आयुर्वेद समजून घेताना
विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, आयुर्वेद समजतोच असे नाही.
अभ्यासासाठी ग्रंथकारांनी याचे तीन भाग केलेत. शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक. जसा रोग तसे त्याचे कारण. जसे कारण तसे औषधी उपाय योजना करणे, म्हणजे चिकित्सा करणे. रोग जर. शारीरिक कारणामुळे झाला असेल, तर उपाय देखील शरीरावर हवा, तिथे आश्वासन देऊन किंवा मानस चिकित्सा करून फरक पडणार नाही. जसे, पायात काटा गेलाय तर उपाय त्याच पायावर, तिथेच, करायला हवा, ज्या पायात काटा घुसलाय. इथे मंत्र म्हणून काटा बाहेर येणार नाही.
पायात काटा गेलाय असे सारखे वाटत रहाणे, तपासण्या केल्या तरी त्यात काहीही व्रण किंवा काटा न दिसणे अशा लक्षणामधे मानसोपचारच उपयोगी पडणारा असतो जो, शंका या रोगाचे समाधान करतो.
आणि सतत एकाच पायात, एकाच ठिकाणी, एकाच कारणानी, वारंवार काटा टोचणे आणि व्रण बरा न होणे, आणि याची सकृतदर्शनी कोणतेही कारणे लक्षात न येणे, यासारखी लक्षणे ही रोगाचे मुळ आत्मदोषापर्यंत नेऊन पोचवतात.
भुवया उंचावून बघण्याची गरज नाही. हो. हा आत्मदोष जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मान्य केला आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या काही संघटनांच्या विरोधामुळे व्हावे तसे संशोधन या विषयावर होत नाही, ही खंत जरूर आहे. असे होऊ नये, आमचे शास्त्र लेबल बदलून, भाषा बदलून, 'त्यांना' ( म्हणजे पाश्चात्य लोकांना ) हवे तसे अर्थ काढून, आम्हालाच शिकावे लागणार आहे. वेदांचे पण तेच झाले आहे. मॅक्समुल्लरला समजलेला भारताचा इतिहास आज आम्हाला शिकावा लागत आहे. जो अतिशय चुकीचे अर्थ शिकवतो.
शुद्धिकरण मुळापासूनच भारतीय मानसिकतेचा, भावनांचा विचार करून व्हायला हवे. केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे म्हणजे वेदांचे प्रतिसंस्करण नव्हे. हे आयुर्वेद शिकताना लक्षात घ्यायला हवे.
ही मानसिकता झाल्यावरच आयुर्वेदाचा श्रीगणेशा आरंभ होईल.
आयुर्वेद समजून घ्यायला ती विशिष्ट दृष्टी हवी. जसं भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप बघण्यासाठी अर्जुनाची सामान्य दृष्टी बदलून, वेगळी विशाल दृष्टी होणे आवश्यक होते, तसे आहे. भगवंत गीतेमधे हेच सांगत आहेत. मोक्ष समजून घ्यायला, कर्तेपण लयाला जायला, मी कोण हे शोधताना ती वेगळी विशाल दृष्टी आवश्यक आहे.
भगवंताची कृपा झाल्यावर संजयाला आणि अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त झाली. आपण सारे अर्जुन आहोत, या भावनेने जर भगवंताकडे ती दृष्टी मागितली तर तो निश्चितच ती दृष्टी देतो. फक्त भाव अर्जुनाचा हवा.
........आणि भक्तीदेखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.02.2017
February 13, 2017
पान जरूर खावे. आजचा तंबाखू सोडला तर पान हे व्यसन नक्कीच नाही. त्यातील घटक किती प्रमाणात असावेत अशी काही लिखित संहिता नाही. जसं आजकाल सांगितले जाते, दररोज तांदुळ अमुक ग्रॅम, अमुक ग्रॅम वजनाची भाजी भाकरी, एवढे मिली आमटी, एवढी मिग्रॅम चटणी. वगैरे. आपल्या इथे प्रत्येकाचे नियम वेगळे…..
July 5, 2017
ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकाऊ असे लक्षात येते.
चार पदार्थ घरात बनवले आहेत.
आमटी भात चपाती आणि भाकरी.
हे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले आहेत. सर्वात पहिला फुकट जाणारा पदार्थ आहे आमटी. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आमटीला आंबूस वास येऊ लागतो. दुसऱ्या दिवशी रात्री भात फुकट जातो. तिसऱ्या दिवशी रात्री चपातीला वास येतो. चौथ्या दिवशी तर बुरशी येते. पण भाकरी मात्र पाचव्या दिवशीपर्यत तश्शीच असते.
असं का झालं ?
त्याचं उत्तर त्या पदार्थातील पाण्यात आहे. ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू.
ज्या पदार्थामधे पाणी जास्ती तिथे जंतुसंसर्ग जास्त. आजच्या भाषेत इन्फेक्शन ! या सूक्ष्म जंतुना देखील जगायला पाणी लागतेच ना.
या चार पदार्थांमधे नेमकं काय झालं असेल ?
आमटीमधे पाणी जास्त असल्यामुळे जंतुसंसर्ग पटकन होतो. म्हणून ती लवकर नासली. भातामधे त्यामानाने पाणी कमी. म्हणून जंतुसंसर्ग जरा उशीराने झाला. म्हणून आमटीनंतर फुकट गेला.
आता राहिली चपाती आणि भाकरी.
चपाती फक्त एक वेळा तव्यावर भाजली जाते, तर भाकरी दोन वेळा. भाकरीपेक्षा चपाती कमी वेळ भाजली जाते म्हणून लवकर फुकट जाते.
भाकरी एवढे दिवस का टिकली ?
खमंग भाजल्यामुळे !
भाकरी एकदा तव्यावर आणि परत अग्निवर थेट भाजली जाते.
जेवढे जास्त भाजले जाते, ज्यावर अग्निसंस्कार जास्ती, तेवढे त्यातील पाणी कमी होत जाते. पाणी कमी तेवढे टिकाऊ.
भाकरी जास्त दिवस टिकली कारण पाणी एकदम कमी केले गेले. भाकरी दोन वेळा भाजली जाते, शिवाय भाकरीत तेलही घातले नाही, त्यामुळे ती आणखीनच सुकी, खडखडीत होते. टिकते.
म्हणून आपला वैश्विक सिद्धांत परत सिद्ध होतो, ज्या पदार्थात पाणी जास्ती तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकावू.
शरीराचे देखील तसेच आहे. गरजेपेक्षा पाणी जास्ती झाले तर जंतुसंसर्ग होणारच ! आधीच शरीरात पाणी जास्ती असते, त्यात गरज नसताना आणखी घेतले तर होईल ना लोच्या !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.12.2016
December 17, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग तीन
सगळं पटतंय हो, पण अहो इथे शहरात आम्हाला बसायला काय उभं रहायला पण जागा नाही, एवढी धान्य कुठे वाळवत बसायची ? शहरात प्लॅस्टिकच्या डब्यांना पर्यायच नाही हो ! गवत कुठून आणणार आणि मुडी कोण वळणार !
जरा प्रॅक्टीकल आयुर्वेद सांगता येणार नाही का ? असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी आजचा लेख.
धान्य टिकवण्यासाठी धान्यातील पाणी कमी करणे आणि त्यासाठी धान्यातील उष्णता वाढवणं महत्त्वाचे !
जर वाळवणं जमत नसेल तर धान्य भाजून ठेवावे. चुलीवर अथवा गॅसवर पण चालेल. पण मंद विस्तवावर शेकत शेकत भाजून घ्यावे. आणि आपोआपच थंड होऊ द्यावे.
भाजण्यासाठी पूर्वी मातीचे खापर वापरत असत. लोखंडी कढई असल्यास उत्तम. त्यात वाळू तापवून भाजल्यास अति उत्तम. वाळूमधे धान्य भाजून ठेवले तर सर्व धान्य एकाच वेळी चारही बाजूने नीट व्यवस्थित भाजले जाते. आणि टिकते. आताचे निर्लेप वगैरे, लेप असेपर्यंत कदाचित ठीक पण जरा ओरखडा आला तर विषासमान.
भाजून झाल्यावर वाळूमिश्रीत धान्यातील वाळू चाळणीने चाळून बाजूला काढली जाते.
भाजल्यानंतर पूर्ण थंड झाल्याशिवाय मात्र धान्य भरून ठेवू नये. भरताना डबा मात्र प्लॅस्टीकचा नको. टीन म्हणजे पत्र्याचा चालेल. स्वस्त मिळतो आणि चकचकीत दिसतो, म्हणून अॅल्युमिनियम पण नको.
काही औषधे सूर्याच्या थेट उष्णतेत वाळवून, संग्रहीत केली जातात, तर काही छायाशुष्क केली जातात. तर काही अति नाजुक छायाशुष्क करताना म्हणजे सावलीत वाळवताना देखील वर आच्छादन घातले जाते. म्हणजे त्या द्रव्यातील रस, गुण, स्वभाव, परिणाम इ. जसे हवेत तसे मिळू शकतात. अर्थात धान्य टिकवणे आणि औषध टिकवणे यासाठी पद्धतीमधे थोडा फरक पडतो, हे पण लक्षात घ्यावे.
सूर्याचे काम घरातील अग्नि करतो. अर्थात तेथे पाहिजे जातीचे, जेनु काम तेनु थाय, असे म्हणतात. सूर्य जे करेल ते इतर कोणीही करू शकणार नाही.
जे न देखे रवि, ते देखे कवि. म्हणजे जे सूर्य पाहू शकणार नाही, ते म्हणे कवि पाहू शकतो. कवि, पणती या अलंकारीक भाषा साहित्यामधे ठीक वाटतात, पण व्यवहारात सूर्याला पर्याय सूर्यच !
कांदा लसूण यासारख्या अन्नाला टिकवायचे असल्यास वाळवायची पद्धत वेगळी. तिथे इतर काही कामाचे नाही. थेट पडणारी सूर्यकिरणेच त्याला आवश्यक! तर कमळाच्या पाकळ्या किंवा केशर, गुलाब संरक्षित करायचे असल्यास झाकण घालून सावलीत वाळवावे लागेल.
धान्य टिकवण्यासाठी भारतात आणखी काही प्रतिनिधी द्रव्य वापरतात. ज्या द्रव्यांना सूर्यापासून निर्माण होणारी पर्यायी नावे आहेत, ती सर्व द्रव्ये (यापैकी एक ) धान्याच्या राशीत ठेवली तरी धान्य टिकून राहते. जसे बिब्बा, तिरफळे, हळकुंड, कढीपत्ता, लवंग, इ. तीक्ष्ण गंधी, उष्ण स्वभावी द्रव्ये वापरली जातात. काही ठिकाणी एरंडेल तेलासारखी द्रव्ये पण रक्षकाचे काम करतात.
काही ओली द्रव्ये सुरक्षित ठेवायची असल्यास तूप तेल मध यांचाही वापर करतात. आसव अरीष्ट टिकवायची असतील तर विशिष्ट लाकडांचे ड्रम बांधून घ्यावे लागतात. प्लॅस्टिकच्या ड्रममधे नाही. या ड्रमना आतून तूप, मध लावून घ्यायचे असते. औषधी द्रव्यांच्या धुरांनी तो ड्रम किंवा बरणी निर्जंतुक करायची असते. हे आमचे आपले आयुर्वेदीय शास्त्र ! (आताही फ्युमिगेशनच करतात की हो ! )
लोणची टिकवायची असतील तर फोडींच्यावर तेलाचा थर आला पाहिजे. हे पण एक शास्त्र आहे. ते घरातील आजीला, आईला माहिती होते. ते सुनेपर्यंत पोचले पाहिजे. एका पिढीतील हे ज्ञान पुढच्या पिढीला परंपरेने समजावून सांगणे, त्यातील गुण आणि दोष ओळखणे आणि त्यात स्वतःची वैज्ञानिक शुद्ध बुद्धी वापरणे महत्त्वाचे !
यालाच तर पिढीजात परंपरा म्हणतात. ज्या अनेक वर्षे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भारतात टिकून आहेत. आणि या अश्या पारंपारिक गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा, पाश्चात्य तज्ञ भारतात येतात. आणि शिकून जातात. आणि परत येऊन आम्हालाच आंग्ल भाषेत शिकवतात !
मेकाॅलेने तेच केले आणि आम्ही भुललो !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
15.05.2017
May 15, 2017
अकाल मृत्युहरणम
सर्वव्याधिविनाशनम,
विष्णु पादोदकं तीर्थं
जठरे धारयाम्यहम् ।।
तीर्थ ग्रहण करताना हा मंत्र म्हणतात. मंत्र म्हटलेलं पाणी आणि साधं पाणी यांचं केमिकल अॅनालेसिस कदाचित एकच येईल. पण आपण या एचटुओ मधे श्रद्धा निर्माण केली की, पाण्याचंच तीर्थ बनतं.
त्यासाठी आपला विचार भारतीय हवा. देवावर श्रद्धा हवी आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास हवा.
तसेच
अच्युतानंद गोविंद
नामोच्चरण भेषजात ।
नश्यन्ति सकला रोगाः
सत्यम् सत्यम् वदाम्यहम् ।।
हा श्लोकदेखील म्हणतात.
अन्न असो वा औषध, देवाचं नाव घ्यावं आणि निश्चिंत व्हावं.
मी परत परत खात्रीनं सांगतोय, असं श्लोककर्ता वारंवार बजावून सांगतोय, पण नाही पटत.
औषधं सर्व रोगानाम्
श्रद्धया हरिसेवनम असं वाग्भटाचार्यदेखील म्हणतात.
काही गोष्टींची कारणमिमांसा केली तरी बुद्धीच्या स्तरावर उत्तरे मिळत नाहीत. अनेक औषधे तयार करत असताना काही विशिष्ट श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणावेत, म्हणजे औषधाची कार्यकारी क्षमता वाढते.
याला अनुभवाशिवाय दुसरा वैज्ञानिक पुरावा काय देता येणार.
मी घेत असलेले अन्न किंवा औषध हे ईश्वरीय इच्छेने घेत आहे, माझे कर्तृत्व शून्य आहे. अशी मनाला सम किंवा शून्य स्थितीत आणून ठेवणारी अवस्था निर्माण करून जेव्हा अन्न वा औषध सेवन केले गेले तर त्याचे परिणाम सकारात्मक दिसतात, असे आजचे मानसोपचार तज्ज्ञ देखील म्हणतात.
हे केवळ भारतीय लोकच म्हणतात, असंही नाही, होमीयोपॅथीमधे पण आय ट्रीट, ही क्युयर्स असंच म्हणतात ना !
अगा म्या नाही केले असे माऊलींचे शब्द आहेत. असो.
अन्न सेवन करत असतानाची भावना महत्वाची असते. म्हणून अन्नसेवन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा.
यात आणखी एक भाव असतो, तुझेच तुजला अर्पण !
तूच तुझ्या शक्तीने तयार केलेले, तुझे अन्न मी तुला अर्पण करतो.
ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवाला आम्हीच बनवले आहे, आम्हीच निवृत्त केले आहे, अश्या विचारसरणीच्या मंडळींनी देखील त्या अज्ञात शक्तीला शरण जावे, आपण घास घेण्यापूर्वी हा विचार जरूर मनात निर्माण करावा.
आता नैवेद्यातील कर्मकांड.
वाढलेल्या पानाभोवती पाणी हातात घेऊन, ताटाभोवती डावीकडून ऊजवीकडे गोलाकार फिरवावे. आणि ताटातील चार सहा शीते बाहेर काढून ठेवावीत. पाण्याची ही गोलाकार रेषा ही ताटात येणाऱ्या सूक्ष्म जीवांसाठी जणुकाही लक्ष्मणरेषा तयार झाली. आता बाहेरील जीव ताटात येणार नाहीत, पण त्यांना सुद्धा आपल्यातील अन्नाचा भाग मिळावा, पाण्याच्या काढलेल्या रेषेवरून, अन्न शोधत येणार्या जंतुना पटकन अन्न मिळावे. म्हणून चित्राहुती.
असंही असू शकेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
11.09.2016
September 11, 2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 34
नैवेद्यम् समर्पयामी-भाग आठ
नैवेद्य दाखवताना देवाला घास भरवायचे. त्याचा मंत्र आहे, "नैवेद्यम् समर्पयामी." असे म्हणून घास भरवायचे. थोडं थांबून देवाला पाणी प्यायला द्यायचे. त्याचा एक मंत्र असा आहे. "नैवेद्यम् मध्येपानीयं समर्पयामी ! " असे म्हणून देवाला थोडे भरवून झाल्यावर मधेच, ताम्हनामधे एक पळी पाणी सोडावे. आणि पुनः देवाला सहा घास भरवायचे.
हे झाले कर्मकांड.
यात देहासाठी काय आहे ?
हे सर्व जेवायचे कसे पाणी कसे प्यावे याचे शुद्ध आयुर्वेदीय नियम आहेत. जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
आयुर्वेद मतानुसार पाणी जेवताना मधेमधेच प्यावे म्हणजे प्रकृती सम रहाते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने बारीक व्हायला होते,
आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाड व्हायला होते. अर्थात आपण कसे पाणी प्यावे, हे आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजेच वैद्य सल्ला महत्त्वाचा ! उगाच आपले आपल्यावर प्रयोग करू नयेत.
पण सर्वसाधारणपणे पाणी जेवताना मधे मधेच प्यावे, हा नियम आहे हे लक्षात ठेवावे. यासाठी हा नियम देवपूजेमध्ये देखील समाविष्ट केला गेलाय. "मध्ये पानीयं समर्पयामी....."
पाणी कोणी किती कसे आणि का प्यावे, याविषयी सविस्तर टीपा मागील वर्षीच येऊन गेल्या आहेत. पुनरूक्ती दोष टाळतो. फक्त एक उदाहरण सांगतो, नारळाचे दूध किंवा नारळाचा रस काढायचा असेल तर, नारळ वाटतानाच त्यामध्ये पाणी घालावे लागते. अन्यथा रस चांगला निघत नाही.
स्लॅब घालताना वाळू, सिमेंट, खडी, मिक्सरमध्ये एकत्र फिरवतानाच त्यात पुरेसे पाणी मिसळले जाते. अन्यथा लोखंडाच्या फ्रेममध्ये हे मिश्रण योग्य रितीने पसरलेच जाणार नाही. तसेच पाणी जेवता जेवता मधे मधे, स्वतःला आवश्यक असेल तेवढे, जरूर प्यावे. म्हणजे पुढे अन्नरस चांगला तयार होतो. कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, डायेटीशियन बोलली म्हणून, टीव्ही वर दाखवले म्हणून, अथवा कोणीतरी पाश्चात्य बुद्धीचा डाॅक्टर सांगतो म्हणून आपण आपल्या भारतीय भोजन परंपरा अजिबात बदलू नयेत. पारंपारिक आहार तसाच घ्यावा. आहाराचे जे अगदी साधे सोपे नियम आहेत, ते उगाच क्लीष्ट करून, शरीरामधे ताण वाढवणारे, चुकीचे नियम, चुकीच्या समर्थनासह करून, सोपे साधे जीवन कठीण करून, रोग वाढवून घेणे आहे.
त्यामुळे पाणी फक्त जेवतानाच प्यावे. तहान नसताना, अन्य वेळी अजिबात नको. अन्य वेळी जे पाणी प्यायचे ते फक्त तळहाताच्या मधे राहील एवढे पळीभरच प्यायचे असते, हा नियम देखील देवपूजेतील आचमनातून आपण शिकलो आहोत.
"मग बाकी सर्वजण पाणी जास्ती प्या" असं का सांगतात? ते त्यांनाच माहिती !!! आपल्याला तहान लागली की, स्वतःला तहान असेल तेवढे पाणी, आपणच ठरवून प्यायचे असते. एवढे लक्षात ठेवावे. बाकी विषय संपला.
तर देवपूजा करणे हे सर्व जीवनावश्यक नियम समजावून सांगणे आहे. हे दररोज सांगावे लागतात. नाहीतर आपली चंचल बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हे सर्व उपचार दररोजच्या पूजेमधेच समाविष्ट करून टाकले.
सततम् क्रिया अभ्यासः । एखादी क्रिया सतत केली गेली की ती अंगवळणी पडते.
आजीआजोबा, आईबाबा यांनी जे नियम ठरवले ते तसेच पाळायचे असतात. स्वतःच्या पाश्चात्य बुद्धीने त्यात बदल केला की, पुढील पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे भरपूर पाणी प्या, म्हणून एका वडील पिढीने सांगितल्यामुळे आताच्या पुढील पिढीमधे पाण्यामुळे होणारे प्रमेह, रक्तदाब, संधीवात, इ.इ. रोग वाढलेले दिसतात. हे "जनुकीय" बदल नाहीत तर जीवनशैलीतील बदल आहेत, जे आपण बदलवू शकतो. ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका जर सहवास आणि साहचर्याने जर पुढील पिढी करीत राहिली तर जनुकीय बदल न होता, चुकीची जीवनशैलीजन्य रोगांची संख्या मात्र वाढतेय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर पहातोय.
आपणाला हे सर्व बदलायचे आहे. रोग कमी करायचे आहेत. डायबेटीस रक्तदाब पीसीओडी थायराॅईड यावरील गोळ्या एकदा सुरू झाल्या की, त्या कायम स्वरूपात घ्याव्याच लागतात, हे धादांत खोटे गृहीतक, रोगाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकायच्या आहेत, जीवनशैलीतील दोष काढून टाकून, निरोगी, निरामय, निर्रौषध, जीवनशैली परत स्थापन करायची आहे. यासाठीच ही माझी देवपूजा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.06.2017
June 27, 2017
सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.
June 16, 2002
चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते.
म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते.
लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही.
ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे कळते.
एका लिंबाचे आठ भाग केल्यावर त्यातील एक भाग पानावर वाढून घ्यावा. हे प्रमाण आहे. हवाच असेल तर जास्तीचा आणखी एक भाग. पण अर्धे किंवा एक लिंबू एकावेळी घेतले गेले तर ? आणि असे रोज !!! नक्कीच त्याचा त्रास होणार. असे अति करणारे रूग्ण अवस्थेत लवकर येतात. यासाठी ग्रंथांचा आणि व्यवहाराचा तौलनिक अभ्यास असणे महत्वाचा आहे.
आंबट चवीमुळे पोटातील पाचक स्राव वाढतात. चिंच आठवली तरी तोंडाला पाणी सुटते. साहाजिकच भूकही वाढते.
वाताला शरीराबाहेर यायला मदत करणारा असतो. याला अनुलोमक असे म्हणतात. पण हा आंबट रस पित्ताला आणि कफाला थोडा वाढवतोच. लिंबाचे सरबत घेतले तर काही जणांना पित्त वाढल्याचे जाणवते, तर काही जणांना पित्त कमी झाल्यासारखे वाटते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते ना ! आंबट अति झाले तर रक्तपित्तासारखे आजार वाढतात.
ह्रदयाला हितकर असा हा आंबट रस अन्नपदार्थांची चवही वाढवतो. वरणभातावर पिळलेले लिंबू आठवतेय ना किंवा झणझणीत मिसळीवर पिळलेले लिंबू. व्वा! लिंबाचा वास येण्यासाठी मात्र लिंबू ताजेच हवे.ताज्या लिंबाच्या सालीतून येणारा विशिष्ट तेलाचा वास हा पण औषधी असतो. त्याची स्वतःची अशी वेगळी चव लागते. वरणभात असो वा मिसळपाव लिंबाशिवाय तृप्ती होत नाही. पूर्णत्व नाही.
ह.
आंबट चव ही तृप्ती करणारी सांगितली आहे.
अति प्रमाणात आंबट चव ही नुकसान करणारी असते. पेशींमधली बंधने लवकर मोकळी करतो. सैल करतो. त्यामुळे शरीराचा घट्टपणा निघून जातो. तेलाने ओषट झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून, लिंबाच्या साली वापरल्या जायच्या. किंवा जेवताना हाताला लागलेला तेलाचा कट जाण्यासाठी लिंबाची फोड बोटांना चोळली जाते, ती याच गुणाचा आधार घेऊन !
अतिसर्वत्र वर्जयेत !
आवडते म्हणून रोज पाणीपुरी खाणे, आंबट साॅस खाणे, आंबट चीज खाणे, व्हिनीगर घातलेले सूप पिणे, बाजारी लोणचे खाणे, इ.इ. हे काही रोगलक्षणे वाढवतात, ते या आंबट चवीच्या अतिरेक केल्यामुळे !
जास्त आंबट खाल्ले जात असेल तर डोळ्यांचे आजार, घश्याचे जीभेचे आजार, ताप येणे, चक्कर येणे, खाज येणे, सूज येणे, रक्ताचे कमी होणे, किंवा रक्तासंबंधी आजार वाढतात. अंगावर उष्णतेचे फोड येणे, पित्ताचे व्याधी असतील तर जरा जास्तच खबरदार असावे.
पण घाबरून जायचे कारण नाही, या आंबट पदार्थांचा वापर युक्तीने केला तर फायदा होतो. त्या युक्तीसाठी वैद्याचा सल्ला घ्यायलाच हवा.
आवडत असेल तर आंबटगोड खावे, पण फार आंबटशौकीन नसावे
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.11.2016
November 2, 2016
प्रत्येकाची गोधडी पण वेगळी. लहान बाळाकरीता तयार केलेली रंगीबेरंगी दुपटी म्हणजे या गोधडीचे जणु बाळच ! ही दुपटी नवीन साडी घेऊन शिवायचीच नसतात. ही साडी जुनी वापरलेलीच हवी. एका बाळासाठी वापरलेली दुपटीदेखील परत परत धुवुन पुढच्या बाळंतपणातदेखील वापरली जात होती.
February 7, 2018
हे जंगली फळ असल्याने ह्याला जंगलची काळी मैना म्हणतात.घनदाट काळ्या झुडपात हि पिकतात साधारणपणे डोंगराळ भागात.करवंदांची फळांच्या पुड्या घेऊन लोक हायवेच्या कडेला किंवा बाजारात बसतात.
करवंदे कच्ची असताना टणक,हिरवी,आंबट तुरट चवीची व उष्ण आणी पित्तकर व वातनाशक असतात.तर पिकलेली करवंदे जांभळी चवीला आंबट गोड व थंड आणी कफपित्त नाशक असतात.कच्ची करवंदे लोणचे करायला वापरतात.
आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या करवंदांचे लोणचे भुक वाढविते,खाल्लेल्या अन्नात पाचक स्त्राव मिसळून त्याचे चांगले पचन करविते.
२)पोटात पित्त वाढून आग होत असल्यास पिकलेली गोड करवंदे खावीत आराम पडतो.
३)गांधीलमाशी किंवा विषारी किडा चावल्यास करवंदे कुचकरून त्याची चटणी दंश झालेल्या भागी चोळावी.
४)पोपटामध्ये वात धरून पोट फुगले व दुंखु लागल्यास मुगाचे कढण करावे व त्यात ५ कच्ची करवंदे व १ मोठा चमचा दही घालून प्यावे फायदा होतो.
५)तोंडास रूची नसणे,तोंड बेचव होणे ह्यात ८-१० करवंदे चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावा तोंडाची चव सुधारते.
कच्ची करवंदे जास्त खाल्ल्यास पोटात आग होते तर पिकलेली करवंदे जास्त खाल्ल्यास पोट बिघडते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti