पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात.
उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल.
फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात प्रथम मोहोरी तडतवणे महत्वाचे असते. मोहोरीनंतर नंबर येतो हिंग किंवा मिरच्यांचा ! गरम तेलात हिंग फुलतो आणि शुद्ध होतो. हिंग वापरताना शक्यतो खडा हिंग आणावा. म्हणजे भेसळ कमी मिळते. आणून तो तूरडाळीमधे ठेवला तर डाळीला वास पण छान येतो आणि टिकते देखील.
सध्या पतंजलीचा हिंग चांगला आहे.
फोडणी करून झाली की त्यात
जी भिजवलेली कडधान्ये आहेत, ती घालावीत म्हणजे तेलाचा तडका आणि भडका कमी होतो नंतर हळद, उसळीचा मसाला, मिरचीपूड इ. घालावी, म्हणजे त्यातील औषधी गुण टिकून रहातील. नंतर थोडेसे परतून मग पाणी घालून शिजवावे.
यातील मसाले हे भूक निर्माण करतात, पचन घडवून आणतात किंवा वासाने सुद्धा पाचक स्राव वाढवतात. तिखट मिरची पूड नको असल्यास, आले, मिरी या मसाल्याचा वापर करावा.
पदार्थ शिजून झाला कि नंतर त्यात मीठ घालावे म्हणजे कमी पुरते. आणि उडून जात नाही.
युक्ती वापरून मसाल्याचा तीक्ष्ण उष्ण तिखट गुण कमी जास्त करावा. यासाठी प्रदेशानुसार नारळ किंवा शेंगदाणे कूट वापरावे.
कोणताही अन्नपदार्थ शिजवताना, त्यावर झाकण ठेवू नये, त्याला सूर्य, चंद्र, वारा, यापैकी कोणाचातरी स्पर्श व्हावा, असे विधान आहे. आणि पदार्थ शिजत असताना त्यातील काही घटक उडून जाणे देखील अपेक्षित असते. झाकण ठेवले तर आतील अन्नाला गरजेपेक्षा जास्त उष्णता लागते आणि जीवनसत्व नष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते. झाकण ठेवून शिजवले असता, इंधन वाचेल पण पदार्थ अपेक्षेपेक्षा जास्ती लवकर शिजतो. आणि गडबड होते.
अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वयात येणे धोकेदायकच असते ना !!!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
13.11.2016
November 13, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !
जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.
एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.
तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.
प्रकृती म्हणजेच निसर्ग !
सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.
बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.
रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.
ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.
हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
कारण,
शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.05.2017
May 12, 2017
डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात.
काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम आकाराचा असतो.ह्याची फुले नारंगी लाल रंगांची असतात तर फळे गोल लालसर व टपोरे दाणे युक्त असतात.
ह्याचे गोड फळ हे थंड व त्रिदोष शामक असून गोड आंबट चवीचे फळ हे किंचीत पित्तकर असते तर आंबट फळ हे कफवातनाशक असून पित्तकर असते.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)लहान मुलांना होणाऱ्या जुलाबात फळाची साल पाण्यात उगाळून मधासह त्याचे चाटण द्यावे.
२)पित्ताचा त्रास,आंबट ढेकर,जळजळ ह्यात १/२ डाळींब रस+१ चमचा खडीसाखर घ्यावी.
३)तापामध्ये तहान लागत असल्यास थोड्या थोड्या वेळाने डाळींबाचा रस प्यावा.
४)डाळींबाची साल सुकवून त्याची पूड करावी व त्याने दात घासावे ह्याने दात व हिरड्या बळकट होतात,रक्त स्त्राव होत असल्यास कमी होतो.
५)घसा बसणे,दुखणे,टाॅन्सील्स वाढणे ह्यात डाळींबाच्या ताज्या सालीचा काढा+चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात.
डाळींब अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब,सर्दी असे त्रास होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 18, 2016

ह्याचे ३-५ मी उंच,सदाहरित,छायायुक्त व अतिसुगंधी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट किंवा पिंगट रंगाची व खडबडीत जड व ६ मिमी जाड असते.टहाळ्या रोमश व पाने ८-१५ सेंमी लांब असतात.नवीन पाने तीक्ष्ण व दंतूर असतात.पानाच्या पृष्ठ भागी राळेच्या गाठी असतात.स्त्री व पुरुष पुष्प वेगवेगळ्या वृक्षांवर उगवतात.हे लहान तांबडी व सुगंधी असते.ह्याचे फळ १-२ सेंमी लांब व पिकल्यावर लाल व आंबट गोड लागते हे फळ सरबतासाठी वापरतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा.कायफळ चवीला तुरट,कडू,तिखट असते.तसेच हे उष्ण गुणाचे असून हल्के व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक आहे.
चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)कायफळ चुर्णाचा वास घेतल्यास भरपूर शिंका येतात व डोके दुखी व सर्दी कमी होते .
२)कायफळ चुर्ण व्रण स्वच्छ करायला तसेच भरून आणण्यास उपयुक्त आहे.
३)दातदुखत असल्यास कायफळ काढ्याने गंडूष करतात व चुर्ण मंजनासाठी वापरतात.
४)कायफळ चुर्ण कफनिस्सारक असल्याने खोकल्यात उपयुक्त आहे.
५)त्वचारोगात देखील कायफळ चुर्ण उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
March 21, 2018
अजून कोणी पाणी वाचवा मोहिमे अंतर्गत कागदच वापरा योजना सुरू करा योजनेची घोषणा केलेली नाही. पण पाश्चात्य देशात मात्र या कागद वाचवा योजनाच चालतात. तिथे जेवल्यानंतर सुद्धा वाटीभर पाण्यात हात बुचकळून कागदाला बोटं पुसायची पद्धत. मग नंतरच काय विचारता ?
February 19, 2018
गहू हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. कफकर आहे. थंड हवेत तयार होणारा आणि त्याच थंड हवेत पचण्यायोग्य असा आहे.जर गहू पचला नाही, तर तो उत्तम कफवर्धक, उत्तम आमनिर्मिती करणारा, अत्यंत चिकट, अश्या अवगुणांचा आहे.
August 24, 2017
गहू कोकणी माणसांनी, कोकणात तर खाऊ नयेच. पण जिथे पिकतो तिथे सुद्धा तो खावा की नाही, अशी परिस्थिती आहे. या संदर्भात काही गोष्टींची माहिती जरूर असावी.
August 25, 2017
लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.
September 3, 2016
जेवण सकाळी आणि सायंकाळी करावे ?
काहीतरीच सांगताय राव ! ही काय जेवायची वेळ आहे ? भूक तर लागली पाहिजे ना ! आमचं सकाळचा नाश्ता खाल्लेलाच पचत नाही, तर जेवायचं कुठुन ?
यासाठी काही मुलभुत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज जे काही सांगितले जातेय, ते कितपत योग्य आहे ते आधी ठरवावं लागेल.
दर दोन तास किंवा चार तासांनी सतत खात रहा, असे आज डाॅक्टरांकडून सांगितले जाते, नाहीतर म्हणे अॅसिडीटी वाढेल म्हणून खावे, असेही सांगितले जाते, असे रुग्ण सांगतात, डाएटीशियन तेच सांगतात, जिम इन्स्ट्रक्टर तेच सांगतात. मुळात प्राॅब्लेम इथेच सुरू होतोय. ज्यांना आरोग्य माहिती आहे त्यांना आहारशास्त्राची माहिती नाही. ज्या डाएटीशियनना आहारशास्त्र माहिती आहे, त्यांना आरोग्याची काहीही कल्पना नाही. आणि जिम इन्स्ट्रक्टरना फक्त प्रोटीन डाएट खपवणे एवढेच माहिती. बाकी त्यांना ओकी ठो माहिती नाही. पण आयुर्वेद तज्ञांना त्यांच्या सिलॅबसमध्ये दोन्ही शास्त्र शिकवली जातात. हेच आयुर्वेदाची प्लस बाजू.
आयुर्वेदात आहाराविषयीचे एक अत्यंत मह्त्त्वाचे सूत्र सांगितले जाते, ते म्हणजे "भूक असेल तेव्हा जेवावे, नसेल तर खाऊ नये." या सूत्राचा आधार घेऊन असे निश्चित सांगता येईल कि दर दोन चार तासांनी भूक नसली तर अजिबात खाऊ नये.
गॅस पेटलेला असेल तरच वर अन्न शिजेल ना. गॅस पेटलेलाच नसेल तर ? चमचाभर पाणी सुद्धा गरम होणार नाही. बरोबर आहे ना ? भूक नसताना जेवले तर अजीर्ण होईल. मग जेवायचेच कशाला ? सकाळ असो वा संध्याकाळ दुपार असो वा रात्र भूक नसताना अजिबात जेवू नये.
आयुर्वेद म्हणतो, वेगान् न धारयेत्
वेगान प्रवृत्तयेत् ।
शरीराकडून निर्माण केलेला वेग अडवू पण नये, किंवा त्याच्या मुद्दाम विरोधात जाऊ नये.
मग आज असे उलटे आणि चुकीचे का सांगितले जाते ?
ते मी कसं सांगू? मी सांगितले तर ते चुकीचे होईल ना.
तो नास्ति मम अधिकारः ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.02.2017
February 27, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग सहा
औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला.
औषधे किती हवी जवळी ?
औषधे ? कि, "ती" हवी जवळी ?
औषधांमधे ताकद आहे कि "तिच्यामधे" जास्ती ताकद आहे.
जर "ती" जवळ असेल तर,
जर तिने जवळ घेतले असेल तर ,
जर तिला जवळ धरले असेल तर,
औषधे कशाला हवीत ?
असं या प्रश्नकर्त्याला विचारायचे आहे.
ती माझे सर्वस्व!
ती माझी प्रेरणा !
ती माझी धारणा !
ती माझी शक्ती !
तीच माझी भक्ती !
शक्तीचीही शक्ती तीच तूही !
सतत असतेस अंतरी
न दिसशी दुसऱ्यास जरी
माझी कर्ती करविती
बोलवती धनी तीच तूही !
केवळ बाजूला बसूनी
सतत सूचना करूनी
घेते गाडी चालवूनी
दुसऱ्या करवी
कधी कोपशी
कधी उर्वशी
कधी फटकारीशी
कशी कवटाळीसी
अशी कशी तू ललना
सांभाळीशी माझ्या जीवना
माझा प्राण तू
माझा श्वास तू
माझा भास तू
अंतरीची आस तू
तू माझे जीवन
जीवन झाले पावन
पावन होण्या कारण
कारण माझे मन !
मनासी देसी कामना
आत्म्यासी चेतना
शरीरासी वासना
तूची देसी
जन्मलो तुझ्यासाठी
जगेन तुझ्यासाठी
सोडलीस जर साथ तू
मृत्युही उभा दारी
सोडू नको साथ अशी
दुधावरची साय जशी
मुलाला माय तशी
रहा जवळी माझेपाशी
खरंय हे ?
एवढी ताकद आहे "तिच्यामधे" ?
का शंका का यावी मनामधे ?
एवढी जपावी ह्रदयामधे ?
अशी कोण लागोन गेली ?
"ती" म्हणजे कोण हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.
मला "ती" म्हणजे "प्रतिकारशक्ती" वाटली.
आणि आपल्याला. ?
वाचा पुनः
- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
24.04.2017
आजची आरोग्यटीप
April 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti