आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग एक
आरोग्य तपासणी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे शोधून काढली, कंप्युटर, डिव्हाईस, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, इ. उपकरणे विज्ञानानेच दिली आहेत. युक्तीने त्याचा वापर करून घेता यायला हवा. आम्ही यंत्रावर एवढे अवलंबून रहायला लागलो कि, सामान्य बुद्धीचा किमान वापरदेखील करता येईनासा झाला. आणि यंत्र जे सांगेल ते अंतिम सत्य वाटायला लागले. "मला काय होतंय हे सुद्धा मला कळेनासे झालेय."
अंतिम निदान घेऊनच वैद्याकडे रूग्ण येताहेत.
"मला ब्लडप्रेशर आहे,
मला डायबेटीस आहे,
मला दोन वेळा अॅटॅक येऊन गेला आहे,
माझं रक्त सारखं कमीच असतं. कितीही पालक खाल्ला तरी रक्त वाढतंच नाही,
मला थायराॅईड आहे,
किती प्रकारची लेबल लावून रूग्ण येतात. बरं त्यांना विचारावं,
" तुम्हाला काय होतंय ?"
तर, त्यांना प्रश्नच कळत नाही, परत परत खोदून विचारावं लागतं,
"तुम्हाला त्रास काय होतोय?"
तेव्हा खूप आठवून रूग्ण सांगतो,
"मला तर त्रास काहीच होत नाही."
"मग औषध कशासाठी घेताय ?" असं परत विचारलं तर सांगतात, "डाॅक्टरनी रिपोर्ट केले आणि सांगितले म्हणून, रिपोर्ट मधे काहीतरी दोष होता म्हणून औषधे सुरू केली होती."
आम्ही या रिपोर्टच्या एवढे आधीन झालो आहोत की त्रास असला तरच औषधे घ्यायची असतात, हे पण आम्ही विसरून गेलो आहोत.
जितकं शक्य आहे, तितका मला माझा आजार यंत्राशिवाय कळला पाहिजे. मला काय होतंय, हे यंत्राशिवाय मला समजलं पाहिजे. एवढं तरी आरोग्य साक्षर व्हायलाच हवे ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.05.2017
May 23, 2017
जेवण शाकाहारीच आहे, पण त्यातही किती विविध छटा दिसतात ना ? सात्विक राजसिक तामसिक इ.इ.
आपण घेत असलेल्या आहारांचा गुणाशी काहीही संबंध असतच नाही, ही ऋषीमुनींनी केलेली थापेबाजी आहे, असे काही जणांना वाटते. पण वास्तवात असे नाही.
बाजारात हाॅटेलमधे मिळणारे अन्नपदार्थ आणि घरात तयार होणारे अन्न यात फरक नाही ? घरात आईने केलेले पदार्थ आणि हाटेलातील बाईनं केलेले पदार्थ, यातील कॅलरीज कदाचित सारख्याच असतील, पण भावनांचा विचार केला तर निश्चित फरक पडतो.
हाटेलमधे केलेल्या जेवणात घरच्या सारखी स्वच्छता, पवित्रता, विवेक आणि मांगल्य कुठुन येणार ? हाटेलच्या जेवणाने कदाचित पोट भरेल पण मन भरणार नाही. कारण त्यात भाव असत नाही. प्रेम असत नाही. असतो फक्त पैसा. बिझनेस ! जो वैश्यवृत्तीच्या इंग्रजाकडून आपण शिकलोय.
तामसिक आहार घेणाऱ्याची वृत्ती केवळ चवीने जेवण करणे आणि पोट भरणे !
राजसिक आहाराने मन आणि बुद्धी चंचल होते. राजसिक प्रवृत्तीची माणसे अत्यधिक महत्वाकांक्षी असतात!
आणि सात्विक भोजन संतुलीत असते. कारण असं जेवण केल्याने मादकताही निर्माण होत नाही, ना आळस, ना अशक्तपणा ना उत्तेजना. केवळ स्फूर्ती येते आणि ताकद मिळते.
समजा आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जेवायला गेलेला आहात. पंचपक्वान्नाचे संतुलीत, चौरस जेवण तयार आहे. परंतु जेवण वाढणाऱ्यांनी उपरोधाने आपणाला म्हटले,
"काय हो ऽऽऽ, यापूर्वी असे जेवण तुमच्या उभ्या आयुष्यात कधी खाल्ले होते काय ?"
तर तुम्हाला ते चांदीच्या ताटात वाढलेले जेवण आवडेल काय ?
इथे भाव महत्वाचा आहे. कॅलरीज नाहीत.
दुसऱ्याच्या घरातील जाऊदेत, आपल्याच घरात आपली आई किंवा सौभाग्यवती वा बहिणाबाई भाकरी करीत आहे. साध्या चटणीबरोबर ती गरम गरम भाकरी इतकी छान लागते. सहज तोंडातून शब्द बाहेर येतात,
" व्वाह, क्या बात है, "
एका भाकरीने भूक भागतच नाही. दुसरी भाकरी घेता, तिसरी मागता.. तसा आईचा चेहेरा खुलत जातो. वाटलं तर परत पीठ भिजवेन, पण जरा दमानं खा, असं प्रेमानं म्हणते. तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव बघण्यासारखे असतात.
आता सीन बदला.
आपल्याच घरात स्वयंपाकाला आलेली बाई भाकऱ्या करीत आहे. त्याच चटणीबरोबर तुम्ही भाकरी खाताय. तुम्हाला भाकरी आवडली आहे. तुम्ही आणखी एक भाकरी तिच्याकडे मागताय. आता तिचा चेहेरा नीट बघा. कपाळावर आठ्या, डोळे वटारलेले, 'मेल्याला आजच भाकऱ्या खायची लहर आलीय, जरा कुठे घरी लवकर जाणार होते, तो बसला गिळायला' जणु असे भाव तिच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसताहेत.........
तुम्हाला ते समजताहेत....
असलेली भूक क्षणार्धात गायब होऊन जाते. आणि भरल्या ताटावरून ऊठावेसे वाटते ना ?
असे का झाले ? तर भाव बदलले.
भाव बदलले, तर चिडचिड वाढतेच ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.10.2016
October 17, 2016
अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही.
April 2, 2017

ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.
April 10, 2018
आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते.
बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो.
चला मग बदामाचे गुणधर्म पाहूया:
बदाम चवीला गोड,तुरट,उष्ण,स्निग्ध,बलकारक,वातनाशक,
कफपित्तवाढविणारे,पौष्टिक,सारक,बुद्धिवर्धक,
पचायला जड,शुक्रवाढविणारे आहे.
आता बदामापासून बनविलेल्या व्यंजनाचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)बदामखीर/मिठाई:
गोड,पौष्टिक,उष्ण,पचायला जड,झोप आणणारी,शुक्र धातूवाढविणारी,बुध्दिवर्धक,
वातपित्तनाशक,बलकारक आहे.
२)बदामाचे तेल:
गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातपित्तनाशक,
कफकर,मेंदूलाशांतकरणारा,वृष्य,उष्ण,
पोषक,डोकेदुखी कमी करते.हे तेल कानाच्या रोगात देखील उपयुक्त आहे.
बदामाचे अतिसेवन केल्यास पित्तवाढून जुलाब देखील होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
January 9, 2017
आज आयुर्वेद व्यासपीठ या नामवंत संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात तब्बल चारशे व्याख्यानांचा एक झंझावात उठत आहे. आयुर्वेद क्षेत्रातील ही एक मोठी क्रांतीकारी घटना असेल.
गेली सात आठ महिने सुरू असलेली कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी, सर्व तालुक्याच्या ठिकाणी काम करीत असलेल्या वैद्यांशी संपर्क, प्रत्यक्ष पत्र व्यवहार, आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी व्यासपीठच्या सर्व कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली.
ती सुद्धा स्वतःच्या खिशातील पैसे आणि वेळ संपवून.
सर्व ठिकाणी एकाच पद्धतीचे व्याख्यान घेतले जावे यासाठी प्रथमच ऑनलाईन वक्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील तब्बल साडेतीनशे वैद्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या घेतला.
काही वैद्य तर आज पहिल्यांदाच, स्टेजवरून जाहीर कार्यक्रमात बोलणार आहेत...
पण मनात ठाम विश्वास निर्माण झालाय,
निर्धार पक्का केलाय....
समाज मन बदलवून टाकण्याचा....
आरोग्य क्षेत्रात जे चुकीचे पायंडे पडत चालले आहेत ते बदलवण्याचा !
कोणाच्याही वैयक्तिक हितासाठी नसलेल्या या सेवाभावी कार्यक्रमाचे नियोजन पाहून ' महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन ' ने या कार्यक्रमात आपला बहुमोल सहभाग दर्शविला. जो सर्व वैद्यांना प्रेरणा देणारा ठरलाय.
एकाच दिवशी एकाच विषयावर एकच संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पोचत आहे.
ही आयुर्वेद क्षेत्रातील एक महान घटना आहे. असे मला वाटते.
आपल्या जवळच्या ठिकाणी आपणाला या व्याख्यानाला उपस्थित रहाता आले तर अवश्य पहावे. आपल्या नातेवाईक मित्र मंडळींना सांगावे.
एकच संदेश आज समाजात जाणार आहे तो म्हणजे इथे प्रत्येकाचे वेगळेपण जपले जाते.
इथे म्हणजे आयुर्वेदात !
आजच्या ग्लोबलाइज्ड युगात वावरतानादेखील प्रत्येकाचं अस्तित्व जपणं महत्वाचं आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, स्वभाव वेगळा, विचार वेगळा, हाताचे ठसे वेगळे, केसांची आणि डोळ्यांची रचनाही वेगळी. रोग होण्याची कारणे जरी एक असली तरी त्याची प्रकट होणारी लक्षणे मात्र वेगवेगळी निर्माण होतात. मग सर्वांना औषध एकच कसे चालणार ? वेगवेगळेच हवे. असा विचार फक्त आणि फक्त आयुर्वेदच करू शकतो.
आज जग फार झपाट्याने जवळ येत आहे. माणसे लांब गेली तरी त्यांचे विचार जवळ येत आहेत.
प्रदेश दूर दूर असले तरी पदार्थ मात्र कमीत कमी वेळात एका ठिकाणहून दुसरीकडे पोचताहेत. रेल्वे, विमान इ सोयीमुळे तयार अन्नपदार्थ देखील इकडून तिकडे पोचताहेत.
यामधला बिझनेस आणि राष्ट्रीय एकात्मता या एक दोन गोष्टी जमेच्या धरल्या तर बाकी आरोग्याचे एकुण तीन तेराच वाजतात.
हं.
हा विचार पटायला, आपली वैचारिक पचनशक्ती वाढवण्यासाठीच आजचा हा धन्वन्तरी जयंतीनिमित्त आयोजित केलेला महामहोत्सव !
थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली या फ्रेझमधे थोडा बदल करून म्हणावेसे वाटते,
थिंक ग्लोबली बट इट लोकली.
वैश्विक जरूर व्हा, पण आपला आहार आपण रहातो त्या प्रदेशातीलच घ्या, जो आपल्या प्रकृतीला पोषक असेल. हा महत्वाचा संदेश आज समाजात पोचवला जात आहे.
येणारी धन्वन्तरी जयंती हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करून, आयुष विभागानेही दुधात साखरच घातली आहे.
इट लोकली सांगणारं आयुर्वेद, आज व्यासपीठच्या माध्यमातून अॅक्ट ग्लोबली करतंय हे मात्र नक्कीच !
-- वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
23.10.2016
October 23, 2016
पाणी शुद्धीकरण भाग नऊ
या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?
ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा....
आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं.... एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची...
गंमत होती सर्व ...
गेली ती सारी गंमत.....
"एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा," लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
" यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं...." माझं तिरकस उत्तर.
त्यावर ती म्हणाली,
" आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं."
तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
" पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
कुठेही उगवतं,
म्हणून त्याचं
कसंही निभावतं "
खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?
जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?
एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !
आजच्या भाषेत "इम्युनिटी" कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !
हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.01.2017
January 5, 2017
कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही, असं नाही. मधुमेह होऊ नये यासाठी देखील रोज खाण्यात कडू असावे.
जसे तिखटाचा अॅण्टीडोट आंबट आहे, तसे गोडाचा कडू असे समजावे. ज्यांना गोड खूप आवडते त्यांनी अगदी तेवढ्या प्रमाणात नाही, पण कडू जरूर खावे. गोड खाऊन मधुमेह झालाय ना, आता तेवढेच कडू खातो, म्हणजे गोड " नील " होईल, असं नाही हां !
कडूपणा कमी होण्यासाठी लवण रस उपयोगी होतो. कारल्याची भाजी जास्त कडू व्हायला नको असेल तर फोडींवर मीठ पेरून ठेवतात, मीठामुळे त्याला काही वेळाने पाणी सुटते. फोडी पिळून हे पाणी काढून टाकले तरी थोडा कडूपणा कमी होतो.
कडू खाताना पण जरा काळजी घ्यावी लागते.
अति प्रमाणात जर कडू चवीचे पदार्थ पोटात गेले तर पित्त हमखास वाढते. जेवणाच्या पानात कडू चवीची जागा डाव्या बाजूला असते, एवढे लक्षात ठेवावे.
कारल्याची भाजी किंवा भजी, काही महाभाग तर रोज सकाळी कारल्याचा ज्युसदेखील पितात. मेथीची भाजी अथवा पराठे, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी पिणे, किंवा मेथी पावडर घेणे, भाकरीच्या किलोभर पीठात, दोन तीन चमचे मेथीची पावडर घालणे, शेवग्याच्या शेंगा आणि केळफूलाची भाजी देखील कडवटच असते. असा कडू आहार आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळा ठीक आहे, याने लिव्हर म्हणजे यकृताचे काम सुधारते. पित्ताला उद्दीपना मिळते, पाचक रस नीट पाझरायला मदत होते, जीभेला चव येते. आतड्यातील आमाचे गोळे हलायला, पुढे ढकलायला मदत मिळते.
पण रोज रोज एवढे कडू खाल्ले तर स्नायुंची ताकद कमी होते. शुक्रजंतु कमी होतात, हे पण लक्षात ठेवावे. अति सर्वत्र वर्ज्ययेत् असे म्हणतात ते चुकीचे नाही.
किराईत या कडू औषधाप्रमाणेच आणखी एक सुप्रसिद्ध कडू औषध म्हणजे कुमारी, कोरफड, अॅलोवेरा. याचा रस आटवला की त्यालाच काळा बोळ किंवा सबर म्हणतात. बाळऔषधात हा असतो.
बाळगुटी हल्ली गायबच झालेली दिसते. त्यातील बहुतेक औषधे ही कडूच असतात. अगदी दररोज नको पण आठवड्यातून दोन वेळा, रविवारी आणि बुधवारी बाळाला दोन दोन वळसे अवश्य उगाळून द्यावी. उगाळून झाल्यावर ही गुटीतील कडू औषधे नीट पुसुन, कोरडी करून, ठेवावीत, म्हणजे बुरशी येत नाही.
जे डाॅक्टर बाळाला बाळगुटी अजिबात देऊ नका, असे सांगतात, त्यांच्या "सिलॅबस" मधे बाळगुटी नसल्याने, त्या औषधांचा त्यांना अभ्यास नसतो, म्हणून त्यांना तसे सांगावे लागते. यात त्यांचा काहीच दोष नाही. हे सर्व डाॅक्टर्स लहानाचे मोठे होत असताना, कडू चवीची बाळगुटी खाऊनच मोठे झालेले आहेत, हे पण लक्षात ठेवावे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
22.11.2016
November 22, 2016
आपल्या स्वयंपाकामध्ये जिच्या उपस्थिती शिवाय फोडणी हि संकल्पना पुर्णत्वाला येऊच शकणार नाही अशी ही फोडणीवर स्वत:ची मोहर टाकणारी मोहरी उर्फ राई. इंग्रजीत हिला Brassica तसेच Mustard असेही म्हणतात. अमुक व्यक्तीने एखाद्या गोष्टीच्या बाबतींत राईचा पर्वत केला हि म्हण आपल्या सर्वांच्या अगदी तोंडावर असते नाही का, तशीच आहे ही राई.
मोहरीचे लहान क्षूप असते आणि आपण वापरतो ती मोहरी ही त्याच्या बिया होय. चवीला कडू तिखट आणि बरीच उष्ण त्यामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी करते.
चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना.
१) पुष्कळ खोकला येऊन कफ सुटत नसेल तर १/४ चमचा मोहरी+१ चमचा खडीसाखर हे मिश्रण तोंडात ठेऊन त्याचा रस गिळावा आराम पडतो.
२) दात किडल्या मुळे दुखत असल्यास मोहोरीचा काढा करून त्याने गुळण्या कराव्यात दात दुःखी थांबते.
३) मोठ्या व्यक्तींना जप कायम पोटात जंत होण्याची तक्रार असेल तप मोहरीचे चूर्ण १/२ चमचा गरम पाण्यात सोबत घ्यावे व नंतर त्यांवर ५-६ चमचे एरंडेल तेल प्यावे त्याने शौचा मधून जंत पडतात.
४) कुठल्याही अवयवावर सूज आली असेल तर पादेलोण अर्थात काळे मीठ व मोहरी समप्रमाणात एकत्र वाटावी व त्या मिश्रणाचा लेप सूज आलेल्या भागी करावा सूज उतरते.
५) जास्त चालणे अथवा एका जागी फार काळ बसून राहील्याने जर सांधे दूखुन मुंग्या येत असतील तर मोहरी एरंडेल तेलात वाटावी व ते मिश्रण त्या भागावर चोळावे रक्तप्रवाह सुधारतो आणि ही तक्रार कमी होते.
मोहरीच्या अतिवापराने एॅसीडीटी, हातपायांची जळजळ, अंगावर पुरळ उठणे, डोके दुखणे, संडास, लघवी अथवा नाकातून रक्तस्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 12, 2016
पाणी शुद्धीकरण भाग सात
आपण मागे बघितले की ज्या नद्या खळाळत वाहातात, त्यांचे पाणी संथ वाहाणाऱ्या नदीच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असते.
हे मूळ सूत्र ग्रंथकारांनी सांगितले. आता याच सूत्राने आपल्याला पाणी शुद्ध करता येईल का ?
ज्या नद्यांचे पाणी मोठाल्या दगडावर आपटत खाली येते, उंचावरून खाली पडते, तुषार उडवणारे असते, जोरात वाहाणारे असते, ते जर शुद्ध होते, तर पाणी शुद्ध करण्यासाठी हीच पद्धत वापरता येईल.
म्हणजेच पाण्याला घुसळून वापरणे..
दह्याचे ताक करताना जसे घुसळले जाते, तसे पाणी घुसळले तर त्यातील अशुद्धी खाली बसतात. त्यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात, आणि पाणी शुद्ध होते.
दही घुसळताना जी शक्ती वापरली जाते, त्या शक्तीच्या सहाय्याने दह्यातील सूक्ष्मत्व वेगळे होत जाते. त्यातील लोण्याचा घन भाग एकत्र येत जातो आणि वर तरंगतो, तसेच पाणी घुसळले गेल्यावर त्यातील अशुद्ध द्रव्याचा घनभाग एकत्र येतो आणि तळात एकत्रित होतो.
या प्रक्रियेत आणखी एक फायदा असा होतो, तो म्हणजे वातावरणातील प्राणशक्ती पाण्यात जास्त प्रमाणात मिसळली जाते. आणि पाण्यातील अतिरिक्त वायु महाभूत निघून जाते.
एखादे द्रव्य महाभूतांचा विचार करता पांचभौतिकच असते. फक्त तरतम भावांचा विचार करता, प्रत्येक द्रव्यातील संघात वेगवेगळा होतो, त्यावर ते द्रव्य घन वायु द्रव आकाशीय, तेजस बनणे अवलंबून असते.
तसे पाण्यात असलेला घन, वायु आणि आकाशीय भाग कमी करत गेला की शुद्ध जल महाभूताकडे आपण जातो. आपल्याला जे द्रव्य ज्या स्वरूपात हवे आहे, ते महाभूत त्यामधे शिल्लक ठेवून अन्य महाभूतांचे प्रमाण कमी करीत जाणे. हीच खरी शुद्धी.
हाच नियम कुठेही वापरू शकतो. अगदी सोन्याच्या बाबतीतही. मग सोन्यातील अन्य महाभूते कमी करत सोन्यातील फक्त शुद्ध पृथ्वी महाभूत शिल्लक ठेवण्यासाठी जे संस्कार सोन्यावर केले जातात, ती सोन्याची शुद्धी !
उंचावरून खाली पडणारे पाणी शुद्ध असते. थोडसं संयुक्तिक वाटणार नाही पण समजण्यासाठी सांगतो, चहा "चढवला" कि त्याची चव बदलते ना ? चढवणे म्हणजे लांऽऽब करणे. उंचावरून खाली ओतणे, या उंचावरून ओतण्यामुळे त्यातील घन द्रवता बदलत जाते.चहाची चवही बदलते. तसेच आहे. पाणी उंचावरून ओतून घुसळण्याच्या प्रक्रियेतून अशुद्ध द्रव्ये घनीभूत होतात. नंतर ती गाळून वेगळी करता येतील.
घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी मिक्सरमधून काही काळ फिरवून बघा. वेळ असेल तर ताकाच्या रविने घुसळा...
रविचे घुसळणे आणि मिक्सरमधून घुसळणे यातही खूप फरक आहे, पण पाणी घुसळून पहा तर खरं, पाण्यातील अशुद्धी कश्या तळात जमा होतात त्या !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
03.01.2017
January 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti