अकल्पित (भाग – 3)
Category:
कथा साहित्य - ललित“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. मी घाईघाईने उठून दरवाजा उघडला तो समोर राणीसाहेब, म्हणजे माझ्या सासूबाई! त्यांनी एकदम हंबरडा फोडला आणि माझ्या अंगावर खेकसून ओरडल्या, “ही! ही! चांडाळीण, पांढऱ्या पायाची अवदसा! हिने खाल्ले माझ्या पोराला. चल चालती हो माझ्या घरातून!” असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला ओढू लागल्या. लोकांनी त्यांना आवरले. खाली दिवाणखान्यातून प्रचंड रडारडीचा आवाज येत होता. मी अगदी भांबावून गेले. मला कळेना हा काय प्रकार आहे? जिन्यावरून धावत धावत खाली आले तर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीत सूर्यकांत राजेंना झाकून ठेवलेले! आसपास शिकारीला गेलेली सगळी मंडळी माना खाली घालून उभी!