जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे सत्तेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग पाच
शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये. गरज लागल्यास कोणाला तरी सोबत घेऊन जावे, म्हणजे अपघात, चोर, शत्रू, यांच्यापासून भय राहात नाही. रात्रौ घराबाहेर जाताना डोक्यावर शिरस्त्राण घालूनच बाहेर पडावे. दिवसा तशी आवश्यकता नाही.
भर दुपारी, सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी रात्री मध्यरात्री तीन किंवा चार रस्ते जिथे मिळतात, तिथे बसू नये. जिथे पूर्वी कोणाची हत्या (खून) झाली असेल असे जंगल, पडकी घरे, स्मशान इ. ठिकाणी दिवसा पण जाऊ नये.
अगदी चॅलेंज स्विकारून, कुणीतरी जातीलही, पण जो धक्का मनाला बसलेला असतो, त्यातून सावरणे कठीण होते, हे नक्कीच! अश्या धक्क्याने बनलेले अनेक मानसिक रुग्ण पाहायला मिळतात.
हे एवढे सगळे सांगण्याचे कारण केवळ भूताटकी नव्हे तर, अशा जागी दिवसा अथवा रात्री गेल्यास एकांतामुळे, निर्जन स्थळी गेल्यावर, आपल्याला काही झालेच तर कोणाला कळणार देखील नाही. यासाठी आपला जाण्याचा ठावठिकाणा सांगून बाहेर पडावे, आपली ओळख पटेल असे काहीतरी आपल्याजवळ असावे, घरच्यांना संपर्क करता येईल, असा फोन नंबर नाव गाव पत्ता खिशात अथवा पर्समधे ठेवावा.
त्या ठिकाणात भर म्हणून हाॅस्पीटल्सचा उल्लेख देखील करायला हरकत नाही. रूग्णाला बघायला हाॅस्पीटलमधे गेलं नाही तर लोक काय म्हणतील? काही लोकामध्ये यावरुन रागरुसवे पण होतात. पण खरच हाॅस्पीटलमधे गर्दी केली तर तिथल्या व्यवस्थापनेला पण अडचण होते. तिथे बघायला येणाऱ्या मंडळींच्या नकारात्मक चर्चेने बऱ्याचदा रूग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचे मनोबल कमीच होते.
शिवाय तेथील वातावरण, वास, रुग्णांचे विव्हळणे, मृत्युनंतरचा आलाप, अपघातात क्षतीग्रस्त रुग्णांचे रक्त, मांस इ. पाहायलादेखील भीती वाटते. चक्कर येते, मग अशा ठिकाणी कमकुवत आणि कोमल भावनाप्रधान मनाच्या मंडळीनी अजिबात जाऊ नये. गर्भिणी, वृद्ध, लहान मुलांना तर अजिबात नेऊ नये.
वाढ(व)लेल्या रोगामुळे जी भीती मनात निर्माण झाली आहे, त्या भीतीपोटी अनेक वेळा आपले मन कच खाते आणि दोरीला साप समजू लागते. आणि पोटातील गॅसला किंवा वाढलेल्या पित्ताला हार्ट अॅटॅक समजू लागते. मग रात्रीच्या वेळी डोक्यावर पडलेल्या पानाला सुद्धा मन घाबरते. आणि शरीरातील काही हार्मोन्स बदलतात. एकदा हाॅर्मोन्स बदलू लागली की एकाचा परिणाम दुसऱ्या ग्रंथीवर होतो आणि सगळं च बिनसते. जसे सुरू असलेल्या घड्याळातील एकच काटा आपण हलवू शकत नाही, तीन काटे फिरायच्या अगोदर आतील काही चक्रे फिरतात, तेव्हा ते तीन काटे हललेले आपणाला दिसतात, तसंच शरीरात देखील एक हाॅर्मोन बदलवण्याचा प्रयत्न केला की, त्याबरोबर इतर हार्मोन्स देखील आपोआपच बदलतात, जे शरीराला हानीकारक असते.
हे बदल कोण करतंय तर भीतीयुक्त मन ! म्हणून जिथे भीती उत्पन्न होईल अशा ठिकाणी शक्यतो एकट्याने जाऊ नये. ज्यांची मनं निर्ढावलेली आहेत, त्यांची गोष्ट वेगळी !
सावध करणे हे आमचे काम आहे, ज्यांना स्मशानात जाऊन झोपावेसे वाटते, त्यांना स्मशानही मोकळे आहेच.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०५.०९.२०१७
September 5, 2017
दुध हे पुर्णान्न आहे पण देशी गाईचेच बरं का!
देशी गाईमध्ये देखील गीर हि प्रजाती जी मुळ गुजरात येथील आहे तिचे दुध सगळ्यांपेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे. देशी गायीचे दुध हे तुलनेने भरपूर गुणांनीयुक्त,पचायला हलके, स्निग्धांश कमी असणारे असे असते.
लहान मुलांना देखील काही कारणाने आईचे दुध मिळत नसेल तर पावडरचे दुध घालून त्यांचे पोट खराब करण्यापेक्षा गाईंचे दुध पाजावे.असे म्हंटलेच आहे ना माय नसेल तिथे गाय आहे.आणी कसा योगायोग आहे पहा ना आई जशी आपल्या बाळाला पोटात ९ महीने वाढवते तशी गाय देखील ९ महिन्यांनीच व्याते.
आपल्या भारतीय संस्कृतींत गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे ते काही उगाच नव्हे.गाय हि खरोखरच पुजनीय आहे.असे म्हणतात कि गोमातेची सेवा केल्याने सर्व पापकर्मांचे क्षालन होते.तसेच गाईच्या उदरात ३३ कोट देव वसतात असे म्हणतात.
गाईंचे दुधच नव्हे तर मुत्र,शेण हे देखील औषधी गुणधर्म युक्त आहे.गाईच्या वाशिंडावर जी सुर्य किरणे पडतात त्याचे रूपांतर सोन्यामध्ये होते आणी ह्या सोन्याचे अंश गाईच्या दुधात सापडले आहेत हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच देशीगायीचे दुध हे पिवळया रंगाचे असते.
आधुनिक विज्ञानाच्या संशोधनातून असे आढळले कि देशी गाईच्या दूधामध्ये A-2 protein आढळते जे आपल्या आरोग्याला अत्यंत फायदेशीर आहे.
पण आपल्या देशाची विवंचनाच अशी आहे कि आपण हातचे सोडुन पळत्याच्या मागे धावत असतो.आणी ह्याच मुळे आपल्याला आपले अस्तित्व गमवायची पाळी आली आहे.होय बरोब्बर ओळखलेत तुम्ही माझा रोख कुठे आहे तो.
२५-३० वर्षांपूर्वी आपल्या देशांतील सरकारने काय केले. दुधाचे उत्पादन वाढवावे म्हणून जर्सी हा प्राणी आपल्या देशात आणला आणी त्याची बिजं आपल्या देशांतील दुग्ध उत्पादन क्षेत्रात रोवली. आपण सगळे जर्सी गाय असे म्हणता पण मी त्याला फक्त एक प्राणीच म्हणेन कारण ज्या प्राण्याच्या शरीरात दुध उत्पादन वाढावे म्हणून डुक्कर ह्या प्राण्याचे जीन्स रोवले आहेत त्याला आपण गाय नाही ना म्हणू शकत.आणी ह्या जर्सीचे दुध हे दुध नसून दुधाच्या रूपातले सफेद विष आहे जे आपल्या देशांतल्या पिढीच्या रक्तात इतकी वर्षे भिनले आहे आणी आता ते आपले जहाल रूप दाखवू लागले आहे.थोडक्यात काय जर्सी ह्या पुतनामावशीचे विषारी दुध आपल्या देशांतील बाळकृष्ण दुध म्हणून पित आहेत किंबहुना आपल्या देशांतील यशोदा माताच त्यांना हे पाजत आहेत.तर सांगायचा मुद्दा हा कि जर्सीचे दुध हे slow poison आहे.
जर्सीच्या दुधात असणारे A-1 protein हे त्यामागील खरे कारण आहे.ह्याच प्रथिनामुळे जर्सीचे दुध हे विषारी बनले आहे .आणी त्यामुळे हे दुध पिऊन कर्करोग, डायबेटिस ,हृदयविकार, मानसिक आजार,नपुंसकता इ अनेक भयानक रोग आपल्या देशात वाढले आहेत.खरं वाटत नसेल तर विचार करून बघा.
आता पुढे अजून हानी व्हायच्या आत आपण सर्वांनी शहाणे होऊया.आणी हे जर्सीचे दुध पिणे थांबवून देशी गाईंचे दुंध पिऊया.आपण सर्वांना माझी हि कळकळीची विनंती आहे कि देशी गाईचेच दुध प्या व आपल्या मुलांना पाजा.गाईचे दुध मिळत नसेल म्हशीचे प्या पण जर्सीच्या दुधापासून लांब रहा.
दुध ह्या विषयी पुढील माहिती देण्या आधी मला आपणा सर्वांना जागृत करणे गरजेचे वाटले म्हणून हा लेख.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 1, 2017
सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव.
तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते.
हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत.
सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत.
हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. )
स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे काम ही चव करते. या एका अति महत्वाच्या गुणामुळे ती वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रिय झाली आहे.
रक्तवाहिनींचा संकोच करीत असल्यामुळे रक्तस्राव थांबवणारी,त्यामुळे शस्त्रकर्मींना हुकुमी शस्त्रच जणु !
आतड्यांचे, गुदमार्गाचे आकुंचित करत असल्यामुळे अतिसार कमी करणारी, सहन होत नाही, सांगताही येत नाही वाले सगळे खुश !
तसेच पित्त वाहिनीचा संकोच झाला तर पित्ताचे स्रवण पण कमी करण्यासाठी वापरली जाणारी, म्हणजेच पित्तशामक गुणाची त्यामुळे गॅस्ट्रोएन्टराॅलीस्टना भक्कम आधार देणारी.
रोमकुपांचा संकोच झाल्यामुळे घाम कमी करणारी, त्यामुळे त्वचारोग तज्ञांना सावरून घेणारी.
शुक्रवाहिनीचा संकोच झाल्यामुळे शुक्राच्या बाहेर पडण्यावर बंधन आणणारी, म्हणून शीघ्रस्खलनामधे उपयोगी ठरणारी, म्हणजेच सेक्स स्पेशालिस्टच्या भात्यातील मदनाचा बाणच जणु !
केस जिथून उगवतात, त्या पेशींना आकुंचित करत असल्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे स्त्रीयांची जीवश्च कंठश्च सखी !
मूत्रमार्गाचा अवरोध करत असल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी करवणारी, म्हणून मधुमेह तज्ञांना मदत करणारी
स्थूलता कमी करण्यासाठी, भूकेवर संयम आणण्यासाठी पण ही तुरट चव वापरता येते. म्हणजे ढेरपोटे, तुंदीलतनु कमी करण्यासाठी धडपडणारे स्लीम सेंटर वाले भी खुश !
हिरड्यांना बलदायक आहे. म्हणून प्रत्येक दंतमंजनामधे वापरली जातेच जाते. दातांची हलणारी मुळे या संकोच गुणामुळे मजबूत होतात. म्हणजे सर्व दात पाडणारे तज्ञ पण खुश !
गुणांचा अभ्यास केला की द्रव्य कोणतेही असो, ते कसे काम करेल, याचा अंदाज बांधता येतो आणि इच्छित ठिकाणी जावून औषध काम करते.
यासाठी युक्ती वापरावी लागते. ही ज्याच्याकडे आहे तो बुद्धिमान यशस्वी होतो.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
26.11.2016
November 26, 2016
कोकणातील आणखीन एक झणझणीत तिखट पदार्थ म्हणजे माश्याचे कालवण ! कच्ची हळद, धने, आले आणि तिरफळाचा वास घमघमणारी. सुक्या लालेलाल मिरचीचा ठसका असणारी, ही मिरची जर काश्मिरी वापरली तर बघूनच समाधान ! आणि नेहेमीचे ओला नारळ आणि कांद्यालसणीचे वाटप. आंबटपणासाठी कोकणात कोकम आणि गोवन फूडमधे चिंचेचा कोळ. फोडणी म्हणजे मोहोरीचा तडका नाही.
पिवळसर लाल दिसणारी माश्याची आमटी,
कधी खाल्ली नाही, पण माश्याच्या ठिकाणी आंबाडे, टोमॅटो, मुळा, भेंडी वेगवेगळी वापरून करून बघितली.
मासे हे मुळात समुद्रात, म्हणजे नैसर्गिक अधिवासात तयार होणारे. त्यामुळे त्यात ब्राॅयलर प्रमाणे कृत्रिमता हा प्रकार नाही. काही ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. पण यात तेवढा धोका नाही, जेवढा ब्राॅयलर मधे दिसतो. गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील माश्यांचे गुणधर्म वेगळे असतात.
सर्व जलज प्राणी हे हमखास कफ वाढवणारे असतात, विशेषतः रक्तासंबंधी, त्वचेसंबंधी, पाण्याशी संबंधित, मीठाशी संबंधीत आजारात जलचर प्राणी दोष उत्पन्न करतात. जसे, आजच्या भाषेत गाऊट, मधुमेह, रक्तदाब सोरीयासीस, इ.इ. त्यातल्या त्यात खारे मासे हे जास्त गडबड करणारे.
हा दोष जावा, आणि माश्यांचा उग्र वास कमी व्हावा, यासाठीच तर यात मसाल्यांची मुक्तहस्ते उधळण असते. पण युक्तीने बरं का. माश्याचे अजीर्ण दूर व्हावे, मासे सहज पचावेत यासाठी मसाल्यामधे तीक्ष्ण वासाची तिरफळे. धने, आणि हळद. ग्रेव्हीसाठी कांदा लसूण आणि ओले खोबरे. मिरीचा भगभगीतपणा वेगळा आणि तिरफळाचा तीक्ष्ण सणसणीतपणा वेगळा. म्हणून ही औषधी गुणाची तिरफळे माशाच्या आमटीत हमखास वापरली जातात. माश्याच्या आमटीत नको असतील तर सोलकढीत तरी घालावीत. म्हणजे मासे सहज पचतात. प्रदेशानुसार जे जिथे सहज उपलब्ध असते, ते तिथे सहज पचते, या न्यायाने सर्व समुद्र किनाऱ्यालगत मासे खातात ते पचतात.
सुकवलेले मासे भाजल्यावर त्यावर गावठी खोबरेल तेल घातले की अस्सा वास सुटतो (म्हणे ...) सुक्या माश्यातला रूक्षपणा कमी करण्यासाठी स्निग्ध गुणाचे खोबरेल तेल !
ब्राह्मणी पद्धतीने बनविलेले कंदमुळांचे खतखते जवळपास याच पदार्थांनी बनवले जाते. फक्त यात कांदा लसूण नाही, आणि फोडणीपण नाही. पण तिरफळे मात्र हमखास असतात.
आयुर्वेदात सांगितलेले आहारीय पदार्थ प्रदेश विचारानुसार सांगितलेले आहेत. किंवा युक्ती वापरून बनवले जातात. तिखट पदार्थातील तिरफळे हा त्यातीलच एक वैशिष्ट्य.
या तिरफळांचा वास तर सातासमुद्रापार पोहोचलेला, पण नैसर्गिक कोकणी मानसिकतेप्रमाणे व्यापारी दृष्टीचा अभाव असल्याने पांढऱ्या तांबड्या रश्श्या प्रमाणे " कॅश " न करता आलेली, ही तिरफळाची वैशिष्ट्यपूर्ण अशी तिखट आमटी.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.11.2016
November 20, 2016
तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही.
भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही.
एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात अन्यत्र असतात.
रस्सा असो वा मिसळ.
त्यावर तरंगणाऱ्या तर्रीचा तिखट तर्रेबाजपणा कमी करण्यासाठी आंबट लिंबू वापरले जाते. भेळेचा भडकपणा कमी होण्यासाठी त्यावर चिंचखजुराच्या पाण्याचा शिडकावा केला जातो. चटणीमधे कैरी किंवा साॅसमधे टोमॅटो असतोच. या आंबटपणामुळे तिखटपणा थोडासा का होईना कमी केला जातो.
जेवण झाल्यावर बोटांना लागलेले तेल काढण्यासाठीच जेवताना ताटात उरलेल्या लिंबाची फोड पिळून बोटांना चोळली जाते, ती यासाठीच ! प्रत्येक रस एकमेकांना खूप मदत करीत असतो.
तशी आंबट, गोड आणि खारट यांची छुपी युती असते. सामील होणार नाही, पण बाहेरून पाठींबा जाहीर केलेला असतो. तसंच कडू तिखट तुरट चवींची मैत्री जरा जास्तच आहे. एक गट जेव्हा सत्तेत चलती नाण्याच्या बाजुला असतो, तेव्हा बाकीचे तीन विरोधी पक्षात बोंबाबोंब करत बाके बडवायला बसलेले असतात. कुरघोडी करण्यात यांचा हात कोणीच धरू शकणार नाही.
तिखट झालेल्या रसभाजीमधला तिखट तोरा कमी करण्यासाठी काय करावे ?
रसभाजीमधे पाणी वाढवून तिखटपणा कमी होईल पण भाजीची मूळ चव पण बिघडून जाते, यासाठी आंबट चव मदतीला धावत येते. झणझणीत झुणक्यामधे देखील आमसोलाचे आंबट घातल्याखेरीज भाकरीलापण बरे वाटत नाही. तळलेल्या मिरच्यावर मीठ घालून लिंबू पिळून घेतले की.. व्वा, क्या बात है ! हे आपण व्यवहारात पण पहातो. मिरच्यांचा खर्डा मात्र काही वेळा या आंबटाशिवाय लांब जाऊन भांडून फटकून बसल्यासारखा असतो.
आंब्बट्ट म्हटले तरी दोन्ही डोळे एकदम बंद होतात.
आंबटगोड हा युती शब्द उच्चारला की फक्त एक डोळाच बंद होतो.
आणि तिखटात आंबट नाही घातले, तर मात्र दोन्ही डोळे हेऽ एऽवढे उघडतात.
तिखट लोणच्याची, कधी गोडाशी मैत्री होऊच शकत नाही. तिथे तिखट-आंबट युतीच कामी येते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.11.2016
November 14, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस
बाबा सांगतात...
बाबा म्हणजे आप्त म्हणजेच ग्रंथकार सांगतात,
सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा आणि दुर्जनापासून लांब रहावे.
हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य आणि असंबद्ध भाषा, दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, आणि शास्त्र विरूद्ध विचार ही दहा प्रकारची पापकर्मे होत. यांचा काया, वाचा आणि मनेकरून त्याग करावा.
या सर्व उपदेशात्मक उपचारांना हितोपदेश असे म्हटलेले आहे. जसे योग शिकताना, अष्टांग योगामधील यम नियम प्रथम पाळायचे असतात, त्यानंतरच त्यापुढील आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अंगांचा विचार करावा. तसेच आयुर्वेद शिकताना प्रथम हितोपदेश शिकावा, आचरावा, कृतीत आणावा. म्हणजे पुढील उपचार शिकणे सोपे असते.
आजच्या काळात हे नियम पाळणे शक्य आहे का, असे म्हणून नियम टाळणे तर नक्कीच समर्थनीय नाहीत. काळानुरुप यात बदल अवश्य करावेत, पण ग्रंथातील मूळ सूत्र सोडू नये.
ही दहा पापकर्म सांगितलेली आहेत.
ही अशा प्रकारची कर्मे करू नयेत. असं सांगण्याचं कारण, कथनी और करनी मे यदी एकता नही है तो मन मे खोट जरूर पैदा होती है । जे आत असेल तेच बाहेर येते.
विहिरीत किंवा टाकीमधे जे पाणी असते, बाहेर काढल्यावर तेच पाणी येणार ना. आपल्याला जर चांगले पाणी हवं असेल तर जिथून घेणार तो मूळ स्रोतदेखील चांगलाच हवा. म्हणजेच मन स्वच्छ असेल तर मनात काही पापभावना नसतील तर शरीरातील दोष देखील जरा अपथ्य झालं तरी संतुलीत रहातात. कारण या मनाचा संबंध थेट हार्मोन्सशी आहे. मन स्थिर आणि उच्च विचारांनी प्रेरीत असेल तर अंतःस्रावी ग्रंथींची कामे देखील स्थिर आणि उच्च दर्जाची होतात.
या प्रत्येक शब्दावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. कधी कोणाची शाब्दीक हिंसा देखील करू नये, कठोर बोलू नये, हे गांधीनी पण सांगितले होते. पण भविष्यातील सोय पाहून, सर्वधर्म समभावच्या नावाखाली काही ठिकाणी गांधींनी सोयीस्कर दुर्लक्ष देखील केले होते. या असत्याचाच राग पुढे व्यक्त झाला असे आफळेबुवांच्या एका किर्तनात ऐकले होते. नरो वा कुंजरो वा असे म्हणून धर्मराजाने देखील असत्य भाषण केले होते, ज्यामुळे त्याचा रथ पुढे स्वर्गापासून दोन बोटे लांब राहीला होता. नुकसान झालेच होते. याच असत्यामुळे गांधीना आपला प्राण गमवावा लागला होता, हे सत्य लक्षात घ्यावे.
भविष्यात आपल्याला जे संभाव्य आजारपण येणार आहे, त्याचा आतापासूनच नीट विचार करावा. यासाठी आपल्याला उपयोगी होणाऱ्या मंडळींना प्रेमाने जिंकून घ्यावे. ही माणसे तुटु नयेत, यासाठी प्रयत्नशील रहावे. प्रयत्न करूनही काही फायदा होत नसेल तर समजावणे सोडून द्यावे. भविष्यात येणाऱ्या आजारपणात, आपत्तीत जी माणसे उपयोगी ठरतील अशांना हाताशी धरावे.
केवळ आपलेच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीचे हित कशात आहे, हे ओळखून पावले उचलावीत.
या हितोपदेशांचा आजच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
August 23, 2017
कावळ्याचिमणीची गोष्ट
गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू केले होते. त्यात एक क्षुद्र किटक, कोळी सुद्धा होता. भक्ष्याला पकडण्यासाठी तयार केलेलं जाळं तुटलं तरी जिद्द न हरता, परत परत तो तयार करीत होता. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते शिकावं हे दत्तगुरूनी शिकवलं होतं. तसं हा कावळा पक्षी माझा गुरू झाला. खूप काही शिकवून गेला.
एकदा रात्री साडे दहा वाजता दवाखान्यातून घरी येत असताना, घरासमोरच रस्त्यावर एका बाजूला एक मांजर गाडीखाली सापडून मरण पावले होते. खूप वाईट वाटलं. पण....
दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडलो, तेव्हा त्या मृत मांजराभोवती तीन चार कावळे बसून त्याला खात होते. माझी गाडी त्यांच्या जवळून गेल्यावर ते उडून गेले. मी पुढे गेल्यावर परत तिथे आले. माझे काम संपवून जेव्हा अर्ध्या पाऊण तासाने परत आलो तेव्हा जवळपास अर्धेअधिक मांजर त्यांनी फस्त केले होते.
गाडीतून उतरताना बुद्धीने विचार केला....
काल रात्रीपासून ते मांजर तिथे पडून होते, रात्रीची शांत निवांत वेळ खाण्यासाठी योग्य होती, वाहानांचा, माणसांचा कोणाचाही त्रास नव्हता, मग या कावळ्यांनी रात्रीच या मृत मांजराला का खाल्ले नाही ??????
तेव्हा, त्याने आखून दिलेला नियम आठवला आणि लक्षात आले. रात्रीचे खायचे नसते.
जे काही खायचे ते सूर्योदय झाल्यावर खावे. पोटभर खावे. भीती न बाळगता खावे आणि महत्त्वाचे म्हणजे खाल्ल्यानंतर काय खाल्ले होते, ते अजिबात आठवू नये. म्हणजे खाल्लेले सर्व सहज पचून जाते. खाल्लेल्या अन्नाविषयी मनात नकारार्थी भावना तयार व्हायच्या अगोदरच आहार पचून गेला पाहिजे.
सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये, हे त्याच दिवशी संध्याकाळी चिमण्यांनीदेखील मला शिकवले. एका दुकानात सौ. बरोबर गेलो होतो. ती आत मधे खरेदी करताना मी गाडीत बसलो होतो. आणि दुकानाच्या बाहेर जमिनीवर पडलेले धान्य खाण्यासाठी येणाऱ्या चिमण्यांच्या थव्याकडे कुतुहलाने पाहात होतो.
सायकल वाला आला, चिमण्या भुर्रऽऽऽ,
रिक्शा आली पुनः चिमण्या भुर्रऽऽऽ
माणसं गेली तरी चिमण्या भुर्रऽऽऽ
कितीतरी वेळ असा पोटभरतीचा खेळ चालला होता. त्यांचा चिवचिवाट ऐकून बरं वाटत होतं.
तेवढ्यात सौ.चा निरोप आठवला, काळोख पडायच्या आत पिठाच्या चक्कीवरून दळण आणायचे आहे. म्हणून अगदी जवळच असलेल्या चक्कीवरून दळणाची पिशवी आणून गाडीत ठेवली. एव्हाना दुकानाबाहेर दिवे पण लागले होते आणि त्या संधीप्रकाशात मी परत चिमण्या शोधायला लागलो, पण एकही चिमणी दिसेना. चिमण्यांनी फुललेला बाजुचा गुलमोहर देखील अबोल झाला होता. एक विषण्णता मनात दाटून आली. सायकलवाला पण नव्हता, रिक्शावाला पण नव्हता, माणसांची वर्दळ पण थांबली होती, पण सर्व चिमण्या मात्र निमूटपणे परत फिरल्या होत्या......घराकडे अपुल्या....
कारण एकच होतं. तो "दिनकर" अस्ताला गेला होता.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.03.2017
March 1, 2017
लवण रसाचा युक्तीने वापर केला तर तो प्रिझरवेटीव्ह म्हणून वापरता येतो. म्हणून तर लोणच्यामधे मीठ जास्त घालतात.
मीठाला कधीही कीड लागत नाही. हा त्याचा एक चांगला गुण. मीठाप्रमाणेच खायचा चुना देखील कीटनाशक आहे.
मीठातील हा गुण ओळखून मासे टिकवण्यासाठी, सुकवण्यासाठी मीठाचा वापर होतो. कैरी, लिंबू मिरच्या टिकवण्यासाठी सुद्धा मीठच वापरले जाते.
कोकणात कच्च्या फणसाचे गरे मीठ लावून वाळवतात. काही ठिकाणी हे असे मीठ लावलेले कच्चे गरे नीट गुंडाळून, मातीच्या मडक्यात जमिनीत पुरूनही ठेवतात. ते कुसत नाहीत किंवा किडत नाहीत. आणि आवश्यक वाटतील तेव्हा बाहेर काढून, धुवुन भाजी करतात.
दररोज दात घासण्यासाठी लवणरस हा निषिध्द सांगितला आहे. त्याने दात जास्त क्षरण पावतात, म्हणजे झिजतात, पण युक्ती वापरली तर किडलेल्या दातांपासून मुक्ती मिळते. किडलेल्या दाढांमधे मीठाचा दाणा धरून ठेवल्यास किड मरते.
कशी ?
घरात कोबी अथवा फ्लाॅवर किंवा तत्सम भाजी आणली, तर त्यात लपलेली किड दिसत नाही. ती बाहेर यावी यासाठी सुगृहिणीला, हा फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा असतो, हे सांगावे लागत नाही, किंवा शिकण्यासाठी शाळेत जावे लागले नाही. फ्लाॅवर मीठाच्या पाण्यात बुडवला की लपलेली कीड आपोआप बाहेर येते, तशी दाढेत लपलेली कीडदेखील आठवड्यातून एकदा मीठाच्या पाण्याचा कवल धरला की झाले काम ! मीठाची गुळणी धरून बसणे म्हणजे कवल. ( कवल टीप यापूर्वी झाली आहे. )
म्हणजे आजच्या भाषेत मीठ जंतुनाशक झाले ना !
कोबी, पालक, पडवळ, दोडका अश्या काही भाज्यामधे मीठ नैसर्गिकरित्या जास्तच आहे. त्या शिजवताना मीठ जरा कमीच घालावे लागते. या भाज्या शिजल्यानंतर आळतात, हे सुगृहिणीला कळते.
मीठ जास्त झाले तर पोटात ढवळत रहाते. म्हणून उलटी नीट होण्यासाठी मीठाचे पाणी प्याले तर उलटी छान होते.
छान होते ? किळसवाण्या उलटीमधे छान होण्यासारखे काय आहे ? ते उलटी करणाऱ्यांना विचारावे, म्हणजे समजेल.
पोटात आतड्यांना चिकटलेला चिक्कट आम सोडवण्यासाठी हे लवणजल वापरले जाते.
ताप कमी होण्यासाठी मीठाच्या पाण्याच्या घड्या डोक्यावर ठेवतात, हा प्रथमोपचार तर सर्वांनाच माहिती आहे.
आणि कुठेतरी लचकून मुरगळून सूज आली, तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेणे हा उपाय पण घरातील ज्येष्ठ नागरीकांना माहिती आहे. शरीरातील पाणी बाहेरून स्वतःकडे शोषून घेणे, या मीठातील गुणामुळे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मीठ बाहेरूनच वापरले जाते.
उलट्या जुलाब होत असतील तर मीठ साखर पाण्याचा जगजाहीर उपाय आहेच. पण तो आयुर्वेद मतानुसार सरसकट वापरू नये, अग्नि मंद होतो. यासाठी वैद्य मत जरूर घ्यावे.
केस गळणाऱ्या केसमधे मीठ जरा जपूनच वापरावे, नाहीतर गाॅनकेस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
06.11.2016
November 6, 2016
आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ?
आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे.
आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते.
शिल्लक काय रहाते ?
जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते.
मागे साधे मीठच उरते !
जे खरंतर औषधी आहे.
आणि आम्हाला ऐशी पैसे किलोने मिळते. !!
मग आयोडीनयुक्त मीठ खाऊन फायदा कुणाचा ?
आणि आजचा सर्व्हे असा सांगतो, की भारतात अति उंचावर असणाऱ्या काही डोंगराळ प्रदेशामध्येच आयोडीनची कमतरता भासते. अन्य ठिकाणी आयोडीनची गरजच नाही. अन्य ठिकाणी समुद्रमीठातून, रंगीत फळामधून, रंगीत भाज्यांमधून, कडधान्याच्या वरील सालीतून, मासे,इ. समुद्री प्राण्यांमधून, सर्व प्रकारच्या लाल औषधामधून, कोकम, चिंच, शेंगदाणे, या आहारीय पदार्थातून, आपल्याला रोजच्यारोज आयोडीन मिळतेच. वेगळे आयोडीन घेण्याची तशी गरजच नाही.
हं, गरज आहे, मल्टीनॅशनल कंपन्यांची !
या ना त्या मार्गाने पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत.
मध्यंतरी काही जागरूक नागरीकांनी या विरोधात आवाज उठवला होता,
पण पुनः ये रे माझ्या मागल्या....
मोरारजी आणि जाॅर्ज फर्नांडिस यांच्या काळात...विदेशी, घातक, रसायनयुक्त कोल्ड्रींक्सवर बंदी आणली गेली.
नंतर ???
पुनः हातमिळवणी झाली. जाहीराती झाल्या, स्टार मंडळीनी त्यात सहभाग घेतला, राजकीय समीकरणे बदलली, त्यांचे अधिकृत आर्थिक प्रशिक्षण झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने विक्री वाढू लागली. तसेच, आयोडीनयुक्त मीठाचे झाले. नंतर काय ? ठेंगा
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.11.2016
November 7, 2016
पाणी शुद्धीकरण भाग पाच
पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.
त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.
याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.
हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.
पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.
पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.
केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.
एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.
नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.01.2017
January 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti