केशर म्हटले की पुर्वीच्या काळातील राजा रजवाडे ह्यांची आठवण आल्या शिवाय रहात नाही.किंबहूना हे नाव ऐकल्यावर मला तरी त्यांची आठवण होते.असा हा राजेशाही आश्रय लाभलेला पदार्थ आता जरी सर्व सामान्यांच्या अवाक्यातला झाला असला तरी त्याच्या भोवताली असणारे ते वलय काही कमी झाले नाहीये बुवा.
सांगण्याचा हेतू हा की केशर हा तसा जपून वापरण्याचा पदार्थ आहे कारण आज देखील ह्याच्या किंमती गगनास भिडलेल्या आढळतात.
साधारण पणे राजभोगा मध्येच अर्थात अगदी खास अशा पक्वान्नांमध्येच ह्याचा वापर केला जातो.मिठाई,बासुंदी,मसालेदुध,केशराचा शिरा इ (आणखी पदार्थांची नावे देणे टाळते कारण आपल्या रसग्रंथी उत्तेजीत करून अत्रूप्त ठेवल्याचे पातक माझ्या माथी नको)
तर हा केशर जसा आपण गोड धोड पदार्थात वापरतो तसेच ह्याचे काही औषधी उपयोग देखील आहेत तेच आपण आज पहाणार आहोत.
केशराचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरत असलेले केशर हे त्या फुलात मध्यभागी असतात.
चवीला तिखट,कडू आणी उष्ण गुणाचे असतात.केशर शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतात.
चला आता ह्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:
१)आव पडत असल्यास केशर कडू निंबाच्या रसातून द्यावे.
२)पोटात जंत होत असतील तर केशराचा ४ कांड्या थोड्या कापूरासह २ चमचे दूधात मिसळून द्यावे.असे ८ दिवस करावे.
३)लहान मुलांना वारंवार सर्दी होत असेल तर ४ केशर कांड्या २ चमचे दूधातून द्यावे.
४)लहान मुलांना उन्हाळयात गोवर उठते ती पुर्ण पणे शरीराबाहेर न पडल्यास त्यांना त्रास होऊ शकतो ह्यासाठी १० केशर कांड्या ६ चमचे पाण्यात रात्री भिजत घालाव्यात व त्यात साखर घालून हे पाणी गोवर थोडे अंगावर फुटलेले दिसले की मुलांना सकाळी हे पाणी पाजावे.
५)पाळीच्या वेळी ओटीपोटात दुखणे,स्त्राव नीट न होणे अशक्तपणा अशा तक्रारी असल्यास १/४ चमचा केशर + २ चमचे जीरे हे मिश्रण दुपारच्या जेवणापुर्वी ३ महीने घ्यावे.
६)शरीरात अशक्तपणा असल्यास व रक्ताची कमी असल्यास १/४ चमचा केशर+ ३ काळे खजूर+ २ चमचे शिंगाडा पीठ +१ चमचा मध हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी घ्यावे.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 17, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32
नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा
देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
कशासाठी?
वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )
एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )
सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !
अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !
बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !
काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.
चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.06.2017
June 25, 2017
कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला !
मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद असेल नाहीतर मेद असेल, रस धातू असेल नाहीतर स्तन्य असेल. हे दोष विशेष शरीरातील स्रोतसांना चिकटून राहिले तरच दुष्टी निर्माण होते.
कडू चवीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमध्ये खर म्हणजे खरखरीतपणा, दोन पेशींना एकमेकांपासून वेगळे करण्याचा गुण, याला शास्त्रकार विशद असे म्हणतात. आणि रूक्ष म्हणजे कोरडेपणा हे महत्वाचे गुण असतात.
मधुमेहामधे नेमके यांच्या विरूद्ध गुण शरीरात वाढलेले असतात, त्यामुळे गुणविपरीत औषध म्हणून कडू चवीची औषधे मधुमेहावर छान गुण दाखवतात.
मधुमेहाशिवाय वाढलेली ढेरी कमी करणे, किंवा शरीराचा कोणताही भाग फाजीलपणे वाढणे, गळ्याच्या गाठी वाढणे, गर्भाशयात फायब्राॅईडची गाठ वाढणे,शरीरात आत बाहेर कुठेही अमर्याद स्वरूपात वाढणारी कर्करोगाची गाठ, डोळ्यांचे आजार, सांध्यांना येणारी सूज, रक्तातील चिकटपणा वाढल्यामुळे रिपोर्टमधे दिसणारे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, वगैरे पॅथालाॅजिकलल आजारदेखील या कडू चवीने कमी होतात. आमामुळे पोट गप्प होणे, बरेच दिवसांच्या बऱ्या न होणाऱ्या जखमा, ती अगदी साधी सर्दी देखील कडू चवीने कमी करता येते.
तापावर हटकून उपयोगी पडते ती कडू चव ! म्हणून तापाची कारणे शोधता न आल्यास, कडू चवीची औषधे वापरली की ताप जातो. जसे महासुदर्शन काढा.
औषध कोणतेही असूदेत, ताप उतरला पाहिजे. एवढेच रूग्णाला अपेक्षित असते. मग ते कडू चवीचे महासुदर्शन चूर्ण असू देत नाहीतर, कडू चवीची पॅरासिटेमोलची कडू जार गोळी. कडू म्हणजे ताप उतरवणारे हे साधे सोपे समीकरण आहे.
पुस्तकात लिहिलं नसलं तरी या कडू चवीचा अतिरेकी परिणाम म्हणून वात आणि पित्त हे वाढतेच, हे आपण व्यवहारात बघतोच! हातच्या ( दिसणाऱ्या) वातपित्ताला ग्रंथाधार कशाला ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.11.2016
November 24, 2016
शाळेत जाताना पाण्याच्या बाटल्या किती पालकांनी नेल्या आहेत ? मला तर आठवतच नाही. कधी न्यावीच लागली नाही. शाळेत स्टीलचे पिंप ठेवलेले असायचे. खेळून झाले की, धावत पहिल्यांदा जाऊन पिंपातले पाणी पिण्याची मजा काही औरच होती.
December 4, 2016
अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही.
ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने फुटतात आणी त्याच्या मधोमध हे फळ उगवते.लहान व कच्चे असताना हे फळ लालसर असते तर पिकल्यावर ते पिवळे होते.फळाच्या डोक्यावर मुकुट शोभावा अशी पाने असतात.
हे पिकलेले असताना गोड व कच्चे असताना आंबट असते.हे थंड असल्याने वात व पित्त शामक आहे.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमीत येत नाही त्यांनी कच्च्या अननसाचा रस मासिक पाळी येण्याच्या तारखे पुर्वी १/२-१ कप रोज प्यावा.
२)१ ग्लास अननसाचा रस+१चमचा साखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे लघ्वीची जळजळ,लघ्वी कमी होणे,लघ्वीला उग्रवास येणे कमी होते.
३)अजीर्ण,उल्ट्या,जुलाब ह्यात उपवास करावा व अननसाचा रस+काळी मिरी+साखर हे मिश्रण थोडे थोडे प्यावे.
४)गजकर्ण,खरूज,ह्यात येणारी खाज कमी करायला अननसाचा रस लावावा.
५)पोटफुगणे,भुकमंदावणे,नियमीत संडासला न होणे ह्यात जेवणासह अननसांची फोड चावून खावी.
अननस खायचा अतिरेक केल्यास अम्लपित्त व जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
निरोगी रहाण्यासाठीचे हे पथ्यापथ्य मोजक्या दिवसासाठी नसून कायम स्वरूपी आहे, हे लक्षात घ्यावे.
आपण नेहमी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते सोडून आमच्या धारणाच आम्ही बदलून टाकल्या आहेत. आयुष्य हे अनमोल आहे, हे विसरून आयुष्य हे चुलीवरच्या कांद्यापोह्या एवढे स्वस्त करून टाकले आहे. गॅसपेक्षा चुलीवरचे जरा खमंग लागतात, एवढेच काय ते !
निरोगी रहाण्यासाठी अमुक पथ्य पाळा, असे सांगितले की, रुग्णाच्या कपाळावर डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत आठ्याच आठ्या दिसू लागतात.
बंधनात रहायला कुणालाच आवडत नाही. आणि जर ते बंधन दुसऱ्याने घातलेले असेल तर अजिबात नकोसे वाटते.
मी मला हवे तसे वागेन, मला कोण अडवणार ? अशा बेगुमान मनाला लगाम तर हवाच. हा लगाम आप्तांनी घातला तर त्याला तप म्हणतात. आई वडीलांनी सांगितले तर शिस्त म्हणतात, आणि डाॅक्टरनी सांगितले तर पथ्य म्हणतात. आणि दुसऱ्या कुणीतरी सांगण्यापेक्षा स्वतःचे स्वतःला आवरणे आणि सावरणे आवश्यक आहे.याला संयम म्हणतात.
हे कुणा दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या भल्यासाठी आहे, एवढे तरी लक्षात ठेवावे. शरीर मन आणि आत्मा या तिघांच्या चिरंतर कल्याणासाठी हे करावेच लागेल.
पहिल्या ओळीतील हितकर असा आहार विहार हा शरीरासाठी. दुसरी तिसरी ओळ मनावरील संयमासाठी आणि चौथी ओळ आत्मरक्षणासाठी आहे. हे भान असावे. असे ग्रंथकार सांगतात.
या संयमाची सवय पहिल्यापासूनच लावून घेतली तर लागते. संयम आतून यावा लागतो. संयम येण्यासाठी मनाला मुरड कशी घालावी, आवर कसा घालावा, हे समर्ध रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात लिहून ठेवले आहे.
मना वासना दुष्ट कामा नये रे,
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना धर्मता नीती सोडू नको हो,
मना अंतरी सार विचार राहो ।।
संत असो वा आप्त. सर्वजण आतून एकच विचार करीत असतात, हेच यावरून सिद्ध होते. आयुष्य असो वा आरोग्य. ते नीट सांभाळायचे असेल तर काही पथ्य तर करावेच लागणार.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०७.०८.२०१७
August 7, 2017
पदार्थामधील पाणी कमी केले की तो टिकाऊ होतो. द्राक्ष आणि मनुका बेदाणे, ओला अंजीर सुका अंजीर, ताजी फळे आणि सर्व ड्राय फ्रूटस, यात टिकाऊ काय ? कोणते पदार्थ ?
जे सुके आहेत ते. ज्यांच्यात पाणी कमी आहेत ते !
साधा रवा आणि भाजून ठेवलेला रवा. साध्या रव्यात कीड पटकन होते. पण भाजून ठेवल्याने त्यातील पाणी कमी केले जाते. जंतुना जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी कमी झाल्याने, भाजून ठेवलेल्या रव्यात कीड, टोका पडत नाही. बरोबर ना !
घरात आणलेल्या पालेभाज्यांचं सर्वसाधारण आयुष्य किती ? एक दिवस. जास्ती जास्त दोन दिवस. नंतर त्या चक्क मान टाकतातच ! पाण्याच्या अभावाने त्या मरतात. पालेभाज्या म्हणजे ऐशी नव्वद टक्के पाणीच ना ! पाणी संपले की संपले. हीच पालेभाजी पाणी शिंपडून ओट्यावर ठेवली तर जिथे पाणी साठले आहे, त्या ओट्याला चिकटून राहिलेल्या भागातील भाजी कुसुन लिबलिबीत होते. फुकट जाते.
पाण्याशिवाय जीवन नाही. जंतुचे देखील तसेच आहे. स्थूल आणि सूक्ष्म जीवांना जगण्यासाठी देखील पाणी हवे असते, ते मिळाले नाही तर ते पण मरतात.
झुरळांची पैदास कुठे होते ? बेसिनच्या खाली.
डासांची वाढ कुठे होते ? पाण्यामध्ये.
त्यांचा जन्म, पोषण, वंशवृद्धी पाण्यावर, पाण्याच्या दमटपणावर अवलंबून असते. पाणी नसले की जीवन संपले.
चंद्र मंगळावर जी अंतराळ याने पाठवताहेत, ती कशासाठी? केवळ दगडधोंडे आणि हवामान तपासायला ?
नाही.
त्या दगडातील पाण्याचा अंश शोधायला.
त्या दगडात जरा जरी पाण्याची शक्यता वाटली तर तिथे इतर जीवजंतु नक्कीच असणार. या शक्यतेवरच या मोहिमा चालतात.
म्हणजे जीवांना त्यांचे पोषण करणारे पाणी जिथून मिळेल तिथे हे जीव स्थिरावतात, हा वैश्विक नियम आहे.
याची दुसरी बाजू. जिथे पाणी नाही, तिथे जीव संसर्ग नाही. इन्फेक्शन नाही.
म्हणजेच
शरीरातील पाणी गरजेपेक्षा वाढत गेले तर तिथे जीवांची उत्पत्ती होणारच. आणि अवास्तव पाणी कमी करत गेलो तर जंतुसंसर्गही तेवढाच कमी होत जाणार ! बरोबर ना ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.12.2016
December 18, 2016
भारतीय दर्शन शास्त्रात अनेक ग्रंथ अभ्यासासाठी आहेत. याविषयी सविस्तर दोन तीन दिवसामधे लिहीन. १८ दिशा विचार मल विसर्जन करताना उत्सर्जित केलेला मळ अथवा मूत्र पुनः आपल्या पायावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी जागेचा उतार नीट पहावा. आता मलविसर्जनावेळी जी भांडी वापरली जातात ती अशा उताराची असावीत.
February 18, 2018
आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा.
आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो हे एकुन आता तरी आपल्याला नवल वाटणार नाही हे मला पक्के माहित झाले आहे.
चला तर आता पहिल्या भाजी पासुन सुरूवात करूया ना.बरं मग हि पहिली भाजी कोणती बरे,चला एक क्लु देते रामदेव बाबांच्या योग शिबिरे व योग व्याख्यानांमुळे ह्या महाशयांना बरीच प्रसिध्दी लाभली आहे.
आता कसे बरोब्बर ओळखलेत तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधीभोपळा किंवा ज्याला आपण कोकणदुधी म्हणतो तोच हा बरं का!
November 8, 2016
पचन सुरू असताना शक्यतो दुसरे कष्टांचे काम करू नये. सवय नसेल तर नकोच. जर काम करायचे असेल तर जेवण नको. भरल्यापोटी अति श्रमाचे काम करणे म्हणजे पचन बिघडवणे. लमाणी लोकांची गोष्ट वेगळी. त्यांना पहिल्यापासूनच अति कष्टाच्या कामाची सवय असते.
पचन होत असताना त्यात पित्ताशयाकडून येणारे पित्त, स्वादुपिंडातून पाझरणारे स्राव इ. मदतीला असतात. हे पचनाचे काम करताना अन्य दुसरी अनावश्यक कामे बंद करणे अपेक्षित असते.
आता खरे पाचन सुरू होते. आपल्याला हवे तसे आपण संस्कारीत करून घेतले, दात जीभेला जे हवे तसे भरडून आत उतरवले, इथपर्यंत पचनावर आपला ताबा असतो. जे काही अपेक्षित बदल आहेत ते इथपर्यंतच. एकदा घश्याखाली अन्न उतरले की आपला अंमल संपला. डिपार्टमेंटच बदलले. आता त्याला हवे तसे योग्य ते बदल तो करू लागतो. आधीच ठरवलेल्या फाॅर्म्युल्याप्रमाणे योग्य ती पाचक द्रव्ये तिथे आणली जातात. नीट घुसळली जातात. सर्व रस एकजीव होतात. अग्निनारायण मदतीला असतोच. रंजक पित्त, पाचक पित्त, समान वायु, बोधक कफ हे मदत करीत असतात. त्या सर्वांचं एक मिश्रण तयार होते, आणि हळुहळू पुढे सरकू लागते. पोटाच्या म्हणजे जठराच्या अगदी सुरवातीला आणि शेवट असलेले दोन्ही दरवाजे बंद केले जातात. एकदा मिक्सर सुरू झाला की दरवाजे मधे उघडू नयेत.
आणि पोटाचे स्नायु उलट सुलट फिरू लागतात. म्हणजे मधेच उलट मधेच सुलट. अगदी पुरण यंत्राप्रमाणे, जेव्हा पुरण खाली पडायचे बंद होते तेव्हा मधेच दोन तीन वेळा उलट फिरवले की कसे, जाळीला चिकटून बसलेले पुरण कसे सोडवले जाते, तसे.
किंवा इमारतीला स्लॅबसाठी आवश्यक असलेले सिमेंट, वाळू, खडी, पाणी जसे अगोदरच ठरलेल्या प्रमाणात, त्या मोठ्या मिक्सरमध्ये घालून फिरवले जाते, आणि योग्य वेळानंतर दुसऱ्या बाजूला ओतले जाते, एक वेगळेच मिश्रण तयार झालेले असते.
अगदी तस्सच पोटात अन्नरस तयार झालेला असतो. त्यात अजूनही काही स्राव मिसळणे बाकी असते. हे पचन जिथे चालते त्या अवयवाचे नाव ग्रहणी असे आहे. पोट आणि लहान आतडे यांच्यामधे अर्धकंसाच्या ( आकाराचा हा अवयव असतो.
या अवयवाच्या दुष्ट होण्यामुळे किंवा अन्य दोषांच्या परिणामामुळे ग्रहणी नावाचा आजारही होतो, जो आजार चिकित्सेसह फक्त आयुर्वेदात वर्णन केला आहे.
कोण म्हणतं नावात काही नाही म्हणून ???
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.03.2017
March 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti