(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    04.04.2017

      April 4, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंधरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग सहा

    औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला.

    औषधे किती हवी जवळी ?
    औषधे ? कि, "ती" हवी जवळी ?

    औषधांमधे ताकद आहे कि "तिच्यामधे" जास्ती ताकद आहे.

    जर "ती" जवळ असेल तर,
    जर तिने जवळ घेतले असेल तर ,
    जर तिला जवळ धरले असेल तर,
    औषधे कशाला हवीत ?

    असं या प्रश्नकर्त्याला विचारायचे आहे.

    ती माझे सर्वस्व!
    ती माझी प्रेरणा !
    ती माझी धारणा !
    ती माझी शक्ती !
    तीच माझी भक्ती !
    शक्तीचीही शक्ती तीच तूही !

    सतत असतेस अंतरी
    न दिसशी दुसऱ्यास जरी
    माझी कर्ती करविती
    बोलवती धनी तीच तूही !

    केवळ बाजूला बसूनी
    सतत सूचना करूनी
    घेते गाडी चालवूनी
    दुसऱ्या करवी

    कधी कोपशी
    कधी उर्वशी
    कधी फटकारीशी
    कशी कवटाळीसी
    अशी कशी तू ललना
    सांभाळीशी माझ्या जीवना

    माझा प्राण तू
    माझा श्वास तू
    माझा भास तू
    अंतरीची आस तू

    तू माझे जीवन
    जीवन झाले पावन
    पावन होण्या कारण
    कारण माझे मन !

    मनासी देसी कामना
    आत्म्यासी चेतना
    शरीरासी वासना
    तूची देसी

    जन्मलो तुझ्यासाठी
    जगेन तुझ्यासाठी
    सोडलीस जर साथ तू
    मृत्युही उभा दारी

    सोडू नको साथ अशी
    दुधावरची साय जशी
    मुलाला माय तशी
    रहा जवळी माझेपाशी

    खरंय हे ?

    एवढी ताकद आहे "तिच्यामधे" ?
    का शंका का यावी मनामधे ?
    एवढी जपावी ह्रदयामधे ?
    अशी कोण लागोन गेली ?

    "ती" म्हणजे कोण हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.
    मला "ती" म्हणजे "प्रतिकारशक्ती" वाटली.
    आणि आपल्याला. ?
    वाचा पुनः
    - वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    02362-223423.
    24.04.2017

    आजची आरोग्यटीप

      April 25, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग चौवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा

    पोटात खड्डा पडावा.

    सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
    त्यामुळे काय होते ?
    आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.

    पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.

    ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.

    आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.

    अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?

    खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.

    नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    03.05.2017

      May 3, 2017


  • प्रमुख आहारसूत्र – भाग १६

    सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात.

    आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच!

    अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा केवळ डोळ्यानीच तो ऑपरेट करणे, असे अॅप सुद्धा आले आहे, एका हाताचे एक बोटसुद्धा हलवायला नको. फक्त डोळे फिरवायचे की कर्सर हलतो. हे आस्यासुख.!

    उभे राहून काम करण्यापेक्षा किंवा फिरत फिरत काम करण्यापेक्षा बसून काम करावे असे वाटणे. बसताना सुद्धा खाली जागा नीट समतल असावी, एखादी बैठक असावी, असे वाटणे. सतरंजी मिळाली की सतरंजीपेक्षा आणखी मऊ आरामशीर आसनावर बसावे, एकदा बसले की उठू नये असे वाटणे, बसलो तर टेकून बसावेसे वाटणे, टेकून बसलो तर टेकायला मऊ तक्क्या असावासा वाटणे, तक्का मिळाला तर उशी हवीशी वाटणे,बसायला जागा मिळतेच आहे तर खुर्ची का नको ? मग ही खुर्ची काटकोनीच कशाला, त्यापेक्षा विशालकोनी बरी. हे आस्यासुख !!

    आरामखुर्चीवर बसल्यावर पुढे पाय समांतर टेकण्यासाठी टेबल हवे, असे वाटत रहाणे, पण मागे काय चालले आहे हे समजत नाही, त्यासाठी ही आरामखुर्ची गोल फिरणारी हवी ..... आरामखुर्चीवरच बसायचे मग नुसतीच कापडवाली आरामखुर्ची कशाला, फोमचीच वापरूया..... हे आस्यासुख !

    चालण्यापेक्षा सायकल बरी, सायकल पेक्षा स्कूटी बरी, स्कूटीपेक्षा स्कूटर, त्यापेक्षा बाईक, ही बाईक एक पाय झाडून सुरू करण्यापेक्षा एक बोट दाबून सुरू झाली तर बरी !!!!! हे आस्यासुख !!

    कमरेत वाकून जमिनीवरचा केर केरसुणीने काढण्यापेक्षा उभे राहून व्हॅक्युम क्लीनरने केर ओढून घेणे, उकीडवे बसून लादी पुसण्यापेक्षा माॅबने किंवा दांडा लावलेल्या स्पंजने लादी अलगद पुसुन घेणे, किंवा आपण काम न करता, चक्क त्या कामासाठी बाई लावणे, हे आस्या सुख !!!

    सुख हे केवळ बसण्यामधूनच मिळते. बसण्यामधले पुरेपुर सुख मिळवण्यासाठी धडपड सुरू होणे असाही आस्यासुखचा अर्थ आहे.

    सुखार्था सर्व भूतानाम् मताः सर्वा प्रवृत्तयः, असे वाग्भटजी म्हणतात. सर्व प्राणी मात्रांची सुखाकडेच प्रवृत्ती असते, पण प्रमेहामधे, ती जरा जास्तच या कॅटेगरीमधे मोडते.

    याचा अर्थ असा नव्हे की सुखाची कामना, इच्छा करूच नये. सुख मिळावेसे वाटणे, ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आणखी आणखी, त्यापेक्षा जास्ती सुख मलाच मिळावे. हा हावरटपणा किंवा सुखाचा अतिरेक हे दुःखाचे कारण ठरू नये.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.02.2017

      February 1, 2017


  • प्रमुख आहार सूत्र – भाग २

    पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध देखील !
    यांच्यातील काही साम्य.
    दोन्ही घटक आहारीय. म्हणजे आहारातील मुख्य. एक बालकांचे एक इतरांचे.
    यांच्याशिवाय आहार पूर्ण होतच नाही.
    दोघांविषयी जनमानसात प्रचंड गोड गैरसमज.
    आणि महत्वाचे म्हणजे मधुमेहाचे हे दोन मोठे मित्र !
    मधुमेह होण्यामधे आणि वाढवण्यामधे.

    पाणी हे जसे मधुमेह वाढवायला मदत करते तसे ते रक्तदाब वाढवायलाही मदत करते. तसेच दूध हे देखील मधुमेहाला वाढवते.

    पाणी आणि दूध दोघे एकमेकामधे असे काही एकजीव होऊन जातात. की पाण्यात दुध की दुधात पाणी समजाणार सुद्धा नाही.

    असो.

    मोठ्या शहरामधे तर आपल्या घरात येणारे प्लॅस्टिकच्या पिशवीतील दूध, हे दूधच आहे की नाही, हे शोधण्यासाठी फार कष्ट करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. एकवेळ पाणी शुद्ध करता येईल. पण दूध शुद्ध करणे हे महाकठीण काम. दूध शुद्ध करण्यासाठी गोवंश शुद्ध करण्यापर्यंतचा प्रवास करावा लागेल.

    जिथे जिथे दूध असा उल्लेख आयुर्वेदात येतो, तिथे ते गाईचेच वापरावे. हे जेव्हा लिहिले होते त्या काळात गाईमधे "हायब्रीड" हा प्रकार नव्हता. जे दूध उपलब्ध होते, ते सर्व शुद्ध देशी भारतीय वंशाचेच होते.

    सरकारी यंत्रणेने दुधाचा महापूर योजने अंतर्गत विदेशी वळू आणून आमच्या अस्सल देशी गाई नासवल्या. खरंतर दुधासाठी नव्हे तर भरपूर मांस मिळवण्यासाठी, विदेशी माजवलेले वळूंचे वीर्य आणले गेले हे खरे सत्य आहे. ( खोटे सत्य असते काय ? हो. भारतात असते. सांगायचे एका कारणासाठी. असते दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे खोटे सत्य. "सत्य" शब्द देखील असा नासवलाय, की आता तो वापरतानादेखील खुलासा करावा लागतोय. हे दुर्दैव.

    आणि आता तर विदेशी गोवंशाचा हैदोसच सुरू आहे. औषधाला देखील देशी गाय उपलब्ध राहिलेली नाही. दूध, दही, लोणी, ताक, तूप या आहारातील सर्वात श्रेष्ठ अश्या दैनंदिन वापरातील पदार्थांविषयी खात्रीने सांगावे असा एकही पदार्थ आज उपलब्ध नाही.

    कोणत्या तोंडानी वैद्यांनी सांगावे, दूध प्या म्हणून ? आणि या या अश्या विदेशी गाईचे दूध प्यावे म्हणून? जे अत्यंत विषारी आहे. एकाही मिडीयाने याची दखल घेतलेली नाही. प्रत्येकाचे लागेबांधे कुठेतरी आहेत. दूध हे दुध राहिलेले नाही. जोपर्यंत आपण आपले पूर्ण शुद्धिकरण करत नाही, तोपर्यंत दुधापासून थोडं लांबच राहिलेलं बरं.
    नाहीतरी दुध मधुमेहामधे वर्ज्यच सांगितलेले आहे.
    एवढं स्पष्ट लिहून देखील काही जण प्रश्न विचारतील, मग आम्ही दूध पण प्यायचे नाही का ?
    आता काय सांगावे ?

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.01.2017

      January 18, 2017


  • किचन क्लिनीक – फलवर्ग

    किचन क्लिनीक – फलवर्ग

    आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव.

    हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील असतात.पण हिच फळे खाताना जर आपण काही नियम पाळले तर मला वाटते आपण सेवन करत असलेल्या फळांचा आपल्या शरीराला अपाय न होता फायदाच होईल.

    फळं खात असताना आपण हि खुण गाठ मनाशी घट्ट बांधावी कि ती कायम पोट रिकामी असताना एक आहाराचा भाग म्हणून खावी.कारण बरीच मंडळी भरपेट जेवण झाल्यावर फळे कापून खातात,हे असे करणे म्हणजे रोगाना आयते आमंत्रण होय.कारण जेवल्यावर फळे खाण्याने त्याचा विपरीत परिणाम खाल्लेल्या अन्नाच्या पचनावर होऊन रक्तातील ट्रायग्लिसराईड्स देखील वाढतात हे माझ्या वाचनात आले होते जे मला पटले.त्याचा विस्तार येथे करणे अयोग्य होईल.

    दुसरा प्रकार म्हणजे हिच फळे दुध,दही,पनीर,चक्का,आयस्क्रीम ह्या सोबत खाणे जसे फ्रूट सलाड विथ कस्टर्ड,शेक्स इ वारंवार खाणे म्हणजे त्वचा रोग,सर्दी,दमा,खोकला,सायनस ह्याला आयतेच निमंत्रण होय.

    तसेच काही मंडळींना फळांचा रस पिण्यात भारी रस असतो.पण गरज नसताना असे करणे म्हणजे आपल्या पचन शक्तीवर अतिरिक्त ताण देणे होय.कारण जेव्हा आपण सबंध फळ खातो तेव्हा आपल्या पोटात त्याचा चोथा ज्यास फायबर म्हणतात ते जाते,पण रस काढायला व त्यातून पोट भरायला भरपूर फळे वापरावी लागतात.त्यामुळे सहाजीकच जास्त साखर व पर्यायाने उष्मांक शरीरात गेले कि नाही.त्यामुळे मी तर कायम फ्रूट ज्युसच पिते पण वजन मात्र कमी होत नाही अशी तक्रार करणार्याॅनी हे लक्षात घ्यावे.

    तसेच सकाळी नाश्त्याला इतर पदार्थ खाऊन असे पाश्चात्यांन प्रमाणे ज्युस पिणे म्हणजे पोटाचे विकार,अपचन,व वजन वाढीला आयतेच आमंत्रण आहे हे लक्षात असु द्यावे.

    म्हणूनच फळे खा पण ते खायचे नियम पाळून बरे का!
    ह्या विभागाची माहिती देण्यापुर्वी मला आपणांस हे सांगणे आवश्यक वाटले कारण आपल्या पैकी बरेच जण ह्या अशा चुका फळे खाताना हमखास करत असतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 17, 2016


  • याला जीवन ऐसे नाव भाग ३२

    अग्नि महत्वाचा !

    'अग्निमिळे' या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व !

    पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा.

    हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत.

    सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. (आणि तसं पाणी सूर्यास्तानंतर प्यायचेच नाही, अगदी उकळून गार झालेले पाणी देखील परत गरम करायचे नाही आणि रात्र उलटून गेली तर निषिध्दच ! )

    सूर्याखेरीज आणखी कोणते अग्नि वापरले जातात. मोठ्या यज्ञामधे जी अग्निची स्थापना करतात, त्यासाठी लाकडी रवि लाकडी उखळात घर्षण करून अग्नि निर्माण केला जातो. स्वयमग्नि ! हा अग्नि अत्यंत शुद्ध असतो.
    नंतर त्याची स्थापना करून इतर समिधा, लाकडे वगैरे इंधन वापरून वाढविला जातो.

    एक अग्नि विवाहाच्या वेदीवर सप्तपदी करत असताना प्रज्वलीत केला जातो. या अग्निचे रक्षण पुढे समंत्र आयुष्यभर करायचे असते, जो मृत्युनंतर उरलेलं शरीर परत ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी, म्हणजेच दहन करण्यासाठी वापरला जातो. हा अग्नि अत्यंत पवित्र असतो. म्हणून अग्निला पावक असेही म्हणतात.

    गारगोटीचा दगड वापरून अग्नि प्रज्वलीत केला जातो, तोही अग्निच, पण गरज म्हणून तयार केलेला. मंत्राशिवाय केवळ तंत्र वापरून.

    एक अग्नी चुल पेटवण्यासाठी वापरतात. सध्याच्या जमान्यातील काडेपेटी वापरून म्हणजे गंधकाचा वापर करून. किंवा लायटर मधली चकमक वापरून ठिणगी तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेला अग्नि हा दुय्यम दर्जाचा मानला जातो.

    अग्नि रक्षणासाठी जे इंधन वापरले जाते, तेही महत्वाचे. जसे तेल, तूप, राॅकेल, कापूर, स्पिरीट, जसे इंधन तशी काजळी, तशी अग्निची तीव्रता !

    विडी किंवा सिगरेट पेटवायची असेल तर देवघरातल्या निरांजनावर पेटवली जात नाही. जसे काम तसा अग्नि. जसे काम तशी पवित्रता.

    अग्नि कोणत्या कारणासाठी हवाय, त्याप्रमाणे अन्य साधने. आयुर्वेदात काही भस्म बनवताना भट्टी वापरायला लागते. ही भट्टी विशिष्ट लाकडे वापरून, विशिष्ट संख्येमध्ये रानशेणी वापरून बनवायला सांगितली आहे. रानशेणींची संख्या बदलली की पुटाचे नाव बदलले. त्या औषधावर होणारा परिणाम बदलला. हे सगळं अग्निवरच अवलंबून आहे ना !

    घरात जी चुल पेटवली जाते, त्या चुलीमागे एक उपचुल असते. तिला वाईल, वैल असे म्हणतात. त्यावर मातीचे मडके ठेवून त्यात पाणी ठेवून दिले जाई. पुढे मुख्य चुलीवर काम करत असताना मागे जाणारा अग्नि फुकट दवडू न देता, त्यावर मडक्यात पाणी तापवून घेतले जाई. आमटी भाजीत जर पाणी हवे असेल तर हेच गरम पाणी वापरले जाई. हे पाणी दिवसभर त्या वैलावरच. चुल प्रत्यक्षात थंड झाली तरी देखील चुलीचे दगड गरम असत, तेवढी उष्णता हे पाणी धगधगीत ठेवायला पुरेसे असे. या पाण्याला एक मस्त वास येतो. धुराचा वास. स्मोक फ्लेवर ! जो वास तयार अन्नाला आपोआपच येत असे. (आमच्याघरी आजही चुल आहे. आम्हाला पेज अजूनही चुलीवरची मिळते.) हे वैलावरचे पाणी सतत कोमट असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचे काही कारणच नाही.

    काळ बदलत गेला, तसे अग्नि निर्माण करण्याची पद्धत बदलत गेली. ओव्हन आला. विद्युत उर्जा वापरून हा अग्नि तयार केला गेला.

    आतातर चुंबकीय पद्धतीने अग्नि मिळतो म्हणे. मायक्रोवेव्ह !! आणि इंडक्शन प्लेट. !!! अग्निचे तेज हे हे रूप दिसतच नाही. केवळ तापणे.

    एका अग्निवर एका पद्धतीने शुद्ध करून घेतलेले पाणी परत दुसऱ्या अग्नीच्या संपर्काने शुद्ध करायचे नाही. गुण बदलतात.

    वेळ नाही, या सबबीखाली अन्न शिळं करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि गरम करायला सुद्धा सवड नाही, म्हणून मायक्रोवेव्ह मधे ठेवून परत गरम करून खायचं. अशी ही पाश्चात्य पद्धत !

    मायक्रोवेव्हमधे गरम केलेलं पाणी आणि चुलीच्या अग्निवर केलेलं पाणी यावर तौलनिक अभ्यास झाला. दोन वेगवेगळ्या कुंडीतील एकाच वयाच्या, एकाच प्रकारच्या रोपट्यांना विशिष्ट दिवस या दोन्ही प्रकारानी गरम करून गार झालेले पाणी घातले. काही दिवसांनी असे लक्षात आले, की मायक्रोवेव्ह मधील अग्निचे जे तरंग निर्माण होतात, ते घातक असतात, त्यांनी गरम केलेले "शुद्ध" पाणी पिऊन रोपटे मरून गेले.

    आज पाश्चात्य तंत्र आमच्या स्वयंपाकघरात येऊन पोचले आहे. ज्याच्या निर्धोक उपयोगिते विषयी अजून मोठे प्रश्नचिन्हच आहे. तरी आम्हाला जाग येत नाहीये. एका बाजूने तंत्रज्ञान वाढते आहे, तर एका बाजूने रोग वाढताहेत. नवनवीन रोग अक्राळविक्राळ स्वरूपात समोर येताहेत. आणि अजून आम्हाला जाग येत नाही.
    याला काय अर्थ आहे ?
    आमचं वैलावरचं पाणी मात्र त्यासाठी समर्थ आहे.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

      January 8, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकसस्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 17 - पुष्प पाचवे

    वेगवेगळी फुले उमलली
    रचूनी त्यांचे झेले.

    बुके शब्दाला प्रतिशब्द म्हणजे झेले असे लक्षात येते. परडी देवासाठी, गजरा घरातल्या देवीसाठी आणि झेला इतर माणसासाठी !

    देवासाठी फुले काय पाने काय एकच !

    भगवंत सांगताहेत,

    पुष्पं पत्रं फलम् तोयम्, मला काहीही चालेल. फक्त भक्तीभावाने अर्पण करा. हे देवासाठी ठीक आहे. पण फुलांऐवजी पानाचा गजरा सौ. देवीसाठी ठीक राहील का ? तिथे पुष्पार्थे अक्षताम् समर्पयामी म्हणून कसं चालेल ? माणसासाठी मात्र तेथे पाहिजे जातीचे !

    पानावरून आठवले. देवाला जशी फुले वाहातात, तशी पाने देखील अगदी मंत्र म्हणून वाहिली जातात. याला पत्री वाहणे म्हणतात. याचे मंत्रदेखील किती आरोग्य पूरक आहेत पहा,

    एकदंताय नमः अर्क पत्रम समर्पयामी ।
    गजकर्णाय नमः तुलसीपत्रम समर्पयामी ।
    लंबोदराय नमःबदरीपत्रम समर्पयामी ।
    नावे गणेशाचीच. पण गर्भित अर्थ वैद्यांसाठी आहेत.

    दंतांसंबंधी काही व्याधी असतील तर रूईचे पान किंवा पान जाळून त्याची राख मंजनामधे वापरण्यासाठी सूचक आहे का ?

    गजकर्ण या रोगासाठी किंवा कर्णासंबंधी व्याधीकरीता तुलसीपत्र.

    ज्याचे उदर लंब आहे अश्यासाठी खरखरीत बदरीचे पान. हे आरोग्य सूचक नव्हेत काय ?

    पानेदेखील तोडायची नाही, खुडायची. पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने आवारामधे कोणती झाडे कुठे आहेत, ते वर्षातून एकदा तरी कळते. आयुर्वेद किंवा आरोग्याची ओळख ही अशी शाळेत जाण्यापूर्वीपासूनच होती.

    विष्णुसाठी तुळस प्रिय आहे, गणेशाला दुर्वा, तर शंकराला बेल. बेल नसला तर प्रतिद्रव्य म्हणून निर्गुंडी, मारूतीला रूई, नंदीला आघाडा, अशी पत्रांची योजना कुणी का केली असेल, का केली असेल ?

    शेयशायी विष्णुंचा निवास सागरात आहे, पाण्यात आहे. सतत पाण्याशी संबंधीत आजारापासून सुटका होण्यासाठी पाणी लगेचच शोषून घेणारी तुळस हा त्याचा "अॅण्टीडोट" म्हणून सांगितले गेले असेल का ? रक्तबीज राक्षसाला गिळल्यानंतर, गणेशजींच्या मनाचा, तनाचा दाह कमी करणारी दुर्वा, हे पित्तज व्याधींचे प्रतिक समजता येईल का ?

    कृपानिधी भोलेनाथ शंकर तर असलं तर सूत नाहीतर भूतराज ! कधी समाधी तर कधी समाधी भंग होऊन तांडव सुरू होईल ते सांगता येत नाही, अशा क्षणात रक्तदाब वाढणाऱ्या व्यक्तींसाठी बेलाची उपाय योजना असेल का ? नंदी म्हणजे बैल. पशूंचा प्रतिनिधी. जसे माणसासाठी गुळवेल, तसे आघाडा हे पशुचिकित्सेमधील एक प्रमुख औषध आहे.

    देवतांसाठी ज्या फुलापानांची योजना केली आहे, त्याचा हेतु काय असेल ?

    कधीतरी आयुर्वेदाभिमुख होऊन, वेगळी नजर वापरून, अध्यात्मामधील आरोग्याच्या छुप्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

    आपल्या संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. त्या तश्याच जपायला हव्यात, नाहीतर एक दिवस जर्मनीतून एखादा प्रतिमॅक्समुल्लर धोतर नेसून यायचा आणि षोडशोपचार पूजा सांगणारा पुरोहित व्हायचा !

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    10.06.2017

      June 10, 2017


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 25-दीपं दर्शयामी-भाग दोन

    शुभं करोति कल्याणम
    आरोग्यम सुख संपदा ।
    शत्रुबुद्धी विनाशाय
    दीपज्योती नमोस्तुते ।।

    ही दिव्याची प्रार्थना तर आपली सर्वांचीच पाठ आहे. पाठ आहे, म्हणजे अर्थ माहिती असेलच असे नाही. कधी विचारही केला नसेल एवढा ! या पाठात एक बदल होत चाललाय, तो लक्षात आणून देतो, धनसंपदा नाही, सुखसंपदा ! आरोग्य तर मिळतेच पण सुख देखील मिळते. आपण भारतीय कधी धनाच्या मागे नव्हतो, पण सुखाच्या मागे कायम होतो. सुख मिळविण्यासाठी धन हवेच असे नाही, पण सुख हेच धन असे मानणारी आपली भारतीय संस्कृती !

    मी दिव्याला नमस्कार करतो कारण, हा शुभ आहे, पवित्र आहे, शुद्ध करणारा आहे, कल्याणकारक आहे. आरोग्यकारक आहे, सुखकारक आहे. आपल्याच मनातील, शत्रुप्रमाणे असणारे वाईट विचार नष्ट करणारा आहे.

    दिव्या दिव्या दीपत्कार
    कानी कुंडले मोतीहार
    दिव्याला पाहून नमस्कार
    दिवा लावला देवापाशी
    उजेड पडला तुळशीपाशी
    माझा नमस्कार सर्व देवांपाशी

    देहलीदीपक न्याय नावाचा एक न्याय सांगितलेला आहे. उंबरठ्यावर लावलेला एक दिवा आतील देवापर्यंत आणि बाहेरील तुळशीपर्यंत प्रकाश देत राहतो. आतून बाहेरून प्रकाश देणारा हा अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. असं संत सोहिरोबानाथ देखील म्हणतात.

    घरातली पीडा बाहेर जावो,
    बाहेरची लक्ष्मी घरात येवो,
    घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो.
    ही सर्वांचे शुभ करणारी कल्याणकारी प्रार्थना दिव्याला उद्देशून म्हटली जाते.

    दीपज्योती परब्रह्म
    दीपज्योति जनार्दनः
    दीपो हरतु मे पापं
    संध्यादीपं नमोस्तुते ।

    मनात निर्माण होणाऱ्या वाईट विचारांचे पाप नष्ट होण्यासाठी रोज सायंकाळी घरात दिवा लावावा. सायंकाल हा संधीकाल आहे. दिवस आणि रात्री मधला. पाप आणि पुण्ण्या मधला ! चांगलं आणि वाईट यामधला ! हा संधीकाल असतो सत्व आणि तमामधला ! सकारात्मकता आणि नकारात्मकता यामधला ! वनस्पतींचे श्वसन बदलण्याचा ! हे "चेंज ओव्हर" होत असताना सर्वच स्तरावर संतुलन राखणं महत्त्वाचे असते. आणि हेच काम दिवा करत असतो.

    भो दीप ब्रह्मरूपस्त्वं
    ज्योतिषांप्रभुरव्ययः
    आरोग्यम देही पुत्रांश्च
    सर्वान् कामांश्च देही मे

    प्रत्यक्षात सगुण रूपातील देव म्हणजे अग्नी. निसर्गात सूर्य नारायणाच्या रूपात तर शरीरात जाठराग्नीच्या रूपात असतो. जसं निसर्गाचं रक्षण करतो, तसंच हा अग्नी आरोग्याचे रक्षण करणारा आहे. केवळ रक्षण करणाराच नव्हे तर वंश वाढवणारा आहे. सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे. फक्त विश्वास ठेवून, श्रद्धेने करणाऱ्याला फळ मिळते.

    केवढा अर्थ भरलाय या प्रार्थनेमध्ये !

    कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून केली जाते. का ? कशासाठी ? काय एवढं मोठ्ठं होणार तेलाचा दिवा लावून ?

    स्वतः जळत असताना, स्वतःच्या जळण्याचे दुःख न करता, मेणबत्तीसारखे जळताना, सारखं अश्रु गाळत न रडता, आपल्या जळण्यामुळे सारं जग प्रकाशमान होतंय या आनंदात, फक्त प्रकाश मागे ठेवायचा असतो.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.06.2017

      June 18, 2017


  • आहारसार भाग ६

    साधी कणिक मळून झाली की हाताला किती चिकटून रहाते ? काढायची ठरवली तरी येत नाही. एवढी चिकट आहे. पोटातही तशीच चिकटून रहाणार. असे थरावर थर बसत गेले की ट्रॅफिक जाम होणारच !

      August 24, 2016