण २-३ वेळा प्यावे.

    ३)साल काढलेल्या पिचचा गर १ वाटी रोज रात्री खाल्ल्यास मळाचे खडे होणे,मलबध्दता कमी होते.

    ४)लहान मुले झोपेत लघ्वी करतात त्यांना रोज १ चमचा वावडींगाचे चुर्ण पाण्यासह प्यायली द्यावे व पीच खायला द्यावा.

    ५)ब्लड प्रेशर वाढून लघ्वी कमी होत असल्यास पिचचा रस १ कप+१/४ चमचा वेलची पूड+१ चमचा धणे पुड हे मिश्रण प्यावे.

    पीच खायचा अतिरेक केल्यास सर्दी,जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – अंतिम भाग पंचवीस

    निरोगी कोण ?

    आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
    आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.

    यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.

    जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.

    जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.

    प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
    कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.

    आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.

    म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.

    पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?

    या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.

    आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
    पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.

    आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?

    सकाळी हलकेच जाग यावी.
    उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
    पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
    समाधानाची अनुभूती घ्यावी.
    सणसणीत भूक लागावी.
    मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
    दिवसभर गाडी पळवावी.
    तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
    शक्ती पुरवून वापरावी.
    विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
    पुनः भुकेची जाणीव व्हावी.
    हलक्या आहाराने ती पुरी करावी.
    झालेली कामे सहज आठवावी.
    ही ईश्वराची कृपा समजावी.
    आणि मस्त झोप यावी.
    निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
    "तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
    आणि सकाळी हलकेच जाग यावी.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.04.2017

      April 9, 2017


  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017

      March 16, 2017


  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २०

    प्रमेहामधे नुसता जिभेवर संयम ठेवून चालत नाही. झोपेवर पण संयम ठेवावा लागतो. आपल्या मूळ श्लोकातील आस्यासुख शब्दानंतरचा दुसरा शब्द स्वप्नसुख.

    स्वप्न या शब्दाचा अर्थ निद्रा, झोप. नेहेमीची शांत झोप लागणे वेगळे आणि लोळतलोळत पडणे वेगळे!

    नेहेमीची शांत झोप आवश्यकच आहे. आरोग्याच्या प्रमुख घटकामधे ती आहार आणि ब्रह्मचर्याबरोबर स्विकृत झालेली आहे.

    झोप अशी हवी की, तिला अन्य गोळी, अभ्यास, अंथरूण पांघरूण, उशी, अंगाई, कोणाचीही गरज नसावी. पडल्या पडल्या ती आली पाहिजे. दिवसभर एवढे श्रम व्हावेत, की कधी एकदा आडवे टेकतोय असे व्हावे, आणि पाठ टेकताक्षणी ती प्रसन्न व्हावी. जसं झोपून उठून मलविसर्जनाला गेल्यावर पाच मिनीटात परत बाहेर यावेसे वाटले पाहिजे. आणि झोप पूर्ण झाल्यावर आणखी थोडावेळ झोपूया, असे न वाटणे म्हणजे झोप पूर्ण होणे. मुख्य म्हणजे या झोपेचे समाधान मिळाले पाहिजे.

    झोपेचा आणखी हव्यास वाटू लागणे म्हणजे प्रमेहाकडे वाटचाल सुरू होणे.

    अर्थात हे लहान मस्तीखोर मुले जी दिवसभर फक्त धावपळच करतात आणि झोपतात, त्यांच्यासाठी नाही सांगितलेले !

    ज्यांची झोप पूर्ण झालेली आहे आणि ज्यांना नुसते अंथरुणात लोळत पडायला आवडते, त्यांना थोडे लवकर अंथरूणातून उठून बाहेर पडायला हवे. ही जास्तीची झोप शरीरातील कफ दोष वाढवते.

    दोषांची प्राकृत कर्मे ही शरीरात होतच असतात पण या प्राकृत कामापेक्षा, गरज नसताना, आणखी जास्त कार्य घडून येणे म्हणजे प्रकोप होणे आणि गरजेपेक्षा काम कमी होणे हा दोषांचा क्षय मानावा. अतिरिक्त झोपेमुळे सुस्ती, येते. शरीर आळसावते. पचन मंदावते. अग्नि कमी होतो.

    आपण कसं रात्री झोपताना खोलीतील मोठा बल्ब कमी करून झिरोचा बल्ब सुरू ठेवतो, तसेच झोपल्यावर शरीरातील अग्निदेखील कमी केला जातो. म्हणूनतर झोपेपूर्वी पचन पूर्ण होऊन मगच झोपणे अपेक्षित आहे. म्हणून कामा निमित्त (वा असेच वाॅटसपसाठी) जागरण करणाऱ्या मंडळींना पचनाच्या विकृतींना सामोरे जावे लागते. पचनाचा आणि झोपेचा, झोपेचा आणि अग्नीचा खूप जवळचा संबंध आहे.
    अग्नि कमी झाला की स्थित्यंतर, बदल होणे कमी होते. स्थिरता येते. मेद वाढतो. जाडी वाढते. म्हणजेच प्रमेहाकडे वाटचाल सुरू होते.

    हे निरीक्षण फक्त आयुर्वेदात वर्णन केले आहे. ऋषींची ही दृष्टी आपल्याला आत्मसात होणे अपेक्षित आहे.

    मी या स्वप्नसुखमचा आणखी एक शब्दशः अर्थ लावतो, तो म्हणजे झोपेत स्वप्नातदेखील सुख बघणे. झोपेतदेखील सुखाचाच विचार करणारी स्वप्ने बघणे म्हणजे स्वप्नसुख.

    काही जणांना वाईट स्वप्न पडतात ते किंचाळत ओरडत उठतात, दुसऱ्यांची झोपमोड करतात. काही जणांना ही स्वप्ने आठवतात, तर काहींना अजिबात आठवत नाहीत. ही वाताची स्वप्ने.

    काहींना आपल्याला स्वप्न पडले होते एवढे आठवते, भानावर येतात आणि खुदकन हसतात आणि लगेचच परत झोपतात.ही स्वप्ने त्यांच्या लक्षात राहातात, ही पित्ताची स्वप्नप्रकृती.

    तर काहीजण या स्वप्ननगरीतून बाहेरच पडत नाहीत. जागे झाले तरी याच स्वप्नधुंदीत राहातात. झोपेतच हसतात, बोलतात, चालतात सुद्धा. पण भान नसते की आपण अजून झोपेतच स्वप्न बघत आहोत. पूर्ण भानावर येतात, तेव्हा जाग येऊन पुनः झोपतात. ही कफाच्या स्वप्नाची दुनिया असते.

    आणखीन एक झोप ही फक्त रात्रीच घ्यायची असते. दिवसाचे झोपणे हे शंभर टक्के वर्ज्य.
    वामकुक्षी वेगळी. आणि भरपेट जेवून, पंखा किंवा एसी लावून अंथरूण घालून, डोक्यावरून पांघरूण घेऊन, 'चला आता मस्त झोपतो', असे म्हणत जे झोपणार, त्यांचा सोबतीला प्रमेह नक्की येणार.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.02.2017

      February 5, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे  – भाग चार

    “शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “

      April 13, 2017